“तुम्ही ते सुरक्षेसाठीचे कपडे घातलेत, तर तुम्ही एखाद्या अंतराळवीरासारखे दिसाल, एकदा महानगर पालिकेचा एक अधिकारी मला सांगत होता,” कोइम्बतूरच्या महानगरपालिकेमध्ये सफाई कामागार म्हणून काम करणारे, तुंबलेली गटारं साफ करण्यासाठी त्यात उतरणारे ६० वर्षाचे मणी सांगत होते. “सर, मी त्यांना नम्रपणे म्हणालो, तुम्ही स्वतः एकदा घालून बघा, मग मीही जरूर घालेन.”

मणी (ते फक्त त्यांचं नाव लावतात) पुढे सांगतात, “आपल्या देशात जर कुणी अधिकारी आपल्याला सुरक्षेचे कपडे आणि नाकाला ऑक्सिजन लावून गटारात किंवा ड्रेनेट लाइनमध्ये उतरायला सांगत असेल तर एक तर त्याला काय कळत नाही किंवा तो नुसता हवेत बाता मारत असतो. कारण तिकडे आतमध्ये हलायला इंचभरही जागा नसते. आम्ही जास्तीत जास्त आमच्या अंगावर चड्डी ठेऊन आत उतरू शकतो. आम्हाला वेडं बनवायचं काम आहे त्यांचं. त्यांना कसलीही पडलेली नाहीये, कारण शेवटी त्या घाणीत आमची शरीरं असतात आणि त्यांनाही वाटतंच की ही असली कामं करणं आमच्या जातीचं कामच आहे.”

तरीही, वर्षानुवर्षांच्या कामातून आलेल्या त्यांच्या अंगच्या कौशल्यांचा त्यांना अभिमान वाटतो आणि ते इतर सफाई कर्मचाऱ्यांना गटारात कसं उतरायचं आणि तिथल्या जीवघेण्या वायूंपासून कसा बचाव करायचा ते शिकवत असतात. “हल्ली जो येतो तो आम्हाला शिकवू लागतो,” ते म्हणतात, “पण इतर कुणाहीपेक्षा आम्हालाच या समस्या जास्त नीट माहितीयेत ना. अहो सफाई कर्माचाऱ्यांचे मृत्यू थांबवायचे असतील, तर सरकारने सगळ्या ड्रेनेज लाईन नव्याने टाकायला पाहिजेत, दुरुस्त करायला पाहिजेत. बाकी सगळ्या भूलथापा आहेत.”

ते लहान असताना मणींचे वडील सुब्बन आणि त्यांची आई पोन्नी कोइम्बतूरच्या सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कामाला होते. “आम्ही हॉस्पिटलच्या आवारातच रहायचो,” ते तेव्हाच्या आठवणी सांगतात. “शाळेतून आलो की मी थेट हॉस्पिटलमध्ये जायचो, इसीजी, एक्सरे अगदी शवविच्छेदनालाही मदत करायचो. त्या काळी १९६० मध्ये ते मला या कामाचे दिवसाला ५-१० पैसे द्यायचे. मी आठवीपर्यंत शाळा शिकलो आणि त्यानंतर सफाईकाम करू लागलो.”

मणी दलित आहेत, चक्किलार जातीचे. त्यांनी शाळा सोडली कारण त्यांचे शिक्षक आणि वर्गातली इतर मुलं त्यांना थोटी म्हणून चिडवायचे, दक्षिणेकडे सफाई काम करणाऱ्या जातींसाठी हा अवमानकारक शब्द वापरला जातो. त्यांना वेगळं बसवायचे. “ते मला शिव्या घालायचे कारण मी मृतदेह आणि मैला साफ करत होतो. शिक्षक तर मला वर्गाच्या बाहेर बसायला लावायचे,” मणी कथन करतात.

मणींच्या पत्नी नागम्मा जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या कचेरीत झाडू मारतात. त्यांना महिन्याला १५,००० पगार मिळतो. त्यांचे वडील नेसय्यर आणि आई किरुबादेखील सफाई कामगार होते, त्या सांगतात. “मी सहावीपर्यंत सेंट मेरीज शाळेत शिकले. ती मिशनरी शाळा होती त्यामुळे तिथे मला कधी भेदभाव जाणवला नाही पण बाहेरच्या जगासाठी मात्र मी अस्पृश्य होते. मी ख्रिश्चन, त्यामुळे मला कसलंच आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे महानगरपालिकेतही मला नोकरी मिळाली नाही. माझं लहान वयातच लग्न झालं आणि मी एम नागम्मा झाले. आणि हे नाव जरा हिंदू नावासारखं वाटत असल्यामुळे मला ही [झाडू मारण्याची] सरकारी नोकरी मिळाली.” नागम्मांनी ३० वर्षं हे काम केलंय आणि २०२० मध्ये त्या निवृत्त होतील.

मणीदेखील वयाच्या २७ व्या वर्षापासून या कामावर आहेत, आता त्यांना महिन्याला १६,००० पगार मिळतो. याआधी ते हेच काम कंत्राटी कामगार म्हणून करत होते. “आता इतक्या सगळ्या वर्षांत,” ते म्हणतात, “माझ्या शरीराला मैल्याची सवय झालीये. पण मी जेव्हा नव्याने हे कामाला लागलो होतो, तेव्हा अंगावरचे सगळे कपडे उतरवून फक्त चड्डीवर त्या गटारात उतरणं किती मुश्किल होतं ते आजही मला आठवतं. जवळ जवळ एक वर्षभर तरी मी रस्त्यामध्ये जवळजवळ नागवा उभा आहे याची मला इतकी शरम वाटायची की बस्स. पण काळ आणि संकट तुम्हाला सगळं काही शिकवतात. आमची जात हेच आमचं नशीब, आमच्या कपाळावर कोरून ठेवलेलं. तुम्ही थोटी म्हणून जन्माला आला असाल तर हा मैला जन्मभर तुमच्या अंगाला चिकटलाच म्हणून समजा. समाज तुम्हाला ‘भंगी’ बनायला भाग पाडतो. या भोगातून सुटका हवी असेल तर तुमच्याकडे चिवट इच्छाशक्ती आणि घरच्यांचा पाठिंबा हवा. आम्ही काही यातनं बाहेर पडू शकलो नाही, पण आम्ही आमच्या मुलांना मात्र आम्ही वेगळा मार्ग तयार करून दिलाय.”

हे जातीने लादलेलं त्यांचं काम त्यांच्यासोबतच संपावं अशी मणी आणि नागम्मा, दोघांचीही इच्छा आहे. आपल्या मुलांना हा भेदभाव सहन करावा लागणार नाही याची त्यांना खात्रीच होती. “माझं एकच स्वप्न होतं – माझ्या मुलांची या घाणीतून आणि जीवघेण्या वायूंपासून सुटका व्हावी,” मणी सांगतात. “हे स्वप्न सत्यात उतरावं यासाठी मी आणि माझी बायको खूप झटलोय.” त्यांची मुलगी तुलसी एका कपड्याच्या कारखान्यात प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करते, तिचं लग्न झालंय आणि मुलगा मूर्ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे.


व्हिडिओ पहाः मणी, सोबत त्यांच्या पत्नी नागम्मा, त्यांचं काम आणि जात यावरील कलंकाबद्दल बोलतायत

एखाद्या तुंबलेल्या गटारात उतरण्यापूर्वी आतली परिस्थिती कशी आहे ह्याचा अंदाज ते कसा घेतात हे मला दाखवायचं मणींनी कबूल केलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कचेरीजवळील तुंबलेल्या गटारापाशी ते मला पोचायला सांगतात. ते एका ट्रकमागे जातात आणि नंतर फक्त चड्डीवर बाहेर येतात. मणी हसतात आणि म्हणतात, “वर्षानुवर्षं मी या नरकात जातोय, पण दर वेळी माझ्या मनात एकच भीती असते – काय माहित, मी जिवंत बाहेर येतोय का नाही ते. आत उतरण्याआधी मी डोळे मिटतो आणि माझ्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणतो. मग मी आत डुबकी घेतो. ती माझ्यासाठी भाग्याची आहे. कधी कधी अगदी ऐन वेळी जेव्हा तुंबलेली घाण निघत नसते, तेव्हा मी तिचं नाव घेतो आणि बाहेर यायचं ठरवतो. आतापर्यंत तरी मी सुखरुप बाहेर आलो आहे.”

पण, या वर्षी १ एप्रिल ते १० जुलै या काळात देशभरात ३९ सफाई कामगार गटारांमध्ये किंवा सेप्टिक टँकमध्ये मरण पावले आहेत. हाताने मैल्याचं काम करण्याची पद्धत देशभरात बंद व्हावी यासाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचारी आंदोलन या संघटनेने खासदारांना सादर केलेली आकडेवारी हे सांगते.

मणी त्या गटारात उतरायची तयारी करत असतात, तेव्हा इतर सफाई कर्मचारी गटाराचं झाकण उघडून आत कोणते विषारी वायू नाहीत ना हे तपासण्यासाठी एक आगकाडी पेटवतात. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर मणी आतमध्ये शिरून खाली उतरू लागतात.

ते जर जिवंत बाहेर आले नाहीत तर? बाकीचे सफाई कर्मचारी मात्र निवांत दिसतायत. त्यांच्यासाठी हे रोजचंच काम आहे. नागम्माचे शब्द आठवत मी तिथे उभी आहे, “माझा रोजचा दिवस भीतीच्या ओझ्याखाली जातो. आणि इतका तणाव असताना सगळं काही नीट असल्यासारखं जगणं अशक्य आहे. मणी रोजच दारू पितात. मी त्यावरून त्यांच्याशी भांडतेही. पण मलाही माहितीये, हे असलं घाणेरडं, माणूसपणाला शरम आणणारं काम नशेत असल्याशिवाय करताच येणार नाही. गटारात, सेप्टिक टँकमध्ये माणसं मेल्याच्या बातम्या ऐकल्या की माझं काळीज पिळवटून निघतं. गटारात उतरणाऱ्याची बायको असणं म्हणजे काय ते मला पुरेपूर माहितीये. आमच्या जातीच्या लोकांना कुणी माणसासारखं वागवतच नाहीत. मरेपर्यंत हा जातीचा ठप्पा आमच्यासोबत राहणारच.”

थोड्या वेळाने, मणी त्या गटारातून बाहेर येतात. त्यांचं सगळं शरीर मैल्याने, विष्ठेने भरलंय. ते चेहऱ्यावरची घाण हाताने निपटून काढतात, आणि त्यांचे डोळे दिसू लागतात. “या खेपेलाही नशिबाने मला साथ दिलीये,” इति मणी.

फोटोः भाषा सिंग

अनुवादः मेधा काळे

Bhasha Singh

بھاشا سنگھ ایک آزاد صحافی اور قلم کار ہیں۔ ہاتھ سے میلا ڈھونے کے موضوع پر ان کی کتاب ’ادرِشیہ بھارت‘، (ہندی) پینگوئن کے ذریعے ۲۰۱۲ میں شائع کی گئی (انگریزی میں یہ کتاب ’اَن سین‘ کے نام سے ۲۰۱۴ میں چھپی)۔ ان کی صحافت کا محور ہیں شمالی ہندوستان میں زرعی پریشانیاں، جوہری تنصیبات کی سیاست اور زمینی حقائق، اور دلت، صنف اور اقلیتی حقوق۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Bhasha Singh
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے