“सगळ्या बोडो मुलींसारखं, मी आईला विणताना पाहतच मोठी झाले,” सामा ब्रह्मा सांगतात. खुजराबगुडी नं. २ गावात घराच्या ओसरीत बांबूची पायपट्टी असलेल्या आपल्या मागापाशी त्या बसल्या होत्या. दक्षिण आसामच्या बोडोलँडमधल्या चिरांग जिल्ह्यातल्या अई नदीच्या किनारी हिरव्या कंच भातशेतांमध्ये हे गाव वसलं आहे.

इथून सगळ्यात जवळचं गाव, बोंगाईगाव, २० किमी अंतरावर आहे. काही ठिकाणी नदीचा वाळूभरला किनारा पार करत किंवा मोडकळीला आलेल्या एका बांबूच्या पुलावर जरा जपूनच पाऊल टाकत ८७ उंबरा असणाऱ्या त्यांच्या गावी पोचता येतं.

आसामच्या गावांमध्ये बोडो समुदायाच्या सगळ्या घरांमध्ये हातमाग असतोच. हा समुदाय (आसामीमध्ये बोरो) अनुसूचित जमातींमध्ये मोडतो. कापड कातता येणं हे बाईकडचं आणि भावी वधूकडचं अत्यंत मोलाचं कौशल्य मानलं जातं. मात्र सामासारख्या काही मोजक्या जणींनीच त्यांचं हे परंपरागत कौशल्य वापरून त्यातून काही कमाई केली आहे.

“मी पंधरा वर्षांची होण्याआधीपासूनच कापड विणतीये. साला माता कपडा [साधं कापड] विणण्यात मी तरबेज झाले,” ४२ वर्षीय सामा सांगतात. “माझा आत्मविश्वास वाढू लागला तसं मी गोमोसा [शालीसारखं वस्त्र] आणि पलंगपोस विणू लागले. पण मला सगळ्यात जास्त काय आवडायचं तर दोखोणा [साडीसारखं वस्त्र] तोही गुंतागुंतीची फुलांची नक्षी असलेला.”

Sama seated at her bamboo pedal loom
PHOTO • Anne Pinto-Rodrigues
Sama seated at her bamboo pedal loom
PHOTO • Anne Pinto-Rodrigues

बोडोलँडच्या खुजराबगुडी नं. २ गावी सामा ब्रह्मा आपल्या बांबूची पायपट्टी असलेल्या हातमागावर दिवसाचे ६-८ तास कापड विणतात, क्वचित कधी तरी सुटीही घेतात

मी सामांच्या घरी गेले तेव्हा त्यांना माझ्याशी बोलायला थोडी उसंत होती. त्यांचं घराच्या भिंती माती लिंपलेल्या बांबूच्या होत्या तर छपराला पत्रा होता. आज त्यांना सुटी होती कारण जवळच्या प्राथमिक शाळेत आज त्यांना पोषण आहार शिजवायला जायचं नव्हतं. त्या दर सोमवार ते शुक्रवार, सकाळी १० ते १ हे काम करतात, ज्याचे त्यांना महिन्याला १००० रुपये मिळतात. पूर्वी अधून मधून त्या तांदळाची बियर करून ती विकत असत. त्या जे काही विणायच्या ते त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वापरासाठी असायचं.

२००० साली सुरुवातीला, सामा आगोर दागरा अफाद (बोडो भाषेत या तीन शब्दांचा अर्थ होतो, ‘नक्षी’, ‘विणकर’ आणि ‘संस्था’) या संस्थेच्या सभासद झाल्या. या संस्थेचं काम विणकरच पाहतात, स्थानिक महिलांना त्यांच्या विणकामाच्या परंपरागत कौशल्याचा वापर करून काही अर्थार्जन करता यावं या दृष्टीने ही संस्था सुरू करण्यात आली. सामा यांना आगोरकडून रंगवलेलं सूत मिळतं ज्यापासून त्या कापड विणतात. हाताने विणलेलं हे कापड संस्था गोळा करते आणि त्यापासून विविध पोशाख , वस्त्रं तयार करून प्रदर्शनांमध्ये किंवा भारतभरातल्या काही दुकानांमध्ये विकते.

या कामातून सामा यांना नियमित पैसे मिळतात – विणलेल्या प्रत्येक मीटर कापडामागे रु. ७५. आणि एखाद्या महिन्यात जेव्हा त्या ४५-५० मीटर कापड विणतात, तेव्हा त्यांची रु. ४००० पर्यंत कमाई होते. “आगोरला केवळ साधं कापड विणून हवं असतं [कोणत्याही नक्षीशिवाय], त्यामुळे माझं काम झपाझप होतं,” त्या सांगतात.

किती कापड विणलं हे मोजलं तर गेली तीन वर्षे सामा ऐंशी बायांच्या त्यांच्या केंद्रामध्ये सलग पहिल्या क्रमांकावर आहेत. आणि त्या मागची त्यांची प्रेरणा स्पष्ट आहेः त्यांना आपल्या मुलांना शिक्षण द्यायचंय. “माझ्या मोठ्या मुलीचं, २१ वर्षांच्या मेनुकाचं मला फार वाईट वाटतं. सहावीत असतानाच तिला शाळा सोडावी लागली होती,” हे सांगताना त्यांचे डोळे पाणावतात. “त्या काळी तिच्या शिक्षणासाठी आमच्याकडे बिलकुल पैसा नव्हता. पण माझ्या बाकी मुलांवर मी ही वेळ येऊ देणार नाही.”

Sama tinkering with the warping drum that has recently been installed at her home. The warping drum is used to prepare the vertical yarn known as ‘warp’, which is later loaded on the loom
PHOTO • Anne Pinto-Rodrigues
Sama shares a joke with her daughter Sulekha
PHOTO • Anne Pinto-Rodrigues

ताण्याचा ड्रम हाताळताना (डावीकडे), उभ्या विणीचा किंवा ताण्याचा धागा या ड्रमला गुंडाळला जातो आणि नंतर तो मागावर घेतला जातो. सामा आणि त्यांची मुलगी, सुलेखा (उजवीकडे)

त्यांचा १५ वर्षांचा मुलगा, स्वरांग आणि १२ वर्षांची लक्ष्मी शाळेत शिकतायत. आणि सुलेखा, वय १८, कला महाविद्यालयात १२ वीत आहे. “पदवी तर मिळवायचीच असं सुलेखानं पक्कं ठरवलंय,” सामा सांगतात. “आणि तिचं हे ध्येय पूर्ण होईल यासाठी मला जे काय करण्यासारखं आहे ते सगळं मी करणार आहे. तिच्यासाठीच मी इतकं सारं कापड विणतीये. माझं दुखणं खुपणं मी तिच्या ध्येयाच्या आड येऊ देणार नाही.”

सामा स्वतः फक्त (बोडो माध्यमाच्या शाळेत) दुसरीपर्यंत शिकल्या आहेत आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातलं कुणीच महाविद्यालयीन पदवीपर्यंत पोचलेलं नाही. त्यांच्या गावात शक्यतो फक्त मुलगेच पदवीधर झाले आहेत. त्यामुळे आपली मुलगी बीए होईल त्या दिवसाची सामा आतुरतेने वाट पाहत आहेत. “माझी मुलगी या गावातली पहिली पदवीधर मुलगी असणार आहे आणि म्हणूनच मी कापड विणतीये.”

पहाटे ५ वाजता उठून, घरकामात भरपूर वेळ गेल्यानंतर सामा रोज ६-८ तास कापड विणतात. त्या रोज त्यांच्या मागावर काम करतात, सुटी तशी विरळाच. त्या ज्या बांबूच्या मागावर काम करतात तो त्यांच्या यजमानांनी, धनेश्वर ब्राह्मांनी स्वतः बनवला आहे. ते गावातल्या किंवा जवळपासच्या गावात रानांमध्ये ३०० रुपये रोजावर शेतमजुरी करतात. त्यांच्या पगारातून घरखर्च भागतो. सामांची बहुतेक सगळी कमाई मुलांच्या शिक्षणावर खर्च होते. “सुलेखाला कॉलेजला जाण्यात खंड पडू नये म्हणून मला सायकल घ्यावी लागली,” त्या सांगतात. इथून सगळ्यात जवळचं कॉलेज बिजनी शहरात आहे, २५ किमी लांब. सुलेखा मंगोलियन बाजारपर्यंत पाच किमी अंतर सायकलने जाते. तिथून ती टमटमने बिजनीला जाते.

Doing the household chores forms a big part of Sama’s day
PHOTO • Anne Pinto-Rodrigues
Sama heads to the market on her bicycle
PHOTO • Anne Pinto-Rodrigues

हातमागावरच्या कामासोबतच घरकामासाठी वेळ काढावाच लागतो, बाजारात जायला किंवा इतर काही छोट्या मोठ्या कामांसाठी त्या सायकलचा वापर करतात

तरुण पिढी जसजशी शिकू लागलीये आणि नोकऱ्या करू लागलीये, तशी बोडो विणकामाची कला हळू हळू लयाला जाऊ लागली आहे. “माझी परंपरा जागती ठेवायचं काम मी करतीये,” सामा अभिमानाने सांगतात. “मी माझ्या थोरल्या दोघींना विणायला शिकवलंय. मेनुका अवघड नक्षीकाम करू शकते तर सुलेखा आता साधं कापड विणायचं कौशल्य अवगत करतीये.”

हाताने विणलेल्या कपड्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. “काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये यंत्रमागावर विणलेल्या दोखोणांनी बाजार भरून वाहत होता. किंमत २५-३०० अशी खिशाला परवडणारी असली तरी त्याचा दर्जा मात्र चांगला नव्हता,” सामा सांगतात. “आज, हाताने विणलेल्या दोखाणांची मागणी पुन्हा वाढली आहे कारण तो विणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याचं महत्त्व आता लोकांना कळायला लागलंय. अगदी ६०० रुपये किंवा कधी कधी जास्त पैसे देण्याचीही लोकांची तयारी आहे.”

आम्ही सामांची सायकल ठेवली होती तिथपर्यंत चालत गेलो – त्या बाजारात जायला आणि छोटी मोठी कामं करण्यासाठी सायकल वापरतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती आजही स्थिर नसली तरी आपल्या मुलांचं शिक्षण आपण करू शकतो या गोष्टीचा सामांना आनंद आहे. त्या म्हणतात की सुलेखाच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल असणार याची त्यांना खात्री आहे.

ही भेट घडवून आणण्यासाठी आणि विशेषतः बोडोमधून केलेल्या अनुवादासाठी आगोर दागरा अफाड संस्थेचे व्यवस्थापक राहिमोल नारझारी यांचे विशेष आभार.

अनुवादः मेधा काळे

Anne Pinto-Rodrigues

Anne Pinto-Rodrigues is a Netherlands-based writer and photographer. Her work can be viewed at www.annepintorodrigues.com

Other stories by Anne Pinto-Rodrigues
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale