सकाळचे आठ वाजलेत, रस्त्यात तशी शांतता आहे. पण एका कोपऱ्यातून मोठ्याने ठक ठक ऐकू येतीये. बाळप्पा चंदर धोत्रे एका पदपथावर पत्थरांच्या ढिगाऱ्यात बसून छिन्नी हातोड्याने दगड घडवतायत. त्यांच्या या तात्पुरत्या ‘कारखान्या’मागे लागलेल्या स्कूटर आणि रिक्षा थोड्याच वेळात कामावर जातील आणि मग बाळप्पादेखील काही तासांत इथून बाहेर पडतील – उत्तर मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातल्या पदपथावर बसून घडवलेले खल बत्ते घेऊन.

चटण्या किंवा मसाला वाटायला-कुटायला लागणारा एक खलबत्ता किंवा पाटा वरवंटा घडवायला त्यांना तासभर लागतो. ते त्याला कल्लु रुब्बु म्हणतात, कानडीत. मराठीत खलबत्ता. काम पूर्ण झालं की एका मजबूत रेग्झिनच्या पिशवीत ते तयार खलबत्ते टाकतात आणि पदपथावरच्या आपल्या ‘कारखान्या’तून बाहेर पडतात. एका वेळी सोबत २-३ खलबत्ते आणि प्रत्येकाचं वजन १-४ किलो असतं. मग वर्दळीच्या रस्त्यांवर कोपऱ्यावर ते आपलं दुकान मांडतात. कधी कधी ते एखादा दगड सोबत ठेवतात. जर जास्तीचं गिऱ्हाईक आलं तर आयत्या वेळी तिथल्या तिथेच त्यांना एखादी वस्तू घडवून देता येते.

“लोक मला पत्थरवालाच म्हणतात,” बाळप्पा सांगतात.

लहान खलबत्ता २०० रुपयांना आणि मोठा ३५०-४०० रुपयांना विकला जातो. “एखाद्या आठवड्यात १०००-१२०० रुपयांचा धंदा होतो. कधी कधी काहीच नाही,” ते सांगतात. खरेदी करायला येणारे बहुतेकांना विजेवर चालणारा मिक्सर परवडत नाही किंवा ज्यांना आपल्या दिवाणखान्यात शोभेसाठी म्हणून या वस्तू मांडायच्या असतात. किंवा बाळप्पांच्या मंडळी, नागूबाईंसारखे, ज्यांना खलबत्ताच आवडतो. “मला काही मिक्सर आवडत नाही,” त्या म्हणतात. “चवच राहत नाही. यात कसं वाटण चवदार लागतं, ताजं.”

Women buying stone pestle on the road
PHOTO • Aakanksha
Women grinding on stone pestle
PHOTO • Aakanksha

उपनगरातल्या वर्दळीच्या रस्त्यांच्या कोपऱ्यावर बाळप्पा त्यांचं ‘दुकान’ थाटतात, गिऱ्हाइकांमध्ये बहुतेक असेच विजेवर चालणारा मिक्सर परवडत नाही किंवा ज्यांना शोभेसाठी म्हणून जुने खलबत्ते मांडायचे असतात किंवा खलबत्त्यामुळे अन्नाला येणारी चव आवडते

बाळप्पांना काही त्यांचं वय लक्षात नाही, मात्र त्यांचा मुलगा अशोक, जो तिशीत आहे तो सांगतो की ते ६६ वर्षांचे आहेत. २०११ साली बाळप्पा बृहन्मुंबई मनपाच्या झाडूखात्यातून निवृत्त झाले असले तरी ते स्वतःची ओळख कारागीर म्हणून करून देणंच पसंत करतात. दगडाचं हे काम त्यांच्या घराण्यात वारशानं आलंय. त्यांचे वडील आणि आजोबा दोघंही उत्तर कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्याच्या हुमनाबाद तालुक्यातल्या आपल्या मन्नेकहळ्ळी या गावी दगडं फोडायचं आणि घडवायचं काम करायचे. ते कल्लू वडार समाजाचे आहेत (वडार जातीच्या या पोटजातीची नोंद कर्नाटकात इतर मागासवर्गामध्ये केली जाते).

१९४०-१९५० च्या सुमारास बरीचशी कुटुंबं दगडी पाटा-वरवंटा वापरत आणि बाळप्पांचा आजोबा आणि  वडील त्यातनं बऱ्यापैकी कमाई करू शकत – तेव्हा तर बाळप्पांना आठवतं त्याप्रमाणे एकाची किंमत ५-१५ पैसे होती. नाही तर पाटा-वरवंट्याच्या बदल्यात त्यांना धान्य वगैरे मिळत असे. “याच्या बदल्यात आम्हाला सगळंच मिळत असे – गहू, ज्वारी, तांदूळ, सगळंच.”

वयाच्या १८ व्या वर्षी बाळप्पा त्यांची पत्नी नागुबाईंसह मुंबईला आले. त्या आधी बरीच वर्षं त्यांनी महाराष्ट्राच्या गावोगावी हिंडून खलबत्ते विकले होते. “मी माझ्या वडलांसोबत बीड आणि औरंगाबादला जायचो,” ते सांगतात. “आमच्यापाशी एक गाढव होतं. त्याच्या पाठीवर सगळा माल लादायचा आणि गावोगावी जाऊन खलबत्ते विकायचे.”

On left A man sitting on a sofa, on right side - man is hammering stone
PHOTO • Aakanksha

‘लोक मला पत्थरवालाच म्हणतात,’ ६६ वर्षीय बाळप्पा सांगतात

अखेर दुष्काळाने त्यांना मुंबई गाठणं भाग पडलं. “आमच्या गावी दुष्काळ होता,” सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला पडलेल्या दुष्काळाबद्दल बाळप्पा सांगतात. पिकं करपली आणि खायलाच काही नव्हतं. “रानं सुकली, चारा नाही, जनावरांनी काय खावं? पाणी नाही, खायला अन्न नाही, पैसा नाही, काहीच नाही,” ते सांगतात. लोक बाहेर पडायला लागले. काहींनी जमिनी विकल्या आणि शहरात जाऊन स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्या दगडी वस्तूंचं गिऱ्हाईकच कमी व्हायला लागलं. त्यांच्या कुटुंबाकडे काही जमीन नव्हती, जे काही होतं ते म्हणजे एक झोपडं ज्यात त्यांचं लहानपण गेलंय. (आजही ते घर आहे, जे आता एका कुटुंबाला भाड्याने दिलंय.)

बाळप्पांनी त्यांच्या वडलांची आणि आजोबांची अवजारं आपल्यासोबत शहरात आणली – हातोडा, छिन्नी आणि टिकाव – खलबत्ते घडवण्यासाठी.

पहिल्याप्रथम मुंबईत आल्यावर बाळप्पा आणि नागुबाईंनी दादर रेल्वे स्थानकाच्या जवळ झोपडं उभारलं. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहिले – लोअर परळ, वांद्रे, अंधेरी – त्यांचं काम जिथे असेल तिथे जरा मोकळी जागा पाहून ते त्यांची झोपडी बांधत.

नागुबाई त्यांच्याबरोबर वेगवेगळीकडे जाऊन पाटे-वरवंटे, खलबत्ते विकत. “माझे वडील देखील खलबत्ते घडवायचे,” त्या सांगतात. “मी आणि माझी आई विकायला जायचो. लगीन झाल्यावर मी ह्यांच्याबरोबर जायला सुरुवात केली. आता मला पाठीचा त्रास आहे म्हणून जाऊ शकत नाही.”

Balappa Chandar Dhotre's family members sitting together in their house
PHOTO • Aakanksha
PHOTO • Aakanksha

मुंबईत आल्यानंतर बाळप्पांच्या पत्नी नागुबाई (डावीकडे, सोबत मुलगा अशोक, सून काजल आणि नातवंडं) त्यांच्याबरोबर खलबत्ते विकायला जायच्या

पण जसजसा विजेवर चालणारा मिक्सर लोकप्रिय होऊ लागला तसं खलबत्त्यांची मागणी कमी व्हायला लागली. मन्नेकहळ्ळीला परतणं – जिथे हाताला कसलंच काम नव्हतं – हा काही पर्यायच नव्हता. मग बाळप्पा धोत्रेंनी नागुबाईंबरोबर मुंबईतच रहावं असं ठरवलं. (पुढे त्यांची सात मुलं – तीन मुलगे, चार मुली जन्मली). ते पडेल ती कामं करायचे अगदी मुंबईतल्या सिनेमांच्या शूटिंगसाठी देखील. उपकरणं इकडून तिकडे न्यायचे, सेट साफ करण्याचे “त्या काळी दिवसाचे १५ रुपये मिळायचे,” त्यांना आठवतं.

एका दुपारी, तेव्हा ते कुटुंबासोबत अंधेरी रेल्वे स्थानकापाशी राहात, बृहन्मुंबई मनपाने त्यांना आणि इतर काही पुरुष मंडळींना बोरिवलीत सफाईचं काम दिलं. “तात्पुरतं काही दिवसांसाठी रस्ते झाडायचं काम होतं. कालांतराने तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना खात्यात कायम करून घ्यावं असा विचार केला,” बाळप्पांचा सर्वात थोरला मुलगा, चाळिशीला टेकलेला तुळशीराम सांगतो.

बृहन्मुंबई मनपाचं कर्मचारी पत्र मिळाल्यावर बाळप्पांना कांदिवली पूर्व हा भाग सफाईसाठी देण्यात आला. बोरिवली पूर्व जवळ असणाऱ्या देवीपाडा या झोपडपट्टीत ते स्थायिक झाले. बांबूच्या खांबांना प्लास्टिकचा कागद बांधून केलेल्या झोपड्याच होत्या तिथे. मनपाचे कर्मचारी म्हणून त्यांना सुरुवातीला महिन्याला रु. १५०/- इतका पगार मिळायचा.

हे सगळं चालू असतानाही त्यांनी खलबत्ते बनवणे काही थांबवलं नव्हतं. “ते सकाळी सहा वाजता [मनपाच्या] कामावर जायचे,” तुळशीराम सांगतात. “दीड वाजण्याच्या सुमारास आई त्यांचा डबा घेऊन यायची.” दुपारच्या डब्याच्या पिशवीत त्यांची वेगवेगळी अवजारं देखील असायची – हातोडा आणि वेगवेगळ्या आकाराच्या छिन्न्या. कामाची पाळी संपली की ते दगड घडवत बसायचे आणि संध्याकाळी ५-६ वाजता घरी परतायचे.

Stone hammering tools
PHOTO • Aakanksha

खलबत्ते तयार करण्यासाठी बाळप्पांनी त्यांच्या वडलांची आणि आजोबांची अवजारं इथे शहरात सोबत आणली

त्यांना लागणारा एकमेव कच्चा माल म्हणजे काळा पाषाण. “[पूर्वी टिकाव आणि पहारीने] जरा जमीन खणली की दगड लागायचा,” बाळप्पा सांगतात. आजकाल ते शहरातल्या बांधकामावरनं दगड मागवतात.

जवळ जवळ तीस वर्षं झाडू खात्यात काम केल्यानंतर बाळप्पा २०११ साली मनपातून निवृत्त झाले. त्यांचा मुलगा अशोक सांगतो की ते निवृत्त झाले तेव्हा त्यांचा पगार रु. १८०००-२०,००० होता. सध्या त्यांना महिन्याला ८,००० रुपये पेन्शन येते.

अशोक त्याच्या वडलांच्या जागी झाडू खात्यात कामाला लागला आहे. तुळशीराम मिळेल तेव्हा रोजंदारी करतो, बाळप्पांचा धाकटा मुलगाही तेच करतो. त्यांच्या चारही मुलींची लग्नं होऊन त्या मुंबईतच वेगवेगळीकडे राहत आहेत. कोणीही त्यांच्या कुटुंबाचं दगड घडवण्याचं काम करत नाहीत. “मला काही हे पसंत नाही, पण करणार काय? आता त्यांना हे काम नाही करायचं म्हटल्यावर नाही करायचं,” धोत्रे आपल्या मुलांबद्दल म्हणतात.

तीन वर्षांपूर्वी बाळप्पा आणि नागुबाईंना देवीपाड्यातलं घर सोडावं लागलं, तिथे बांधकाम होणाऱ्या इमारतीत एका विकसकाने त्यांना फ्लॅट देण्याचं वचन दिलंय. तोवर ते शेजारच्याच एका चाळीत राहतायत.

बाळप्पा आजही खलबत्ते घडवतायत, गिऱ्हाइकांची संख्या आटत असली तरी. “माझा बाप आणि आजा हे काम करायचे, मी पण कारागीरच आहे ना, तीच माझी ओळख आहे,” ते म्हणतात. नागुबाई दुजोरा देत पुढे म्हणतात, “त्यांना हे काम पसंत आहे. आन् मला पण बरं वाटतंय की म्हातारा अजून काही तरी काम करतोय.”

अनुवादः मेधा काळे

Aakanksha

آکانکشا (وہ صرف اپنے پہلے نام کا استعمال کرتی ہیں) پاری کی رپورٹر اور کنٹینٹ ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Aakanksha
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے