दिवाळीच्या निमित्ताने बहीण भावाचं नातं साजरं करणाऱ्या भाऊबिजेबद्दलच्या या तेरा जात्यावरच्या ओव्या घेऊन येत आहोत. या गायल्या आहेत, पुणे जिल्ह्यातल्या नांदगावच्या शाहूबाई कांबळे यांनी.

शाहूबाई कांबळेंचा आवाज कोणाच्याही हृदयाचा ठाव घेऊ शकतो. त्यामुळेच आम्ही सप्टेंबर २०१७ मध्ये मुळशी तालुक्यातल्या नांदगावला जायचं ठरवलं. त्यांना भेटावं, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घ्यावेत अशी आशा मनात धरून आम्ही गेलो खरे. पण तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की शाहूबाई एक वर्षापूर्वीच हे जग सोडून गेल्या. आणि आम्हाला त्यांच्या घरच्यांकडून फक्त त्यांचा एक जुना फोटो काय तो मिळाला. शाहूबाईंच्या मागे त्यांचे पती, दोन मुलगे, सुना आणि नातवंडं आहेत.

Nandgaon signboard
PHOTO • Namita Waikar

नांदगावच्या वेशीवर, याच गावात शाहूबाई रहायच्या, काम करायच्या आणि इथेच त्यांच्या गोड आवाजतल्या ओव्या त्यांनी गायल्या

शाहूबाईंनी जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी एकूण ४०१ ओव्या गायल्या आहेत, ज्यातल्या १०७ ऑक्टोबर १९९९ मध्ये ध्वनीमुद्रित करण्यात आल्या आहेत (इतर मात्र १९९५-९६ मध्ये फक्त लिहून घेतलेल्या आहेत). महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून गोळा केलेल्या १,१०,००० ओव्यांपैकी या काही. आता हा मोलाचा ठेवा पारीकडे जतन करण्यासाठी आला आहे आणि पारीचा एक गट या ओव्या गाणाऱ्या काही कलावंतांना भेटण्यासाठी पुन्हा त्या गावांना भेट देत आहे, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ गोळा करत आहे.

दिवाळी सणाच्या या ओव्या पुरुषप्रधान संस्कृतीत घट्ट रुतलेल्या सामाजिक व्यवस्थेकडे बोट दाखवतात. कोणत्याही सणाला घरच्या पुरुषांचंच कौतुक, औक्षण घरच्या स्त्रियांकडन केलं जातं. पैशाची सत्ताही पुरुषांकडेच आणि त्यामुळे घरच्या स्त्रियांना भेट देण्याची, ओवाळणी टाकण्याचा वरचष्माही त्यांच्याचकडे.

पुढे सादर केलेल्या ओव्यांमध्ये शाहूबाई भाऊबिजेबद्दल गातायत. भाऊबिजेच्या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात, औक्षण करतात आणि भाऊ तिला ओवाळणी घालतात.

या ओव्यांमध्ये शाहूबाई त्यांच्या मैत्रिणीला सांगतात की दसऱ्याच्या दिवशी ताटामध्ये मणी ठेऊन त्यांनी आपल्या पतीला ओवाळलं. शाहूबाईंनी गायलेल्या दसऱ्याच्या ओव्या झेंडूच्या फुलांसारखी तजेलदार गाणी या लेखात सादर केली आहेत. आता भाऊबिजेच्या दिवशी भाऊ जी ओवाळणी घालेल त्यातून शालू घ्यायचा मानसही त्या बोलून दाखवतात.

Shahubai's son and daughter-in-law
PHOTO • Samyukta Shastri

शाहूबाईंचा मुलगा संजय कांबळे आणि सून पौर्णिमा

पुढच्या ओवीत त्या म्हणतात, भावानं बहिणीच्या घरीच सोमवार सोडलाय आणि तिनं खास त्याच्यासाठी पंच पक्वान्नाचं जेवण केलंय, खास कारल्याची भाजी केलीये.

कधी कधी आलेला पाहुणा नीट जेवत नाही तेव्हा त्याला हाताला धरून जेऊ घालायची इच्छा ओवीत बोलून दाखवलीये. मात्र तो भाऊ नाही, मेहुणा आहे त्यामुळे त्याच्या हाताला कसं धरावं हा गोंधळही फार छान मांडलाय.

बहिणीनी खास भावासाठी गुळ घालून गोडाचं केलंय आणि हा तिचा भाऊ नवसाचा आहे त्यामुळे त्याला रवा अन् साखरेचा बाकुरही ती भरवत आहे.

शेजारीण जेव्हा तिला विचारते की तिच्या घरी कोण पाहुणा आलाय आणि आता ती त्याला अचानक काय खाऊ घालणार? तेव्हा शाहूबाई गातात की अचानक आला असला तरी बहीण त्याच्यासाठी काही करून अनारसे करणारच. बहीण भावाची माया अगदी पोटातली आहे, जणू सीताफळाच्या आतला गोड गाभा असं सुंदर वर्णन पुढच्या ओवीत येतं.

शेवटच्या दोन ओव्यांमध्ये मात्र शाहूबाई भावजयीमुळे बहीण भावाचं प्रेमळ नातं कसं तुटतं ते गातात. एका झाडाच्या संत्र्यासारखे असलेल्या या भावा-बहिणीमध्ये परक्याच्या नारीमुळे म्हणजे भावजयीमुळे अंतर पडत जातं असं त्यांनी गायलंय. नणंदा-भावजयांमधला वाद इथे जाणवतो आणि काळाप्रमाणे नात्याचे रंग बदलतात, फिके होतात असंही त्यांनी सुचवलंय.

अशी दसर्याच्या दिशी माझ्या ना ताटामंदी मणी
सांगते ग माझे बाई ववाळू घरधनी

भावाला ग भाऊबीज करु दोघी तिघी
सांगते ग माझे बाई शालू घेऊ मनाजोगी

अशी दसर्याच्या दिशी नाही ग बंधू ववाळीला
भावाला ग भाऊबीज आपण करु दिवाळीला

पंच अमृत भोजन कारलीच्या फोडी
कशी बहिनीच्या घरी भाऊ सोमवार सोडी

पंच अमृत भोजन जेव म्हणते जेवना
कशी हाताला धरु भाव नव्ह तो मेव्हणा

पंच अमृत भोजन याला गुळाचे लेवण
असा जेव माझ्या बंधू भाऊबिजचं जेवण

पाव्हणा ग मला आला शेजी म्हणती कोण व्हावा
माझ्या नवसाच्या बंधूला साखरत मी देते रवा

पाव्हणा ग मला आला शेजी विचारी अंगणात
शेजी विचारी अंगणात तांब्या बुडवी रांजणात

पाव्हणा ग मला आला शेजी म्हणती व्हईल कसं
अशी ना माझ्या बंधूसाठी पैदा करीते अनारसं

तिन्हीसांजचा पाव्हणा हा तर मजला नाही जड
अशी ना आता माझा बंधू माझ्या काळजाचा घड

बहिण ग भावंडाचा आत पोटामधी माया
फोडील ग सीताफळ आत साखरची काया

अशी साखरच पुडी कशी मुग्यांनी येढली
भावाला ग होती माया भाऊजयीनी तोडली

अशी ना बहिण भावंड अेक्या झाडाची संत्र
कशी आली परक्याची तिनी पाडीलं अंतर

aśī dasaryācyā diśī mājhyā nā tāṭāmandī maṇī
sāṅgatē ga mājhē bāī vavāḷū gharadhanī

bhāvālā ga bhāūbīja karu dōghī tighī
sāṅgatē ga mājhē bāī śālū ghēū manājōgī

aśī dasaryācyā diśī nāhī ga bandhū vavāḷīlā
bhāvālā ga bhāūbīja āpaṇa karu divāḷīlā

pañca amṛta bhōjana kāralīcyā phōḍī
kaśī bahinīcyā gharī bhāū sōmavāra sōḍī

pañca amṛta bhōjana jēva mhaṇatē jēvanā
kaśī hātālā dharu bhāva navha tō mēvhaṇā

pañca amṛta bhōjana yālā guḷācē lēvaṇa
asā jēva mājhyā bandhū bhāūbijacaṁ jēvaṇa

pāvhaṇā ga malā ālā śējī mhaṇatī kōṇa vhāvā
mājhyā navasācyā bandhūlā sākharata mī dētē ravā

pāvhaṇā ga malā ālā śējī vicārī aṅgaṇāta
śējī vicārī aṅgaṇāta tāmbyā buḍavī rāñjaṇāta

pāvhaṇā ga malā ālā śējī mhaṇatī vhīla kasaṁ
aśī nā mājhyā bandhūsāṭhī paidā karītē anārasaṁ

tinhīsāñjacā pāvhaṇā hā tara majalā nāhī jaḍa
aśī nā ātā mājhā bandhū mājhyā kāḷajācā ghaḍa

bahiṇa ga bhāvaṇḍācā āta pōṭāmadhī māyā
phōḍīla ga sītāphaḷa āta sākharacī kāyā

aśī sākharaca puḍī kaśī mugyānnī yēḍhalī
bhāvālā ga hōtī māyā bhāūjayīnī tōḍalī

aśī nā bahiṇa bhāvaṇḍa aēkyā jhāḍācī santra
kaśī ālī parakyācī tinī pāḍīlaṁ antara


On Dussehra day, I have a jewel on my platter
O woman, let’s felicitate our respective husbands

We, sisters, will together celebrate our brothers’ Bhaubeej
I tell you, my sister, we shall buy brocade sarees we like

On Dussehra day, I did not felicitate my brother
We shall celebrate Bhaubeej for my brother during Diwali

A meal with five kinds of sweets and fried slices of bitter gourd –
A brother breaks his Monday fast at his sister’s house

A delicious meal – I insist he eat it, but he refuses
How can I hold his hand to stop him? He is not my brother but my brother-in-law

Five kinds of sweets are made with jaggery for the festive meal
Brother, have this special Bhaubeej meal

A guest has come to my house; the woman next door asks who he is
My brother for whom mother had made a vow, I give him sweet semolina

A guest has come to your house? The woman asks me in the courtyard
The woman asks me while dipping a jug in an earthenware pot [of water]

A guest has come to my house, the woman next door says, what will you do
I shall get anarasa [a special Diwali sweet made with rice flour] for my brother

A guest came to my house in the evening, but he is not a burden
My brother has come, he is very dear to me

A sister and brother have deep affection for each other
Like a green custard apple with sugary flesh inside

A packet of sugar is surrounded by ants
My brother loves me dearly but my sister-in-law broke our relation

A brother and a sister are like oranges from the same tree
A sister-in-law comes from another family, she caused a rift between them

Framed photo of Shahu Kamble with garland
PHOTO • Samyukta Shastri


कलावंत : शाहूबाई कांबळे

गाव : नांदगाव

तालुका : मुळशी

जिल्हा : पुणे

जात : नवबौद्ध

वय : ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)

मुलं : २ मुलगे आणि २ मुली

व्यवसाय : शेती

दिनांक : या ओव्या ५ ऑक्टोबर १९९९ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आल्या. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आली.

मालिका संपादकः शर्मिला जोशी

पोस्टरः श्रेया कात्यायनी

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team