तरुण असो की वृद्ध, आपल्‍या डोळ्यासमोर ग्रामीण भारतीय स्‍त्रीची एक साचेबद्ध प्रतिमा असते. पारंपरिक वेशभूषा, कमरेवर एक आणि डोक्‍यावर एक किंवा दोन पाण्‍याचे हंडे घेऊन तोल सांभाळत चालणारी स्‍त्री. हे पाणी तिने जिथून आणलेलं असतं, ती गावातली विहीर म्हणजे फक्‍त पाणवठा नसतो. गोल असो की चौकोनी, देखण्या किंवा साध्या, विहिरीभोवती अनेक कथा गुंफलेल्‍या असतात. कधी कुणाच्‍या घट्ट मैत्रीची ती साक्षीदार असते, तर कधी गावातल्‍या भानगडींची. जातीपातीच्‍या भेदभावांमुळे कोणी किती आणि कधी पाणी घ्यायचं, कोणी घ्यायचंच नाही, याबद्दलचे नियम आणि त्‍यावरून उसळलेले वादही तिच्‍याच भोवती विणले जात असतात.

उभ्या गावाला ‘जीवन’ देणारी ही विहीर गावात मनाविरुद्ध लग्‍न केलेल्‍या, सासुरवास सोसणार्‍या अनेकींना मात्र आपल्‍या दुःखाची सांगाती वाटत असते. काही क्षण का होईना, विसावा देत असते. या गीतात मात्र सांगाती असलेली ही विहीरही ‘ति’च्‍या विरोधात गेली आहे. जणू वैर्‍याच्‍या घरात तिला देणार्‍या तिच्‍याच कुटुंबातल्‍या पुरुषांची तिची तक्रार ऐकून घ्यायला आता कुणीही नाही.

आपल्‍या कुटुंबातल्‍या पुरुषांनी आपल्‍याशी मांडलेल्‍या वैराची तक्रार करणार्‍या, अंजारच्‍या शंकर बारोट यांनी गायलेल्‍या या गीतासारखी काही गीतं आजही वेगवेगळ्या विवाहविधींच्‍या वेळी आवर्जून गायली जातात.

अंजारच्‍या शंकर बारोट यांनी गायलेलं लोकगीत इथे ऐका

Gujarati

જીલણ તારા પાણી મને ખારા ઝેર લાગે મને ઝેર ઝેર લાગે
જીલણ તારા પાણી મને ઝેર ઝેર લાગે મને ખારા ઝેર લાગે
દાદો વેરી થયા’તા મને  વેરીયામાં દીધી, મારી ખબરું ન લીધી
જીલણ તારા પાણી મને ઝેર ઝેર લાગે મને ખારા ઝેર લાગે
કાકો મારો વેરી મને  વેરીયામાં દીધી, મારી ખબરું ન લીધી
જીલણ તારા પાણી મને ઝેર ઝેર લાગે મને ખારા ઝેર લાગે
મામો મારો વેરી મને  વેરીયામાં દીધી, મારી ખબરું ન લીધી
જીલણ તારા પાણી મને ઝેર ઝેર લાગે મને ખારા ઝેર લાગે
જીલણ તારા પાણી મને ઝેર ઝેર લાગે મને ખારા ઝેર લાગે

मराठी

विहिरी तुझं खारं पाणी जहरीलं, पाणी जहरीलंऑ
खारं पाणी हे जहरीलं, पाणी जहरीलं
आजा माझा वैरी, मला वैर्‍यालाच दिली
मागे वळून नाही माझी विचारपूस केली
काका माझा वैरी, मला वैर्‍यालाच दिली
मागे वळून नाही माझी विचारपूस केली
मामा माझा वैरी, मला वैर्‍यालाच दिली
मागे वळून नाही माझी विचारपूस केली
विहिरी तुझं खारं पाणी जहरीलं, पाणी जहरीलं

PHOTO • Labani Jangi


गीतप्रकार : पारंपरिक लोकगीत

श्रेणी : विवाहगीत

गीत :

शीर्षक : जीलण तारा पाणी, मने खारा ज़ेर लागे

संगीत : देवल मेहता

गायक : शंकर बारोट, अंजार

वाद्यसंगत : हार्मोनियम, ड्रम, बेंजो

ध्‍वनिमुद्रण : २०१२, केएमव्‍हीएस स्‍टुडिओ

सूरवाणी या कम्‍युनिटी रेडिओ स्‍टेशनने अशा ३४१ लोकगीतांचं ध्‍वनिमुद्रण केलं आहे. कच्छ महिला विकास संघटन (केएमव्‍हीएस) कडून ते पारीकडे आलं आहे

विशेष आभार : प्रीती सोनी, केएमव्‍हीएसच्‍या सचिव अरुणा ढोलकिया, केएमव्‍हीएसच्‍या प्रकल्‍प समन्‍वयक अमद समेजा आणि भारतीबेन गोर. या सगळ्यांनी केलेली मदत खूपच मोलाची होती

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

यांचे इतर लिखाण Pratishtha Pandya
Illustration : Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

यांचे इतर लिखाण Labani Jangi
Translator : Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

यांचे इतर लिखाण Vaishali Rode