नाही हो. किशनजी त्या ट्रकच्या मागच्या दारातून (दारच म्हणायचं ना?) आत डोकावून काहीही पाहत नाहीयेत. तसंही हा ट्रक रिकामाच होता. उत्तर प्रदेशातल्या मोरादाबादच्या एका छोट्या बस्तीत गोदामात आताच त्यातनं माल उतरवला गेलाय.

किशनजी सत्तरी पार केलेले एक साधेसे फेरीवाले आहेत. आपल्या हातगाडीवर ते शेंगदाणे आणि घरीच तयार केलेले खारमुरे वगैरे इतर पदार्थ विकतात. “काही तरी राहिलं म्हणून मी जरा घरी गेलो,” ते आम्हाला सांगतात. “येऊन पाहतो तर हा भला मोठा ट्रक माझ्या गाडीवर चढलाय.”

झालं असं की या ट्रक ड्रायव्हरनी त्याचा ट्रक इथे उभा केला. ते करत असताना, गाडी मागे घेत असताना त्याचा ट्रक किशनजींच्या या लाडक्या गाडीला लागला. लागला कसला, गाडीवर चढलाच. आपला ट्रक तिथे उभा करत असताना अर्थातच त्याने गाडीला धक्का लागतोय का हे पाहण्याचे कष्टही घेतले नाहीत. आणि नंतर तो ड्रायव्हर आणि ट्रकचा क्लिनर उतरून निघूनसुद्धा गेले. मित्रांना भेटायचं असेल किंवा दुपारचं जेवण तरी करायचं असेल. ट्रकचा मागचा दरवाजा हातगाडीत अडकला होता, खरं तर हातगाडीवर बसल्यासारखाच दिसत होता. आणि किशनजी त्यातनं आपली गाडी सोडवण्याची खटपट करत होते. चष्मा घातलेले किशनजी ट्रकमध्ये डोकावून पाहत होते. नक्की काय आणि कसं अडकलंय त्याच्या शोधात.

ट्रक असा लावून त्याचा ड्रायव्हर आणि क्लिनर कुठे गायब झाले असावेत याचं आम्हाला कोडं पडलं होतं.  ड्रायव्हरता आणि क्लिनरचा पत्ता नसला तरी त्यांच्या बापजाद्यांचं कूळ मूळ मात्र सगळं काही त्यांनी काढलं. वाढत्या वयाने नजर अधू झाली असली तरी त्यांच्या जिभेची धार मात्र बिलकुल कमी झाली नव्हती.

आपल्या छोट्याशा हातगाडीवरून मालाची वाहतूक करणारे किशनजींसारखे शेकडो हजारो फेरीवाले भारतात आहेत. त्यांचा खराखुरा आकडा किती हे नक्की कुणालाच माहित नाही. १९९८ साली मी हा फोटो काढला, तेव्हाचा तर असा कुठलाही आकडा माझ्या माहितीत नाही. “गाडी घेऊन मला फार लांबवर चालत जाता येत नाही. म्हणून मी तीन-चार वस्त्यांमध्येच फिरतो,” ते सांगतात. त्यांचं म्हणणं होतं, “आज ८० रुपये जरी मिळाले – तरी दिवस चांगला गेला म्हणायचं.”

आम्ही त्यांची अडकलेली गाडी सोडवायला मदत केली. किशनजी गाडी हाकत लांबवर निघून गेले. त्यांच्याकडे पाहताना एकच विचार मनात आला, आज त्यांची ८० रुपयांची कमाई होवो आणि त्यांचा दिवस चांगला जावो.

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے