रोजची दळणं सुरूच आहेत. पुणे जिल्ह्याच्या निमगाव केतकीच्या या तिघी जणी आपल्या भावासाठी प्रेमाने ओव्या रचतायत आणि गातायत

“अशी जितेंद्र बंधवाला, हाती जीप या सोभा देती,” ओवी रचत निमगाव केतकीच्या या तिघी गातायत. आपल्या भावाला जीप शोभून दिसते. आणि भाऊ कोण?  जितेंद्र मैड. जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ गटातला तरुण संशोधक. निमगाव केतकीला जाऊन ओव्या रेकॉर्ड करण्याचं त्याचं काम सुरू होतं.

आपल्या भोवतालाशी जुळवून घेत फुलाबाई भोंग, चंद्रभागा भोंग आणि भागू मोहिते या तिघी इंदापूर तालुक्यातल्या चिचंवाडी वस्तीवर १५ ओव्या रचतात. आपल्या भाऊ मोठा माणूस आहे याचा त्यांना अभिमान वाटतो. ‘जितेंद्र बंधवाला, श्रीमंताला गर्व नाही’ असं म्हणून त्या त्याचं कौतुक करतात.

१९९५ साली या ओव्या रेकॉर्ड करण्यात आल्या. प्रत्येक जण एकेक शब्द गुंफत होती आणि सगळ्या मिळून ओवी रचून ती गात होत्या. जुन्या काही ओव्यांचे शब्द त्या विसरल्या होत्या. जितेंद्रने त्यांना ते आठवायला मदत केली. आणि सगळ्यांनी मिळून मजा करत या ओव्या रचल्या, गायल्या आणि रेकॉर्ड केल्या. संशोधक म्हणून गेलेल्या जितेंद्रला त्यांनी आपल्या दुनियेत सामावून घेतलं, सहज.

आपल्या बहिणीच्या गावी भाऊ कसा येतो हे पहिल्या दोन ओव्यांमध्ये गायलं आहे.

असा जिपड्याचा बसणार, माझ्या घराला आला पायी
असा जितेंद्र बंधवाला, शीरीमंताला गर्व नाही

वेड्यावाकड्या वाटेने सफाईदारपणे जीप चालवत येणाऱ्या आपल्या भावाकडे ती कौतुकाने पाहते. एरवी श्रीमंतीचं प्रतीक असणारी जीप चालवत येणारा भाऊ आपल्या घरी पायी येतो. त्याला कसला गर्व नाही याचंही बहिणीला कौतुक वाटत राहतं.

या ओव्यांमधला भाऊ हा गुणाचा आहे. भलं बुरं जाणणारा, श्रीमंतीचा गर्व नसणारा. ओवीमध्ये एक प्रसंग सांगतात. दोघी बहिणी भावाच्या गावाला चालल्या आहेत. वाटेने जाणाऱ्या वाटसराची नजर एकीला भुलवते. त्याच्यासाठी ती आपली वाट सोडून द्यायला तयार होते. पण तिचा भाऊ, म्हणजे जितेंद्र म्हणतो की “आपलं नाव सांभाळ”. असा सल्ला देणं हे त्याच्या प्रेमाचं द्योतक आहे.

PHOTO • Antara Raman

भावासाठी आपल्या खर्चाने मुंडावळ्या घेण्यातून बहिणीची त्याच्यावरची माया दिसून येते

आपल्या भावाला काय जेऊ घालावं अशा काही ओव्या आहेत आणि त्यातूनही या बहिणींना भावाविषयी किती प्रेम वाटतं तेच लक्षात येतं. एकीची चूल थंड आहे पण विस्तव आणून ती त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून त्याला जेऊ घालणार आहे.

असा पाव्हण्याला पाव्हणचार, अन् मी करिते डाळकांदा
किती सांगू रे बंधु तुला, कळी पाडूनी लाडू बांधा

पुढच्या ओव्यांमध्ये धाकट्या भावाचं लग्न ठरल्याचं बहिणीला समजतं. “अगं नेनंता माझा बंधु, नवरा व्हायाचा वैशाखात,” ती गाते. ती स्वतःच्या हाताने मोत्याच्या मुंडावळ्या ओवते, त्या कापसात नीट जपून ठेवते. स्वतःच्या खर्चाने मुंडावळ्या घेण्यातून बहिणीला भावाविषयी वाटणारी माया समजते.

शेवटच्या दोन ओव्यांमधेय भागुबाई मोहिते यांनी आपल्या माहेराविषयी किती वेगवेगळ्या भावना दाटून येतात ते गायलं आहे. आपल्या भावाचं यश आणि त्याच्या संपत्तीविषयी मनात कौतुक तर आहे पण आता आपल्या भावांच्या जिवावर भावजयी राज्य करतायत अशी काहीशी असूया देखील या ओव्यांमध्ये जाणवत राहते. कुटुंबातल्या नात्यांचे ताणेबाणे कसे गुंतलेले आहेत आणि प्रेम आणि जिव्हाळ्यासोबत असे ताणतणाव आयुष्याचा भाग आहेत हेच बायांच्या ओव्यांमधून कळतं.

रोजचं दळण सरलंय आणि आता तिच्या सुपात पानपुडा आहे म्हणजेच दोन क्षण निवांत बसून ती सुपारी चघळेल, नाही तर पान लावील. आणि मग ती आपल्या सख्यांना सांगते की काहीही असो माझा चुडा म्हणजे पती नऊ लाखाच्या तोलाचा आहे.

ओव्यांच्या मधेमधे जितेंद्र आणि या सगळ्या जणींच्या गप्पा नक्की ऐका. तो आपलं लग्न ठरेल तेव्हा त्यांना लग्नाला यायचं आमंत्रण देतो. तुम्ही यायचं, हळद फोडायची सगळं करायचं म्हणतो तेव्हा त्याही हसत हसत म्हणतात, “आम्हाला घेऊन जा. आम्ही गाणी गाऊ तुमच्या लग्नात.” आणि मग क्षणात हेही सांगतात, “आम्हाला घेऊन जावं लागेल. तुमचं घर आम्हाला कुठं माहितीये?”

फुलाबाई भोंग, चंद्रभागा भोंग आणि भागु मोहितेंच्या आवाजात या ओव्या एका


असा जिपड्याचा बसणार, माझ्या घराला आला पायी
असा जितेंद्र बंधवाला, शीरीमंताला गर्व नाही

अशी वाकडी तिकयाडी, वाट बंगल्यावरी जाती
अशी जितेंद्र बंधवाला, हाती जीप या सोभा देती

असं वाटंच्या वाटसरा, तुझी नदर न्यारी न्यारी
अरे तुझ्या या जिवासाठी, वाट सोडून दिली सारी

असा जितेंद्र बंधु बोलं, संबळ आपल्या नावायाला
आज आम्ही ना दोघी बहिणी, येतुया तुझ्या या गावाला

असं बंधुला भोजयान, चूल माझिया थंडगार
असा जितेंद्र बंधुराया, आला बुंदीचा जेवणार

असा पाव्हण्याला पाव्हणचार, अन् मी करिते डाळकांदा
किती सांगू रे बंधु तुला, कळी पाडूनी लाडू बांधा

असा पाव्हण्याला पाव्हणचार, पाठकऱ्याला चहा बी पाणी
अगं बोलतो बंधु मला, पड चिमणी, ने जा पाणी

अगं सकाळीच्या पारी, माझी नजर कशीबशी
किती सांगू रे बाळा तुला, कुठं गेलिया कपबशी

अगं सकाळीच्या पारी, माझी नजर कशीबशी
किती सांगू रे शिवराजा, आहे रं जाग्याला कपबशी

तुझा माझा या भाऊपणा, भाऊपण्याची चितरायी
किती सांगू रे बंधु तुला, टाक संतरंजी हाथरायी

अगं  बंधुचं लगियान, मला कळालं बाजारात
अगं मोतियाच्या मंडवळ्या, घेते जरीच्या पदरात

अगं बंधुचं लगियान, मला कळालं सासयारी
अगं मोत्याच्या मंडवळ्या, आन् मी वविते वसयारी

अगं मोत्याच्या मंडवळ्या, आन् मी ठेविते कापसात
अगं नेनंता माझा बंधु, नवरा व्हायाचा वैशागात


असं सरलं दळयीण, नाही सरल्या बारा ओव्या
असं बंधुच्या जिवावरी, राज्य करिती भाऊजया

असं सरलं दळयीण, माझ्या सुपात पानपुडा
असं वं सांगते सया तुला, नवलाखाचा माझा चुडा



PHOTO • Hema Rairkar

फुलाबाई भोंग

कलाकार : फुलाबाई भोंग, चंद्रभागा भोंग

गाव : निमगाव केतकी

तालुकाः इंदापूर

जिल्हा : पुणे

जात : फुलमाळी

दिनांक – हे तपशील, ओव्या आणि छायाचित्र ५ ऑक्टोबर १९९९ नोंदवण्यात आले आहेत.


कलाकार : भागुबाई मोहिते

गाव : निमगाव केतकी

तालुकाः इंदापूर

जिल्हा : पुणे

जात : मराठा

दिनांक – हे तपशील, ओव्या आणि छायाचित्र ५ ऑक्टोबर १९९९ नोंदवण्यात आले आहेत.


पोस्टरः ऊर्जा

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

نمیتا وائکر ایک مصنفہ، مترجم اور پاری کی منیجنگ ایڈیٹر ہیں۔ ان کا ناول، دی لانگ مارچ، ۲۰۱۸ میں شائع ہو چکا ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز نمیتا وائکر
PARI GSP Team

پاری ’چکی کے گانے کا پروجیکٹ‘ کی ٹیم: آشا اوگالے (ترجمہ)؛ برنارڈ بیل (ڈجیٹائزیشن، ڈیٹا بیس ڈیزائن، ڈیولپمنٹ اور مینٹیننس)؛ جتیندر میڈ (ٹرانس کرپشن، ترجمہ میں تعاون)؛ نمیتا وائکر (پروجیکٹ لیڈ اور کیوریشن)؛ رجنی کھلدکر (ڈیٹا انٹری)

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI GSP Team
Illustration : Antara Raman

انترا رمن سماجی عمل اور اساطیری خیال آرائی میں دلچسپی رکھنے والی ایک خاکہ نگار اور ویب سائٹ ڈیزائنر ہیں۔ انہوں نے سرشٹی انسٹی ٹیوٹ آف آرٹ، ڈیزائن اینڈ ٹکنالوجی، بنگلورو سے گریجویشن کیا ہے اور ان کا ماننا ہے کہ کہانی اور خاکہ نگاری ایک دوسرے سے مربوط ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Antara Raman