जेमतेम बारा वर्षांची होती जमलो. फेब्रुवारीत कधी तरी ती तेलंगणातल्‍या मिरचीच्‍या शेतावर काम करण्‍यासाठी गेली. टाळेबंदी लागल्‍यावर बरोबरच्‍या इतर मजुरांबरोबर तीही चालत घरी यायला निघाली आणि सतत तीन दिवस चालल्‍यावर रस्‍त्‍यातच १८ एप्रिलला तिचा मृत्‍यू झाला.

‘‘आमच्‍या इतर गाववाल्‍यांबरोबर तीही गेलीय हे माहितीच नव्‍हतं आम्‍हाला. दुसर्‍या दिवशी कळलं ते,’’ सुकमती मडकम, जमलोची आई म्हणाली. हे कुटुंब मुरिया या आदिवासी समाजाचं आहे.

छत्तीसगढमधल्‍या बस्‍तर भागातल्‍या बिजापूर जिल्‍ह्यातलं आदेड हे जमलोचं गाव. या गावी गावातल्‍या ११ मजुरांबरोबर जमलो परत येत होती. यातली काही मुलं तेलंगणातल्‍या मुलुगु जिल्ह्यातल्‍या कन्‍नईगुडेम गावाजवळच्‍या शेतात कामाला गेली होती. ( वरचा कव्‍हर फोटो याच रस्‍त्‍यावरून ७ मे रोजी जाणार्‍या अशाच एका गटाचा आहे. ) तिथे ही मुलं मिरच्‍या खुडतात, त्‍याचे त्‍यांना दिवसाला २०० रुपये मिळतात किंवा आधी ठरल्‍याप्रमाणे मिरच्‍यांची पोती मिळतात. (वाचाः Children of the chilli fields )

‘‘जमलो तिच्‍या मैत्रिणी आणि इतर काही गावकर्‍यांबरोबर कामाला गेली होती. पण काम थांबलं आणि त्‍यांनी गावी परतायचं ठरवलं. मुळुगु जिल्ह्यातल्‍या पेरुरू गावाहून ते निघाले तेव्‍हा तिने मला फोन केला होता. शेवटचा फोन आला तो तिच्‍याबरोबर असणार्‍या आमच्‍या गाववाल्‍यांचा, माझ्‍या लेकीच्‍या मृत्‍यूची बातमी देणारा...’’ अंदोराम, जमलोचे वडील सांगतात. वनोपज गोळा करणं, छोट्याशा जमिनीच्‍या तुकड्यावर भात, हुलगे आणि इतर पिकं, रोजगार हमीचं काम ही अंदोराम आणि सुकमती यांच्‍या उत्‍पन्‍नाची साधनं आहेत. आदेडच्‍या बहुतेक सर्व आदिवासींसारखं यावरच त्‍यांचं घर चालतं.

‘‘दोन महिन्‍यांपूर्वी जमलो मजुरी करायला तेलंगणाला गेली. पण लॉकडाऊन झाल्‍यावर काम बंद झालं. मजुरांना आता काहीही करून आपल्‍या गावी परतायचं होतं. त्‍यांच्‍याकडचे उरलेसुरले सगळे पैसे संपले होते. त्‍यांच्‍या कंत्राटदारानेही त्‍यांना गावी परत जा, असंच सांगितलं होतं,’’ पुष्पा उसेंडी-रोकडे सांगते. बिजापूरची पुष्पा पत्रकार आहे. जगदलपूरहून निघणार्‍या एका वर्तमानपत्रासाठी ती काम करते. ती स्‍वत: गोंड आदिवासी आहे.

Sukmati with her younger daughter Sarita and infant son; she and Andoram Madkam had eight children; five have died, including Jamlo
PHOTO • Kamlesh Painkra
Sukmati with her younger daughter Sarita and infant son; she and Andoram Madkam had eight children; five have died, including Jamlo
PHOTO • Kamlesh Painkra

सुकमती आणि सोबत तिची धाकटी मुलगी आणि मुलगा (डावीकडे), तिला आणि अंदोरामला आठ मुलं होती; त्‍यातली जमलोसह (उजवीकडे) पाच वारलीयेत

लॉकडाऊनमध्ये वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्‍ध नव्‍हतं. या मजुरांनी चालत गावी जायचं ठरवलं. कन्‍नईगुडेम, जिथे ते कामाला गेले होते, तिथून त्‍यांच्‍या गावाचं, आदेडपर्यंतचं अंतर १७० ते २०० किलोमीटर आहे. (कोणत्‍या रस्‍त्‍याने जाता, त्‍यानुसार ते थोडंथोडं कमीजास्‍त होतं.) १६ एप्रिलला त्‍यांनी चालायला सुरुवात केली. मुख्य रस्‍ता बंद होता, त्‍यामुळे जंगलातल्‍या रस्‍त्‍याने ते पुढे सरकायला लागले. रात्री वाटेवरच्‍या गावांमध्ये, गाव नसेल तर जंगलात झोपत होते. प्रचंड थकवणारा प्रवास होता तो. पण तरीही तीन दिवसांत त्‍यांनी १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केलं.

१८ एप्रिलला थकले भागले मजूर पाय ओढत आपल्‍या साठ किलोमीटरवर असलेल्‍या गावाकडे जात असतानाच सकाळी नऊच्‍या सुमाराला जमलोचा मृत्‍यू झाला. आपल्‍या पोटात दुखत असल्‍याची, डोकं दुखत असल्‍याची तक्रार तिने केली होती, असं बर्‍याच बातम्‍यांमध्ये म्‍हटलंय. ती पडली होती आणि तिचं हाड मोडलं होतं, असाही काही बातम्‍यांत उल्‍लेख आहे. पण आम्‍हाला तिचा अधिकृत वैद्यकीय अहवाल उपलब्‍ध झाला नाही.

‘‘ती लहानशी मुलगी होती. तीन दिवस खूपच चालली होती ती... जवळजवळ १४० किलोमीटर! शेवटी तिचं घर ५५ – ६० किलोमीटरवर राहिलं, तेव्‍हा ती कोसळली,’’ डॉ. बी. आर. पुजारींनी फोनवर सांगितलं. ते बिजापूरचे मुख्य आरोग्‍य आणि वैद्यकीय अधिकारी आहेत. ‘‘प्रचंड थकवा आणि स्‍नायूंना झालेल्‍या श्रमामुळे ती कोसळली असावी. पण हे शवविच्‍छेदन अहवालात कदाचित असणार नाही. आदल्‍या दिवशीही ती पडली होती आणि तिला लागलं होतं, असं तिच्‍या बरोबर असलेले काही मजूर सांगतायत.’’

जमलोच्‍या मृत्‍यूची घटना डॉ. पुजारींना सकाळी ११ च्‍या सुमाराला कळली. ‘‘मी रुग्‍णवाहिका पाठवली, पण तोपर्यंत तिचा मृतदेह घेऊन ते पाच-सहा किलोमीटर चालत आले होते,’’ ते सांगतात. जमलोचा मृतदेह बिजापूरच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात नेण्‍यासाठी जवळच्‍या, [उसुरच्या] सार्वजनिक रुग्‍णालयातून रुग्‍णवाहिका पाठवण्‍यात आली होती. ‘‘जमलोबरोबर आलेल्‍या इतर ११ मजुरांना कोविड-१९ च्‍या निर्देशांनुसार क्‍वारंटाइन करण्‍यात आलं,’’ ही घटना घडल्‍यावर डॉ. पुजारींनी माध्यमांना सांगितलं होतं.

दुर्गम, आदिवासी भागांमधलं जीवन टाळेबंदीने कसं उद्‌ध्वस्‍त झालं, याची नोंद तोवर फारशी घेतली गेली नव्‍हती. जमलो मडकमच्‍या बातमीने मात्र माध्यमांना ही नोंद घेणं भाग पडलं.

Jamlo's parents, Sukmati and Andoram; the family are Muria Adivasis
PHOTO • Vihan Durgam

जमलोचे आई-वडील, सुकमती आणि अंदोराम; हे कुटुंब मुरिया आदिवासी आहे

जमलो स्‍थलांतरित मजूर होती. तिच्‍या मृत्‍यूनंतर आरोग्‍य अधिकार्‍यांनी तिची कोरोना चाचणी केली. शनिवार, १८ एप्रिलला सकाळी तिच्या लाळेचे नमुने जगदलपूरला चाचणीसाठी पाठवण्‍यात आले आणि रविवारी संध्याकाळी चाचणी निगेटिव्‍ह असल्‍याचा अहवाल आला, असं डॉ. पुजारींनी माध्यमांना सांगितलं. शवविच्‍छेदनानंतर सोमवारी तिचा मृतदेह कुटुंबाच्‍या ताब्‍यात देण्‍यात आला.

‘‘मी आठ मुलांना जन्‍म दिला, त्‍यातली चार तर रांगती असतानाच गेली. आता जमलोही गेली...’’ जमलोच्‍या आईने, सुकमतीने कमलेश पाइंकराला सांगितलं. (या बातमीचा सहलेखक असलेला कमलेश बिजापूरला पत्रकार आहे. तो उत्तर छत्तीसगढमधल्‍या कंवर आदिवासी समाजाचा आहे).

सुकमती आणि अंदोरामला आता तीन मुलं आहेत. जमलोचा सगळ्‍यात मोठा भाऊ आहे १४ वर्षांचा बुधराम. अलीकडेच त्‍याने शाळा सोडली आहे. आम्‍ही (पाइंकरा) जमलोच्‍या घरी गेलो होतो, तेव्‍हा बुधराम तेंदुपत्ता बांधण्‍यासाठी लागणारी दोरी वळण्‍यासाठी झाडाची साल काढायला गेला होता. सहा वर्षांची तिची छोटी बहीण सरिता सरकारी शाळेत पहिलीत जाते. ती गावातल्‍या विहिरीवर अंघोळ करत होती. आणि धाकटा दोन वर्षांचा भाऊ घरात आईजवळ होता.

मडकम कुटुंबाकडे गेली दहा-बारा वर्षं रेशन कार्ड नाही. आधी त्‍यांच्‍याकडे जे कार्ड होतं, ते काही तांत्रिक कारणांमुळे रद्द झालंय. आपल्‍या तुटपुंज्‍या मिळकतीतून ते तांदूळ, धान्‍य आणि इतर गरजेच्‍या वस्‍तू खुल्‍या बाजारातून चढ्या भावाने खरेदी करतात. आत्ता, जमलोच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांना नवं ‘बीपीएल’ (दारिद्र्यरेषेखालील) कार्ड मिळालं. पण त्‍यातही बर्‍याच चुका आहेत. मडकम कुटुंबात पाच जण आहेत, कार्डावर मात्र त्‍यांची संख्या चार दाखवली आहे. बुधराम आणि सरिताचं वयही चुकीचं घातलं गेलं आहे. (जमलोच्‍या आधार कार्डावरही तिचं नाव इंग्रजीत Jeeta Madkami असं चुकीचं लिहिलं आहे.)

जमलो तिसरीपर्यंत गावातल्‍या शाळेत जात होती. पण मग कुटुंबाची चार बैलं चारायला घेऊन जाण्‍यासाठी तिला शाळा सोडावी लागली. (चारातला एक बैल अलीकडेच मेला.) जमलोच्या घरी थोड्या कोंबड्याही आहेत.

तिचं गाव, आदेड, मुख्य रस्‍त्‍यापासून खूप दूर आहे. छत्तीसगढची राजधानी रायपूरपासून ते ४०० हून अधिक किलोमीटरवर आहे. आदेडला पोहोचण्‍यासाठी बिजापूरपासून तीसेक किलोमीटरवर असलेल्‍या टोयनार या गावी जावं लागतं. इथपर्यंत पक्‍का रस्‍ता आहे. पुढे मात्र कच्‍चा रस्‍ता. एवढंच नाही, वाटेत दोन वाहते ओढेही लागतात, ते पार करून जावं लागतं.

Jamlo's parents, Sukmati and Andoram; the family are Muria Adivasis
PHOTO • Venketesh Jatavati

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्‍या मिरचीच्‍या शेतात कामाला गेलेले छत्तीसगढ आणि ओरिसातले मजूर चालत आपल्‍या गावी परतत आहेत.

मोर्मेड ग्रामपंचायतीत येणार्‍या आदेड गावात ४२ कुटुंबं राहातात. गावाचे वॉर्ड सदस्‍य बुधराम कोवासी गावाची माहिती देतात. कोवासी माडिया आदिवासी आहेत. आदेडचे बहुतेक सर्व गावकरी चार समाजांचे आहेत. मुरिया व माडिया या आदिवासी जमाती आणि कलार व राऊत या इतर मागासवर्गीय समाजाचे.

‘‘जमलो फक्‍त बारा वर्षांची होती. ती पहिल्‍यांदाच मिरच्‍या खुडायला आंध्रला (तेलंगण) गेली होती. साधारणपणे इथले (या पंचक्रोशीतले) लोक काम शोधायला दुसर्‍या राज्‍यात जात नाहीत. टोयनार किंवा बिजापूरपर्यंत जातात,’’ बुधराम सांगतात.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जमलोच्‍या मृत्‍यूची दखल घेतली. २१ एप्रिलचं त्यांचं ट्विट आहे, ‘‘जमलो मडकम या बिजापूरच्‍या बारा वर्षांच्‍या मुलीचा दुर्दैवी मृत्‍यू हृदयद्रावक आहे. या कठीण काळात तात्‍काळ मदत म्हणून मी मुख्यमंत्री मदत निधीतून १ लाख रुपये आणि अनुदान म्हणून ४ लाख रुपये देत आहे. बिजापूरच्‍या जिल्‍हाधिकार्‍यांना जमलोच्‍या मृत्‍यूची चौकशी करून त्‍याचा अहवाल सादर करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.’’

कामगार विभागही याची चौकशी करत आहे. जमलोच्‍या गावातली एक स्‍त्री आणि तेलंगणातल्‍या कन्‍नईगुडेम गावातला एक मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्‍यावर एफआयआर दाखल करण्‍यात आला आहे. कंत्राटदार म्‍हणून नोंदणी न करताच त्‍यांनी लहान मुलांसह मजुरांना एका राज्‍यातून दुसर्‍या राज्‍यात नेलं, असा आरोप त्‍यांच्‍यावर आहे.

छत्तीसगढच्‍या बिजापूर, सुकमा आणि दंतेवाडा या जिल्ह्यांतल्‍या सीमेवरच्‍या गावांमधून बरेच जण कामाच्‍या शोधात दुसर्‍या राज्‍यात स्‍थलांतर करतात. काही जणांना त्‍यांच्‍या भागातल्‍या वाढत्‍या नक्षलवादामुळे हे पाऊल उचलावं लागतं. पण शोध असतो तो मात्र उपजीविकेचाच.

जमलोही अशीच गेली असावी... परतताना आपल्‍या कुटुंबासाठी काहीतरी आणता येईल या आशेने. पण परतीचा रस्‍ता बारा वर्षांच्‍या या मुलीसाठी खडतर ठरला आणि खूपच लांबचा.

अनुवादः वैशाली रोडे

Kamlesh Painkra

کملیش پینکرا بیجاپور، چھتیس گڑھ میں مقیم ایک صحافی ہیں؛ وہ ہندی روزنامہ ’نو بھارت‘ کے لیے کام کرتے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Kamlesh Painkra
Purusottam Thakur

پرشوتم ٹھاکر ۲۰۱۵ کے پاری فیلو ہیں۔ وہ ایک صحافی اور دستاویزی فلم ساز ہیں۔ فی الحال، وہ عظیم پریم جی فاؤنڈیشن کے ساتھ کام کر رہے ہیں اور سماجی تبدیلی پر اسٹوری لکھتے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پرشوتم ٹھاکر
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Vaishali Rode