कित्येक शतकांपासून राजस्थानच्या पाली जिल्ह्यातल्या सादरी गावचे राइका उंट पाळत आले आहेत. मी फुयाराम राइकांसोबत चडिये किंवा चारणीला गेले. खरं तर हे दिवसभराचं काम असतं. फुयारामजी सकाळी घर सोडतात, सोबत चहाचं सामान आणि रोट्या मुंडाशात बांधून घेतात आणि सांजेला परत येतात. राजस्थानातला असह्य गरमा आणि २० उंटांवर देखरेख ठेवण्याचं काम असतानाही ते त्यांच्या चहात मलाही वाटेकरी करून घेतात.

फुयारामजींना कदाचित कल्पना असावी की त्यांच्या कुटुंबातलं कुणीच त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार नाहीये. त्यांची मुलं कसं हे काम करणार नाहीत हे त्यांनी बोलून दाखवलं. आता पशुपालकांसाठी उरलेल्या मोजक्या काही गायरानांमधून जात असताना त्यांनी मला सांगितलं की कधी काळी राइका लोक सादरीच्या रानावनातून मुक्तपणे संचार करत आणि वाटेत भेटेल त्याच्याशी त्यांचे पक्के ऋणानुबंध जुळत असत.

व्हिडिओ पहाः सादरी गावचे जुनेजाणते फुयारामजी राइका आपल्याला नशिबाबद्दल एक कहाणी सांगतात. त्यांच्या कुटुंबातलं कुणीही त्यांच्यासारखं पशुपालकाचं आयुष्य जगणार नाही याची त्यांना कल्पना आहे 

पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता पुरेशी कुरणं नाहीत, कारण बरीचशी जमीन खाजगी मालमत्ता झालीये किंवा सरकारने ताब्यात घेतली आहे. पशुपालकांना पूर्वी जसं गायरानांचा मुक्त वापर करता यायचा त्यावर आता मर्यादा आल्या आहेत. आणि पूर्वापारपासून एकत्र नांदलेल्या शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आता तेढ निर्माण होऊ लागली आहे.

मी फुयारामजींना त्यांच्या लहानपणी त्यांनी ऐकलेल्या गोष्टी सांगण्याची विनंती केली. त्यांनी एक गोष्ट सांगितली – ही गोष्ट आहे एका भावा बहिणीची, आणि दोन देवांची – भाग्य आणि संपत्तीची. संपत्तीच्या मागे धावणाऱ्यांना सावध करण्यासाठी ही गोष्ट सांगितली जाते.

संलग्न कहाणीः राजस्थानचे राइका

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Sweta Daga

Sweta Daga is a Bangalore-based writer and photographer. She is working on several multi-media projects, including fellowships with the People's Archive of Rural India, and the Centre for Science and Environment.

Other stories by Sweta Daga