‘माझ्या घराचं बांधकाम काढलंय, म्हणून आम्ही माझ्या आईच्या घरी रहायला आलोय,’ या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही त्यांना लव्हार्ड्यात भेटलो तेव्हा लीलाबाई शिंदे सांगत होत्या. त्यांचं गाव पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात येतं. जात्यावरच्या ओव्या संग्रहातल्या एक कलावंत जाई साखळेंची त्या एकुलती एक कन्या, त्यांच्या घराशेजारीच त्यांचं घर. आम्हाला त्यांच्या आईचा फ्रेम केलेला फोटो  त्यांनी दाखवला आणि मग नीट वर्तमानपत्रात गुंडाळून पत्र्याच्या कोठीत ठेऊन दिला. आमचे चक्रावलेले चेहरे पाहून त्याच म्हणाल्या, ‘या घराच्या भिंतींवर खिळेच नाहीत ना.’

Woman sitting in the doorway of a house
PHOTO • Samyukta Shastri

लीलाबाई आणि त्यांची आई , दोघींनी ग्राईंडमील सॉंग्स डेटाबेस ला ओव्या दिल्या आहेत

जात्यावरच्या ओव्या प्रकल्पामधल्या स्त्री कलावंतांना आम्ही भेटी देत होतो तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली. त्यातल्या बऱ्याच जणी एकमेकीच्या नात्यातल्या होत्या, जन्माने किंवा सोयरिकीने. आई आणि मुलगी, बहिणी किंवा भावजयी, जावा आणि सासू आणि सुना. लीलाबाईंची आई २०१२ मध्ये वारली. त्यांच्या ओव्या मे २०१७ मधल्या शेतकरी आणि पावसाचं गाणं या लेखात तुम्हाला वाचायला मिळतील.

जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ टीमने लीलाबाईंच्या सात ओव्या लिहून घेतल्या होत्या, मात्र त्याचं ध्वनीमुद्रण केलं नव्हतं. आम्ही जेव्हा त्यांना परत भेटायला गेलो तेव्हा या ओव्या आमच्या कॅमेऱ्यासमोर गाण्याची विनंती आम्ही त्यांना केली. आधी त्यांनी जरा आढेवेढे घेतले मात्र नंतर त्या तयार झाल्या. घराबाहेरच्या पडवीत ठेवलेल्या जात्यापाशी त्या आम्हाला घेऊन गेल्या आणि त्या जात्याजवळ बसल्या. जातं फिरवण्यासाठी खुटा हातात घेऊन त्यांनी आंबेडकरांचं कौतुक करणाऱ्या ११ ओव्या आमच्यासाठी गायल्या.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रांतातल्या (आजचा मध्य प्रदेश) महू या छावणी भागात झाला. समाज सुधारक, राजकीय नेते, विधीज्ञ आणि भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार असणारे डॉ. आंबेडकर वयाच्या ६५ व्या वर्षी दिल्लीत ६ डिसेंबर १९५६ रोजी निवर्तले.

बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांच्या, शोषितांच्या हक्कांसाठी लढा दिला. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट (१९३६) हे त्यांचं मोलाचं लेखन आहे. शोषित जातींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी पुकारलेल्या लढ्याचा गाभा म्हणजे हे पुस्तक. त्यांनी त्यांच्या अनुयायांना ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा!’ हा संदेश दिला.

बाबासाहेबांनी दलितांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला तो शिक्षण आणि बोद्ध धर्माचं आचरण यातून. ‘शूद्र’ आणि ‘अपवित्र’ असा कलंक देणारी हिंदू जात व्यवस्था भेदून जाण्याचा तो मार्ग होता.

लीलाबाई शिंदेंच्या जात्यावरच्या ओव्या

व्हिडिओ पहाः लीलाबाई शिंदे आणि एक शेजारीण गात आहेत : भीमबाबा स्वार्ग्यात गेले , इंद्रसभेचे राजे झाले

या ओव्यांमध्ये, डॉ. आंबेडकर यांना स्नेहभावाने भीम, भीमबाबा, भीमराया किंवा बाबासाहेब असे संबोधित केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आणि स्वतःला पण सन्मानाने वागणूक मिळावी अशी इच्छा व्यक्त होत आहे

या ओव्यांमधून दलितांना आणि खासकरून दलित स्त्रियांना आंबडेकरांविषयी वाटणारी कृतज्ञता आणि आदर व्यक्त होतो. आणि तो व्यक्त होतो तो मात्र अगदी वैयक्तिक पातळीवर, जिव्हाळ्याच्या नात्याने. या ओव्यांमध्ये ते भीम, भीमबाबा, भीमराय किंवा बाबासाहेब असतात. आंबेडकरांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत असतानाच आपल्याला समानतेने आणि आदराने वागवलं जावं ही इच्छाही या ओव्यांमधून दिसते.

“भीम माझा गुरुभाऊ,” लीलाबाई डॉ. आंबेडकरांबद्दल म्हणतात. त्यांच्यासाठी ते गुरू आहेत, विश्वासातले आहेत आणि भाऊ आहेत. (वेगवेगळ्या जातीतल्या व्यक्तींच्या किंवा स्त्री पुरुषांच्या अशा नात्यांना समाजाच्या विरोधाचं भय नसतं. एखादा पुरुष गुरूभाऊ असू शकतो, तसंच एखादी स्त्री गुरूबहीण असू शकते.) लीलाबाई म्हणतात, त्या मोठ्या भाग्याच्या आहेत, जणू तांदूळ कांडणारं त्यांचं मुसळ सोन्याचं झालंय. भीमाचं नाव घेतल्याने तिचं तोंड गोड होतं आणि त्याचा विचार केल्याने तिचं शरीर शुद्ध होतं (अस्पृश्य, ‘विटाळ’ राहत नाही).

बुद्धाच्या मंदिराला सोन्याचं कवाड आहे, असं लीलाबाई त्यांच्या चौथ्या ओवीत सांगतात. त्यांच्या मुलाला बुद्धाचीच खूप आवड आहे असंही पुढच्या ओळीत गातात. बाबासाहेबांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी आपली आई घाईघाईने पांढरी साडी नेसत असल्याबद्दल पुढच्या ओवीत लीलाबाई गातात.
Woman sitting on the floor of a house with a grindmill
PHOTO • Samyukta Shastri

पडवीत जात्यावर बसलेल्या लीलाबाई

पाचव्या ओवीत त्या म्हणतात, “आम्हाला वेगळं, परकं कोण म्हणतं?” आम्ही तुमच्यासारखे नाही, जातीबाह्य आहोत असं कोण म्हणतं असा याचा अर्थ. भीमाने तर ब्राह्मण मेव्हणे केले याची आठवण त्या करून देतात. (बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता ब्राह्मण होत्या, त्याचा हा संदर्भ.)

सहाव्या ओवीमध्ये लीलाबाई माळणीला विचारतात, “तुझ्या टोपलीत काय आहे?” भीमाच्या फेट्याला तुरा म्हणून शोभून दिसेल म्हणून तिच्याकडनं जाई घ्यायची आहे असं त्या कौतुकानं तिला सांगतात. सातव्या ओवीत समृद्धीचं, सन्मानाचं प्रतीक असलेली तुरकाठ्या लावलेली आगगाडी येत असल्याचं त्या सांगतात. आणि पुढे हेही म्हणतात की भीमाच्या राज्यामध्ये मराठी लोक ढोरं ओढतायत. पिढ्या न पिढ्या मेलेली ढोरं ओढण्याचं, त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम दलित जातींना करणं जात व्यवस्थेनं बंधनकारक केलं आहे. आजही परिस्थिती बदललेली नाही. तुरकाठ्यांमधून समृद्धी आणि भविष्यात मिळणारा मान दर्शवला आहे तर मराठी लोकांना, ज्यांनी आजवर दलितांना ही हीन दर्जाची कामं करायला लावली त्यांना ढोरं ओढायचं काम करावं लागतंय यातून जात व्यवस्थेची उलथापालथ सुचवली आहे.

शेवटच्या तीन ओव्यांमध्ये लीलाबाई डॉ. आंबेडकर वारले त्याबद्दल शोक व्यक्त करतायत. भीमराय गेले असले तरी ते स्वर्गात जाऊन इंद्रसभेचे राजे झालेत असं त्या म्हणतात. त्या स्वर्गातल्या देवांना तांदुळाचं वाण देतात आणि म्हणतात, आमचं सोनं, दलितांसाठी सोन्यासारखे असणारे भीमराव आता स्वर्गात आले आहेत.

शेवटच्या ओवीत त्या म्हणतात, भीमबाबा गेले आणि त्यांचा देह गाडीतून नेला जात होता. जसजशी गाडी पुढे जात होती तसतसा मोठा जनसागर त्यांच्यामागे चालत होता. डॉ. आंबेडकरांच्या वाटेनं जाण्याचं दलित समाजानं ठरवलंय हेही यातनं प्रतीत होतं. त्यांच्याप्रमाणे दलित समाजाने हिंदू धर्म-जात व्यवस्था सोडली आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिक्षण घेण्याचं ठरवलं जेणेकरून शोषणापासून त्यांची मुक्ती होईल.

भीम भीम म्हणू भीम माझा गुरुभाऊ
सोन्याच्या सळयी देते तांदळाला घावू

भीम भीम म्हणू भीम साखरचा खडा
ध्यान येता मनी गोड झाल्यात दातदाढा

बुद्धाच्या मंदिराला सोन्याची कवाड
माझ्याही बाळाला लई बुद्धाची आवड

पांढऱ्या साडीला नेसते गं घाई घाई
बाबा साहेबाची दिक्षा घेती माझी आई

आमच्या लोकाला कोणं म्हणे वाले वाले
आमच्या भीमानी बाह्मण गं केलं साले

माळीण बाई तुझ्या टोपलीत काई
भीमाच्या तुर्याला इकत घेते जाई

आली आगीणगाडी गाडीला तुरकाठी
माझ्या भीमाच्या राज्यात ढोर वढाती मराठी

मेले भीम बाबा कोणं म्हणे मेले मेले
स्वार्ग्यात गेले इंद्रसभेचे राजे झाले

स्वर्गीच्या देवा तुला तांदळाचं वाण
मेले भीम बाबा स्वर्गी आहे आमचं सोनं

मेले भीम बाबा यांचं गाडीत मैत
पुढे चालती गाडी मागं चाललं रहित

PHOTO • Samyukta Shastri

कलाकार: लीलाबाई शिंदे

गाव : लव्हार्डे

तालुका : मुळशी

जिल्हा : पुणे

जात : नवबौद्ध

वय : ६०

शिक्षण: निरक्षर

मुले : तीन मुलगे, एक मुलगी

तारीख : ३० एप्रिल, २०१७ रोजी ही माहिती आणि व्हिडीओ, फोटो, आणि ध्वनिमुद्रण केले.


अनुवाद: मेधा काळे

पोस्टर : सिंचिता माजी

फोटो: संयुक्ता शास्त्री

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale