"सुरूवातीपासूनच मी भजनांसोबत वादनाची साथ करत आलो आहे. लहानपणापासूनच मी ही  दोन वाद्यं वाजवतोय," ६० वर्षांचे प्रेमलाल आम्हाला सांगतात. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथे २०१९ साली डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवात त्यांची आमची भेट झाली.

प्रेमलाल वाजवतात ती दोन वाद्यं म्हणजे "रूबाब" आणि "खंजरी". त्यांच्या उजव्या खांद्यावर टांगलेलं तारवाद्य म्हणजे रुबाब (या वाद्याचा उदय मध्य अफगाणिस्तान मधे झाला असावा अशा बऱ्याच नोंदी आहेत). त्यांच्या डाव्या खांद्यावर अडकवलेलं आणि कमरेवर विसावलेलं छोटं चर्मवाद्य म्हणजे खंजरी (हे वाद्य चर्मवाद्यांच्या "डफ" या प्रकारात मोडत असावं.)

हेच आणि एवढंच आपलं पूर्ण नाव आहे असं ठामपणे सांगणारे प्रेमलाल हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामधील जगत या गावचे रहिवासी आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ब्रम्हौर तालुक्यातल्या या गावाची लोकसंख्या ९०० च्या आसपास होती. गावात रहाणारे जवळपास ६०टक्के लोक आदिवासी आहेत तर उरलेल्या ४० टक्क्यांपैकी बहुतांश रहिवासी दलित आहेत.

ही दोन्ही वाद्यं सोबत कशी वाजवतात याची छोटीशी झलक प्रेमलाल यांनी आम्हाला दाखवली (व्हिडीओ पहा). आपण स्वतः शेतकरीही असल्याचंही ते आवर्जून सांगतात. "हे वादन करतोच पण सोबत मी मका आणि राजम्याची शेतीही करतो," प्रेमलाल सांगतात.

चित्रफीत पहा: रूबाब आणि खंजरी ही वाद्ये वाजवणारे प्रेमलाल

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

यांचे इतर लिखाण पुरुषोत्तम ठाकूर
Translator : Rushikesh

ऋषीकेश भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथे समाजशास्त्र विषयाचे संशोधन अभ्यासक आहेत. भारतीय खेडेगावांमधील जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे.

यांचे इतर लिखाण Rushikesh