संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंदेरी आणि सोनेरी काठाचा, आरशांनी सजवलेला घागरा लेवून निर्मला देवी उदयपूरच्या बागोर की हवेलीच्या रंगमंचावर अवतरतात. मुलगी तारा आणि इतर आठ जणींसोबत - ज्या सगळ्या एकमेकींच्या नात्यातल्या आहेत – त्या चारी, घूमर, भवाई आणि इतर काही नृत्य प्रकार सादर करू लागतात.

“रोज, त्याच ऊर्जेने नाचणं काही सोपं नाही,” त्या म्हणतात. जेव्हा तुम्ही तोंडात तलवार धरलेली असते, किंवा पेटता दिवा ठेवलेली कळशी तुमच्या डोक्यावर असते किंवा काचेच्या तुकड्यांवर तुमची पावलं थिरकत असतात आणि डोक्यावर घडे तोलत तुम्ही नाचत असता तेव्हा तर हे खचितच सोपं नाही. तरीही निर्मला आणि त्यांच्या चमूतल्या इतर स्त्रिया ज्यात तिची जाऊ सीमा देवी आणि सासू भमरी बाईदेखील आहेत – रोज संध्याकाळी हे करतायत. “माझी जाऊ डोक्यावर ११ घडे घेऊन नाचते आणि नाच संपतो तेव्हा ती नखशिखान्त घामाने डबडबलेली असते,” निर्मला सांगतात. “आणि तरीही चेहऱ्यावरचं हसू ढळत नाही आणि पुढच्या नृत्यासाठी तयार होण्यासाठी लगेच कपडे बदलायच्या खोलीत जाते.”

पण नाच करणाऱ्यांचा हा कमाद समुदाय (अनुसूचित जातीत समाविष्ट) सर्वात जास्त ओळखला जातो तो तेरा ताली नृत्यासाठी. हवेलीतल्या तासभराच्या नृत्यातला हा १०-१५ मिनिटाचा तुकडा या भागातले एक थोर पुरुष बाबा रामदेव यांना अर्पण केला जातो. या समुदायात अशी कथा सांगितली जाते की बाबा रामदेवांनी वंचितांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं.

चित्रफीत पहाः तेरा तालीः मंजिऱ्यांची तेरा नृत्यं

निर्मला देवी सांगतात की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्यांच्या समुदायातर्फे सादर केली जाणारी नृत्यं किंवा भजनं, तानपुरा, ढोलक आणि मंजिऱ्यांचा नाद, यातूनच या नृत्याचा जन्म झालाय. तेरा ताली सादर करताना दोरीने पाय, हात आणि पावलांवर मंजिरे बांधले जातात आणि १३ वेगवेगळ्या प्रकारे हे नृत्य केलं जातं.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातल्या पडारला गावी लहानगी निर्मला तिच्यासाठी तिच्या आईने तयार केलेले मंजिरे बांधून आईचा नाच पाहून हुबेहूब नाचायची. तिसरीत असताना त्यांनी आपल्या आजी-आजोबांबरोबर जत्रा, सण आणि मंदिरांच्या वाऱ्या करण्यासाठी म्हणून शाळा सोडली. हळू हळू त्या देखील एक उत्तम नर्तकी झाल्या आणि वयाच्या १२ व्या वर्षी पेटी आणि ढोलक वाजवून गायन सादर करणाऱ्या आपल्या आजोबांबरोबर त्यांनी अजमेरच्या पुष्कर मेळ्यात पहिल्यांदा रंगमंचावर नृत्य सादर केलं. त्या लोकगीतं देखील गायच्या. “मी काही गाणं शिकले नाहीये. आमचं सगळं कुटुंब एकत्र सणावाराला आणि पूजांमध्ये गायचो,” त्या सांगतात.

A girl is playing harmonium
PHOTO • Urja

पडद्यामागे, तारा आणि तिची आई निर्मलाः ‘एक दिवस असा यावा जेव्हा मी स्टेजवर आल्या आल्या लोकांनी माझ्या नावाचा घोष करावा’

वयाच्या १२ वर्षी निर्मलाच्या घरच्यांनी गोगुंदा तालुक्यातल्या धोल गावच्या पेटीवादक असणाऱ्या खेम दास कमादशी तिचं लग्न ठरवलं. १५ वर्षांची झाल्यानंतर ती त्याच्या घरी नांदायला गेली. त्यांचा मुलगा श्याम, आता १८ वर्षांचा आहे. मुलगी तारा कुमारी गर्भात असताना, नऊ महिने भरलेले असताना त्यांच्या पतीचं अपघातात निधन झालं. “ताराने तिच्या वडलांना पाहिलंही नाहीये. तिच्यासाठी केवळ मीच काय ते सर्वस्व आहे,” त्या सांगतात.

त्या काळी निर्मला आणि खेम दास इंदोरला राहत होते, तिथल्या हॉटेलमध्ये ते त्यांची कला सादर करायचे. खेम दास मृत्यू पावल्यानंतर निर्मलाच्या भावाने त्यांना अहमदाबादमध्ये बोलावून घेतलं. तिथे १२ वर्षं राहिल्यानंतर निर्मला आणि त्यांचं कुटुंब उदयपूरला परतलं, त्याला आता चार वर्षं झाली.

आता हे कुटुंब उदयपूरच्या जुन्या भागात एका जुन्या वास्तूत राहतं. पिचोला सरोवराच्या काठावर असलेल्या बागोर की हवेली या राज्य शासनाच्या अखत्यारीतील संग्रहालयातल्या कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या धरोहर फोक डान्स (लोक नृत्य) यांनी त्यांना हे घर मिळवून दिलं आहे.

बागोर की हवेलीमध्ये निर्मला आणि तारा यांना महिन्याला प्रत्येकी रु. ५,००० मिळतात. आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात उदयपूरमधल्या हॉटेल्समधून त्यांना कार्यक्रमांची निमंत्रणं येतात. या काळात त्यांची भरपूर लगबग सुरू असते. “आम्हाला [हॉटेलमधल्या] २-३ तासांच्या कार्यक्रमासाठी प्रत्येकी १००० रुपये मिळतात,” त्या सांगतात. आणि महिन्यातून त्यांना अशी पाच तरी निमंत्रणं असतात. “आणि जर कार्यक्रम दिल्लीत किंवा दूर कुठे असेल तर मग आम्हाला ३००० रुपये बिदागी मिळते,” तारा सांगते.

Two women are performing traditional Terah Taali dance Rajasthani dance
PHOTO • Urja
Women artists getting ready for Terah Taali dance
PHOTO • Urja

घडे, मंजिरे, तलवारी, दिवे आणि इतरही अनेक चीजवस्तूंसोबतचं नृत्य

या चमूतल्या अनेक जणी एका मध्यस्थामार्फत परदेशीही जाऊन आल्या आहेत. २०१४ साली महिनाभराच्या एका सफरीत निर्मलांनी १२ देशांमध्ये त्यांची कला सादर केली आहे. त्यांनी अशा दोन परदेशवाऱ्या केल्या आहेत.

नृत्याशिवाय तारा उदयपूरच्या सरकारी विद्यालयात ११ व्या इयत्तेत शिकत आहे. तिने ऐच्छिक विषयांमध्ये संगीत आणि चित्रकलेची निवड केली आहे. ती सांगते की तिने वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये कार्यक्रम केलेत. या गेष्टीचा तिच्या शिक्षकांना अभिमान वाटतो. पण वर्गातले काही जण मात्र तिच्या कलेकडे तुच्छतेने पाहतात. “मी जशी नाचते तसं नृत्य त्यांना जमत नाही. त्यांना कला कधीच समजणार नाही आणि ते आम्हाला कमीच लेखत राहतील. मी नाचत असते ना तेव्हा या सगळ्या कटकटी विसरून जाते, मग त्या घरातल्या असोत किंवा इतर कसल्या,” ती म्हणते.

ताराला गाण्यातही रस आहे. “मी मंचावर जावं आणि प्रेक्षकांनी केलेला माझ्या नावाचा घोष ऐकावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या वडलांचा आवाज माझ्या गळ्यात उतरलाय का कसं, हे काही मला माहित नाही पण माझ्या घरचे तसं म्हणतात. आणि मी जेव्हा विचार करते ना तेव्हा वाटतं की चांगली गायिका होणं तितकंसं काही अवघड नाही, मला जमेल ते,” ती सांगते.

A old women getting ready to perform Terah Taali dance
PHOTO • Urja
A old women performing traditional Terah Taali dance of Rajasthan
PHOTO • Urja

भमरी बाई, निर्मलाच्या सासूबाई आज वयाच्या सत्तरीतही नाचतायत पण आपली आई आजीएवढी म्हातारी झाल्यावर तिने नृत्य करू नये असं ताराला वाटतं

आपल्या मुलांनी शिकावं अशी निर्मलांची इच्छा आहे. त्यांचा मुलगा कला शाखेचं दूरस्थ शिक्षण घेतोय आणि त्याला व्यायामशाळेत प्रशिक्षक व्हायचंय. “ताराने नाच आणि गाणं करत रहावं मात्र तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर गोष्टी थोड्या सोप्या होतात,” निर्मला सांगतात. “मला गायला आवडतं पण सगळ्या ओळी लक्षात राहत नाहीत. मला लिहिता वाचता येत असतं तर मी कागदावरचं सहज वाचून गाऊ शकले असते.”

आणि तिथे ताराची अशी इच्छा आहे की तिच्या आईने आजीसारखं म्हातारपणी काम करू नये. “तिचं वय झालं की तिने मस्त घरी बसून आराम करावा, नवनवे कपडे घालावे आणि चांगलं चुंगलं खावं.”

पण निर्मला काही फार काळ रंगमंचापासून दूर राहू शकतील असं वाटत नाही. “दिवस तसा कंटाळवाणाच जातो,” त्या म्हणतात. “पण रंगमंचावर जायची वेळ आली ना, की मन कसं उचंबळून येतं.”

अनुवादः मेधा काळे

Urja

اورجا، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) کی سینئر اسسٹنٹ ایڈیٹر - ویڈیوہیں۔ بطور دستاویزی فلم ساز، وہ کاریگری، معاش اور ماحولیات کو کور کرنے میں دلچسپی لیتی ہیں۔ اورجا، پاری کی سوشل میڈیا ٹیم کے ساتھ بھی کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Urja
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے