समिताच्या चाळीतून जवळपासच्या अपार्टमेंटमध्ये आता कपड्यांच्या बोचक्यांची ने-आण थांबली आहे. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ती दररोज सकाळी वाडा शहराच्या अशोकवन कॉम्प्लेक्समधून कपड्यांचे गठ्ठे घेऊन यायची. हातात आणि डोक्यावर कपड्याची बोचकी घेऊन दोन किलोमीटर चालत ती वाड्यातल्याच भानुशाली चाळीत आपल्या घरी परत यायची. तिथे कपड्यांना इस्त्री करून नीट घड्या घालून ती त्याच दिवशी संध्याकाळी ती त्या त्या घरी कपडे पोचवून यायची.
“टाळेबंदी लागली आणि माझ्या ऑर्डरच थांबल्या,” ३२ वर्षांची समिता मोरे सांगते. ऑर्डर म्हणजे इस्त्रीसाठीचे कपडे. २४ मार्च रोजी टाळेबंदी लागण्याआधी समिताला रोज किमान चार ऑर्डर मिळायच्या आणि आता मात्र आठवड्याला कशाबशा दोन मिळतायत. समिता एका शर्ट किंवा पँटचे पाच आणि साडीचे ३० रुपये घेते. दिवसाला १५०-२०० रुपयांची तिची कमाई एप्रिल महिन्यात आठवड्याला १०० रुपये इतकी घसरली होती. “एवढ्या पैशात कसं भागायचं?” ती विचारते.
समिताचे पती संतोष, वय ४८ रिक्षा चालवायचे. पण २००५ साली वाड्याजवळ ते टेम्पो चालवत असताना कुणी तरी दगड भिरकावला आणि त्यांचा एक डोळा गेला. “मी माझ्या बायकोला इस्त्री करायला मदत करतो, कारण माझ्याजोगतं दुसरं कोणतंच काम नाही,” ते म्हणतात. “रोज चार तास उभ्याने इस्त्री करून पायाला रग लागते.”
गेली १५ वर्षं समिता आणि संतोष इस्त्रीचं काम करतायत. “त्यांचा अपघात झाला त्यानंतर पोरांचा शाळेचा खर्च होता, रोजचं खाणं-पिणं सगळ्यालाच पैसा लागणार. म्हणून मी हे काम सुरू केलं,” समिता सांगते. “पण ही टाळेबंदी आमच्या जिवावरच उठलीये.” या कुटुंबाकडे जी काही थोडी फार बचत होती ती गेल्या काही आठवड्यात संपत आलीये. त्यामुळे त्यांनी किराणा आणण्यासाठी आणि ९०० रुपये वीजबिल भरण्यासाठी म्हणून नातेवाइकांकडून ४,००० रुपये उसने घेतले आहेत.
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या वाडा शहरात समिता राहते त्याच गल्लीत पुढे ४५ वर्षांच्या अनिता राऊत राहतात. त्यादेखील इस्त्री करून संसार चालवतात. “सहा वर्षांपूर्वी माझे पती वारले, पण तेव्हाही मी कसं तरी भागवलं. पण या टाळेबंदीत माझा धंदा पूर्णच ठप्प झालाय,” त्या सांगतात. अनितांचे पती, अशोक, चाळिशीचे होते जेव्हा ते पक्षाघाताच्या झटक्याने वारले.
अनिता त्यांच्या मुलासोबत राहतात. १८ वर्षांचा भूषण त्यांना इस्त्रीच्या कामात मदत करतो. “माझे पती, सासरे आणि आजेसासरे, सगळे हेच काम करायचे,” अनिता सांगतात. त्या परीट आहेत ज्यांची नोंद इतर मागासवर्गीयांमध्ये होते. (आधी उल्लेख केलेली इतर कुटुंबं मराठा किंवा इतर मागासवर्गात मोडतात.) “रोज ५-६ तास उभ्याने इस्त्री करून तिचे पाय सुजतात. मग ते काम मी हाती घेतो आणि शहरात मीच घरोघरी कपडे पोचवून येतो,” भूषण सांगतो. तो वाड्यातल्या एका कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीमध्ये शिकतोय.
“सध्या [एप्रिल-जून] लगीनसराई आहे त्यामुळे आम्हाला साड्या आणि ड्रेसची इस्त्रीची भरपूर कामं मिळतात. पण आता सगळी लग्नंच रहित झालीये त्या विषाणूमुळे,” अनिता सांगतात. उघड्या नाल्या असलेल्या चिंचोळ्या गल्लीतल्या त्यांच्या एका खोलीचं भाडं १,५०० रुपये आहे. “गेल्या वर्षी रोजखर्चासाठी मला माझ्या बहिणीकडून पैसे उसने घ्यावे लागले होते,” त्या सांगतात. तसंच अशोक यांना झटका आल्यानंतर दवाखान्यात भरती केलं तेव्हादेखील त्यांनी आपल्या बहिणीकडून कर्जाने पैसे घेतले होते. “मी या महिन्यात पैसे परत करायचं कबूल केलं होतं पण धंदाच बंद पडलाय. आता मी तिचे पैसे परत कसे करणार?” त्या विचारतात.
४७ वर्षीय अनिल दुरगुडेंनाही एप्रिल ते जून या काळात थोडी जास्तीची कमाई होईल अशी आशा होती. त्यांच्या उजव्या पायाला व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास आहे. अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांच्या भिंती किंवा झडपा कमजोर झाल्याने हा त्रास उद्भवतो. त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पैशाची गरज आहे. “गेली दोन वर्षं मला हा त्रास आहे. इथून २५ किलोमीटरवर एका खाजगी दवाखान्यात त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ७०,००० रुपये खर्च होणार आहे.
“पण या टाळेबंदीमुळे माझा धंदाच बंद पडलाय,” अनिल सांगतात. त्यांचा पाय सारखा दुखत असतो. “मला इस्त्रीसाठी दिवसातले किमान सहा तास तरी उभं रहावं लागतं. माझ्याकडे सायकल नाही त्यामुळे गिऱ्हाइक माझ्या घरी कपडे आणून देतात आणि मी त्यांना कधी घेऊन जायचे त्याची वेळ देतो.” टाळेबंदी लागण्याआधी अनिल महिन्याला ४,००० रुपये कमवत होते. मात्र गेल्या दोन महिन्यात त्यांची कमाई १००० -१५०० रुपये इतकीच झाली आहे, आता त्यांची सगळी भिस्त त्यांच्या बचतीवर आहे.
“माझी बायको आहे ना नम्रता, तिला इस्त्रीची धग सहन होत नाही. त्यामुळे ती घरचं सगळं काम करते आणि ऑर्डरींचा सगळा हिशोब ठेवते. आम्हाला मूल नाही पण माझा भाऊ वारलाय, त्याची दोघं मुलं आमच्यापाशीच असतात. माझा धाकटा भाऊदेखील काही वर्षांमागे अपघातात वारला,” अनिल सांगतात. या दोघा मुलांची आई शिलाई करते. तिला महिन्याला ५,००० रुपये मिळतात त्यालाही टाळेबंदीचा फटका बसला आहे. “ही टाळेबंदी का लावलीये त्यामागची कारणंच आम्हाला पूर्ण समजली नाहीयेत, परत पूर्वीसारखं सगळं कधी होणार तेच माहित नाहीये,” अनिल म्हणतात. “आमची रोजची कमाई मात्र चाललीये.”
टाळेबंदीमुळे सुनील पाटेंचंही उत्पन्न कमी झालंय. २५ मार्चच्या आधी ते दिवसाला इस्त्री करून २०० रुपये कमवत होते आणि ‘महालक्ष्मी किराणा आणि जनरल स्टोअर्स’ या त्यांच्या दुकानातून डाळ, तांदूळ, तेल, बिस्किटं, साबण आणि इतर सामान विकून दिवसाचे ६५० रुपये कमाई होत होती. “आता माझी कमाई दिवसाला १००-२०० रुपयांवर घसरली आहे,” ते सांगतात.
२०१९ साली ऑक्टोबरमध्ये सुनील त्याची पत्नी आणि तीन मुलांसह वाड्याला रहायला आले. त्या आधी ते एका किराणा दुकानात १५० रुपये रोजावर मालकाच्या हाताखाली काम करायचे. “माझ्या बहिणीने मला वाड्यातल्या या दुकानाविषयी सांगितलं, त्यानंतर मी ६ लाखांचं कर्ज काढलं आणि हे दुकान विकत घेतलं,” ते सांगतात. स्वतःचं दुकान विकत घेण्याचा निर्णय त्यांच्यासाठी खूप मोठा होता. फार आशेने घेतलेला होता.
सुनील यांनी त्यांच्या दुकानाबाहेर इस्त्रीचं टेबल टाकलंय आणि टाळेबंदीच्या आधी दिवसाला त्यांच्याकडे ४-५ ऑर्डर असायच्या. “मी इस्त्रीचं काम सुरू केलं कारण त्यात नियमित पैसा मिळतो. दुकानही आहेच, पण त्यात कधी कधी आमची कमाई होते, कधी कधी नाही.”
४८ वर्षीय अंजू म्हणतात, “मला त्यांना इस्त्रीत मदत करावीशी वाटते पण मी दोन तासाहून जास्त काळ उभी राहिले तर माझी पाठ भरून येते. त्यामुळे मग मी दुकान चालवायला हातभार लावते. सध्या आम्हाला फक्त तीन तास [सकाळी ९ ते १२] दुकान उघडायला परवानगी आहे. आज तर मी फक्त पारले जीचे दोन पुडे विकलेत. गिऱ्हाइक आलं जरी, तरी त्यांना काय विकणार? तुम्हीच पहा, दुकान रिकामं पडलंय.” या दुकानात, महालक्ष्मीमध्ये टाळेबंदीच्या आधीचा काही माल आहे पण कप्प्यांवर फारशा वस्तू नाहीत. “माल विकत आणायलाच पैसे नाहीयेत,” सुनील सांगतात.
त्यांची मुलगी सुविधा वाडा शहरात विद्यार्थ्यांसाठी शिकवणी घ्यायची, ज्यातून महिन्याला १,२०० रुपयांची भर पडायची. तेही आता थांबलंय. कारण शिकवण्या बंद झाल्या आहेत. “एप्रिलमध्ये सुविधाचा साखरपुडा ठरला होता, तोही आता पुढे ढकलावा लागलाय,” सुनील सांगतात. “मी लग्नाचा खर्च म्हणून ५०,००० रुपये दिले नाहीत तर व्याह्याने साखरपुडा रद्द करण्याची धमकी दिलीये. टाळेबंदीमुळे त्याचंही नुकसान झालंय.”
पाटील कुटुंबाचं रेशन कार्ड वाडा शहरात चालत नाही, त्यामुळे त्यांना बाजारातून गहू-तांदूळ विकत आणावा लागतो. आणि तेही जेव्हा त्यांच्या हातात नियमित पैसा येतो तेव्हाच
त्यांची दोघं मुलं, अनिकेत, वय २१ आणि साजन, वय २६ काम शोधतायत. “माझा थोरला मुलगा भिवंडीत एका कॅमेरा दुरुस्तीच्या दुकानात कामाला होता. पण [टाळेबंदीच्या आधी] त्यांचं दुकान बंद झालं. अनिकेतचं पदवीचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालंय,” सुनील सांगतात. “कधी कधी एवढं टेन्शन येतं, वाटतं जीव द्यावा. पण मग लक्षात येतं की आम्ही सगळे या संकटात एकमेकांच्या सोबत आहोत. शेजारीच एक नाभिक राहतो, त्याने तर गेल्या कित्येक दिवसांत रुपयाही कमावला नाहीये. त्यामुळे कधी कधी मी त्याला आमच्या दुकानातली बिस्किटं आणि [राहिलेली] डाळ देतो.”
पाटील कुटुंबाचं रेशन कार्ड वाडा शहरात चालत नाही कारण त्यांची नोंद भिवंडीमध्ये आहे. रेशनवर त्यांना २ रु. किलोने गहू आणि ३ रु. किलोने तांदूळ मिळाला असता. ते राहिलं, सुनील सांगतात, “बाजारात गव्हाला किलोमागे २० आणि तांदळाला ३० रुपये पडतायत.” आणि तेही कधी जेव्हा त्यांच्या हातात पैसा खेळत असतो तेव्हा. “दुकानातून काही कमाई झाली तर मी आठवड्यातून एकदा काही तरी किराणा आणू शकतोय. सध्या अशी गत आहे की ज्या दिवशी दुकान चालत नाही त्या दिवशी आम्ही दिवसातून एकदाच जेवतोय,” सुनील भरल्या डोळ्यांनी सांगतात.
इतर कुटुंबांनीही टाळेबंदीला तोंड देण्याचे मार्ग शोधून काढलेत. १ एप्रिल पासून अनिता शेजारच्या इमारतीत घरकामाला जायला लागल्या आहेत. त्याचे त्यांना महिन्याला १,००० रुपये मिळतात. “मी जर कामासाठी बाहेर पडले नाही तर आम्हाला खायलाच मिळणार नाही,” त्या म्हणतात. “मी जुन्या कापडाचा एक मास्क शिवलाय. कामाला जाताना मी तो घालते.”
अनिता आणि समिता दोघींच्या कुटुंबांना एप्रिल आणि मे महिन्यात प्रधान मंत्री जन धन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५०० रुपये मिळालेत. आणि मे महिन्यात (एप्रिलमध्ये मात्र नाही) त्यांना रेशन कार्डावरच्या ५ किलो व्यतिरिक्त माणशी ५ किलो जादा तांदूळ मिळाला आहे. समिता जमेल तसं कपड्याला इस्त्रीचं काम करतायत. “आता सध्या तरी टाळेबंदीत कुणी शर्ट-पँट घालून बाहेर पडत नाहीये, तरीही काम मिळणार असेल तर मी बाहेर पडते. माझीं मुलं म्हणतात की घराबाहेर जाऊ नको म्हणून, पण दुसरा काही पर्याय नाही हे त्यांना समजत नाही. कसं तरी करून पैसा तर कमवायलाच हवा ना,” समिता म्हणते.
कपडे आणून इस्त्री करून परत दिल्यानंतर ती साबणाने हात धुते – कसे ते तिच्या मुलाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून तिला सांगितलंय.
अनुवादः मेधा काळे