साठीच्या दशकातला प्रसंग आठवतो आणि दिलावर शिकलगारांना हसू येतं. कारखान्यात कुणी तरी लोखंडावर घाव घालत होतं आणि त्यातून उडालेली एक चिप त्यांच्या डाव्या हाताच्या बोटात घुसली. आज पन्नास वर्षांनंतरही त्या जखमेचा वण तसाच आहे, ते हसत म्हणतात. “हे माझे तळवे बघा. लोखंडी झालेत की नाही.”
या पन्नासहून जास्त वर्षांत ६८ वर्षांच्या दिलावर यांनी दररोज किमान ५०० वेळा लोखंड आणि कार्बन स्टीलवर हातोड्याचे घाव घातलेत. गेल्या ५५ वर्षांत मिळून त्यांनी त्यांचा पाच किलो वजनाचा पारंपरिक घण या धातूंवर तब्बल ८० लाख वेळा तरी चालवला असेल.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या बागणी गावचे लोखंडाचं काम करणारे हे शिकलगार गेल्या शेकडो वर्षांपासून हे काम करतायत. घरात आणि शेतात लागणारी धातूची अवजारं ते हाताने घडवतायत. पण त्यांची खासियत, ज्यामुळे लोक त्यांना ओळखतात ते म्हणजे अडकित्ते. वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे, टिकाऊ आणि धारदार.
अगदी चार इंचापासून ते दोन फुटापर्यंतचे अडकित्ते ते बनवतात. लहान आकाराचे अडकित्ते सुपारी आणि कात कातरण्यासाठी, खोबऱ्याचे काप करण्यासाठी किंवा सुतळी तोडायला वापरले जातात. मोठे अडकित्ते सोनं आणि चांदीच्या कामात (सोनार आणि सराफ वापरतात) किंवा मोठ्या सुपाऱ्या फोडण्यासाठी वापरतात, ज्याची खांडं बाजारात विकली जातात.
या शिकलगार कुटुंबाने तयार केलेले अडकित्ते इतके प्रसिद्ध आहेत की लांबलांबून लोक ते घ्यायला बागणीला येतात. अगदी अकलूज, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगोला आणि सांगली या महाराष्ट्रातल्या गावांहून तर लोक येतातच पण कर्नाटकातल्या अथणी, विजापूर आणि रायबागहूनही येतात.
“आजवर किती अडकित्ते तयार केलेले त्याची मोजदादच नाही,” दिलावर सांगतात. त्यांनी खुरपी, विळा, विळती, कडबा कापायची विळती, धनगरी कुऱ्हाड, बागकामाची कात्री, पत्रा कापायची कात्री आणि बर्चा अशी अनेक अवजारं आणि हत्यारं तयार केली आहेत.
आज बागणीमध्ये लोखंडकाम करणारे चारच जण या व्यवसायात आहेत. त्यातले दिलावर सगळ्यात ज्येष्ठ आहेत. ते, त्यांच्या मुलासोबत, ४१ वर्षांच्या सलीमसोबत हे काम करतात. (इतर दोघं सलीमचे चुलत भाऊ आहेत, हरून आणि समीर शिकलगार.) ५०-६० च्या दशकात त्यांच्या गावात हेच काम करणारे १५-१६ जण होते. काही वारले आणि इतर काही शेतीची अवजारं बनवायला लागलेत. एक तर अडकित्त्यांची मागणी घटलीये आणि दुसरं म्हणजे या कामाला भरपूर वेळ आणि चिकाटी लागते. पैसाही फार मिळत नाही, दिलावर सांगतात. “हे खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम आहे.”
आपला मुलगा सलीम हे काम पुढे नेईल याची मात्र त्यांनी काळजी घेतलीये. लोखंडकामाची ही कला जिवंत ठेवणाऱ्या शिकलगारांची ही सहावी पिढी. “आजकाल नोकऱ्या कुठे आहेत?” ते विचारतात. “हातातली कला कधी वाया जात नाही बघा. तुम्हाला नोकरी लागलीच नाही तर तुम्ही काय कराल?”
वयाच्या १३व्या वर्षी दिलावर यांनी आपले वडील मकबूल यांच्यासोबत पहिल्यांदा अडकित्ते बनवायला सुरुवात केली. मकबूल यांना हाताखाली माणसं कमी पडत होती, त्यामुळे मग दिलावर यांना आठवीत शाळा सोडावी लागली आणि आपल्या घराण्याच्या धंद्यात यावं लागलं. त्या काळात एका अडकित्त्याला ४ रुपये मिळत होते. “अहो दोन रुपयात आम्ही बसनी सांगलीला जाऊन, वर पिक्चर बघून येत होतो,” ते सांगतात.
आणि मग, त्यांना त्यांच्या वडलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवतेः शिकलगारांचं अडकित्ते बनवण्याचं कसब पाहून अचंबित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी (सांगली संस्थानामध्ये) मिरजेत कारागिरांना त्यांची कला सगळ्यांना दाखवता यावी यासाठी एका प्रदर्शन भरवलं होतं. “त्यांनी आमच्या पणज्याला, इमाम शिकलगारांना बोलावलं होतं. त्यांनी बनवलेला अडकित्ता पाहिल्यावर त्यांनी सवाल केला की तो मशीनवर बनवलाय का म्हणून.” इमाम नाही म्हणाले. काही दिवसांनी त्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत बोलावणं धाडलं – तो सुबक अडकित्ता त्यांना परत पहायचा होता. “त्यांनी विचारलं की लागणारं सगळं साहित्य त्यांना दिलं तर ते त्यांच्यासमोर तसलाच अडकित्ता बनवून देतील का म्हणून.” त्यांनी लागलीच होकार भरला.
“त्या प्रदर्शनात आणखी एक कारागीर त्याने बनविलेली पकड घेऊन आला होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यालाही हाच सवाल केला. त्याने तिथनं पळ काढला कारण त्यानी मशीनवर त्याची पकड बनवली होती असं तो म्हणला. साहेब लई चलाख होता,” हसत हसत दिलावर म्हणतात. “त्यांना कलेची पारख होती.” काहींनी त्यांनी बनवलेले अडकित्ते इंग्लंडला नेलेत – शिकलगारांचे हे अडकित्ते अमेरिकेतही पोचले आहेत.
“अमेरिकेतून काही संशोधक इथल्या गावांमध्ये [१९७२च्या] दुष्काळावर अभ्यास करायला इथे आले होते. त्यांच्याबरोबर एक दुभाष्याही होता.” हे संशोधक, दिलावर सांगतात, जवळच्या नागावमधल्या एका शेतकऱ्याकडे गेले. “चहापाणी झालं आणि त्या शेतकऱ्याने अडकित्त्याने सुपारी कातरायला सुरुवात केली.” ते अवजार पाहून चकित झालेले ते संशोधक तो अडकित्ता बनला त्या शिकलगारांच्या कारखान्यात येऊन थडकले. “त्यांनी मला १० अडकित्ते बनवायला सांगितले,” दिलावर सांगतात. “मी महिनाभरात ते काम पूर्ण केलं आणि [एकूण] कामाचे १५० रुपये त्यांना सांगितले. त्यांनी मोठ्या मनानी मला वरचे १०० रुपये दिले की,” हसत ते सांगतात.
अगदी आजही हे शिकलगार कुटुंब दिवसाकाठी १२ वेगवेगळे अडकित्ते बनवतं. “आम्ही जसा हवा असेल तसा अडकित्ता बनवून देतो,” सलीम सांगतो. त्याने सांगली शहरात मशीन टूल ग्राइंडिंगचा आयटीआयचा कोर्स पूर्ण केलाय. २००३ सालापासून तो त्याच्या वडलांना मदत करतोय. त्याचा धाकटा भाऊ जावेद, वय ३८ याला काही घरच्या व्यवसायात रस नाही. तो लातूर शहर सिंचन विभागात कारकून म्हणून काम करतोय.
खरं तर पश्चिम महाराष्ट्रात स्त्रिया आणि पुरुष दोघं मिळून लोहारकाम करतात. पण बागणीत मात्र, दिलावर सांगतात, “पहिल्यापासनं केवळ गडी माणसंच अडकित्ते बनवतायत.” दिलावर यांच्या पत्नी, जैतूनबी, वय ६१ आणि सलीमची बायको, अफसाना, वय ३५ दोघीही गृहिणी आहेत.
अडकित्त्यावरचं काम सुरू होतं आणि सलीम म्हणतो, “इथे तुम्हाला वर्नियर कॅलिपर किंवा इतर मोजपट्ट्या सापडायच्या नाहीत. शिकलगार कधीही मोजमापं लिहून ठेवीत नाहीत हो. गरजच नाही,” दिलावर सांगतात. “आमच्या नजरेत बसलंय.” अडकित्त्याचा वरचा दांडा कमान पट्टीचा (कार्बन स्टील-लीफ स्प्रिंग) आणि खालचा दांडा लोखंडाच्या सळीपासून बनवतात. बागणीहून ३० किलोमीटरवर असलेल्या कोल्हापूर किंवा सांगलीत सलीमला किलोभर लीफ स्प्रिंग ८० रुपयांना पडते. १९६० च्या दशकात याच मालासाठी दिलावर यांना फक्त ५० पैसे मोजावे लागत होते.
या बापलेकाचं काम सकाळी ७ वाजता सुरू होतं आणि पुढचे दहा एक तास सुरू राहतं. सलीम भट्टीमध्ये कार्बन स्टील तापवतो आणि त्यानंतर भट्टीचा वाऱ्याचा झोत सुरू करतो. त्यानंतर काही मिनिटांनी तो चपळाईने चिमट्याचा वापर करून धातूचा ठोकळा हॅमरिंग मशीनमध्ये सरकवतो. २०१२ साली त्याने हे दीड लाखाचं मशीन विकत घेतलं. त्याआधी शिकलगार सगळं काम हाताने हातोड्याचे घाव घालून करत आणि रोजचाच जिवाला आणि हाडांना धोका पत्करत.
कार्बन स्टीलच्या तुकड्यावर काही काळ घाव बसले की सलीम तो तुकडा ५० किलो वजन असलेल्या लोखंडाच्या एका ठोकळ्यावर ठेवतो. त्यानंतर दिलावर हाताने, सफाईने त्याच्यावर घणाचे, हातोड्याचे घाव घालत त्याला अडकित्त्याचा आकार देतात. “मशीनवर काही असा छान आकार देता येत नाही,” सलीम सांगतो. हातोड्याने घाव घालायला, भट्टीत तापवून ठोकाठोकी करायला ९० मिनिटं तरी लागतात.
एकदा का अडकित्त्याचा मूळ आकार तयार झाला की दिलावर कार्बन स्टीलचा तो तुकडा एका पकडयंत्रात पक्का धरतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कानस वापरून तो तासतात. कोल्हापूरच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजारं मिळतात.
अडकित्त्याचा आकार मनाजोगता झाल्यानंतर ते त्याच्या पात्याला धार लावायला सुरुवात करतात. त्यांचं काम इतकं अचूक आणि धारदार आहे की, ते म्हणतात त्याप्रमाणे या अडकित्त्याला पुढची १० वर्षं तरी धार लावावी लागायची नाही.
सध्या शिकलगारांना एक अडकित्ता बनवण्यासाठी पाच तास लागतात. पूर्वी जेव्हा सगळंच काम हाताने व्हायचं तेव्हा वेळ दुप्पट लागायचा. “आम्ही कामाची वाटणी केलीये, त्यामुळे कामं झरझर उरकतात,” सलीम सांगतो. तो भट्टीत धातू तापवायचं, ठोकायचं आणि त्या तुकड्यांना आकार देण्याचं काम करतो तर त्याचे वडील जास्तीचं लोखंड तासून काढायचं आणि पात्याला धार लावायचं काम करतात.
अडकित्त्याचं नक्षीकाम आणि आकारावर त्याची किंमत ठरते, ५०० रुपये ते १५०० रुपयांपर्यंत. दोन फूट लांब अडकित्त्याला ४,००० ते ५,००० रुपये पडतात. हे अडकित्ते किती काळ टिकतात? “तुम्ही आहे तोपर्यंत चालतंय,” दिलखुलास हसत दिलावर सांगतात.
पण आजकाल मजबूत अडकित्ते हवेत कुणाला? पूर्वीच्या महिन्याला कमीत कमी ३० अडकित्त्यांवरून त्यांची विक्री आता ५-७ नगांवर आलीये. “पूर्वी लोक चिक्कार पानं खायचे. त्याला सुपारी कातराया लागायची,” दिलावर सांगतात. आजकाल गावातली तरूण मंडळी पान खात नाहीत, सलीम म्हणतो. “आजकाल गुटखा आणि पान मसाल्यावर जोर आहे.”
आता फक्त अडकित्ते बनवून पोट भरणं मुश्किल असल्यामुळे, हे कुटुंब विळे आणि विळत्याही बनवतं – महिन्याला ४० च्या आसपास. दिलावर विळे-कात्र्यांना धारही लावून देतात, नगाला ३० ते ५० रुपये आकारतात. “या बाकीच्या कामातून पोटाला चार घास मिळतात,” त्यांच्या कुटुंबाची अर्धा एकर शेती त्यांनी खंडाने कसायला दिलीये, त्यातूनही थोडी कमाई होते.
पण शिकलगारांनी बनवलेल्या विळ्या-सुऱ्यांना स्थानिक लोहारांनी कमी दर्जाचा माल वापरून बनवलेल्या निम दर्जाच्या मालाला टक्कर द्यावी लागतीये. असल्या वस्तू ६० रुपयापर्यंत मिळतायत, शिकलगाराकडच्या विळ्यांना मात्र १८०-२०० रुपये मोजावे लागतात. “लोकांना आजकाल वापरा-फेका असली सवय लागलीय त्यामुळे ते स्वस्तातल्या वस्तू घ्यायला जातात,” ते सांगतात.
“तसंही सगळेच लोहार काही अडकित्ते बनवू शकत नाहीत,” ते म्हणतात. “जमलं पाहिजे!”
रोजच्या अडचणी आणि आव्हानं तर आहेतच. इजा आणि आजारपणाची शक्यताही. काम करत असताना चेहरा झाकण्यासाठी धातूचं चिलखत वापरण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला आहे जेणेकरून कर्करोगजन्य घटक श्वासावाटे शरीरात जाणार नाहीत. पण ते केवळ घडीचा सुती मास्क आणि कधी कधी हातमोजे वापरतात. त्यांच्या सांगण्यानुसार, सुदैवाने, त्यांच्या कुटुंबातल्या कुणालाही कामामुळे कसलंच काही आजारपण आलेलं नाही – दिलावर यांच्या बोटाला इजा झाली तो एक अपघात सोडून.
दर महिन्याला त्यांना कारखान्याचं १००० रुपयांचं वीज बिल भरावं लागतं. पण दररोज ४-५ तास वीज गायबच असते. त्यामुळे हॅमरिंग मशीन आणि धार लावायचं एक दुसरं यंत्र बंदच ठेवावं लागतं. त्यामुळे मोलाचा वेळही वाया जातो आणि कमाईवर पाणी सोडावं लागतं. “वीज कधी जाईल याची निश्चित अशी काही वेळ नाही,” सलीम म्हणतो. “विजेशिवाय काहीच कामं करता येत नाहीत.”
अडचणी काहीही येवोत जे काही करायचं ते उत्कृष्ट करायचं हे शिकलगारांसाठी फार महत्त्वाचं आहे. त्यांचे अडकित्ते त्यासाठीच तर ओळखले जातात. “बागणीला अडकित्त्यांचा वारसा आहे,” सलीम सांगतो. चौथीत शिकणारा आपला मुलगा, १० वर्षांचा जुनैद शिकलगारांचा हा वारसा पुढे सुरू ठेवेल अशी त्याला आशा आहे. “लोक लांबून त्यासाठी इथवर येतात. हलक्या दर्जाचे अडकित्ते बनवून त्यांना निराश करणं आम्हाला बरोबर वाटत नाही. एकदा का वस्तू विकली, गिऱ्हाईक तक्रार घेऊन माघारी येऊ नये.”
आपल्या कुटुंबाच्या या पिढीजात वारशाचा दिलावर यांना आजही अभिमान वाटतो, मग मागणी घटेना का. “ही अशी कला आहे ना, तुम्ही पार डोंगरावर जरी जाऊन राहिलात तरी लोक तुम्हाला हुडकत तिथवर पोचणार,” ते म्हणतात. “आज आमच्यापाशी जे काही आहे, ती या अडकित्त्यांची देन आहे बघा.”
अनुवादः मेधा काळे