ती एक लहानशी, निर्जन ठिकाणी, मातीच्या भिंतींपासून बनविलेली चहाची टपरी आहे. समोरच लावलेल्या सफेद कागदावर, हाताने लिहिलेल्या अक्षरात एक पाटी दिसते:

अक्षरा कला आणि क्रीडा

वाचनालय

ईरूप्पुकल्लाकुडी

इडामलाकुडी

इडुक्की जिल्ह्याच्या या घनदाट जंगलात वाचनालय? भारताच्या सर्वांत जास्त साक्षर असलेल्या केरळ राज्यातील हे कमी साक्षरता असलेले स्थान आहे. राज्यात सर्वप्रथम निवडून आलेली आदिवासी ग्रामीण परिषद असलेल्या या गावात केवळ २५ कुटुंबे राहतात. त्याव्यतिरिक्त कोणाला या वाचनालयातून पुस्तके घ्यावयाची असल्यास, त्यांना या घनदाट जंगलातून पायपीट करत यावं लागतं. एव्हढ्या लांब खरंच कोणी येईल का?

“हो, नक्कीच”, ७३ वर्षांचे पी. व्ही. चिन्नातंबी, एक चहा विक्रेता, क्रीडा संघाचे आयोजक आणि ग्रंथपाल. "ते येतात". त्यांची ही छोटीशी चहाची टपरी - येथे चिवडा, बिस्कीटे, काडेपेटी इ. किराणा, आवश्यक वस्तू ते विकतात. ही टपरी इडामलाकुडीच्या डोंगराळ रस्त्यांवर मधोमध आहे. केरळच्या सर्वांत दूर  असलेल्या या पंचायतीत केवळ एकच आदिवासी समूह, मुथावन, येथे वास्तव्याला आहे. इथे यायचे म्हणजे, मुन्नार जवळच्या पेट्टीमुडीपासून १८ कि.मी. चालत यावं लागतं. चिन्नातंबींची चहाची टपरी आणि वाचनालयासाठी तर अजून दूर चालावं लागतं. आम्ही धडपडत जेव्हा तेथे पोहोचलो, तेव्हा चिन्नातंबींच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. चिन्नातंबींचे कुटुंबही मुथावन आहे.

"चिन्नातंबी", मी गोंधळून विचारले, "मी चहा प्यायलो, किराणा मालही मला दिसतोय, पण आपले ते वाचनालय कुठे आहे?" चिन्नातंबींनी विस्मयकारक स्मितहास्य केले आणि आम्हांला त्यांनी लहान संरचनेच्या आतील भागात नेले. गुडुप अंधार्या कोपर्यातून, कमीत कमी २५ किलो तांदूळ मावतील अशी दोन पोती घेऊन चिन्नातंबी आले. या दोन पोत्यांमध्ये १६० पुस्तके आहेत, हीच त्यांची संपूर्ण यादी. अतिशय काळजीपूर्वक त्यांनी चटईवर पुस्तके मांडली, जसं ते रोज वाचनालयाच्या वेळेत मांडतात.

आम्ही आठ भटके ती पुस्तके खूप आश्चर्याने चाळत होतो. प्रत्येक पुस्तक एक साहित्यिक रचना होती. अभिजात आणि राजकीय पुस्तकांचे ते संकलन होते. एकही पुस्तक रहस्यकथेचे, गाजलेले किंवा सुमार दर्जाचे, भावना चाळवणारे नव्हते. त्यातील एक तमीळ महाकाव्य 'सिलापट्टीकरम' चा मल्याळम अनुवादीत पुस्तक आहे. वायकोम मुहम्मद बशीर, एम. टी. वासुदेवन नायर, कमला दास यांचीही पुस्तके आहेत. इतर शीर्षकांमध्ये एम. मुकुंदन, ललिथांबिका अनंतरजनम आणि इतर यांचीही पुस्तके आहेत. महात्मा गांधींच्या पुस्तकांव्यतिरिक्त प्रसिद्ध, उग्र कट्टरपंथी जसे की थोपील बस्सी यांच्या आक्रमक लेखणीतून लिहिले गेलेले 'यू मेड मी अ कम्युनिस्ट' ही या संकलनात आहे.

"पण चिन्नातंबी, लोक खरोखरच ही पुस्तकं वाचतात का?" आम्ही विचारले, आता आम्ही बाहेर बसलो होतो. मुथावन समुदाय इतर आदिवासींप्रमाणेच सर्व अर्थाने वंचित आणि इतर भारतीयांच्या तुलनेत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलेच राहिले आहेत. प्रश्नाचं उत्तर म्हणून चिन्नातंबी वाचनालयाचे रजिस्टर घेऊन आले. यात कोणी, कोणतं पुस्तक, कधी घेतलं, कधी परत केलं याचा हिशोब उत्तमपणे, नीटनेटका ठेवलेला आहे. या गावात केवळ २५ कुटुंबच राहतात, तरिही २०१३ मध्ये ३७ पुस्तके वाचून परत केली गेली. म्हणजे एकूण संकलनाच्या जवळ जवळ एक चतुर्थांश पुस्तके; हे एक उत्तम प्रमाणच मानलं पाहिजे. वाचनालयाचे एकवेळचे सभासदस्यत्व शुल्क २५ रू. आहे आणि मासिक शुल्क २ रू. आहे. पुस्तकं घेताना कोणतेही वेगळे शुल्क नाही. चहा विनामूल्य आहे. काळा चहा, साखरेशिवाय. "लोक टेकड्यांवरून दमून भागून येतात." केवळ बिस्किटे, चिवडा आणि इतर वस्तूंसाठी पैसे द्यावे लागतात. कधीकधी एखाद्या पाहुण्याला साधेसे भोजनही विनामूल्य मिळू शकते.

रजिस्टरमध्ये पुस्तकांची देवाण-घेवाण झाल्याच्या तारखा, नावे सर्व काही नीटनेटके लिहिलेले आहे. इलांगोंचे 'सिलापट्टीकरम' एकाहून अधिक वेळेस वाचण्यासाठी घेतले गेले. यावर्षी, आधीच बरीच पुस्तके वाचण्यासाठी लोक घेऊन गेलेले आहेत. या घनदाट जंगलात अभिजात साहित्य इथले आदिवासी स्वारस्याने वाचत आहेत. सर्वार्थाने उपेक्षित आणि वंचित आदिवासी. हे एक वेगळंच समाधान देणारं होतं. माझ्या मते, आमच्यापैकी काही शहरी वातावरणातील आपल्या वाचन सवयींवर विचार करत होते.

आमच्या बहुतेकांसाठी लेखन हेच उपजीविकेचे साधन होते, आमच्या अहंकाराच्या फुग्यातून हवा तर कधीच निघून गेली. केरळ प्रेस अकादमीच्या, पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या तीन विद्यार्थ्यांपैकी एक, युवा विष्णू एस. आमच्याबरोबरच होता, त्याला या पुस्तकांमध्ये 'सर्वांत वेगळे' पुस्तक आढळले. कोणाचेही नाव नसलेली, हस्तलिखितांची ती वही म्हणजे चिन्नातंबींचे आत्मचरित्र आहे. "फार काही नाही लिहिलं पण त्यावर काम चालू आहे.." चिन्नातंबी खेदाने उद्गारले. "असं काय चिन्नातंबी, त्यातलं काही वाचून दाखवा." आमचा आग्रह मानून त्यांनी वाचलं. लांबलचक नव्हतं, अपूर्ण होतं, परंतु जे लिहिलं ते जिवंत होतं. त्यांच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी अनुभवलेल्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराचे ते भान होते. वास्तविकत: लेखक जेव्हा ९ वर्षांचा होता तेव्हा महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला, याचे ते कथन होते.

चिन्नातंबींचे एडामलाकुडीमध्ये परत येण्याची प्रेरणा म्हणजे मुरली 'माश' (मास्तर किंवा शिक्षक). त्यांच्या प्रेरणेनेच वाचनालयाची स्थापना झाली. मुरली 'माश' या भागातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आणि गुरू. तेही आदिवासीच परंतु दुसर्या समूहाचे आहेत. या पंचायतीबाहेरील मानकुलामला त्यांचे वास्तव्य आहे. त्यांनी आपले बहुतांश आयुष्य मुथावन समुदायासोबत आणि त्यांच्या कार्यासाठीच वेचले. चिन्नातंबी म्हणतात, "माशनेच मला मार्गदर्शन दिले." चिन्नातंबींच्या मते त्यांनी काही विशेष कार्य केलेले नाही, पण सत्य डोळ्यांसमोरच लख्ख आहे.

२,५०० पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या २८ गावांपैकी इडामलाकुडी एक गाव आहे. संपूर्ण जगातील मुथावन येथेच आहेत. ईरूप्पुकल्लाकुडीमध्ये केवळ १०० लोक राहतात. राज्यात इडामलाकुडीची पंचायत म्हणजे सर्वांत कमी, १,५०० मतदातांचे, जंगलात शंभर चौरस किलोमीटर परिसरातले क्षेत्र आहे. आमच्या परतीचा मार्ग आम्हांला टाळावा लागला. तामीळनाडूच्या वलपरईला जाण्यासाठी तो आडमार्ग आता जंगली हत्तींनी काबीज केला आहे.

तरिही, चिन्नातंबी येथेच राहून सर्वांत एकाकी वाचनालय चालवत आहेत. येथील उपाशी आदिवासींना वाचनाची गोडी लावून त्यांना समर्थ करण्याचे कार्य करत आहेत. त्याचबरोबर चहा, चिवडा, काडीपेटीही पुरवित आहेत. एरव्ही, आम्ही भरपूर गोंगाट करतो, पण या भेटीचा आम्हा सर्वांवरच खूप प्रभाव पडला आणि आम्ही निस्तब्ध चालत होतो. आमचं लक्ष जरी येणार्या वाटेत कोणत्या अडचणी येतील याकडे होते तरी मन मात्र एका असामान्य ग्रंथपालाभोवती, पी. व्ही. चिन्नातंबींभोवती घुटमळत होतं.

हा लेख मूळ स्वरूपात http://psainath.org/the-wilderness-library/ वर प्रकाशित झालेला आहे.

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath