उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये लडाखच्या सुरू खोऱ्यात चैतन्य निर्माण होतं. हिरव्याकंच रानांमधून ओढे खळखळत वाहत असतात, हिमाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर रानफुलं डुलत असतात. आकाश निरभ्र आणि निळंभोर असतं. रात्रीच्या अंधारात दूधगंगासुद्धा डोळ्याला दिसू शकते.
या खोऱ्यातल्या कारगिल जिल्ह्यातली मुलं इथल्या पर्यावरणाशी अगदी एकरुप झालेली आहेत. २०२१ साली ताइ सुरू गावात मी हे फोटो काढले. इथल्या मुली कातळांवर चढतात, उन्हाळ्यात फुलं गोळा करतात, किंवा हिवाळ्यात बर्फाचे गोळे. आणि ओढ्यांमध्ये उड्या मारतात. जवाच्या शेतात खेळणं हा उन्हाळ्यातला त्यांचा सगळ्यात आवडता खेळ.
पर्यटकांची गर्दी असलेल्या लेहपासून कारगिल खूप दूर आहे आणि दुर्गम. लडाख जिल्ह्याचे हे दोनच जिल्हे आहेत.
अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की कारगिल काश्मीर खोऱ्यात आहे, पण मुळीच नाही. काश्मीरमध्ये सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे पण कारगिलमध्ये मात्र शिया इस्लामचा प्रभाव जास्त दिसून येतो.
सुरू खोऱ्यातल्या मुसलमानांसाठी कारगिल शहराच्या दक्षिणेकडे ७० किलोमीटरवर असलेल्या ताइ सुरू गावाचं धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. इथले लोक इस्लामी नववर्षाचा पहिला महिना मुहर्रम म्हणजे पैगंबराच्या नातवासाठी इमाम हुसैनसाठी शोक करण्याचा काळ असल्याचं मानतात.
मुहर्रममध्ये पाळण्यात येणाऱ्या अनेक विधींमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघंही सहभागी होतात. वेगवेगळ्या दिवशी जुलुस किंवा दस्ता काढतात. यातल्या सर्वात मोठा जुलूस अशुरा म्हणजेच मुहर्रमच्या दहाव्या दिवशी निघतो. याच दिवशी हुसैन आणि त्याच्या सैन्याचं करबलामध्ये शिरकाण करण्यात आलं असं मानलं जातं. काही तरुण स्वतःला साखळी आणि पात्यांनी वार करून घेतात (कमा जानी) आणि सगळेच आपला ऊर बडवतात (सीना जानी).
अशुराच्या आदल्या दिवशी स्त्रिया मस्जिदीपासून इमामबाड्यापर्यंत जुलूस काढतात आणि पूर्ण वाटेत मरसिया आणि नोहा (आक्रोश आणि विलाप) म्हणतात. या वर्षी अशुरा ७-८ ऑगस्ट रोजी येत आहे.
मुहर्रमदरम्यान इमामबाड्यात दिवसातून दोनदा मजलिस (धार्मिक संमेलन) होते. त्यामध्ये हुसैन आणि सोबत असणाऱ्यांचा संघर्ष आणि त्यागाच्या स्मृती जागवल्या जातात. इमामबाड्यात स्त्रिया आणि पुरुषांसाठी बसायला वेगवेगळ्या जागा असतात. पुरुष (आणि मुलगे) आणि स्त्रिया करबलाच्या युद्धाची आणि संबंधित संघर्षाची कथा आगाच्या तोंडून ऐकत असतात.
पण याच सभागृहाच्या वरच्या मजल्यावर जाळीच्या खिडक्या असणारा एक छज्जा आहे आणि तिथे मुलींनी ठाण मांडलंय. खाली काय चाललंय ते इथून अगदी छान दिसतं. याला म्हणतात, ‘पिंजरा’. बंदिस्त, घुसमट होणारी जागा असा जरी यातून अर्थ निघत असला तरी मुलींना मात्र ही जागी मजा करण्याची मोकळीक देते.
एक क्षण असा येतो की इमामबाड्यात विलाप अगदी टोकाला पोचतो, सगळं वातावरण एकदम गंभीर होतं. आणि मग या मुली देखील माना झुकवून रडू लागतात. पण काहीच क्षण. जास्त नाही.
मुहर्रम हा शोक व्यक्त करण्याचा महिना जरी असला तरी मुलांच्या जगात मात्र हा महिना म्हणजे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा काळ असतो. अगदी रात्री उशीरापर्यंत. काही तरुण मुलं स्वतःवर वार करू घेत असले तरी मुलींना मात्र यामध्ये भाग घ्यायला मनाई आहे. मुलींचं काम म्हणजे बाकी लोक काय करतात हे पाहणं.
बहुतेक वेळा काय होतं, लोकांना वाटतं मुहर्रम म्हणजे स्वतःवर वार करू रक्त काढत जाणाऱ्या तरुणांचे जुलूस. पण शोक किंवा विलाप करण्याची बायांची वेगळी रीत आहे – शांत पण दुःखावेगाने भरलेली.
अनुवादः मेधा काळे