सावित्रा उभे आणि त्यांच्यासोबत काही जणी दळता दळता या आठ गोव्या गातायत. एकीकडे नित्याचं आयुष्य सुरू असताना बहीण भावामधल्या भांडणाचा विषय या ओव्यांमध्ये येतो
बाई बहीण भावंडाचा,
यांचा झगडा रानवनी
बाई बहिणीच्या डोळा पाणी,
बंधु चिंतावला
मनी
या पहिल्या ओवीत बहिणीला आपल्या भावाशी झालेल्या भांडणाची याद येते. आणि रानावनात झालेल्या या भांडणाला दुसरा कुणी साक्षीदार नाही. काय असेल हे भांडण? लहानपणी एकत्र खेळताना झालेली कुरबुर असेल का? का मोठेपणी घरच्या शेतीभातीतल्या हिश्शावरून झालेला संघर्ष? बहिणीचे डोळे भरून येतात. तिला कल्पना आहे की ते पाणी पाहिलं तर भाऊ चिंता करत राहणार.
मुळशी तालुक्याच्या खडकवाडीतल्या सावित्रा उभे, तारा उभे आणि मुक्ता उभे आपल्या जोरदार आवाजात या आठ ओव्या गातायत. सुरुवातीला त्या गळा गातात. गळा म्हणजे स्वतःच लावलेली चाल असते किंवा लोकप्रिय लावणी, गवळण किंवा अभंगाच्या चालीवर बेतलेली चाल असते. गळा ओवीच्या आधी गातात. किंवा कधी कधी ध्रुवपदासारखं प्रत्येक ओवीनंतरही तो गायला जातो. या ओव्यांसोबत गायलेला तीन ओळींचा गळा भावाशी झालेल्या भांडणानंतर बहिणीचा त्रागा व्यक्त करतो आणि या ओव्यांना एक वेगळा संदर्भ जोडतो:
याच्या हातीची फुलं घ्या गं
याला रिकामा जाऊ द्या गं
तिचा राग जावा म्हणून भाऊ फुलं घेऊन येतो. पण बहीण मात्र मैत्रिणींना बजावते की आत्ताच्या आता त्याने आणलेली फुलं घ्या पण त्याला तसाच रिकाम्या हाती माघारी जाऊ द्या. तिला त्याच्याशी बोलायचीही इच्छा नाही. कोण जाणे त्याला देण्यासारखं तिच्यापाशी काही नसेलही. कदाचित मनातली खोलवरची जाणीव व्यक्त होत असेलः “माझ्याकडे काय आहे? माझ्यापाशी काही नसताना, तुझ्यापाशी मात्र सगळं काही आहे.” एकीकडे भावाबहिणीचं अवीट प्रेम असलं तरी आपल्या पुरुषप्रधान समाजात बाई आणि पुरुषामधल्या सामाजिक-आर्थिक भेदाची किनार त्याला आहेच.
दुसऱ्या ते आठव्या ओवीची पहिली ओळ दळण सरल्याचं सांगते. दळण संपत आल्याची ही ओळ बाईला रोजच करावं लागणारं कष्टाचं काम हलकं वाटावं म्हणून गायली जात असेल का? दळण झाल्यावर बाई जात्यावर झाकण ठेवते आणि म्हणते की चंद्र-सूर्य त्याचं रक्षण करणार आहेत.
काम संपता संपता तिला दारात आपला लेक दिसतो. तो वाघाच्या स्वारीप्रमाणे आल्याचं ती अगदी अभिमानाने गाते. पुढे ती म्हणते की तिच्या सोन्याच्या हातानी ती दळतीये, तेही भाग्यवंताच्या जात्यावर. त्यातून घरादाराला समृद्धी मिळणार असल्याचं ती सूचित करते.
दळण सरत येतं, धान्य सुपाच्या काठाला येतं. गंधावर अबीर लेवून येणारा आपला लेक तिला दिसतो. विठ्ठलाचे भक्त असणाऱ्या वारकऱ्यांमध्ये असा अबिराचा बुक्का लावण्याची पद्धत आहे. आता तिचा लेक तिला विठ्ठलाएवढा दिसतो, आणि सुपामध्ये केवडा असल्याचा भास होतो.
दळण सरत येतं तेव्हा भरल्या जात्यावर लक्ष्मी आल्याचं ती गाते. दारात आपला दीर उभा पाहून ती खांद्याचा पदर डोक्यावर घेते. आजही घरच्या बाईने डोक्यावरून पदर घ्यावा अशी रीत महाराष्ट्रातल्या अनेक समुदायांमध्ये आहे. बाईने, खास करून लग्न झालेल्या बाईचा मान म्हणजे डोक्यावरचा पदर.
आठव्या ओवीपर्यंत प्रत्येक ओळीनंतर गळा गायला जातो. भावावर रुसलेली बहीण आपला त्रागा यातून व्यक्त करते.
बाई बहीण भावंडाचा, यांचा झगडा रानवनी
बाई
बहिणीच्या डोळा पाणी, बंधु चिंतावला मनी
असं सरीलं दळयाण, जात्या ठेविते झाकयण
जात्या
ठेविते झाकयण, चांद सुरव्या राखयण
असं सरीलं दळयाण, सूप सारुनी आला दारी
असा
बाळ ना माझा, आला वाघाची याची स्वारी
असं सरीलं दळयाण, माझ्या सोन्याच्या हातायानी
माझ्या
सोन्याच्या हातायानी, भाग्यवंताच्या जात्यायानी
सरीलं दळयाण, आलं सुपाच्या बांधावरी
आता
ना माझा राघु, अबीर लेतो गंधावरी
असं सरीलं दळयाण, माझ्या सुपात केवयडा
असा
पंढरीचा विठू, माझ्या बाळाच्या येवयढा
असं सरीलं दळयाण, पदर घेयाचा माथ्यावरी
अशी
लक्ष्मीबया आली, माझ्या भरल्या जात्यावरी
असं सरीलं दळयाण, खांद्याचा पदर डोईवरी मी घेतयला
दीर
माझ्या तू सरवणा गं, उंबऱ्यावरती मी देखियला
गळा
आत्ताच्या आत्ता
याच्या
हातीची फुलं घ्या गं
याला
रिकामा जाऊ द्या गं
कलावंत – सावित्रा उभे, तारा उभे, मुक्ता उभे
वाडी – खडकवाडी
गाव - कोळावडे
तालुका – मुळशी
जिल्हा – पुणे
जात – मराठा
दिनांक – या ओव्या १ जून १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत
पोस्टर – ऊर्जा
सावित्रा उभेंनी रोजच्या दळणाविषयी गायलेल्या या आणखी काही ओव्या ऐका.
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.