शास्ती भुनिया हिने मागील वर्षी शाळा सोडली. नंतर तिने सुंदरबनमधील तिच्या सीतारामपूर गावाहून सुमारे २,००० किमी लांब बंगळूरला जाणारी ट्रेन पकडली. "आम्ही अतिशय गरीब आहोत. मला शाळेत दुपारचं जेवण मिळत नाही," ती म्हणते. १६ वर्षांची शास्ती इयत्ता ९वीत गेली होती, आणि पश्चिम बंगाल व भारतभर शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ८वी पर्यंतच मध्यान्ह भोजन देण्यात येतं.
या वर्षी मार्चमध्ये शास्ती साऊथ २४ परगणा जिल्ह्यातील काकद्वीप तहसिलातल्या आपल्या गावी परतली. टाळेबंदी झाल्यापासून तिचं बंगळूरमधील घरकाम बंद झालं होतं. त्यासोबत तिच्या पगाराचे रू. ७,००० मिळणंही बंद झाले – यातलेच थोडे ती दर महिन्याला घरी पाठवायची.
शास्तीचे वडील, ४४ वर्षीय धनंजय भुनिया, येथील बऱ्याच गावकऱ्यांसारखे सीतारामपूरच्या किनाऱ्याहून थोड्याच अंतरावर असलेल्या नयाचर बेटावर मच्छीमार म्हणून काम करतात. ते कधी नुसत्या हातांनी, तर कधी लहान जाळ्यांचा वापर करून मासळी व खेकडे धरतात, जवळपासच्या बाजारांत विकतात आणि दर १०-१५ दिवसांनी घरी परत येतात.
धनंजय यांची आई महाराणी, त्यांच्या मुली जंजली, २१, व शास्ती, १८, आणि मुलगा सुब्रत, १४, यांना घेऊन त्यांच्या मातीच्या, गवताने शाकारलेल्या झोपडीत राहते. त्यांची पत्नी सुब्रतचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी मरण पावली. "आज काल बेटावर पूर्वीसारखे मासे अन् खेकडे मिळत नाहीत, [गेल्या काही वर्षांत] आमची कमाई पुष्कळ कमी झाली आहे," धनंजय म्हणतात, ते महिन्याला रू. २,००० ते रू. ३,००० कमावतात. "आम्हाला जगण्यासाठी मासे अन् खेकडे पकडणं भाग आहे. त्यांना शाळेत पाठवून आम्हाला काय मिळणार?"
शास्तीने जशी शाळा सोडली, तसेच सुंदरबनच्या वर्गांतून इतर विद्यार्थीही झपाट्याने गायब होऊ लागले आहेत. खाऱ्या मातीमुळे इथे शेती करणं कठीण जातं, आणि नद्यांचं रुंदावतं पात्र आणि वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे त्यांची खोऱ्याच्या प्रदेशातील घरं उद्ध्वस्त होत राहतात. परिणामी, या भागातील बरेच गावकरी पोटापाण्यासाठी स्थलांतर करतात. मुलांनाही वयाच्या १३ किंवा १४ व्या वर्षी कामासाठी घराबाहेर पडावं लागतं. बरेचदा कुटुंबातली शिकणारी पहिलीच पिढी असणारे हे विद्यार्थी पुन्हा वर्गात परतून येऊ शकत नाहीत.


जंजली (डावीकडे) आणि शास्ती भुनिया. शास्ती शाळा सोडून बंगळूरला घरकाम करायला निघून गेली; टाळेबंदी दरम्यान ती घरी परतली तेव्हा तिच्या वडलांनी तिचं तापस नैया (उजवीकडे) याच्याशी लग्न लावून दिलं
साऊथ २४ परगणा जिल्ह्यात ३,५८४ शासन-अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये एकूण ७,६८,७५८ विद्यार्थी नोंदवलेले असून ४,३२,२६८ विद्यार्थी उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिकतात. विद्यार्थी सोडून जात असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची प्रचंड कमतरता, मोडकळीला आलेले वर्ग अशी अवस्था असल्यामुळे एकदा गेलेले विद्यार्थी परत येत नाहीत.
"२००९ पासून [सुंदरबन प्रदेशातील] शाळाबाह्य मुलांच्या प्रमाणात तीव्र वाढ झाली आहे," अशोक बेडा म्हणतात. ते सागर तहसीलीतील पूर आणि विसर्जनप्रवण घोडामारा बेटावर एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा इशारा या भागात ऐला चक्रीवादळ धडकलं, त्याने प्रचंड विनाश केला आणि कित्येकांना विस्थापित केलं, त्या वर्षाकडे आहे. तेंव्हापासून अनेक वादळं आणि चक्रीवादळांमुळे जमीन व तलावांच्या क्षारतेचं प्रमाण वाढलं आहे, ज्यामुळे कित्येक कुटुंबांना शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना कामासाठी बाहेर पाठवणं भाग पडलं.
"इथे नदी आमची जमीन आणि घरं हिसकावून घेते, आणि वादळ आमचे विद्यार्थी [हिरावून घेतं]," गोसाबा तहसीलातल्या आमतली गावातील अमृता नगर उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक अमियो मोंडल म्हणतात, "आम्ही [शिक्षक] हतबल होतो."
या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं की कायदे आणि वैश्विक ध्येयांपेक्षा एक वेगळंच वास्तव नजरेस पडतं. २०१५ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांची २०३० साठीची १७ शाश्वत विकास उद्दिष्टे अंगिकारली. यातलं चौथं उद्दिष्ट आहे, "सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे आणि सर्वांकरिता आयुष्यभर शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देणे". आपल्या देशाचा बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९ वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुलांना लागू होतो. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५, मध्ये खास करून मागासवर्गीय आणि अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सर्वसमावेशक वर्गांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय. शाळाबाह्य मुलांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून राज्य आणि केंद्र शासन पुष्कळ शिष्यवृत्ती आणि आर्थिक प्रोत्साहनही देत असतं.
पण सुंदरबनच्या खोऱ्यातील शाळांमधून अजूनही विद्यार्थी गळती सुरूच आहे. येथे एक शिक्षक म्हणून वर्गांमध्ये हरवलेले चेहरे शोधताना मला पायाखालची जमीन ढासळल्यागत होतं.

शाळा सोडून गेलेल्यांपैकी एक आहे मोस्तकिन जामदर. 'मी माझ्या मुलाला पूर्णवेळ मासेमारी करायला आणि घराला मदत करायला पाठवलंय,' त्याचे वडील सांगतात
"शिकून काय होणार? मला बाबांसारखंच नदीतून मासे अन् खेकडे पकडायचे आहेत," राबिन भुनिया नावाचा माझा विद्यार्थी पाथारप्रतिमा तहसिलात त्याच्या बुडाबुडीर तात या गावी अम्फान चक्रीवादळ धडकण्यापूर्वी मला म्हणाला होता. १७ वर्षांचा राबिन आपल्या वडलांना मासेमारीत मदत करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शाळा सोडून गेला. अम्फानने त्याचं घर उद्ध्वस्त केलं आणि गावात खाऱ्या पाण्याचे लोंढे येऊन पाणी साचून राहिलं. सप्तमुखी नदीच्या पात्राकडे बोट दाखवून तो म्हणाला होता: "ही नदी आम्हाला भिकेला लावणार."
शाळा सोडून गेलेल्यांपैकी एक आहे १७ वर्षीय मोस्तकिन जामदार, जो शास्तीच्याच गावचा आहे. "शिकण्यात काही मजा येत नाही," दोन वर्षांपूर्वी इयत्ता ९वीत असताना शाळा सोडून जाण्यामागचं त्याचं कारण. "शिकून काय होणार?" त्याचे वडील, एलियास जामदार विचारतात, "मी माझ्या मुलाला पूर्णवेळ मासेमारी करायला आणि घराला हातभार लावायला पाठवलंय. शिकून काही मिळणार नाही. मला तरी ते कुठे कामी आलंय." एलियास, ४९, यांनी इयत्ता ६वी नंतर पोटापाण्यासाठी शाळा सोडली, आणि नंतर गवंडी म्हणून काम करायला केरळला स्थलांतर केलं.
शाळेत न जाण्याचे खासकरून मुलींना विपरीत परिणाम सोसावे लागतात – त्यांच्यातील अधिकाधिक जणींना एक तर घरीच राहावं लागतं किंवा त्यांचं लग्न लावून देण्यात येतं. "मी राखी हाझरा [इयत्ता ७वीतील एक विद्यार्थिनी] हिला गेले १६ दिवस गैरहजर का राहिली ते विचारलं, तेव्हा तिला रडूच कोसळलं," दिलीप बैरागी, शिबकालीनगर गावाच्या आय. एम. उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, यांनी मला २०१९ मध्ये सांगितलं होतं. "ती म्हणाली की तिचे आईवडील हुगळी नदीत खेकडे पकडायला जातात तेव्हा तिला तिच्या भावाला [जो इयत्ता ३रीत होता] सांभाळावं लागतं."
टाळेबंदीमुळे शाळेतून असं बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलंय. अमल शीत, बुडाबुडीर टाट गावातील एक मासेमार, यांनी इयत्ता ९वीत शिकणाऱ्या आपल्या १६ वर्षीय कुमकुम हिला शाळा सोडायला सांगितलं. तिच्या घरच्यांनी आर्थिक भार कमी करण्यासाठी तिचं लग्न ठरवलं होतं. "नदीतून पहिल्यासारखे मासे मिळत नाहीत," अमल म्हणतात. ते त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबातील एकटे कमावते आहेत. "म्हणून तिचं शिक्षण राहिलं असूनसुद्धा, मी लॉकडाऊन लागल्यावर तिचं लग्न उरकून टाकलं."
युनिसेफच्या २०१९ मधील एका अहवालात नमूद केलंय की भारतातील २२.३ कोटी बालवधूंपैकी (वय वर्ष १८ अगोदर लग्न झालेल्या) २.२ कोटी पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत.

बुडाबुडीर टाट गावातील कुमकुम (डावीकडे) इयत्ता ९वीत, तर सुजन शीत इयत्ता ६वीत शिकतो. 'नदीतून पहिल्यासारखे मासे मिळत नाहीत,' त्यांचे वडील म्हणतात. ‘ म्हणून तिचं शिक्षण राहिलं असूनसुद्धा, मी लॉकडाऊन लागल्यावर तिचं लग्न उरकून टाकलं ’
"बंगाल सरकारकडून [शिक्षणासाठी] प्रोत्साहन मिळत असलं तरी [सुंदरबन प्रदेशात] मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. बहुतांश आईवडील आणि पालकांना वाटतं की मुलीला शिकवून घराचा फायदा होत नाही, आणि खाणारी एक तोंड कमी झालं तर पैसा वाचेल," बिमान मैती, पाथरप्रतिमा ब्लॉकमधील शिबनगर मोक्षदा सुंदरी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक म्हणतात.
"कोविड-१९ टाळेबंदीमुळे शाळा बऱ्याच काळ बंद आहेत आणि काही अभ्यासही सुरू नाहीये," मैती पुढे म्हणतात. "मुलं शिक्षणापासून वंचित होत आहेत. एवढं नुकसान झाल्यावर ती परत येणार नाहीत. ती हरवून जातील, कायमची."
शास्ती भुनिया बेंगळुरूहून जूनच्या मध्यात परतली, तेव्हा तिलाही लग्नाची बळजबरी करण्यात आली. तापस नैया, वय २१, तिच्याच शाळेत शिकला होता आणि वयाच्या १७ व्या वर्षी, इयत्ता ८वीत त्याने शाळा सोडली. त्याला शिकण्यात रस नव्हता आणि घराला हातभार लावायचा होता, म्हणून त्याने केरळमध्ये गवंडी म्हणून काम शोधलं. तो टाळेबंदीमुळे मे महिन्यात गावी परतला. "तो आता शिबकालीनगरमध्ये एका चिकनच्या दुकानावर काम करतो," शास्ती म्हणते.
शास्तीची थोरली बहीण २१ वर्षांची जंजाली भुनिया, जिला ऐकू येत नाही आणि दिसतही नाही, हिने वयाच्या १८व्या वर्षी, इयत्ता ८वीत गेल्यावर शिक्षण सोडलं. एका वर्षात तिचं उत्पल मोंडलशी – जो आता २७ वर्षांचा आहे – लग्न लावून देण्यात आलं. कुलपी तालुक्यातील नूतन त्यांग्राचार गावी इयत्ता ८वीत असताना त्याने शाळा सोडली. त्याला लहानपणी पोलिओ झाला होता आणि तेंव्हापासून त्याला चालताना त्रास होतो. "स्वतःच्या हातापायांनी कधी शाळेत जाताच आलं नाही, अन् आमच्याकडे व्हीलचेअर घेण्याइतके पैसे नव्हते," तो म्हणतो. "मला इच्छा असून शिकता आलं नाही."
"माझ्या दोन्ही नातींना शिकता आलं नाही," शास्ती आणि जंजली यांची ८८ वर्षीय आजी महाराणी म्हणते. त्यांनीच त्या दोघींना वाढवलं. “आता कोविड-१९ टाळेबंदीमुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे माझ्या नातवाला [सुब्रत] तरी जमेल का, कोणास ठाऊक?"

स्वांतन प हा र, वय १४, काकद्वीप तालुक्यातील सीतारामपूर गावात बाझारबेडिया ठाकूरचाक शिक्षा सदन उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता ८वीत शिकते. युनिसेफच्या २०१९ मधील एका अहवालात नमूद केलंय की भारतातील २२.३ कोटी बालवधूंपैकी (वय वर्ष १८ अगोदर लग्न झालेल्या) २.२ कोटी पश्चिम बंगाल च्या रहिवासी आहेत

बापी मोंडल, वय ११, नामखाना ब्लॉकमधील बलियारा किशोर उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता ५वीत शिकतो. तो आणि त्याचं कुटुंब २० मे रोजी अंफान चक्रीवादळ आल्यानंतर महिनाभर एका मदत केंद्रावर राहिले, नंतर त्यांनी माती, बांबूचे खांब आणि ताडपत्री वापरून त्यांचं घर पुन्हा बांधलं. वारंवार येणाऱ्या वादळं आणि चक्रीवादळांमुळे जमीन आणि तलावाची क्षारता वाढली आहे, ज्यामुळे कित्येक कुटुंबां वर शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना कामासाठी बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे


सुजाता जाना, वय ९, इयत्ता ३रीत शिकते (डावीकडे) आणि राजू मैती, वय ८, इयत्ता २रीत शिकतो (उजवीकडे); दोघंही पा था रप्रतिमा तालुक्या मधील बुडाबुडीर टाट गावात राहतात. त्यांचे वडील मच्छीमार आहेत, पण वर्षागणिक मासळी कमी होत चालली आहे आणि वयात आलेली मुलं शाळा सोडून कामाच्या शोधात जाऊ लागल्याने शिक्षणा चा बट्ट्याबोळ झाला आहे


डावीकडे: पाथरप्रतिमा ब्लॉकमधील शिबनगर मोक्षदा सुंदरी विद्यामंदिरात विद्यार्थी मध्यान्ह भोजन करताना. उजवीकडे: घोडामारा बेटावरील घोडमारा मिलन विद्यापीठ उच्च माध्यमिक शाळा. पश्चिम बंगाल आणि भारतभर शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इयत्ता आठवीपर्यंतच मध्यान्ह भोजन मिळतं; त्यानंतर बरेच जण शाळा सोडतात


डावीकडे: देबिका बेडा, इयत्ता ७वीत शिकणारी एक विद्यार्थिनी, अम्फान चक्रीवादळामुळे पाथरप्रतिमा ब्लॉकच्या छोटो बनश्याम नगर गावातील उद्ध्वस्त झालेल्या आपल्या घराच्या अवशेषांसमोर उभी आहे. हा तोडफोड झालेला टेलिव्हिजन सेट त्यांच्या कुटुंबातील एकमेव इलेक्ट्रोनिक उपकरण होतं; ती आणि तिची पाच वर्षांची बहीण पुरोबी या दोघींना टाळेबंदी दरम्यान 'ई-लर्निंग'करिता काहीच साधन नाही. उजवीकडे: सुपर्णा हाझरा, वय १४, गोसाबा ब्लॉकमधील आ मतली गावातील अमृता नगर उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता ८वीत शिकणारी विद्यार्थिनी आणि इयत्ता तिसरीत शिकणारा तिचा भाऊ राजू

कृष्णेन्दू बेडा, बुडाबुडीर टाट कनिष्ठ माध्यमिक शाळेत इयत्ता ८वीत शिकणारा विद्यार्थी, अ म्फा न चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या आपल्या घरापुढे उभा आहे. तो आपली सगळी पुस्तकं, वह्या आणि कामाच्या वस्तू गमावून बसला य . हे छायाचित्र काढलं तेंव्हा तो आपले वडील स्वपन बेडा यांना गवताच्या पेंढ्यांनी शाकारलेलं मातीचं घर बांधायला मदत करत होता. शाळेत जाणं लांबणीवर पडलं.

रुमी मोंडल, ११, गोसाबा ब्लॉकमधील अमृता नगर उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता ६वीत शिकते. हे छायाचित्र अंफान चक्रीवादळ धडकल्याच्या काही वेळातच काढण्यात आलं होतं. तेंव्हा ती आपल्या आईला समाजसेवी आणि इतर संस्थांकडून साहाय्य मिळण्यास मदत करत होती. 'इथे नदी आमची जमीन आणि घरं हिसकावून घेते, आणि वादळ आमचे विद्यार्थी [हिरावून घेतं],' एक शिक्षक म्हणतात.

अम्फा न चक्रीवादळानंतर गोसाबा ब्लॉकमधील पुईनजली गावातील स्वतःच्या घरासमोर उभ्या असलेल्या रेबती मोंडल. आपलं घरदार गमावून बसल्यामुळे त्यांची मुलं प्रणोय मोंडल (वय १६, इयत्ता १०वी) आणि पूजा मोंडल (वय ११, इयत्ता ६वी) यांना आपलं शिक्षण पुन्हा सुरू करणं अवघड जा णार आहे


डावीकडे: घोडामारा बेटावरील अंजुमन बीबी आपल्या नऊ महिन्यांच्या अयनुर मोल्ला याचा पाळणा हलवत आहेत. त्यांचा मोठा मुलगा मोझिपूर रहमान ने इयत्ता ८वीत आपल्या कुटुंबाला हातभार लावायला शा ळा सोडली . उजवीकडे: नामखाना तालुक्यातील मौसुनी बेटावरील बलियारा गावातील अस्मिना खातून, वय १८, इयत्ता १२वीत गेली आहे. तिचा भाऊ, २० वर्षीय येस्मिन शाह, इयत्ता ९वीत असताना शाळा सोडून गेला आणि त्याने केरळमध्ये गवंडी म्हणून काम करायला स्थलांतर केलं

'माझ्या दोन्ही नातींना शिकता आलं नाही,' शास्ती आणि जंजली यां च्या आजी ८८ वर्षीय महाराणी म्हण तात . त्यांनीच त्या दोघींना वाढवलं. ‘ आता कोविड-१९ टाळेबंदीमुळे शाळा बंद आहेतत्यामुळे माझ्या नातवाला [सुब्रत] तरी जमेल का, कोणास ठाऊक? ' त्या म्हणतात

साऊथ २४ परगणामधील पा था रप्रतिमा तालुक्याच्या शिबनगर गावातील महिला, ज्या मुख्यत्वे आपल्या नवऱ्यांसोबत मासे आणि खेकडे पकडण्याच्या घरगुती कामांमध्ये व्यस्त असतात. त्यांच्यापैकी पुष्कळ कुटुंबांमधील मुलांनी गवंडी म्हणून किंवा बांधकाम मजुरीनिमित्त केरळ आणि तमिळनाडूत स्थलांतर केलंय

विद्यार्थी नया चा र बेटावरील तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये परतताना. तिथे त्यांचे आईवडील उदरनिर्वाहासाठी मासे व खेकडे पकडतात


डावीकडे: अमतली गावातील बिद्या नदीतून मासे पकडून उदरनिर्वाह करता त . उजवीकडे: धनंजय भुनिया नया चा र बेटावरून सीतारामपूरमध्ये आपल्या घरी परतता यत

सीतारामपूर उच्च माध्यमिक शाळेतून घरी परतणारे विद्यार्थी. टाळेबंदी सुरू झाल्यावर त्यांच्या अगोदरच डळमळीत असलेल्या शिक्षणाच्या संधी आणखी गर्तेत गेल्या
शीर्षक छाया चित्र: २०१८ मध्ये रॉबिन रॉय, वय १४, शाळा सोडून कोलकात्यातील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून कामाला लागला. टाळेबंदीमुळे तो नूतन त्यांग्राचार गावात घरी परतला. त्याची बहीण, १२ वर्षीय प्रिया, कुलपी तहसीलीतील हरिनखोला ध्रुबा आदिश्वर उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकते.
अनुवादः कौशल काळू