“देशासाठी मेडल जिंकायचंय एक दिवस, ऑलिंपिकला जाऊन,” वर्षा मोठ्या निर्धाराने तिचं स्वप्न सांगते. ती अजूनही धापा टाकतीये. आजचा सराव नुकताच संपलाय. चार तास कसोशीने ती डांबरी रस्त्यावर धावलीये. ती प्रशिक्षण घेत असलेली श्री स्वामी समर्थ अथलेटिक्स स्पोर्ट्स रेसिडेन्शिअल अकादमी त्याच रस्त्याला लागून आहे. रस्त्यावरची लहान-मोठी दगडं, रेती अनवाणी पायांनी तुडवल्यावर तिच्या थकलेल्या, दुखावलेल्या पायांना आता कुठे काहीसा विसावा मिळाला.

१३ वर्षांची वर्षा कदम लांब पल्ल्याची धावपटू आहे. असं अनवाणी सराव करणं काही छंद नाही तिच्यासाठी. “आई-बाबा बुटं नाय घेऊन देऊ शकत. लय महाग असतात ती धावायची बुटं. नाय परवडत,” वर्षा असहाय्यपणे म्हणते.

वर्षाची आई देवशाला आणि वडिल विष्णू मराठवाड्यातल्या दुष्काळी परभणी जिल्ह्यातले शेतमजूर. तिचं कुटुंब अनुसूचित जातीत मोडणाऱ्या मातंग समाजातलं.

“मला धावायला लय आवडतं,” तिच्या काळ्या-टपोऱ्या डोळ्यांमध्ये एक चमक दिसते. “बुलढाणा अर्बन फोरेस्ट मॅरेथॉन २०२१ ला झालं. ते माझं पहिलं मॅरेथॉन. दुसरी आली, कसलं भारी वाटलं व्हतं. मेडल बी मिळालं. अजून लय जिंकू वाटतं,” वर्षा निश्चयाने म्हणते.

तिच्या आई-वडिलांना तिची धावण्याची आवड ती अगदी आठ वर्षांची असतानाच जाणवली होती. “माझा मामा, पाराजी गायकवाड राज्य स्तरावरचा धावपटू. आर्मीत गेला. मामाला बघूनच मी शिकली धावायला,” वर्षा सांगू लागली. मामाकडून प्रेरणा घेत धावण्याची आवड निर्माण झाली. पुढे जाऊन २०१९ च्या राज्यस्तरीय पातळीवर आंतरशालेय चार किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत वर्षाने दुसरा क्रमांक पटकावला, “त्यामुळे विश्वास आला स्वत:वर की आपण धावू शकतो.”

arsha Kadam practicing on the tar road outside her village. This road used was her regular practice track before she joined the academy.
PHOTO • Jyoti Shinoli
Right: Varsha and her younger brother Shivam along with their parents Vishnu and Devshala
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडे: वर्षा कदम तिच्या गावाबाहेरील डांबरी रस्त्यावर सराव करताना. अकादमीत जाण्यापूर्वी हा रस्ता तिच्या नियमित सरावाचा मार्ग होता. उजवीकडे: वर्षा , तिचा धाकटा भाऊ शिवम आणि त्यांचे वडिल विष्णू आणि आई देवशाला

वर्षाची तिच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू होतच होती आणि मार्च २०२० ची करोनाची महामारी दारात येऊन उभी राहिली. “आमच्याकडं काय स्मार्टफोन नाही. ऑनलाईन काय जमलं नाय शाळेचं.” त्या दिवसांत पुस्तकी शाळा तिच्यासाठी बंद झाली होती. मग वर्षाने तिच्या पावलांना गतीचे धडे द्यायला सुरुवात केली. गावाबाहेर जाणाऱ्या पायवाटेवर ती रोज सकाळ-संध्याकाळ धावण्याचा जोमाने सराव करू लागली.

आणि मग ऑक्टोबर २०२० चा तो दिवस उजाडला, जेव्हा परभणीतल्या श्री स्वामी समर्थ अथलेटिक्स स्पोर्ट्स रेसिडेन्शिअल अकादमीमध्ये तिचा प्रवेश झाला. पिंपळगाव ठोंबरे गावाच्या हद्दीबाहेर असलेल्या या अकादमीत वर्षा औपचारिक पद्धतीने धावण्याचे प्रशिक्षण घेऊ लागली.

वर्षासोबत या अकादमीत सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबातली ८ मुलं आणि ५ मुली असे १३ धावपटू प्रशिक्षण घेतात. इथले काही खेळाडू विशेषतः बिकट स्थितीतील आदिवासी समाजाचेही (पीव्हीटीजी) आहेत. इथल्या काही मुलांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर कोणाचे पोटासाठी नेमाने स्थलांतर करणारे ऊसतोड कामगार, कोणी फक्त हातावर पोट असलेले मजूर. इथल्या प्रत्येक मुलाचं अस्थिर, रोजगारावर जगणारं कुटुंब दुष्काळी मराठवाड्याचा विदारक चेहरा आहे.

हे खेळाडू अकादमीमध्येच वर्षभर राहतात आणि परभणीतल्याच शाळेत आणि कॉलेजमध्येही शिकतात. सुट्ट्यांच्या दिवसांमध्येच ते त्यांच्या घरी जातात. “काही जणांची शाळा-कॉलेज सकाळची असते, काहींची दुपारी. त्यानुसार सरावाच्या वेळा ठरवल्या जातात,” अकादमीचे संस्थापक रवी रासकाटला सांगतात.

“इथल्या मुलांमध्ये खूप कौशल्य आहे, कुठल्याही खेळाचं. पण, जिथे दोन वेळेच्या जेवणाचे हाल आहेत, तिथे एखादा खेळ व्यायसायिकदृष्टीने आत्मसात करणं कठीण आहे त्यांच्यासाठी,” रवी सांगतात. २०२६ मध्ये अकादमी सुरू करण्याआधी रवी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक होते. “मी ठरवलं की अशा होतकरू धावपटूंना लहान वयापासूनच उत्तम आणि मोफत प्रशिक्षण द्यायचं,” ४९ वर्षांचे रवी सांगतात. त्यांच्या खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण, पोषण, बुटांसारख्या सोयी मिळाव्यात यासाठी ते कायमच प्रायोजकांच्या शोधात असतात.

बीड बायपास रोडला लागून निळ्या रंगाच्या पत्र्यांनी बनलेली अकादमी रोडवरून जाताना हमखास नजरेस पडते. धावपटू ज्योती गवतेंचे वडील शंकरराव यांच्या दीड एकरावर ही अकादमी उभी आहे. शंकरराव एसटीमध्ये शिपाई होते आणि आई लक्ष्मीबाई स्वयंपाकाची कामं करते.

Left: Five female athletes share a small tin room with three beds in the Shri Samarth Athletics Sports Residential Academy.
PHOTO • Jyoti Shinoli
Right: Eight male athletes share another room
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडे: श्री समर्थ अथलेटिक्स स्पोर्ट्स रेसिडेन्शिअल अकादमी तल्या तीन खाटा असलेल्या पत्र्याच्या एका खोलीत पाच धावपटू मुली राहतात . उजवीकडे: आठ धावपटू मुलांचा मुक्काम दुसऱ्या खोली त असतो

The tin structure of the academy stands in the middle of fields, adjacent to the Beed bypass road. Athletes from marginalised communities reside, study, and train here
PHOTO • Jyoti Shinoli

बीड बायपास रोडला लागून असलेल्या शेताच्या मध्यभागी , निळ्या रंगाच्या पत्र्याच्या भिंतींनी बनलेली अकादमी. उपेक्षित समुदायातील खेळाडू येथे राहतात , अभ्यास करतात आणि प्रशिक्षण घेतात

“आम्ही आधी पत्र्याच्या खोलीत राहायचो. स्पर्धेतून जिंकलेल्या पैशांची गुंतवणूक, बचत करून एक माळ्याचं पक्क घर बांधलं. भाऊ पण नीट कमवतोय, पोलिस कॉन्स्टेबल म्हणून,” ज्योती तिची संघर्षकथा सांगू लागते. तिने तिचं संपूर्ण आयुष्य धावण्यासाठीच समर्पित केलं आहे. तिच्या कुटुंबाच्या संमतीने त्यांची जमीन रवी सरांच्या अकादमीसाठी देण्याचं ठरवलं. “आमच्यात आपापसात समज आहे यावर.”

अकादमीमध्ये दोन मोठ्या खोल्या आहेत. साधारण १५ बाय २० फूटाची एक खोली. एका खोलीत पाच मुली राहतात. मदतीत मिळालेल्या तीन खाटा मुली समजुतीने वापरतात. तर मुलांच्या सिमेंट-रेतीने सारवलेल्या जमिनीवर गाद्या टाकलेल्या आहेत.

खोल्यांमध्ये ट्यूबलाईट आणि पंखे आहेत. क्वचितच पण वीज पुरवठा खंडित होत असतो. उन्हाळ्यात उष्णतेचा पारा ४२ डिग्री पर्यंत चढतो. तर हिवाळ्याच्या दिवसात १४ डिग्रीपर्यंत तापमान घसरते. अशा एकूणच प्रतिकूल वातावरणात खेळाडूंचं प्रशिक्षण सुरूच असतं.

वर्षासारख्या होतकरू खेळाडूंना, त्यांच्या खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी क्रीडा संकुलं, अकादमी, शिबिरांचं आयोजन, खेळांसाठीची गरजेच्या साधनांची, साहित्याची उपलब्धता करून देण्याचे महाराष्ट्र शासनाचे २०१२ चे क्रीडा धोरण आहे.

पण रवी सांगतात, “दहा वर्ष झाली धोरण येऊन, पण त्यातल्या तरतुदी कागदावरच आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी पाहायला मिळत नाही. शासन कुशल खेळाडूंना ओळख मिळवून देण्यास असमर्थ आहे. क्रीडा अधिकाऱ्यांमध्ये याविषयी उदासीनता आहे.”

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक खात्याने महाराष्ट्र क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीविषयी २०१७ साली अहवाल सादर केला होता. या अहवालात, क्रीडा धोरणातील तालुका पातळीपासून ते राज्य स्तरावरील पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदी पूर्णपणे राबवण्यात राज्य सरकार अपयशी असल्याचं नमूद करण्यात आले आहे.

Left: Boys showing the only strength training equipments that are available to them at the academy.
PHOTO • Jyoti Shinoli
Right: Many athletes cannot afford shoes and run the races barefoot. 'I bought my first pair in 2019. When I started, I had no shoes, but when I earned some prize money by winning marathons, I got these,' says Chhagan
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडेः अकादमीत उपलब्ध असलेली स्ट्रेंग्थ ट्रेनिंगसाठी वापरली जाणारी मोजकी उपकरणं. उजवीकडेः अनेक धावपटूंना बूट परवडत नसल्याने ते अनवाणी धावतात. ‘मी माझी पहिली बुटं २०१९ साली विकत घेतली. सुरुवातीला माझ्यापाशी बुटं नव्हती. मॅरेथॉन जिंकून बक्षिसाच्या रकमेतून मी घेतली,’ छगन सांगतो

Athletes practicing on the Beed bypass road. 'This road is not that busy but while running we still have to be careful of vehicles passing by,' says coach Ravi
PHOTO • Jyoti Shinoli

बीड बायपास रोडवर सराव कर णारे खेळाडू. ' हा रस्ता तितका गजबजलेला नाही , पण धावताना आम्हाला रस्त्यातल्या गाड्यांपासून सावध र हावं लाग तं ,' प्रशिक्षक रवी सांगतात

योजनेअंतर्गत या खेळाडूंना कोणते सहकार्य मिळत नसल्याने रवी यांना अकादमीचा रोजचा खर्च भागवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. बहुतांश खर्च हा रवी आपल्या खासगी प्रशिक्षणाच्या कामातून काढतात. “त्याशिवाय, माझे बरेच विद्यार्थी हे एलिट मॅरेथॉन धावपटू गटात पळणारे आहेत. त्यांना मिळणारी बक्षिसाची रक्कम ते अकादमीला देतात.”

आर्थिक अडचणी आणि सुविधा फारशा नसल्या तरी खेळाडूंच्या पौष्टिक आहाराची योग्यरित्या काळजी घेतली जाते. आठवड्यातून ३-४ वेळा जेवणात चिकन, माशांचा समावेश असतो. इतर वेळी हिरव्या पालेभाज्या, केळी, ज्वारी-बाजरीच्या भाकरी, मोड आलेली मटकी, मूग, हरभरा आणि अंडी असा एकंदरीत पोषक आहार खेळाडूंना दिला जातो.

दिनचर्येचं सांगायचं तर सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत डांबरी रस्त्यावर खेळाडूंचा नियमित सराव सुरु असतो. संध्याकाळच्या वेळेस ५ वाजता, याच रस्त्यावर धावण्याच्या वेगावरचा सराव केला जातो. “रस्त्यावर धावणं तसं सोपं नाही. गाड्या येत-जात असतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेची खबरदारी घेतो,” रवी सांगतात. “वेगाचा सराव म्हणजे जास्तीत जास्त अंतर कमीत कमी वेळेत कापणे. म्हणजे बघा, एक किलोमीटर अंतर २ मिनिट ३० सेंकदात धावावं लागतं.”

खेळासाठी पुरेशा सोयी नसतानाही वर्षाचा संघर्ष सुरू आहे. तिचं देशपातळीवरची धावपटू होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल त्या दिवसाची तिचे आई-वडील अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२१ पासून ती महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेत आली आहे. “तिनं चांगलं धावावं असं वाटतं. आमची सगळी साथ हाय तिला. ती आमचा आन् देशाचा मान वाढवील,” देवशालाच्या आवाजात त्यांच्या मुलीच्या कामगिरीविषयी आनंद होता. “आमाला लय बघू वाटतं तिला धावताना. कुटं बाहेर जाते तिथं. सारखं वाटत राहतं, लेकरू कसं धावत आसंल आमचं,” विष्णू कुतुहलाने म्हणाले.

२००९ साली विष्णू आणि देवशाला यांचं लग्न झालं आणि तेव्हापासून ते ऊसतोडीसाठी जात होते. वर्षा तीन वर्षांची होईपर्यंत त्यांचं स्थलांतर सुरूच होतं. तात्पुरत्या पालांमध्ये कसं तरी राहायचं, एका गावातून दुसऱ्या गावाचा प्रवास थकवणारा होता, खासकरून लहान वर्षासाठी.

“सारखं इथनं-तितनं जावं लागायचं, ट्रकमधून. वर्षा आजारी पडत व्हती. मग थांबू म्हटलं हे काम,” देवशाला स्थलांतराच्या आठवणी सांगू लागतात. कामासाठीची भटकंती थांबवली आणि गावात आणि आसपासच्या गावांमध्येच शेतातली कामं करु लागले, “दिवसाला बायांना १०० मिळतात, गड्यांना २००,” विष्णू सांगतात. ते आता वर्षातले सहा महिने एकटेच शहराकडे जातात, कामासाठी. “नाशकाला, पुना. गार्डचं, बिल्डिंगा बांधायला, नाय तर झाडांच्या नर्सरीत, काय काम मिळतं तसं करायचं.” स्थलांतराच्या त्या ५-६ महिन्यात खर्चातून काटकसर करून २०,००० ते ३०,००० मागे टाकायचे आणि घरची वाट पकडायची. विष्णू एकटेच आपल्या कुटुंबासाठी शेकडो किलोमीटर दूर शहरात राहू लागले आणि मुलांच्या शिक्षणासाठी देवशाला घरी.

गेले ८-९ वर्ष विष्णू आणि देवशाला त्यांचा संसार असाच सुरू आहे. इतक्या अंगमेहनतीनंतरही त्यांना त्यांच्या लाडक्या वर्षासाठी एक जोडी धावण्यासाठीची खास बुटं घेणं कठीण आहे. पण वर्षामध्ये इतकी सकारात्मकता आहे की तिला तिच्या चिकाटीपुढे पायाला संरक्षण देणारे बूट काहीसे दिसेनासेच होतात असं वाटतं, “मी स्पीडवर जास्त लक्ष द्येते, चांगल्या धावायच्या टेक्नीक शिकते.”

Devshala’s eyes fills with tears as her daughter Varsha is ready to go back to the academy after her holidays.
PHOTO • Jyoti Shinoli
Varsha with her father. 'We would really like to see her running in competitions. I wonder how she does it,' he says
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडे: सुट्टीनंतर अकादमीत परत जाण्या ची वर्षाची तया रू सुरू झाल्यावर आई देवशालाचे डोळे भरून आलेत. उजवीकडे: वर्षा तिच्या वडिलांसोबत. ' माला लय बघू वाटतं तिला धावताना . सारखं वाटत राहतं, लेकरू कसं धावत आसंल आमचं ,' ते म्हणतात

*****

धावपटू छगन बोंबलेला त्याची पहिली धावण्याची बूटं घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. “मी जिंकलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पैशातून माझी पहिली बुटं घेतली २०१९ ला. तोपर्यंत बुटं नव्हती,” छगन म्हणाला. त्याने घेतलेले पहिले बूट आता जुने झालेत, तळ घासला गेलाय, तर कुठं भोकंही पडलीयेत..

छगनकडे बुटं असली तरी उत्तम दर्जाचे मोजे घेणं म्हणजे अधिकचा खर्च, त्यामुळे घासलेल्या बुटांच्या तळातून खरखरीत जमिन त्याच्या तळपायांना टाचते. “दुखापत होतेच की. फरक तर पडतो. सिंथेटिक ट्रॅकवर धावणं, पायांना सुरक्षित ठेवणारी चांगली बुटं असणं,” पायाभूत सोयींच्या अभावासाविषयी सांगताना असुविधेतही सराव कसा सुरू ठेवता येतो याविषयी तो सांगू लागतो. “आमी डोंगर, नदीत, मातीत खेळलेली, चाललेली, धावलेली मुलं. आई-बापासंगती श्येतात कामं केलेली, उघड्याच पायांनी. मग धावतो, जीव टाकून. यात काय नाय मोटं.”

आंध या आदिवासी जमातीचा २२ वर्षांचा छगन हिंगोलीतल्या खंबाळा गावातला. त्याचे आई-वडिल, मारुती आणि भागीरथा भूमीहीन आहेत. शेतमजुरीवरच छगनसह आपल्या दोन मुलांना लिहण्या-वाचण्यापुरतं शिक्षण देऊ शकलेत. बुटांची सोय कुठुन शक्य होणार होती बरं?

“लोकांच्या श्येतातच कामं करून जनम गेला. शेतकऱ्यांची गुरं पन राखत्योय. काय पडंल त्ये कामं करतोय,” मारुती जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष सांगू लागले. हाताला जे काम मिळेल ते करूनही मारुती आणि भागीरथा मिळून दिवसाला २५० रुपये कमावतात. मिळालं तर महिन्याचे १०-१५ दिवस कामाचे बाकीचे दिवस कामाच्या शोधातच निघून जातात.

त्यांचा धावपटू मुलगा छगन तालुका पातळीपासून देशपातळीवर लहान-मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होते असतो. “पहिल्या तिघांना बक्षिसाची रक्कम मिळते. कधी १० हजार, कधी १५,०००,” तो सांगतो. “मी ८ ते १० मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. प्रत्येक वेळंला जिंकनं कठीन असतं. २०२२ ला दोन वेळा जिंकलो आनि ३ वेळा उपविजेता. ४२ हजारपर्यंत जिंकलो होतो मागल्या सालाला.”

छगन सातत्याने मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. विजेदपद असो की उपविजेतेपद किंवा प्रमाणपत्र, तो त्याची धावण्याची शैली विविध मंचांवर दाखवून देतो आहे.

Left: 22-year-old marathon runner Chhagan Bomble from Andh tribe in Maharashra
PHOTO • Jyoti Shinoli
Right: Chhagan’s house in Khambala village in Hingoli district. His parents depend on their earnings from agriculture labour to survive
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडे: महाराष्ट्रातील २२ वर्षीय मॅरेथॉन धावपटू आंध आदिवासी छगन बोंबले . उजवीकडे: हिंगोली जिल्ह्यातील खंबाळा गावात लं छगन चं घर. त्याचे आई-वडील पोटापाण्यासाठी शेतमजुरीतून मिळणाऱ्या कमाईवर अवलंबून आहेत

खंबाळा गावातलं त्याचं विटा-मातीचं ठेंगणं घर त्याच्या पदकांनी, प्रमाणपत्रांनी भरलेले आहे. त्याच्या साध्या-भोळ्या आई-वडिलांना याचा प्रचंड अभिमान आहे. “आमी अनाडी मानसं. धावून पोरगं काय तरी नाव काढंल, असं वाटतं,” ६० वर्षांचे मारुती विश्वासाने बोलत होते. “कुटल्या सोन्या-पैक्याहून मोलाची हाइत, ह्ये सगळी पोराची बक्षिसं,” शेणा-मातीनं सारवलेल्या जमिनीवर चटईवर पसरवून ठेवलेल्या बक्षिसांना मायेने गोंजारत भागीरथा म्हणतात.

आई-वडिलांच्या याच विश्वासाच्या जोरावर छगनला अजून उंच पल्ला गाठायचाय, “मला अजून लय पुढं जायचंय. ऑलिंपिकमध्ये धावायचंय.” सध्याच्या घडीला असलेल्या असुविधा सुविधांमध्ये बदलल्या पाहिजेत अशी त्याची इच्छा आहे. “किमान गरजेच्या सोयी तरी मिळाल्या पाहिजेत. चांगल्या धावपटूची ओळख स्कोरवर असते. कमीत कमी वेळेत, जास्त अंतराचा रेकॉर्ड. सिथेंटिक ट्रॅकवरचा स्कोर आणि डांबरी रस्त्यावरचा स्कोर फरक असतो त्यात. योग्य स्कोर नसेल तर ऑलिंपिक, नॅशनल, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड होणं कठीण होतं,” तो निवड प्रक्रियेतील तांत्रिक मुद्दे समजून सांगतो.

सोयींच्या अभावाबद्दल म्हणावं तर या धावपटूंना स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण गरजेचं असतं. त्यासाठी दोन डंबेल आणि रॉडसह पीव्हीसी जिम प्लेट्स तसंच व्यायामाच्या इतर साहित्याचीही कमतरता भासते. “परभणीत काय तर संपूर्ण मराठवाड्यात एकही शासकीय अकादमी नाही,” रवी खात्रीने सांगतात.

आश्वासनं आणि धोरणं भरपूर आहेतच. २०१२ च्या राज्य क्रीडा धोरणाला आता १० वर्षं झाली असून त्यात तालुका स्तरावर पायाभूत क्रीडा सुविधा देण्याचं आश्वासन दिलं होतं. खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गतही महाराष्ट्र शासनाला प्रत्येक जिल्ह्यात एक असे ३६ खेलो इंडिया केंद्र उघडण्यासाठी ३.६ कोटी इतका निधी देण्यात आला आहे.

Left: Chhagan participates in big and small marathons at city, taluka, state and country level. His prize money supports the family. Pointing at his trophies his mother Bhagirata says, 'this is more precious than any gold.'
PHOTO • Jyoti Shinoli
Right: Chhagan with his elder brother Balu (pink shirt) on the left and Chhagan's mother Bhagirata and father Maruti on the right
PHOTO • Jyoti Shinoli

डावीकडे : छगन शहर, तालुका, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. स्पर्धेतून जिंकलेली रक्कम घरखर्चाला आधार होते. त्याच्या ट्रॉफीकडे बोट दाखवत त्याची आई भागीरथा म्हणते , ' कुटल्या सोन्या-पैकाहून मोलाचं हाय. ' उजवीकडे: मोठा भाऊ बाळू व छगन (डावीकडे) आणि छगनची आई भागीरथा व वडील मारुती

आणि अगदी अलिकडे, जानेवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खेळांच्या शुभारंभाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, भारताच्या ‘खेळाचे शक्तीकेंद्र म्हणत’ ग्रामीण महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची १२२ नवीन क्रीडा संकुलं उभारण्याची घोषणा केली आहे.

परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं की, “आम्ही अकादमी उभारण्यासाठी जागा शोधत आहोत. आणि तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचं बांधकाम सुरू आहे.”

घोषणा, योजना आणि आश्वासनं ही जिल्हापातळीवर असोत किंवा देशपातळीवर, वर्षा, छगन आणि इतर धावपटूंना ती प्रत्यक्षात लाभदायी ठरतील तेव्हाच ती खरी आहेत असं म्हणता येईल.

“एका गोष्टीचं वाईट वाटतं. आमच्यासारखे खेळाडू ऑलिंपिकमध्ये पोचल्यावरच नेत्यांना, लोकांना दिसतात,” खोल मनात दडलेली खंत छगन बोलून दाखवतो, “तोपर्यंत कोनालाच नाई. आमी कोणत्या परिस्थितीत सराव करतो, ट्रेनिंग घेतोय... आता तर ऑलिंपिकमधल्या पैलवानांना न्याय मागतात म्हणून आसं वागवलं जातंय, लागून जातं लंय.” कितीही निराशाजनक वातावरण असलं तरी हाडाचा खेळाडू जिद्दी असतो, याची त्याने आपल्या बोलण्यातून जाणीव करून दिली.

“पन खेळाडू लढणं नाय सोडत. सिंथेटिक ट्रॅकसाठी असो की अन्यायाविरोधात. शेवटच्या श्वासापर्यंत लढू,” छगन अगदी उमेदीने म्हणतो.

Jyoti Shinoli is a Senior Reporter at the People’s Archive of Rural India; she has previously worked with news channels like ‘Mi Marathi’ and ‘Maharashtra1’.

Other stories by Jyoti Shinoli
Editor : Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a Senior Editor at PARI where she leads PARI's creative writing section. She is also a member of the PARIBhasha team and translates and edits stories in Gujarati. Pratishtha is a published poet working in Gujarati and English.

Other stories by Pratishtha Pandya