अळगिरी सामी बोळकं भरून हसतात, मागाच्या खटखटात ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करतात. “असं म्हणतात की ५०० वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो आणि या नदीच्या तीरावर आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला,” ते सांगतात. “पण मला तर वाटतं, आम्ही मच्छीसाठी इथे आलो असणार.”

कुथमपल्ली गावातल्या एका केंद्रात ८५ वर्षीय सामी काम करतायत. एका रांगेत तीन असे बारा माग मांडून ठेवलेले आहेत. शेडच्या बाजूला कोइम्बतूर आणि मल्लपुरमच्या सूत गिरण्यांमधून आलेल्या सुताची रिळं दिसतायत, धागे वाळत घातलेत आणि कसावु (जरीच्या) गुंडाळ्या स्टार्चच्या द्रवात भिजत घातल्या आहेत जेणेकरून त्या कडक राहतील. पिवळसर रंगाच्या, सोनेरी काठाच्या तयार वेष्टी आणि जरीत हत्ती, मोर असं नाजूक नक्षीकाम केलेल्या साड्या गिऱ्हाइकांच्या हातात जायची वाट पाहतायत.

ही शेड आणि त्या शेजारचं दुकान सामींच्या कुटुंबाच्या मालकीचं आहे. ते देवांग चेट्टियार या विणकर समाजाचे आहेत. १९६२ मध्ये तामिळ नाडूमधून ते इथे आले आणि त्यांनी भागीरथी अम्मांशी विवाह केला. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की या ५०० वर्षांपूर्वी कोचीच्या राजाने राजघराण्यासाठी वस्त्र विणण्यासाठी या समाजाच्या लोकांना आमंत्रित केलं आणि ते कर्नाटकातून केरळमध्ये स्थायिक झाले. उत्तरेला भरतपुळा आणि पश्चिमेला गायत्रीपुळा (जिला पोन्ननी असंही म्हणतात) नदी अशा प्रदेशात ते स्थायिक झाले.

85 year-old Alagir Sami works on a manual weaving machine
PHOTO • Remya Padmadas

अळागिरी सामीः ‘असं म्हणतात की ५०० वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो आणि या नदीच्या तीरावर आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला’

त्यांचं कौशल्य आणि कारागिरीमुळे या विणकरांनी केरळच्या पारंपरिक पोषाखामध्ये – मुण्डु (वेष्टी), सेट्टू साडी (जरीचे सोन्याचे काठ असलेली) आणि सेट्टु मुण्डु (दोन वस्त्रांची साडी) - नवा श्वास फुंकला. कालांतराने कोचीनपासून १३० किमीवर असलेलं त्रिसूर जिल्ह्याच्या तलप्पिल्ली तालुक्याच्या थिरुवलमाला पंचायतीतील त्यांचं गाव, कुथमपल्ली, केरळमधलं हातमागावरच्या साड्या आणि वेष्टी विणणारं एक प्रमुख केंद्र बनलं आहे.

कुथमपल्ली साड्या, वेष्टी आणि सेट्टु मुण्डु यांना भौगोलिक मानांकन प्रमाणपत्रं मिळालं आहे. समूहांचं पारंपरिक ज्ञान अबाधित रहावं म्हणून सरकारतर्फे असं मानांकन देण्यात येतं. त्याचा अर्थ असा असतो की या एखाद्या उत्पादनाचं विशिष्ट उगमस्थान आहे आणि त्याची वैशिष्ट्यं किंवा प्रसिद्धी ही त्या मूळ स्थानामुळे आहे.

या गावातल्या २,४०० लोकांपैकी (जनगणना, २०११) १४० जण कुथमपल्ली हॅण्डलूम इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य आहेत. ही संस्था अंशतः सरकारी मालकीची आहे, विणकरांना कच्चा माल, मजुरी देऊन त्यांच्याकडून तयार माल विणून घेण्याचं काम ती करते. इतर विणकर गावातल्या अनुभवी विणकरांकडे काम करतात. ते राज्याच्या विविध भागातल्या दुकानांकडून कामाच्या ऑर्डर घेतात आणि या विणकरांकडून ते पूर्ण करून घेतात. काही जण थेट गिऱ्हाइकांकडून ऑर्डर घेतात आणि त्यांना माल पुरवतात. गावातल्या बहुतेक विणकरांकडे घरी १ किंवा २ माग आहेत तर २-३ कुटुंबांकडे अधिक माग आहेत आणि त्यासाठी वेगळी जागा आहे.

कसंही असलं तरी कमाई तशी बेताचीच असते. “इथे काम करणारे लोक, त्यातल्या बहुतेकांनी सत्तरी पार केली आहे,” अळगिरींचा २४ वर्षीय नातू, सुरजित सर्वानन सांगतो. “कसलीही नक्षी नसणारं एक साधं मुण्डु विणण्यासाठी (शक्यतो ४ मीटर लांब) त्यांना एक दिवस लागतो. तुमचा वेग आणि एका दिवसात तुम्ही किती काम संपवता यावर तुमची कमाई अवलंबून असते.”

Tools used for weaving
PHOTO • Remya Padmadas
Mani K. who has been in this profession for over 30 years, works on the handloom
PHOTO • Remya Padmadas

कुथमपल्लीमध्ये मणी के यांच्या घरी साडीसाठीच्या सुताची रिळं (डावीकडे), ते तिथेच त्यांच्या मागावर विणतायत (उजवीकडे)

एका कुथमपल्ली विणकराला प्रत्येक मुण्डुमागे रु. २०० ते रु. ४०० मिळतात. साध्या साडीचे ५०० रुपये आणि नक्षीकाम असणाऱ्या साडीसाठी रु. ७५० ते २००० इतके पैसे मिळू शकतात. खूपच नाजूक आणि साडीभरून नक्षीकाम असेल तर त्याचे ४,००० रुपयेही मिळू शकतात मात्र वयस्क विणकर असेल तर त्याला रोज ९-१० तास काम करूनही ती पूर्ण करायला बरेच दिवस लागू शकतात. “आमच्याकडे गेल्या आठवड्यात एक तरुण विणकर मदतीसाठी म्हणून आला. त्याने एक डिझायनर प्रकारची साडी दोन दिवसात पूर्ण केली आणि ४,००० रुपये खिशात टाकून तो निघून गेला,” सुरजित सांगतो. “तशीच साडी विणण्यासाठी माझ्या आजोबांना आठ दिवस लागले.”

विणकाम हा पूर्वी कुटुंबाचा व्यवसाय होता आणि प्रत्यक्ष विणायला सुरुवात करण्याआधी बरंच काम करायचं असतं असं मणी के सांगतात जे गेली ३० वर्षं या व्यवसायात आहेत. “आमच्या लहानपणी, अख्खं कुटुंब विणकामाच्या प्रक्रियेचा भाग असायचं, आज्यापासून ते कच्च्याबच्च्यांपर्यंत.”

पावु किंवा खळ घातलेल्या सुताची बंडलं सूत गिरण्यांमधून घरी यायची. घरातली वयस्क मंडळी ते धागे सुटे करून सरळ करायची आणि मागाला जोडण्यासाठी त्याच्या गुंडाळ्या करायची. हे धागे किमान ४४ मीटर लांब असायचे त्यामुळे ते सरळ करणं आणि ते पिळून गुंडाळणं हे सगळं काम मोकळ्यावर रस्त्यात व्हायचं आणि किमान सात जणांचे हात त्यासाठी लागायचे. हे होत असताना घरची मुलं आणि स्त्रिया चरख्यावर सूत कातायला आणि कसावुचे गठ्ठे सोडवून त्याच्या छोटी रिळं करायला मदत करायची. या प्रक्रियेला अख्खा दिवस लागायचा.

आता हे सगळं बदलून गेलंय. कुटुंबाचा आकार कमी व्हायला लागलाय, मुलांना काही या धंद्यात रहायचं नाहीये आणि कुशल विणकरांच्या अभावामुळे वयस्क विणकरांना मागावरचं काम सुरू करण्याआधीची तयारी पूर्ण करायला तमिळनाडूतल्या मजुरांना बोलवावं लागत आहे. “आम्ही माग सुरू करण्यासाठी मजूर लावतो, ते सकाळी येतात आणि पाच वाजेपर्यंत परत जातात,” मणी सांगतात. “४,००० रुपये मूल्य असणाऱ्या साडीमागे विणकराला फक्त ३,००० रुपये हाती पडतात. बाकी मजुरीवर खर्च होतात. अखेरीस आमच्या हातात नक्की काय पडतं?” १९९० साली चार माग असणाऱ्या या कुटुंबाकडे आता  केवळ दोन माग आहेत ते त्यामुळेच.

Stacks of punched cards to be used in the jacquard machine, kept in a corner. Shot inside Mani's house.
PHOTO • Remya Padmadas
The charkha in Mani's home used to spin the kasavu (zari) into smaller rolls
PHOTO • Remya Padmadas
The charkha in Mani's house used to spin the kasavu into smaller rolls
PHOTO • Remya Padmadas

मणी के यांच्या घरीः जकार्ड मशीनसाठी वापरात येणाऱ्या भोकं असणाऱ्या कार्डांचे गठ्ठे (डावीकडे) आणि कसावुची रिळं भरण्यासाठी वापरण्यात येणारा चरखा (मध्यभागी आणि उजवीकडे)

कुथमपल्लीचे अनेक तरुण पदवीधर आहेत आणि त्यांना विणकामात रस नाही, मणी सांगतात. त्यांचा मुलगा मेकॅनिकल अभियंता आहे आणि त्रिशूरमध्ये एका बांधकाम कंपनीत काम करतो. “तुम्हाला विणकामातून महिन्याच्या शेवटी केवळ ६,००० रुपये मिळणार असतील, तर तितक्या पैशात काय होणारे?” तो विचारतो. “त्यामुळेच कुणीही तरुण या व्यवसायाकडे वळत नाहीयेत, त्यांना बाहेर कुठे तरी काम करायचंय.”

सुरजित स्वतः अभियंता आहे. तो विणकाम शिकला नाही. त्यांच्या कापड दुकानाचं काम तो पाहतो. त्याचे वडील कुथमपल्ली हॅण्डलूम इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव आहेत आणि त्याची आई कुथमपल्लीतल्या आपल्या घरी विणकाम करते. तो म्हणतो, “तरुणांना या उद्योगात काम करण्यात अजिबात रस नाहीये. इतर ठिकाणी तुम्ही स्वतंत्रपणे काम करता आणि तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. पण विणकामासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच एक चमू लागतो. गिऱ्हाइकाला विशिष्ट रंग हवा असला तर तुम्हाला सूत रंगवून घ्यावं लागतं, त्यासाठी इतरांची मदत लागते. या सगळ्याला दिवस लागतो, आणि ते एकट्याचं काम नाही. तुम्हाला कशी नक्षी हवी आहे त्याप्रमाणे पंच कार्ड दुसरं कुणी तरी तयार करून देतं. मागात काही बिघाड झाला तर कारागिराला बोलावून ते दुरुस्त करून घ्यावं लागतं. यातलं कोणतंच काम तुम्ही एकटे करू शकत नाही. सगळं काम गटात चालतं आणि इतक्या गोष्टीत दुसऱ्यांवर अवलंबून राहून काम करणं अवघड आहे.”

जया मणी घरी त्यांच्या पतीसोबत दोन मागावर काम करतात. त्यांना हे पटतं. “विणकामासाठी फार लोकांची मदत लागते,” त्या म्हणतात. “पावु सरळ करून गुंडाळण्यासाठी आम्हाला आमचे शेजारीपाजारी मदत करतात, आणि आम्ही त्यांना. तशी मदत केली नाही तर आम्ही कामच करू शकणार नाही.” जया आणि त्यांचे पती हॅण्डलून सोसायटीशी संबंधित आहेत आणि दोघं मिळून महिन्याला १८,००० ते २५,००० रुपये कमवतात.

असं असूनही आजही ज्या मोजक्या महिला विणकाम करतात त्यात जयांचं नाव घ्यायला पाहिजे. “बहुतेक बाया आजकाल कापडाच्या दुकानात काम करतात, कारण तिथलं काम सोपं असतं आणि एकटीने करता येतं,” त्या म्हणतात. “माझ्या मुलांना काही या कलेत रस नाही. माझ्या मुलीला विणकाम कसं करायचं माहितीये. पण तिने जर हे काम सुरू केलं तर तिला घरच्या इतर कामांकडे लक्ष देता येत नाही. माझ्या मुलाला तर काडीचा रस नाही आणि तो दुकानात काम करतो. त्याला तरी काय दोष देणार? या धंद्यात काही नफा नाही.”

Jaya Mani works on a loom in her home. In the dying light of the setting sun, the threads on her loom glow faintly.
PHOTO • Remya Padmadas
The roller of a handloom in Kuthampully, over which 4,000 to 4,500 threads of yarn are strung.
PHOTO • Remya Padmadas

डावीकडेः अजूनही विणकाम करणाऱ्या काही मोजक्या विणकर महिलांपैकी एक, जया मणी. उजवीकडेः हातमागाचा रोलर ज्यावर ४,००० ते ५,००० धागे अडकवले जातात

कुथमपल्लीतलं हातमागावरचं काम मागे पडतंय त्याला आणखी कारण आहे. नक्षीकाम असणाऱ्या साड्या जास्त वेगाने आणि कमी खर्चात विणणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या यंत्रमागांच्या वाढता प्रसार. हॅण्डलूम सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या मते कुथमपल्लीतल्या दुकानांमध्ये दर्शनी भागात लावलेल्या साड्यांपैकी ८० टक्के तर तमिळ नाडूतल्या यंत्रमागांवर विणलेल्या आहेत.

“यंत्रमागावर एका दिवसात ५ ते ६ साड्या विणून होतात आणि रात्रभर माग चालवला तर १० साड्यादेखील होऊ शकतात. चार यंत्रमागांवर देखरेख ठेवण्यासाठी एक माणूस पुरेसा असतो. सगळी प्रक्रिया संगणकीकृत आहे,” सुरजित सांगतो. “हातमागावर एका वेळी एकच विणकर एकच साडी विणू शकतो. किंमतीतही प्रचंड फरक आहे – हातमागावरच्या साडीसाठी रु. २००० खर्च येत असेल तर यंत्रमागावरची साडी ४०० रुपयांत तयार होते.”

असं असेल तर मग लोक हातमागावरचे मुण्डु आणि साड्या विकत तरी का घेतात? “दर्जा,” तो म्हणतो. “हातमागावरची साडी इतकी मऊसूत असते की ती नेसली तरी तिचं वजनही जाणवत नाही. यंत्रावर विणल्या गेलेल्या साड्या वेगळ्या प्रकारच्या कसावुचा वापर करतात. आणि दर्जाच्या बाबत जमीनअस्मानाचा फरक आहे. आणि हो, हातमागावरची साडी जास्त काळ टिकते.”

The entrance to a shed in Kuthampully, where weaving takes place.
PHOTO • Remya Padmadas
Settu sarees in a handloom shop in Kuthampully
PHOTO • Remya Padmadas

उजवीकडेः गावातल्या हातमाग केंद्राचं प्रवेशद्वार. डावीकडेः कुथमपल्लीच्या हातमाग दुकानांमधल्या सेट्टु साड्या, विक्रीसाठी सज्ज

सध्या हातमागाच्या साड्यांना असलेल्या मागणीमुळे विणकर तगून आहेत. मात्र ऑगस्ट २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे या उद्योगाचं कंबरडं मोडलं आहे. कुथमपल्ली हॅण्डलूम इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटीच्या व्यवस्थापन कर्मचारी ऐश्वर्या एस. सांगतात की पुरानंतर किमान रु. १ कोटी मूल्य असणारा तयार माल जो व्यापाऱ्यांना उधारीवर विकला होता तो परत आला कारण दुकानात मालाला उठावच नाहीये. आणि इतका सगळा माल विक्रीवाचून पडून राहिला असल्याने सोसायटीला १४० विणकरांना त्यांचा मेहनताना देण्यासाठी कर्ज काढावं लागलं. ऑगस्टमध्ये केरळमधला सर्वात लोकप्रिय सण ओणम असतो, जेव्हा पारंपरिक पोषाखांची विक्री सगळ्यात जास्त होते. सोसायटीने नंतर सवलतीच्या दरात साड्या विक्रीला काढल्या मात्र अजूनही बराचसा माल विक्रीसाठी पडून आहे.

कुथमपल्लीमध्ये पुराने एवढं काही नुकसान केलं नाही. “पुराचा आम्हाला फार काही फटका बसला नाही,” अळगिरी सामी म्हणतात. “आमच्या गावाच्या दोन्ही अंगानी नदी वाहते आणि एकीकडे पाणी जरा वाढलं होतं पण फार मोठं नुकसान झालं नाही.”

पुराच्या थैमानानंतर इतकी वर्षं राज्याची ओळख बनलेल्या, सणसमारंभाला विकल्या जाणाऱ्या पिवळसर आणि सोनेरी काठाच्या साड्या विणणाऱ्या हॅण्डलूम सोसायटीने केरळच्या इतर भागात रंगीत साड्या विणण्याचा निर्णय घेतला. त्यामागे त्यांचं म्हणणं होतं की या वर्षभर विकल्या जाऊ शकतील. गावातल्या अनेक विणकरांनी विरोध केला. “इथले बहुतेक विणकर वृद्ध आहेत आणि त्यांना डोळ्याला कमी दिसतं. रंगीत साड्या विणायला जास्त वेळ लागतो, बारकाईने लक्ष देऊन खूप एकाग्रतेने काम करावं लागतं,” ऐश्वर्या सांगतात. “पण हा उद्योग जर टिकून रहायचा असेल तर आम्हाला हा बदल करावाच लागणार आहे. अर्थात हे सगळं कसं होईल याचं उत्तर काळच देऊ शकेल.”

अनुवादः मेधा काळे

Remya Padmadas

Remya Padmadas is an independent journalist based in Benglauru and Kerala. She has previously worked with Reuters as a business correspondent. Her dream is to travel the world and become a teller of stories.

Other stories by Remya Padmadas
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale