पॉलिस्टरची साधी साडी ९० रुपयाला मिळते म्हटल्यावर आपण हातमागावर विणलेली साधी सुती साडी ३०० रुपयांना कोण घेणार असा प्रश्न मधुसूदन तांतींना सतावतोय.
ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या कोटपाड तहसिलातलं डोंगरीगुडा हे त्यांचं गाव. चाळिशीतले तांती गेली कित्येक वर्षं हामागावर कोटपाड साड्या विणतायत. या साड्यांवर अतिशय नाजूक आणि सुरेख नक्षीकाम केलेलं असतं. काळ्या, लाल आणि तपकिरी रंगाच्या अतिशय मोहक साड्या असतात या.
“विणकाम हा आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. माझा आजा विणायचा, माझा बाप आणि आता माझा मुलगा विणतो,” मधुसूदन सांगतात. आपल्या आठ जणांच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ते इतरही अनेक कामं करतात.
अ वीव्ह अन टाइम ही फिल्म २०१४ साली तयार करण्यात आली होती. मधुसूदन यांच्याकडे परंपरेने आलेला विणकामाचा वारसा आणि तो जतन करण्यात येणारी आव्हानं यांचा मागोवा ही फिल्म घेते.