“काय सांगायचं तुला, कंबरेचा काटा मोडलाय, आणि छातीचा हुंडा पुढे आलाय,” बिबाबाई त्यांच्या अवस्थेचं चपखल वर्णन करतात. “ओटीपोटच राहिलं नाहीये, पाठपोट एक झालंय. दोन तीन वर्षांपासून हे असंच आहे. डॉक्टर म्हणतात, हाडं पोकळ झालीयेत,” बिबाबाई शून्यात पाहत म्हणतात.

डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा अंधाऱ्या स्वयंपाकघरात आम्ही बसलो होतो. मुळशी तालुक्याच्या हडशी गावातलं त्यांचं नीट बांधलेलं, सहा खणाचं, पोटमाळा, ओसरी आणि पडवी असलेलं त्यांचं घर. घराच्या बाहेर पत्र्याची शेड असलेलं छोटंसं स्वयंपाकघर. बिबाबाई चुलीवर आदल्या रात्रीचा भात परतत होत्या. त्यांनी मला बसायला पाट दिला. आणि मग, जेव्हा सगळी भांडी गोळा करून त्या शेजारच्याच मोरीवर न्यायला म्हणून उठल्या तेव्हा नीट लक्षात आलं की बिबाबाई कंबरेतून पूर्ण वाकलेल्या आहेत. वाकल्या म्हणजे किती तर डोकं गुडघ्याला टेकेल इतक्या. उकिडवं बसल्या तर गुडघे कानाला चिकटतील इतक्या.

ठिसूळ झालेली हाडं आणि गेल्या २५ वर्षांत झालेली चार मोठ्या शस्त्रक्रियांचा हा परिणाम. नसबंदी, हर्निया, गर्भाशय काढण्याची आणि आणखी एक ज्यात आतड्याचा काही भाग, पोटातली चरबी आणि स्नायूदेखील काढले गेले.

“माझं लग्न लई लवकर झालं, बघ. मी नुकतीच शहाणी झाले होते. लग्नानंतर पाच वर्ष मूल नव्हतं,” बिबाबाई सांगतात. त्यांनी शाळा पाहिलीच नाहीये. त्यांचे पती महिपती लोयरे ऊर्फ अप्पा त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून निवृत्त झाले. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अप्पांनी शिक्षक म्हणून काम केलंय. लोयरे कुटुंबाची थोडी फार जमीन आहे ज्यात ते भात, हरभरा आणि कडधान्यं घेतात. घरी बैलजोडी आहे, एक म्हैस, गाय आणि तिची कालवड अशी जनावरं आहेत. दुधाचा थोडा फार पैसा येतो. आणि अप्पांची पेन्शनही येते.

“माझी सगळी बाळंतपणं माहेरातच झाली,” बिबाबाई सांगतात. त्यांचा पहिला मुलगा झाला तेव्हा त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. “दिवस भरले होते, बैलगाडी जुंपून डोंगरापलिकडच्या माहेराकडे निघालो होतो. पक्का रस्ता नाही, जायला यायला वाहन नाही, काही नाही आन् गाडीतच जोरात कळा यायला लागल्या. पाणमोट फुटली. कळा थांबेनात. मग काय, तिथे गाडीतच बाळंत झाले!” बिबाबाई तेव्हाच्या आठवणी सांगतात. मायांगाला चिरा गेल्या त्यामुळे नंतर टाके घालायला लागल्याचं त्यांना आठवतं. कुठे ते मात्र ध्यानात नाही.

'My back is broken and my rib cage is protruding. My abdomen is sunken, my stomach and back have come together...'
PHOTO • Medha Kale

‘कंबरेचा काटा मोडलाय, आणि छातीचा हुंडा पुढे आलाय. ओटीपोटच राहिलं नाहीये, पाठपोट एक झालंय...’

दुसऱ्या खेपेला सातव्या महिन्यातच पोट दुखायला लागलं होतं. जवळच्या कोळवणच्या दवाखान्यात तपासणी केल्यावर कळलं की गर्भाची वाढ कमी आहे. बिबाबाईंच्या अंगात रक्त कमी होतं. रक्तवाढीच्या गोळ्या आणि गर्भाची वाढ व्हावी म्हणून १२ इंजेक्शनं घेतल्याचं त्यांना आठवतं. त्यानंतर पूर्ण दिवस भरल्यावर मुलगी झाली. “पण काहीच रडू नाही-कुकू नाही. नुसती शांत. तिला शी-शू काहीही समजायचं नाही. पाळण्यात टाकली तर आढ्याकडे पाहत बसायची. थोड्याच दिवसात आम्हाला कळलं की तिला बुद्धी नाही,” बिबाबाई सांगतात. तीच सविता आता ३६ वर्षांची आहे. पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या दाखल्यानुसार ती मतिमंद आहे. सविता शेतातलं, घरातलं सगळं काम करते.

सविताच्या जन्मानंतर बिबाबाईंना आणखी दोन मुलं झाली. सगळ्यात धाकटा मुलगा जन्मला, त्याला टाळू नव्हती. “तोंडात दूध घातलं की नाकातून बाहेर यायचं,” बिबाबाई सांगतात. “उपचारासाठी २०,००० रुपये खर्च येईल असं कोळवणच्या खाजगी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण कसं असतं, तेव्हा एकत्र कुटुंब होतं. सासरा किंवा मोठा दीर सगळं ठरवायचे. कुणी काही साथ दिली नाही. महिन्याभारत ते बाळ वारलं.” बिबाबाईंचा आवाज कातर होतो.

त्यांचा मोठा मुलगा शेताचं सगळं काम पाहतो आणि धाकटा पुण्यामध्ये लिफ्ट दुरुस्तीची कामं करतो.

चौथ्या मुलाचं असं झाल्यानंतर मग बिबाबाईंनी हडशीपासून ५० किलोमीटरवर पुण्याच्या एका खाजगी दवाखान्यात नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं. तेव्हा त्या तिशीला पोचल्या होत्या. त्यांच्या दिरानेच हा सगळा खर्च केल्याचं त्या सांगतात. पण तपशील काही त्यांना सांगता येत नाहीत. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही वर्षांत पोटाच्या डाव्या बाजूला पोट फुगायला लागलं आणि त्यांना पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. बिबाबाईंच्या मते फक्त ‘वायुगोळा’ होता पण डॉक्टरांनी हर्नियाचं निदान केलं. पुण्यात खाजगी दवाखान्यात ऑपरेशन झालं. पुतण्याने सगळा खर्च केला, किती ते काही त्या सांगू शकल्या नाहीत.

Bibabai resumed strenuous farm labour soon after a hysterectomy, with no belt to support her abdominal muscles
PHOTO • Medha Kale

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कंबरेच्या स्नायूंना आधार म्हणून पट्टाही नाही आणि लगेचच बिबाबाई लगेच शेतात कामाला जायला लागल्या

त्यानंतर चाळिशीच्या सुमारास बिबाबाईंच्या अंगावरून जायला लागलं, पाळीत पण खूप जास्त रक्तस्राव व्हायला लागला. “इतकं जास्त जायचं, की शेतात काम करताना रक्ताच्या गाठी पडायच्या. मी तिथंच त्याच्यावर मातीचा ढेकूळ सारायचे,” त्या सांगतात. हे असं सगळं दोन वर्षांहून जास्त काळ सहन केल्यानंतर, बिबाबाईंनी कोळवणच्या खाजगी दवाखान्यात तपासणी करून घेतली. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की गर्भाशय खराब झालंय (पिशवी नासलीये) आणि लगेच काढावी लागेल.

तर मग, वयाच्या चाळिशीत, पुण्यातल्या एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात त्यांची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली. आठवडाभर त्या जनरल वॉर्डात होत्या. “पिशवी काढल्यानंतर डॉक्टरांनी [पोटाच्या स्नायूंना आधार मिळण्यासाठी] पोटाला पट्टा बांधायला सांगितला होता. पण तेव्हा घरच्यांनी आणून दिला नाही,” बिबाबाई सांगतात. कोण जाणे, त्यांना त्याचं महत्त्व कळलं नसावं. पट्टा तर नाहीच त्यांना पुरेशी विश्रांतीही मिळाली नाही आणि शेतातलं काम लगेचच सुरू झालं.

शस्त्रक्रियेनंतर १ ते ६ महिने जड काम करू नका असा सल्ला बायांना दिला जातो, पण शेतीत काम करणाऱ्या स्त्रियांना “इतका काळ विश्रांती घेण्याची चैन परवडत नाही” आणि त्यामुळे बहुतेक करून त्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच कामाला लागतात असं एक शोधनिबंध सांगतो. इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ सोशल सायन्सेसच्या एप्रिल २०१५ च्या अंकातला नीलांगी सरदेशपांडे यांनी लिहिलेला हा शोधनिबंध पाळी जाण्याआधी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांसंबंधी केलेल्या संशोधनावर आधारित आहे.

नंतर त्यांच्या लेकांनी आणले दोन पट्टे, पण “आता ओटीपोटच राहिलं नाहीये, त्यामुळे पट्टा बसत नाही,” बिबाबाई सांगतात. गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन वर्षांनी बिबाबाईंचं आणखी एक ऑपरेशन झालं, तेही पुण्याच्या आणखी एका खाजगी दवाखान्यात. “या वेळी,” त्या सांगतात, “आतडी सुद्धा [काही भाग] काढून टाकली.” आपल्या वऊवार लुगड्याचं केळं थोडं खाली करून पाठीला चिकटलेलं, पूर्ण सपाट झालेलं पोट दाखवतात. मांस नाही, स्नायू नाहीत. फक्त सुरकुतलेली गोळा झालेली त्वचा.

बिबाबाईंना या ऑपरेशनबद्दल नीटसं काही आठवत नाही. ते का करावं लागलं. काय झालं होतं असे तपशील त्या स्पष्ट सांगू शकत नाहीत. पण सरदेशपांडेंच्या निबंधात असं म्हटलंय की बऱ्याच वेळा गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्राशय, आतडी आणि मूत्रनलिकांना इजा पोचू शकते. या संशोधनात पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या ४४  स्त्रियांच्या मुलाखती घेण्यात आल्या, ज्यांची पाळी जाण्याआधी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातल्या निम्म्या स्त्रियांनी शस्त्रक्रिया झाल्या झाल्या लघवी करायला त्रास होत असल्याचं आणि पोटात दुखत असल्याचं सांगितलं. अनेकींनी शस्त्रक्रियेनंतर अनेक दुखणी जडल्याचं सांगितलं आणि आधी होत असलेल्या पोटदुखीवर काहीच आराम पडला नसल्याचं सांगितलं.

Despite her health problems, Bibabai Loyare works hard at home (left) and on the farm, with her intellactually disabled daughter Savita's (right) help
PHOTO • Medha Kale
Despite her health problems, Bibabai Loyare works hard at home (left) and on the farm, with her intellactually disabled daughter Savita's (right) help
PHOTO • Medha Kale

इतकी सगळी दुखणी काढल्यानंतरही बिबाबाई लोयरे घरचं (डावीकडे) आणि शेतातलं काम अजूनही करतात, त्यांच्या मदतीला असते त्यांची मानसिक अपंगत्व असणारी मुलगी, सविता (उजवीकडे)

या सगळ्या दुखण्यांसोबत गेल्या गेल्या २-३ वर्षांत हाडं ठिसूळ होण्याची गंभीर समस्या निर्माण झालीये. गर्भाशय काढल्यानंतर पाळी लवकर थांबते आणि त्यामुळे अनेकदा संप्रेरकांचं संतुलन बिघडतं. या समस्येमुळे बिबाबाईंची पाठ पूर्णच वाकून गेलीये आणि कंबरेतून त्यांना ताठच होता येत नाहीये. अगदी झोपेतही. 'Oesteoporotic compression fractures with severe kyphosis' असं त्यांच्या स्थितीचं निदान झालंय आणि त्यांच्या गावापासून ४५ किलोमीटर लांब असणाऱ्या पिंपरी चिंचवड मनपा औद्योगिक नगरीतल्या चिखली इथल्या एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यानंतर त्या मला त्यांचे सगळे अहवाल असलेली एक पिशवी देतात. आयुष्यभराची दुखणी आणि आजारपणं पण त्या पिशवीत होते फक्त तीन कागद, एक क्ष-किरण अहवाल आणि औषधांच्या दुकानातल्या काही पावत्या. त्यानंतर त्या जपून एक प्लास्टिकचा डबा उघडतात आणि खूपच जास्त दुखायला लागलं तर आराम पडण्यासाठी घेत असलेल्या गोळ्यांची पट्टी मला दाखवतात. या एक प्रकारच्या स्टिरॉइडविरहित दाहशामक गोळ्या होत्या. एखाद्या दिवशी खूपच काम करायचं असेल, जसं की कणीचं अख्खं पोतं निवडायचं, तेव्हा त्या एखादी गोळी घेतात.

“खूप जास्त शारीरिक श्रम, या डोंगराळ भागात रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले काबडकष्ट आणि त्यात कुपोषण, या सगळ्यांचा स्त्रियांच्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतो,” डॉ. वैदेही नगरकर सांगतात. गेल्या २८ वर्षांपासून त्या हडशीपासून १५ किलोमीटरवर असणाऱ्या पौडमध्ये स्वतःचा दवाखाना चालवतायत. “आमच्याकडे येणाऱ्या स्त्रियांमध्ये काही बदल तर नक्कीच झालाय. प्रजनन आरोग्याच्या तक्रारींसाठी बायका दवाखान्यात येतात मात्र लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय, संधीवात आणि हाडं ठिसूळ होण्याच्या समस्यांवर मात्र अजूनही उपचार घेतले जात नाहीत.”

“आणि खरं तर शेतातलं काम सक्षमपणे व्हावं यासाठी हाडांचं स्वास्थ्य फार मोलाचं आहे. पण या पैलूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं, खास करून वयस्क लोकांमध्ये तर जास्तच.”

The rural hospital in Paud village is 15 kilometres from Hadashi, where public health infrastructure is scarce
PHOTO • Medha Kale

हडशीहून पौडमधलं ग्रामीण रुग्णालय १५ किलोमीटरवर आहे, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा या भागात विरळ आणि अपुऱ्या आहेत

आपल्याला इतका सगळा त्रास का सहन करावा लागला हे बिबाबाईंना माहितीयेः “[२० वर्षांपूर्वी] कामच लई असायचं बघ. घरी आम्ही दोघी जावा होतो, सकाळी रानात गेलं की रात्रीच आम्ही परत यायचो. शेणाच्या सात सात पाट्या डोंगराकडे नेऊन टाकायला लागायच्या. विहिरावरून पाणी भरून आणावं लागायचं...”

आतादेखील, त्यांचा मोठा मुलगा आणि सून शेतात काम करतो त्याला होईल तितकी मदत करतात. “कसंय बघ, शेतकऱ्याच्या घराला आराम माहितच नाही. बाईला तर नाहीच, गरोदर असो किंवा आजारी.”

९३६ लोकसंख्या असलेल्या हडशीच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य सेवा फारच तुटपुंजी आहे. जवळचं उप-केंद्र कोळवणला आहे आणि जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र कुळे इथे, ११ किलोमीटरवर आहे. इतकी वर्षं बिबाबाईंनी सगळे उपचार केवळ खाजगी डॉक्टरांकडे आणि खाजगी दवाखान्यात का घेतले याचं उत्तर काही अंशी या वास्तवात दडलेलं असावं – अर्थात कुठे आणि कुणाकडे उपचार घ्यायचे याचे सगळे निर्णय कायम बिबाबाईंच्या एकत्र कुटुंबातल्या पुरुषांनीच घेतले आहेत.

बिबाबाईंचा भगत-देवऋष्यांवर फारसा कधीच विश्वास नव्हता महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या स्थितीच्या हे जरा विपरितच. आतापर्यंत त्यांना एकदाच देवऋष्याकडे नेलं होतं. “लहान लेकरू असल्यासारखं परातीत बसवून मला अंघोळ करायला लावली होती. ते काही आपल्या मनाला पटलं नाही. तेव्हापासून परत कधी काही बाहेरचं पाहिलं नाही,” त्या सांगतात. आधुनिक वैद्यकावरचा त्यांचा हा विश्वास अपवादच मानायला हवा. त्यांचे पती शिकलेले होते, शाळेत शिक्षक होते, त्याच्यामुळेही असेल कदाचित.

तर अप्पांच्या औषधाची वेळ झालीये आणि ते बिबाबाईंना हाक मारतात. निवृत्त होण्याच्या दोन वर्षं आधी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानंतर गेली १६ वर्षं ते अंथरुणाला खिळल्यासारखे आहेत. त्यांना बोलता येत नाही, स्वतःचं स्वतः खाता येत नाही, फारशी हालचालही करता येत नाही. कधी कधी ते उठून रखडत दारापर्यंत जातात. मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले तेव्हा अप्पा बिबाबाईंवर रुसले होते कारण बोलण्याच्या नादात त्यांची औषधाची वेळ होऊन गेली.

अप्पांना त्या दिवसातून तीन-चार वेळा आमटी किंवा दुधात चपाती किंवा भाकर कुस्करून देतात, अंगात सोडियमचं प्रमाण कमी झालंय म्हणून मिठाचं दोन घोट पाणी पाजतात, असं सगळं गेली १६ वर्षं वेळेवर आणि प्रेमाने करतायत, आपली दुखणी बाजूला ठेवून. आपल्याला जितकं शक्य आहे तितकं काम त्या शेतात आणि घरातही करतात. आणि इतक्या वर्षांचे काबाडकष्ट आणि आजारपणांनंतरही, त्या म्हणतात तसं, शेतकऱ्याच्या घरात बाईला आराम माहित नसतो.

Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے
Illustration : Priyanka Borar

پرینکا بورار نئے میڈیا کی ایک آرٹسٹ ہیں جو معنی اور اظہار کی نئی شکلوں کو تلاش کرنے کے لیے تکنیک کا تجربہ کر رہی ہیں۔ وہ سیکھنے اور کھیلنے کے لیے تجربات کو ڈیزائن کرتی ہیں، باہم مربوط میڈیا کے ساتھ ہاتھ آزماتی ہیں، اور روایتی قلم اور کاغذ کے ساتھ بھی آسانی محسوس کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Priyanka Borar
Series Editor : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی