“सकाळी ५.०० वाजता चालत निंघालु. बिलोशीला जायाचा आहे. गाड्या चालत नाय. शेटनी हजार-हजार रूपये दिलं होतं. त्याचा थोडा मीठ मसाला विकत घेतला. घरी जानं नाय तं खायाचा काय? गावातून फोन आला होता आम्हाला, ‘आता सगळी जणा आलीस तर ठीक. नाय तं मग दोन वर्ष बाहेरच रहा’.”

डोक्यावर सामानाचे बोचके, कडेवर लहान मूल घेऊन उन्हाच्या कारात पायी चालत गावी निघालेली ती माणसं स्वतबद्दल सांगत होती. गावाजवळून जाताना मी त्यांना पाहिलं अन थांबवून थोडी चौकशी केली. वाडा तालुक्यातील बिलोशी गावचे ते रहिवाशी होते. वसई तालुक्यातील भाताण्याला ते सर्व वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतरित झाले होते. लहान मुले, महिला, पुरूष सर्व एकुण १८ जण कातकरी होते.

कोरोनाच्या भितीने आधीच ते घाबरले होते. लॉकडाऊनमुळे घरी जायला वाहन नाही. त्यातच गावातून त्वरित येण्याचा आदेश मिळाला होता. त्यामुळे सर्व जण पायीच निघाले. सकाळी ११.०० च्या सुमारास ते माझ्या गावी, निंबवली येथे पोचले होते.

“वरून उन्हाचा तडका आहे. डोक्यावर ओझा घेऊन चालता चालता पडलू. आन् लागला,” गुडघे दाखवत कविता दिवा, वय ४५, सांगत होती. तिच्या शेजारी बसलेली २० वर्षांची सपना वाघ सहा महिन्यांची गरोदर होती. लग्न झाल्यापासून ती तिचा नवरा किरण वाघ(२३) सोबत विटभट्टीवर काम करते. लॉकडाऊनमुळे तीही पोटात बाळ अन डोक्यावर सामानाचा बोचका घेऊन त्यांच्यासोबत चालत होती.

Sapna and her husband Kiran Wagh (top left), Devendra Diva and his little daughter (top right), and Kavita Diva (bottom right) were among the group of Katkari Adivasis trying to reach their village in Palghar district from the brick kilns where they work
PHOTO • Mamta Pared

वीटभट्टीवरून पालघर जिल्ह्यातल्या आपल्या गावी परतणाऱ्या लोकांमधले सपना आणि तिचा नवरा किरण वाघ (वरती डावीकडे), देवेंद्र दिवा आणि त्यांची लहानगी लेक (वरती उजवीकडे), आणि कविता दिवा (उजवीकडे खालती)

चालून सर्व थकले होते. तहानले होते. मला विहिरीचा पत्ता विचारून त्यांनी सोबत असलेल्या तरूण पोरांना बाटली घेऊन पाणी आणायला पाठवले. काहीच वेळात मागे पडलेले देवेंद्र दिवा, वय २८ आणि देवयानी दिवा, २५ तिथे येऊन पोचले. सोबत असलेलं लहान बाळ अन सामानामुळे त्यांना वेगाने चालता येत नव्हतं.

काहीच वेळात इथून पुढच्या प्रवासासाठी मी त्यांच्यासाठी बोलावलेलं वाहन आलं. पूर्ण भाडं देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. गाडीचं भाडं २००० रुपये ठरलं. त्यातले ते फक्त ६०० रूपयेच देऊ शकत होते. उरलेल्या पैशांची व्यवस्था करून त्यांचा फार वेळ न घेता त्यांना गावी पाठवून दिलं.

मात्र गावात जाऊन ते करणार काय? हाताला काहीही काम नाही. त्यांच्याकडे भाड्यासाठीही पैसै नव्हते.  मग त्यांनी लॉकडाऊनच्या या काळात जगायचं कसं? असे बरेच प्रश्न उत्तराविना मागे उरले.

देशभरात जगण्यासाठी, आपापल्या गावी परतण्यासाठी असे कित्येक जीव घराबाहेर पडले असतील. कोणी घरी परतले असतील. कोणी तिथेच अडकून राहिले असतील... आणि कोणी घराच्या दिशेने चक्क चालत निघाले असतील.

Mamta Pared

ممتا پارید (۲۰۲۲-۱۹۹۸) ایک صحافی اور ۲۰۱۸ کی پاری انٹرن تھیں۔ انہوں نے پونہ کے آباصاحب گروارے کالج سے صحافت اور ذرائع ابلاغ میں ماسٹر کی ڈگری حاصل کی تھی۔ وہ آدیواسیوں کی زندگی، خاص کر اپنی وارلی برادری، ان کے معاش اور جدوجہد سے متعلق رپورٹنگ کرتی تھیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Mamta Pared