तीन बोटं, ओलं कापड आणि हलका हात. “फार नाजूकपणे करावं लागतं.”
विजया पूतरेकुबद्दल बोलतीये. आंध्र
प्रदेशच्या किनारी प्रदेशातली ही एक खास मिठाई. तांदळाच्या ओल्या पिठाचे अगदी
पारदर्शक कागद तयार करून त्यामध्ये सुका मेवा, गूळ आणि तूप भरायचं. सण-समारंभ
असतील तेव्हा हा अगदी आवडीने खाल्ला जाणारा गोडाचा पदार्थ आहे. ही मिठाई करण्यात
सराईत असलेली विजया दररोज २०० रेकु तयार करते आणि गावातले मिठाईचे दुकानदार
तिच्याकडून ते घेऊन जातात. “पूतरेकु तयार करताना सगळं लक्ष एकवटून काम करावं
लागतं. दुसऱ्यांशी बोलता येत नाही,” ती पारीला सांगते.
“आमच्या घरी
कुठलाही सणसमारंभ असू दे, पूतरेकुलु पाहिजेच,” जी. रामकृष्णा सांगतात. ते अत्रेयपुरमचे
रहिवासी असून इथल्या काही दुकानांना पॅकिंसाठी लागणारा कच्चा माल आणि खोकी इत्यादी
मिळवून देण्यात मदत करतात. “मला ही मिठाई खरंच आवडते. कारण यात जरा गंमत आहे. पाहिल्यावर
वाटतं कागदच खाणार आपण. पण पहिला घास घ्या आणि चक्क जिभेवर विरघळून जातं. अख्ख्या
जगात अशी मिठाई तुम्हाला शोधून सापडणार नाही,” असं सांगताना त्यांच्या आवाजातला
अभिमान लपत नाही.
या मिठाईसाठी लागणारा तांदूळ खास
असतो. डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात पिकवला जाणारा हा तांदूळ या मिठाईची
जान आहे. “हा भात एकदम चिकट असतो. त्यामुळे याचा फक्त रेकुच बनतो,” ही मिठाई तयार
करणाऱ्या कायेला विजया कोटा सत्यवती सांगतात. रामचंद्रपुरम तालुक्यातल्या
अत्रेयपुरम
च्या त्या रहिवासी आहेत. मागच्या वर्षी याच अत्रेयपुरम पूतरेकूला
भौगिलिक चिन्हांकन
म्हणजेच जीआय टॅग मिळाला. १४ जून २०२३ रोजी विशाखापटणमच्या श्री
आर्थर कॉटन अत्रेयपुरम पुतरेकुला मॅन्युफॅक्चरर्स वेलफेअर असोसिएशनला हा जीआय टॅग
बहाल करण्यात आला.
आंध्र प्रदेशात आजवर तीन खाद्यपदार्थांना असा जीआय टॅग मिळाला आहे. इतर दोन मानकरी
आहेत तिरुपती लड्डू आणि बांदर लड्डू. राज्यातल्या एकूण २१ वस्तूंना आजवर असं
चिन्हांकन मिळालेलं आहे. यामध्ये हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीतल्या आणि इतरही काही
वस्तूंचा समावेश आहे. गेल्या वर्षी आंध्रच्या पूतरेकुसोबत गोव्याच्या बेबिंकाला हा
मान मिळाला. आणि या आधी मोरेनाचा गजक आणि मुझफ्फरनगरच्या गुळानेही जीआय टॅग मिळवला
आहे.


डावीकडेः विजया घराच्या एका कोनाड्यात काम करत असते. हीच तिची कामाची जागा. बरंच काय काय सामान इथे दिसतं. उपडा टाकलेला, एका बाजूने सरपण सारण्यासाठी भोक असलेला माठ, नारळाच्या झापा, तांदळाचं वाटलेलं ओलं पीठ आणि लोणच्याची एक बरणी. उजवीकडेः जया बिय्यम हा खास प्रकारचा तांदूळ पूतरेकु बनवण्यासाठी वापरला जातो. अर्धा ते पाऊण तास तांदूळ भिजत घालतात त्यानंतर तो वाटून त्याचं ओलं पीठ तयार होतं. याच पिठाचे पातळ पापुद्र्यासारखे रेकु तयार होतात
विजया २०१९ पासून रेकु बनवतीये. आणि ती यात एकदम सुगरण आहे. रेकु बनवत असताना सगळं लक्ष फक्त तिथेच द्यावं लागतं, ती म्हणते. “पण इतर काही मिठाई बनवत असताना मी लोकांशी अगदी आरामात गप्पा मारू शकते कारण ते काम या मानाने सोपं असतं,” ती म्हणते. ती घरी अनेक मिठाया बनवते – सुन्नुंदलु, कोवा आणि इतरही बऱ्याच. भाजलेली उडदाची डाळ वाटून त्यात तूप आणि साखर किंवा गूळ घालून त्यांचे केलेले लाडू म्हणजे सुन्नुंदलु.
“मला माझ्यासाठी आणि माझ्या
घरच्यांसाठी चार पैसे कमवून थोडा हातभार लावायचा होता. दुसरं काहीच काम मला येत
नाही, त्यामुळे मी यात पडले,” मिठाईच्या दुकानांना रेकु विकायची सुरुवात कशी झाली
ते विजया सांगते. इतर कुठलीही मिठाई ती विकत नाही.
महिन्याच्या सुरुवातीला ती ५० किलो
बिय्यम तांदूळ विकत घेते. पूतरेकु तयार करण्यासाठी फक्त जया बिय्यम वाणाचा तांदूळच
वापरला जातो आणि तो ३५ रुपये किलोने बाजारात मिळतो. “हा भात शिजवला की फार चिकट
होतो त्यामुळे रेकु बनवणं सोडून इतर कुणी हा फारसा वापरत नाही,” विजया सांगते.
मिठाई तयार करण्याचं काम सकाळी ७
वाजताच सुरू होतं. रेकु बनवण्यासाठी ती अर्धा किलो तांदूळ पाण्यात स्वच्छ धुऊन
घेते आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजत घालते.
पोरं शाळेत गेली की भिजलेला तांदूळ अगदी
गंधगोळीसारखा वाटून घ्यायचा. त्यानंतर हे ओलं पीठ एका वाडग्यात काढून घराबाहेर
असलेल्या तिच्या ‘वर्कशॉपमध्ये’ म्हणजे स्वयंपाकाच्या जागेत एका छोट्या लाकडी स्टुलावर
ठेऊन देते.
मग, सुमारे ९ वाजता कोनाड्यातल्या चुलीपाशी बसून विजया अतिशय तलम,
पापुद्र्यासारखे पातळ रेकुलु बनवायला लागते. उपड्या टाकलेल्या खापराच्या गरम माठावरती
ओल्या पिठाचे रेकु बनतात. “हे असे खापराचे
माठ फक्त याच भागात आणि इथलीच माती वापरून घडवले जातात. इतर कुठली खापरं किंवा
भांडी यासाठी वापरता येत नाहीत. या माठामुळेच रेकुला त्याचा गोलसर आकार मिळतो,” ती
सांगते.


डावीकडेः तांदळाचं ओलं पीठ आणि पातळ कपडा वापरून पूतरेकुलु बनवतात. उजवीकडेः तयार केलेल्या पातळ पिठात कपडा बुडवून विजया रेकु करायला सुरुवात करते


२०१९ सालापासून मिठाया बनवण्यात सुगरण असलेली विजया रेकु बनवत आहे. रेकु बनवताना सगळं लक्ष फक्त त्याच कामावर द्यावं लागतं, ती सांगते. ती तांदळाच्या ओल्या पिठात कपडा बुडवून ते गरम खापरावर पसरते आणि काढून घेते. पिठाचा पातळ पापुद्रा तयार होतो (उजवीकडे)
नारळाच्या वाळलेल्या झापांची चूल पेटवली जाते. “झापा झर्रकन पेटतात आणि त्यांच्यापासून एकसारखी धग मिळते. आग आणि भांडं नीट नसेल तर रेकुलु होणारच नाहीत,” ती म्हणते.
“एका खापराला ३०० ते ४०० रुपये लागतात.
दर दोन-तीन महिन्यांनी नवा माठ घ्यावं लागतं. त्याहून जास्त काळ काही ते टिकत
नाही,” ती सांगते. विजया गावातल्यात एका दुकानातून दर दोन आठवड्यांनी नारळाच्या
झापा घेऊन येते. पाचसहा मोठ्या आणते आणि एका मोळीचे २०-३० रुपये पडतात.
चुलीवर माठाचं खापर तापेपर्यंत विजया
एक आयताकृती स्वच्छ कपडा घेऊन तो ओला करून घेते. शक्यतो तिच्या साडीचा किंवा इतर
कसला सुती कपडा या कामासाठी स्वच्छ धुऊन वापरला जातो. एका परातीत पातळ पीठ ओतून हा
कपडा त्यामध्ये बुडवून घेतला जातो.
त्यानंतर हे कापड तापलेल्या खापरावर
हलकेच अंथरायचं. त्याला लागलेलं पीठ खापराला चिकटलं की हलक्या हाताने कपडा सोडवून
घ्यायचा. एका क्षणातच फिकट पांढऱ्या रंगाचा पापुद्रा खापरावर तयार होतो आणि चिक्कार
वाफ निघते. अगदी काही सेकंदात हा पापुद्रा शिजतो.
यानंतरचं काम फार म्हणजे फार निगुतीने करावं लागतं. तीनच बोटांनी, हलकासा स्पर्श
करत शिजलेला रेकु गरम खापरावरून सोडवून घ्यायचा. “रेकु काढून घेण्याचं काम सगळ्यात
अवघड असतं. चुरा झाला तर वायाच. त्यामुळे फार काळजीपूर्वक हे काम करावं लागतं,” ती
सांगते. बोलता बोलता अगदी सराईतपणे एकेक रेकु खापरावरून उचलून शेजारच्या गठ्ठ्यावर
हलक्या हाताने ठेवत जाते. तिच्या अंदाजाप्रमाणे एका तासात ती ९० ते १०० रेकु बनवू
शकते आणि अंदाजे दोन-तीन तासांत तिने फटाफट १५०-२०० रेकु तयार केलेसुद्धा. सणवार
असले तर ५०० रेकुलुंची ऑर्डर येते आणि त्या अंदाजानेच ती पीठ वाटून ठेवते.


डावीकडेः रेकु तयार झालाय का हे पाहण्यासाठी विजया बोटाने हलका स्पर्श करून पाहते. उजवीकडेः गरम खापरावरून रेकु सोडवायचा तर अगदी एकदोन बोटांनी हलक्याने काम करावं लागतं


श्यामला आणि सत्या अत्रेयपुरममधील के के नेती पूतरेकुलुच्या दुकानात काम करतात
अत्रेयपुरममध्ये अनेक बाया रेकुलु
तयार करतात. बहुतेक जणी घरीच काम करत असल्या तरी काही जणी दुकानांमध्येही कामाला
जातात.
५४ वर्षीय व्ही. श्यामला के के नेती
पूतरेकुलु या अत्रेयपुरमच्या बसस्थानकाजवळच्या दुकानात काम करतात. त्यांचं घर इथून
चार किलोमीटरवर आहे आणि गेल्या २५-३० वर्षांपासून त्या हे काम करत आहेत. विजयाप्रमाणे
श्यामलासुद्धा सुरुवातीला घरीच रेकु बनवायच्या. “मी एका दिवसात १०० रेकु बनवायचे
आणि मला त्याचे २०-३० रुपये मिळायचे,” त्या सांगतात. त्या पूतरेकु तयार करण्याची
जी अगदी शेवटची पायरी असते ते काम करतात. रेकुमध्ये सुका मेवा, साखर, गूळ आणि
भरपूर तूप घालून त्याची घडी घातली जाते. ते काम श्यामला करतात. श्यामला त्यांच्या घरून
दुकानात चालत येतात पण आजकाल “गुडघे दुखतात” त्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला
आहे. सध्या त्यांचा मुलगा त्यांना गाडीवर दुकानात आणून सोडतो.
के के नेती पूतरेकुलु दुकानाच्या मागे
एका कोनाड्यात त्यांची कामाची जागा आहे. श्यामला एक उंच लोखंडी स्टूल घेतात साडी सावरून
डोळ्यावर ऊन येत नाहीये ना ते पाहून बसतात. रस्त्याकडे तोंड करून त्यांचं काम सुरू
असतं. रेकुमध्ये सगळं सारण भरून त्याच्या घड्या घालण्याचं काम येणाऱ्या जाणाऱ्यांच्या
नजरेस पडत असतं.
श्यामला शेजारच्या गठ्ठ्यातून हलक्या
हाताने एक रेकु घेतात आणि त्याला भरपूर तूप लावतात. त्यानंतर त्याच्यावर गुळाची पूड
पसरतात. “साध्या पूतरेकुसाठी फक्त इतकंच लागतं.” त्या सांगतात त्यानंतर त्यावर
अर्धा रेकु ठेवतात. त्यानंतर सारण बाहेर येणार नाही याची काळजी घेत, रेकु फाटू न
देता त्या अगदी हलक्या हाताने त्याच्या घड्या घालून तो बंद करतात. सारण भरून एक
पूतरेकु तयार करण्यासाठी त्यांना मिनिटभर वेळ लागतो. पूतरेकु शक्यतो पुडाच्या वडीसारखे
आयताकृती असतात पण सामोश्यासारखे त्रिकोणीसुद्धा केले जातात.
जर पूतरेकु सामोश्याच्या आकारत केला
तर श्यामलांना ज्यादा ३ रुपये मिळतात. “सामोश्यासारख्या घड्या घालणं मलासुद्धा
अवघड जातं. फार काळजी घ्यावी लागते नाही तर रेकु तुटणार,” त्या म्हणतात.


श्यामला तांदळाच्या पिठाच्या पापुद्र्यासारख्या रेकुमध्ये सुका मेवा, गूळ आणि इतर सारण भरून घडी घालून तो बंद करतात. सुरुवातीला हाताने रेकु पसरून चपटा करून घेतात. काही थेंब साखरेचा पाक घालून त्यावर भरपूर तूप लावतात. त्यानंतर त्यात सुका मेवा भरला जातो


श्यामला सांगतात, ‘रेकु तयार करत असताना फार काळजी घ्यावी लागते, नाही तर तो तुटू शकतो.’ तयार रेकु खोक्यात भरून पाठवायला तयार
“माझ्या मते फक्त साखर किंवा गूळ घातलेला पूतरेकु खरा मूळचा रेकु आहे. आमच्या गावात कित्येक पिढ्यांपासून हा बनवतायत आणि त्याची कृती एका पिढीकडून दुसरीला मिळतीये,” श्यामला सांगतात. सारणात अगदी अलिकडेच सुका मेवा घालायला सुरुवात झाली आहे.
श्यामला दुकानाच्या मालक कसनी नागसत्यवतींसोबत
दररोज सकाळी १० ते ५ दुकानात काम करतात. रविवारी सुटी असते. त्यांना दिवसाला ४००
रुपये मिळतात. गेल्या तीन वर्षांपासून यात काही वाढ झालेली नाही. पूतरेकुला जीआय
टॅग मिळाल्यानंतरही.
अत्रेयपुरम पूतरेकुला जीआय टॅग
मिळाला पण तो बनवणाऱ्या विजया किंवा श्यामलांसारख्या महिलांना मात्र काहीही फायदा
झालेला नाही. त्यांची रोजची मजुरी काही वाढलेली नाही. पण जीआय टॅग मिळाल्यापासून
अनेक दुकानदार आणि ठोक विक्रेत्यांनी मात्र चांगलाच नफा कमवला आहे.
सत्या सांगतात की पूतरेकु आंध्र
प्रदेश आणि तेलंगण या तेलुगु राज्यांमध्ये फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. “पण आता
जास्त लोकांना याबद्दल माहित झालं आहे. आता ही मिठाई काय असते ते सांगण्याची गरजच
राहिलेली नाही.”
सत्या सर आर्थर कॉटन अत्रेयपुरम
पुतरेकुला मॅन्युफॅक्चरर्स वेलफेअर असोसिएशनच्या सदस्य आहेत. गेल्या १०
वर्षांपासून ही संघटना जीआय टॅग मिळवण्यासाठी प्रयत्नशील होती. अखेर जून २०२३ मध्ये
त्यांना चिन्हांकन मिळालं आणि “अख्ख्या गावासाठी हा फार अभिमानाचा क्षण होता.”


डावीकडेः गरम खापरावरती बनलेला रेकु. उजवीकडेः सत्या यांनी २०१८ साली आपला व्यवसाय सुरू केला


आंध्र प्रदेशाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातल्या खास तांदळामुळेच हा इतका नाजूक पदार्थ बनू शकतो. ‘आमच्या घरी कुठलाही सणसमारंभ असू दे, पूतरेकुलु पाहिजेच,’ अत्रेयपुरमचे रहिवासी जी. रामकृष्णा सांगतात
सत्या सांगतात की त्यांच्या आणि इतरही दुकानांच्या रेकुलुच्या ऑर्डर आता वाढू लागल्या आहेत. “आजकाल आम्हाला थेट १० बॉक्स किंवा अगदी १०० बॉक्सपर्यंत ऑर्डर मिळतायत,” त्या सांगतात. एका बॉक्समध्ये १० पूतरेकुलु असतात.
“लोक पार दिल्ली, मुंबईहून ऑर्डर
पाठवतायत,” त्या सांगतात. “गावात आम्ही एक रेकु १०-१२ रुपयांना विकतो. ते [मोठे
दुकानदार] मात्र एकाल ३० रुपये घेतायत,” त्या सांगतात.
“जीआय टॅग मिळाल्यापासून किंमतीत फार
काही फरक पडला नाहीये,” सत्या सांगतात. “दहा वर्षांपूर्वी एक पूतरेकु ७ रुपयांना
वगैरे मिळायचा.”
“गेल्या आठवड्यात दुबईची एक मुलगी
माझ्या दुकानात आली होती. मी पूतरेकु कसा करतात ते तिला दाखवलं. ती इतकी भारावून
गेली होती. ही मिठाई जिभेवर ठेवताच अशी कशी काय विरघळू शकते, तिचा विश्वासच बसत
नव्हता. हे काम नाही कला आहे, ती म्हणाली. खरं सांगू, मी असा कधी विचारच केला
नव्हता. पण खरंय – इतकी वर्षानुवर्षं रेकु बनवणाऱ्या आणि सारण भरून घडी घालणाऱ्या आमची
जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही,” सत्या म्हणतात.
या वार्तांकनाला
रंग
दे कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.