सांगा शेती करू कशी? करू कशी?
पोटाची खळगी भरू कशी? भरू कशी?

भारतात संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला रोज सतावणारा हा सवाल आहे. पण या पोशिंद्याच्या वतीने हे ऐकायला कुणाला तरी वेळ आहे का, गायक आणि संगीतकार अजित शेळके विचारतो.

“आपल्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याला कसं झगडावं लागतं, ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. हमीभावाची आणि कर्जमाफीची वचनं फक्त राजकीय लाभासाठी वापरली जातात,” महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा २२ वर्षांचा अजित म्हणतो.

Ajit Shelke or ‘Rapboss’ sings powerfully in this Marathi rap song about the acute distress of farmers

गायक-संगीतकार अजित शेळकेः ‘पोशिंदा तो जगाचा, आज झोपला रं उपाशी’

अजितच्या कुटुंबाचं उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या शेळका-धानोरा गावात आठ एकर रान आहे जिथे ते  सोयाबीन आणि हरभरा करतात. पाऊस पडलाच तर ते ऊसही घेतात. “आमच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी माझ्या वडलांना किती त्रास झेलावा लागलाय तो मी पाहिलाय,” तो म्हणतो. “किती तरी वर्षं आम्ही फार हलाखीत राहिलोय.”

शहरात राहणाऱ्या अनेकांना शेतकऱ्यांच्या या संघर्षाशी काही देणं-घेणं नाही, तो म्हणतो. “बाजारात त्या गरीब भाजी विकणाऱ्यांशी लोक दोन-पाच रुपयांवरून घासाघीस करतात. पण हेच लोक मोठ्या मॉलमध्ये जाऊन महागड्या वस्तू निमूट आहे त्या किंमतीला घेतात ना.”

या चित्रफितीचा निर्माता, चेतन गरूड गेल्या १० वर्षांपासून अनेक मराठी मनोरंजन वाहिन्यांसोबत काम करतोय. त्याने काही वर्षांपूर्वी स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आणि गावाकडच्या तरुण कलाकारांना तो काम करण्याची संधी देतो. चेतनचे आई-वडीलही शेतकरी आहेत.

व्हिडिओ पहाः ‘सांगा शेती करू कशी’?

सांगा शेती करु कशी ?

जनता सारी झोपली का?
शेतकऱ्यावर कोपली का?
आत्महत्येची कारणे त्याच्या
सांगा तुम्ही शोधली का?

शोभली का तुम्हाला
भाकरी त्याचा कष्टाची?
दोन रूपयाच्या भाजीसाठी
वाद केला त्याच्याशी

चार घोट पानी पिऊन
खेटर घेतलं उशाशी
पोशिंदा तो जगाचा
आज झोपला रं उपाशी

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

कांद्याला भाव नाय
उसाला भाव नाय
तुरीला भाव नाय
खाऊ काय?

आलेल्या पैश्यात
उधारी दिली मी
सावकाराला देऊ काय?

पोराच्या शाळेची
फीस नाय भरली
पोराला घरीच
ठेवू काय?

एकच दिसतो
पर्याय आता
गळ्याला फास मी
लावू काय?

व्यापाऱ्याची मनमानी
सरकारची आणीबाणी
शान के साथ यांचा थाट
कष्टकऱ्याच्या डोळ्यात पानी

पानी कसं शेताला देऊ
वीज दिली रात्रीची
रात्रीच्या त्या काळोखात
भीती विंचू सापाची

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

मेहनत करुन पिकवलेल्या
मालाला आमच्या कमी भाव
सरकार जरी बदललं तरी
कागदावरच हमी भाव

भेगा पडल्या धरणीमायला
दुष्काळी झाली परिस्थिती
सर्वे, दौरे खोटे सगळे
प्रचारासाठीची उपस्थिती

जिवाच्या पल्याड जपलेली
माझी सर्जा-राजा उपाशी
उपाशी त्यांना ठेऊन सांगा
भाकरी मी खाऊ कशी

प्रश्न माझा, उत्तर द्या
सांगा शेती करु कशी?

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

या गाण्याच्या यूट्यूब पानावरूनः या गीताचा (शेतकऱ्यांच्या भावनांचा) वापर कुठल्याही राजकीय पक्षाने स्वतःच्या हितासाठी करु नये.

व्हिडिओतील कलाकार रॅपबॉस (अजित शेळके) आणि निर्माता चेतन गरूड, चेतन गरूड प्रॉडक्शन्स यांच्या अनुमतीसह हा व्हिडिओ पुनःप्रकाशित करण्यात येत आहे

शीर्षक छायाचित्रः पुरुषोत्तम ठाकूर/ पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया

अनुवादः मेधा काळे

Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے