डॉ. भीमराव रावजी आंबेडकरांची १३० वी जयंती साजरी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळेंनी गायलेल्या या ओव्या. सामाजिक न्याय आणि समतेसाठी आंबेडकरांनी  संघर्ष केला. त्या संघर्षातून काय निष्पन्न झालं ते  या ओव्या सांगतात

अशी सडसारवण सारवण, शेजी ना म्हणती आज काही
पाव्हणी गं मला आली, आंबेडकर अन् रमाबाई

आंबडेकर आणि रमाबाई आपल्या घरी पाहुणे येणार याचा आनंदच या ओवीतून प्रतीत होतोय. बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीचं औचित्य म्हणून सादर केलेल्या जात्यावरच्या ओव्यांच्या या माळेतली शाहूबाईंनी गायलेली ही गाणी त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेमाने ओथंबलेली आहेत. हिंदू जातव्यवस्थेने बद्ध अशा समाजात शतकानुशतकं शोषित आणि दलित समाजघटकांच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कांसाठी हा नेता संघर्ष करत राहिला.

शाहूबाई पुणे जिल्ह्याच्या नांदगावात रहायच्या. १९९० च्या दशकात त्यांनी जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूसाठी ४०० ओव्या गायल्या. २०१७ साली सप्टेंबर महिन्यात पारी-जात्यावरच्या ओव्या गट त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून मुळशी तालुक्यातल्या नांदगावला गेला तेव्हा आम्हाला दुःखद वार्ता कळाली. आदल्याच वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगामुळे शाहूबाईंचं निधन झालं होतं.

त्या शेतकरी होत्या, सुईण होत्या. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं. दलित, बौद्ध असलेल्या शाहूबाई डॉ. आंबेडकरांच्या अनुयायी, नवबौद्ध होत्या. त्या कधी शाळेत शिकल्या नाहीत. “पण ओव्या गोड गळ्यात कशा गायच्या त्याचं तिच्याकडे कसब होतं,” त्यांची मैत्रीण आणि नणंद असलेल्या त्यांच्याच गावच्या कुसुम सोनवणे सांगतात. त्या स्वतःही जात्यावरच्या ओव्या गातात.

डॉ. आंबेडकरांना प्रेमाने आणि आदराने बाबासाहेब म्हटलं जातं. त्यांच्या शाळेच्या काळात त्यांना खूप अवमानकारक जातीभेद सहन करावा लागला. त्यांना वर्गाच्या बाहेर, इतर मुलांपासून दूर जमिनीवर बसवलं जाई. पाण्याच्या घड्याला हातसुद्धा लावता येत नसे – केवळ सवर्णांची मुलं त्यातलं पाणी पिऊ शकत.

१४ एप्रिल १८९१ या दिवशी आता मध्य प्रदेशात असलेल्या इंदूरच्या महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला. रामजी आणि भीमाबाई सकपाळांचं हे १४ वं मूल. रामजी तेव्हा इंग्रजी भारतीय सैन्यात नोकरी करत. हे कुटुंब मूळचं कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या आंबडवे गावचं. लहानग्या भीमाला तिथल्या शाळेत शिकण्यासाठी पाठवलं गेलं. त्यांचे शिक्षक कृष्णाची आंबेडकर या मुलाच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे इतके खूश झाले की त्यांनी त्याचं आडनाव बदललं आणि आंबेडकर असं करून टाकलं.

Kusum Sonawane (with Shahu Kamble's photo), says that the late Shahubai had a talent for setting songs to melodious tunes
PHOTO • Namita Waikar

कुसुम सोनवणे (शाहू कांबळेंची तसबीर घेऊन) म्हणतात की ओव्या गोड गळ्यात गाण्याचं तिचं कसबच होतं

भीमरावांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. १९१३ साली ते अमेरिकेला गेले आणि तिथे न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एमए केलं. कालांतराने याच विद्यापीठात त्यांनी आपला प्रबंध सादर केला आणि १९२७ साली त्यांनी पीएचडी ची पदवी प्राप्त केली. मधल्या काळात ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स इथून पीएचडी केली आणि ग्रे’ज इन इथे कायद्याचं शिक्षण घेतलं.

पुढे जाऊन ते एक राजकीय नेता झाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली त्यामध्ये त्यांचा हा अनुभव आणि शिक्षण खूप मोलाचं ठरलं. जातीने ज्यांना पायदळी तुडवलं त्यांच्यासाठी बाबासाहेब अनेक लढे लढले. यातला सगळ्यात प्रसिद्ध असा लढा होता चवदार तळ्याचा. २० मार्च १९२७ रोजी महाराष्ट्राच्या महाड जिल्ह्यातल्या या सार्वजनिक तलावाचं पाणी पिऊन त्यांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवण्याचं मोठं काम केलं.

अशा या आदरणीय नेत्यासाठी शाहूबाईंनी १३ ओव्या गायल्या आहेत. त्यातल्या पहिल्या आठ बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या आयुष्याचं गुणगान करतात. समोर तारा असलेल्या शाही गाडीतून बाबासाहेब येतात याचं कौतुक आहे. आई-बापाच्या पोटी असा हिरा कसा जन्मला याचा अचंबा आहे. ९ कोटी दलितांचं नेतृत्व करणाऱ्या बाबासाहेबांच्या छत्रीचा झुबा त्यांचं शाही स्थानच दाखवून देतो असं त्या गातात.

आता ते जगात नाहीत, पण शाहूबाई म्हणतात, “नका म्हणू ‘भीम मेला’ कारण जाता जाता ते आपल्याला निळ्या झेंड्याची खूण देऊन गेले आहेत.” १९४२ साली डॉ. आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्त फेडरेशनची स्थापना केली तेव्हा या संघटनेसाठी त्यांनी स्वतः अशोक चक्र मध्यभागी असणारा हा झेंडा निवडला होता. दलितांसाठी हा झेंडा राजकीय, सामाजिक ताकद आणि एकतेचं प्रतीक आहे.

यानंतर शाहूबाई गातात की भीमराव हातात पुस्तकं घेऊन, सूट-बूट मोजे घालून येतात तेही ९ कोटी जनतेसाठी कोर्टात लढण्यासाठी. गांधी मात्र तेव्हा तुरुंगात आहेत.

The walls of Kusum Sonawane's home in Nandgaon shows the family's reverence for Babasaheb Ambedkar
PHOTO • Namita Waikar

नांदगावात कुसुम सोनवणेंच्या घरच्या भिंती पाहिल्या की बाबासाहेब आंबेडकरांवरची त्यांची श्रद्धा लगेच दिसून येते

या ओव्या कदाचित पुणे करारासंबंधी असाव्यात. इंग्रज सरकारने ‘डिप्रेस्ड क्लासेस’ (अनुसूचित जाती) साठी केंद्रीय आणि प्रांतीय स्तरावर राखीव मतदारसंघ ठेवण्याची घोषणा केल्यानंतर १९३२ साली आंबेडकर आणि गांधींनी करार केला.

गांधी तेव्हा पुण्याच्या येरवडा कारागृहात होते आणि त्यांचा या राखीव मतदारसंघांना विरोध होता. यातून हिंदू समाजात फूट पडेल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी उपोषण सुरू केलं. आंबेडकर मात्र दलितांच्या हक्कांसाठी लढले. अखेर हे दोन्ही नेते संयुक्त मतदारसंघाच्या प्रस्तावावर राजी झाले मात्र प्रांत स्तरावर अनुसूचित जातींसाठी विधान सभांमध्ये राखीव जागा असतील या अटीवर.

सातव्या ओवीत शाहूबाई म्हणतात, भीमराव आले की त्यांना रहायला खोली मिळते. आणि त्यांनी एका ब्राह्मण मुलीशी सोयरीक केली. (त्यांच्या दुसऱ्या पत्नी, डॉ. सविता आंबेडकर यांचा संदर्भ). ते येतात त्या गाडीला भिंग आहे आणि ते पाहून ब्राह्मणाच्या म्हणजेच सवर्णांच्या मुली दंग झाल्या आहेत. या सगळ्या तपशिलांमधून बाबासाहेबांबद्दलचा आदर आणि अभिमानच व्यक्त होतो. कारण जातीय समाजामध्ये आंबेडकर ज्या जातीत जन्मले त्या महार जातीच्या लोकांना माणुसकीची वागणूक मिळत नव्हती. मात्र त्यांनी जी उंची गाठली त्यामुळे समाजातला एक वर्ग त्यांचं कौतुक करत होता, आणि ही महार जातीच्या लोकांसाठी मोठी मानाची गोष्ट होती.

डॉ. आंबेडकरांना मिळालेली मान्यता मोलाची होती कारण त्यातून दलितांच्या नेत्याने जातीच्या भिंती लांघल्या होत्या. याच भिंती तोडण्यासाठी दलितांचा संघर्ष सुरू होता. अगदी आज २१ व्या शतकातही हा संघर्ष सुरूच आहे.

नवव्या ओवीत शाहूबाई म्हणतात की बाबासहेब आणि रमाबाईंचं स्वागत करण्यासाठी त्या सडा सारवण करतायत. शेवटच्या चार ओव्यांमध्ये गौतम बुद्धाप्रती श्रद्धा व्यक्त केली आहे. डॉ. आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला होता. सकाळी कवाड उघडताच समोर बुद्धाचं दर्शन होतं. आणि मग त्या आपल्या मुलाला सांगतात की चांदी-सोन्याचे देव पुजण्यापेक्षा बुद्धाच्या मार्गाने जावं. त्या म्हणतात, “सकाळच्या पारी बुद्धाचं नाव घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं.”

शाहू कांबळेंनी गायलेल्या १३ ओव्या ऐका

असे आले भीमराव भीमराव, यांच्या मोटारीला तारा
कशी आईबापांच्या पोटी, कसा जलमला हिरा

अशी ना आला भीमराव भीमराव, यांच्या छतरीला झुबा
नवकोटी जनता साठी, सरहद्दीला राहीला उभा

अशी मेला भीमराव भीमराव, नका ना म्हणू भीम मेला
नवकोटी जनताला, निळ्या झेंड्यायाची खुण देऊयनी गेला

अशी आला भीमराव भीमराव, यांच्या पुस्तकाच्या घड्या
नवकोटी जनतासाठी, कशा गांधीला त्या आल्या बेड्या

अशी आला भीमराव भीमराव, यांच्या पायामंदी बूट
नवकोटी जनतासाठी, कोरटाला गेला नीट

अशी आला भीमराव भीमराव, याच्या पाया मंदी मोजा
आपल्या ना जनतासाठी, गांधीला आली सजा

आला भीमराव भीमराव, याला राहायाला खोली
कशी बाभनाची मुली, यानी सोयरीक केली

अशी आला भीमराव भीमराव, याच्या मोटारीला भिंग
अशी बाभणाच्या मुली, पाहुनी गं झाल्या दंग

अशी सडसारवण सारवण, शेजी ना म्हणती आज काही
पाव्हणी गं मला आली, आंबेडकर अन् रमाबाई

बाई सडसारवण सारवण, सारविते लांब लांब
करीते ना तुला आरती, बुध्ददेवा जरा थांब

अशी सकाळच्या पारी, उघडीते दारकडी
अशी माझ्या अंगणात, गौतम बुध्दायाची जोडी

अशी बाई कायीच करावा, चांदी सोन्याच्या देवाला
सांगते रे माझ्या बाळा, लाग बुध्दाच्या सेवेला

अशी सकाळच्या पारी, नाव बुध्दायाचं घ्यावा
सांगते रे माझ्या बाळा, मग चितल्या कामा जावा

कलावंतः शाहू कांबळे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नव बौद्ध

वयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)

मुलं: दोन मुलं, दोन मुली व्यवसायः शेती

दिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०११ रोजी घेण्यात आली.

पोस्टर - सिंचिता माजी

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

अनुवादः मेधा काळे

نمیتا وائکر ایک مصنفہ، مترجم اور پاری کی منیجنگ ایڈیٹر ہیں۔ ان کا ناول، دی لانگ مارچ، ۲۰۱۸ میں شائع ہو چکا ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز نمیتا وائکر
PARI GSP Team

پاری ’چکی کے گانے کا پروجیکٹ‘ کی ٹیم: آشا اوگالے (ترجمہ)؛ برنارڈ بیل (ڈجیٹائزیشن، ڈیٹا بیس ڈیزائن، ڈیولپمنٹ اور مینٹیننس)؛ جتیندر میڈ (ٹرانس کرپشن، ترجمہ میں تعاون)؛ نمیتا وائکر (پروجیکٹ لیڈ اور کیوریشن)؛ رجنی کھلدکر (ڈیٹا انٹری)

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI GSP Team
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے