पारीवरच्या ओवी संग्रहातल्या या सहा ओव्या ताडकळसच्या गंगुबाई अंबोरेंनी गायल्या आहेत. उन्हाची काहिली, मुलाला ऊन लागत असेल त्याची काळजी याविषयी गातानाच आपल्या पतीला चारित्र्यसंपन्न पत्नी मिळाल्याचा किती अभिमान आहे तेही सांगतात.

मे महिन्याच्या उन्हाच्या तलखीत ओवी संग्रहातल्या या उन्हाळ्यावरच्या ओव्या तुमच्यासाठी सादर करत आहोत.

परभणीच्या ताडकळसच्या गंगुबाई अंबोरे त्यांच्या खड्या आणि गहिऱ्या आवाजात या ओव्या गाताहेत. ८  मार्चला त्यांच्याच आवाजातल्या ओवीने पारीवर या ओवी संग्रहाची सुरुवात झाली. दुःखाने गहिवरलेली आणि वर्षानुवर्षीचा एकाकीपणा भरून राहिलेल्या त्यांच्या ओव्या आम्ही सादर केल्या. त्यांचा आवाज सगळ्यांच्याच मनात रुंजी घालत राहिला.

PHOTO • Bernard Bel

पहिल्या ओवीत गंगूबाई म्हणतात की त्या सकाळी उठतात, कवाड उघडतात तोच त्यांना राम दिसतो.

दुसऱ्या ओवीत सकाळी उठल्यावर पेठेचा रस्ता झाडत असताना रामाचा भक्त मारुतीरायाचं दर्शन झाल्याचं त्या सांगतात.

तिसऱ्या ओवीमध्ये सकाळी उठल्यावर कवाड उघडताच तुळशी वृंदावनापाशी रामाला पाहिल्याचं त्या गातात.

चौथ्या ओवीत चैत्राचं ऊन कसं कडक आहे सांगत असतानाच माझा मुलगा, कसा गळ्याच्या ताइताचं सोनं आहे ते त्या प्रेमानं गातात.

उन्हाळ्याचं ऊन कपाळाला लागतंय, त्यामुळे माझ्या गोपाळाला दस्ती-रुमाल द्यावा असं पाचव्या ओवीत गायलंय.

सहावी ओवी आहे शालीनतेबद्दल. असं म्हटलंय की मी घराबाहेर रस्त्याने जाताना कुणाकडेही पाहत नाही. आणि त्यामुळे माझ्या पतीचा माझ्यावर फार लोभ आहे, त्याला माझा अभिमान वाटतो.

सकाळी उठूनी हात माझा कवाडाला
राम नदरी पडला

सकाळी उठूनी झाडीत होते पेठ रस्ता
राजा मारवती देव आलाय रामाचा गुमस्ता

आत्ता सकाळी उठूनी हात माझा कवाडाला
तुळशीच्या वृंदावनी राम नदरी पडला

असं उन्हाळ्याचं ऊन ऊन लागतं चईताचं
असे माझे गं पंडीत सोनं माझ्या ताईताचं

असं उन्हाळ्याच ऊन लागतं गं कपाळाला
बाळा माझ्या पंडीताला दसती दंड गोपाळाला

अशा रस्त्याने चालले पाहीना मी कोणीकडं
राया माझ्या देसायाला समुद्राला पाणी चढं


Profile shot of Gangubai Ambore (The grindmillsongs project)
PHOTO • Bernard Bel

कलाकार – गंगुबाई अंबोरे

गाव – ताडकळस

तालुका – पूर्णा

जिल्हा – परभणी

जात – मराठा

वय – ५६

शिक्षण – नाही

मुलं: १ मुलगी

व्यवसायः ऊस, कापूस, भुईमूग, ज्वारी निघणारी घरची १४ एकर शेती. मात्र घरातून हाकलून दिल्यामुळे गावच्या देवळात राहत असत.

दिनांक  – या ओव्या ७ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आल्या.

पोस्टर – श्रेया कात्यायनी

अनुवाद - पल्लवी कुलकर्णी

PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Editor and Series Editor : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Pallavi Kulkarni

Pallavi Kulkarni is a Marathi, Hindi and English translator.

Other stories by Pallavi Kulkarni