मध्यरात्रीचे २ वाजले होते. नुसता किर्र काळोख. तमिळ नाडूच्या रामनादपुरम (स्थानिकांच्या भाषेत रामनाड) जिल्ह्यालगतच्या समुद्रावर ‘मेकनाइज्ड बोट’ असं बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या एका बोटीवर.

ही मेकनाइज्ड बोट म्हणजे एका मोडकळीला आलेल्या, पुरातन म्हणता येईल अशा बोटीला लेलँड बसचं इंजिन बसवलेलं. (१९६४ साली या इंजिनवर बंदी आणली गेली, पण त्यात काही फेरबदल करून मासेमारीच्या कामासाठी त्याचा पुनर्वापर होऊ लागला. आणि १९९३ साली मी जेव्हा या सफरीवर निघालो होतो तेव्हाही ही इंजिनं वापरात होती.) माझ्यासोबतचे सगळेच स्थानिक मच्छीमार होते. त्यांना आपण नक्की कुठे आहोत हे पक्कं माहित असलं तरी मी मात्र पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. बंगालच्या उपसागरात कुठे तरी इतकंच फार तर मी म्हणू शकेन.

आम्ही मागच्या १६ तासांपासून दर्यावर होतो. काही ठिकाणी समुद्र खवळलेला होता. पण आमच्या बोटीवरच्या पाच जणांच्या चेहऱ्यावरचं हास्य कशानेही विरत नव्हतं. त्या सगळ्याचं आडनाव फर्नांडो – या भागातल्या मच्छीमार समुदायामधे या आडनावाची पुष्कळ मंडळी तुम्हाला भेटतील.

या ‘मेकनाइज्ड बोटी’वर दिव्याची कसलीही सोय नव्हती. रॉकेलमध्ये कापडाचा एक बोळा बुडवून पेटवून काठीच्या टोकाला बांधला होता. फर्नांडो टोळीतल्या एकाने तो हातात धरून ठेवला होता. माझी अडचण वेगळीच होती. इतक्या मिट्ट काळोखात मी यांचे फोटो कसे घेणार?

पण माझी अडचण माशांनीच सोडवली.

जाळीत घावलेले मासे बोटीत ओतले की ते चमचम चमकायचे. फॉस्फरेसन्सची म्हणजेच अंधारात प्रकाश निर्माण करण्याच्या त्यांच्या गुणांची (आणि इतरही काही असलं तर माहित नाही) ही किमया. त्यामुळे मासे ओतलेला बोटीचा कोपरा उजळून निघायचा. त्यांच्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडला की प्रकाशाची चिंताच नाही. एक दोन फोटो तर मी फ्लॅश न वापरताही काढू शकलो. (तसंही फ्लॅशचं मला वावडंच आहे म्हणा).

एक तासाभराने मी आजवर कधीही खाल्ले नसतील इतक्या ताज्या फडफडीत माशांची मेजवानी मला मिळाली. पत्र्याचा जुना, भोकं पडलेला डबा पालथा घालून त्यावर ते मासे भाजले होते. काही तरी युक्ती करून त्यांनी डब्याखाली आग पेटवली होती. आम्ही दोन दिवस समुद्रावर होतो. १९९३ मध्ये मी रामनाडच्या दर्यावर अशा तीन सफरी केल्या. आणि या प्रत्येक सफरीत माझ्या लक्षात आलं की हे मच्छीमार आपल्या अत्यंत साध्या उपकरणांनी, अतिशय खडतर परिस्थितीतही विलक्षण कार्यक्षमतेने आणि मुख्य म्हणजे आनंदाने काम करतात.

Out on a two-night trip with fishermen off the coast of Ramnad district in Tamil Nadu, who toil, as they put it, 'to make someone else a millionaire'
PHOTO • P. Sainath

आम्हाला सागरी सुरक्षा रक्षकांनी दोनदा अडवलं, सगळी तपासणी केली. हा एलटीटीईचा काळ होता आणि श्रीलंकेचा किनारा अवघ्या काही किलोमीटरवर होता. त्या रक्षकांनी मी कोण होतो ते खरं तर काचकूच करतच मान्य केलं. मी एक प्रामाणिक पत्रकार असल्याचं रामनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र वगळता माझ्याकडे दुसरा कसलाच पुरावा पण नव्हता.

या समुद्रकिनाऱ्यावरच्या बहुतेक मच्छीमारांवर कर्जाचा बोजा आहे आणि पैसा आणि मासळी अशा दोन्ही स्वरुपात पण अतिशय किरकोळ मजुरीवर ते काम करतात. माझी ज्यांच्याशी भेट झाली त्यातला सर्वात जास्त शिकलेला इयत्ता सहावी पास झालेला होता. प्रचंड जोखीम अंगावर घेऊन काम करूनही त्याचा मोबदला मात्र फुटकळ मानावा इतकाच. खरं तर त्यांनी पकडलेल्या कोळंबीसाठी जपानमध्ये पैशाच्या राशी लागतील. आश्चर्याची बाब सांगू? यंत्रावरच्या बोटी चालवणारे आणि ज्यांच्याबरोबर त्यांचे अधून मधून खटके उडत असतात ते पारंपरिक मासेमारीच्या बोटीवले किंवा साध्या होड्यावाले मच्छीमार या सर्वांमध्ये वर्गीय भेदाभेद असा नाहीच. सगळे साधारणपणे सारख्या आर्थिक-सामाजिक स्तरातले आहेत.

सगळेच गरीब आहेत आणि त्यातही स्वतःच्या मालकीच्या बोटी असलेले मोजकेच. ‘मेकनाइज्ड’ बोटीवाल्यांपैकी तर कुणाच्याच स्वतःच्या मालकीच्या बोटी नाहीत. आम्ही पहाटे पहाटे समुद्रातून मासळीची आणखी एक खेप केली आणि किनाऱ्याच्या दिशेने यायला लागलो. सगळ्या फर्नांडोंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. का माहित आहे? त्यांच्या जगण्याचं अर्थशास्त्र समजू न शकल्याने माझ्या चेहऱ्यावर जो काही गोंधळ उडाला होता त्यामुळे.

सोपं आहे, त्यांच्यातला एक जण म्हणालाः “दुसरा कुणी लखपती व्हावा यासाठी हा आटापिटा.”

या लेखाची छोटी आवृत्ती १९ जानेवारी, १९९६ रोजी द हिंदू बिझनेसलाइनमध्ये प्रकाशित झाली आहे.

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے