मुळशी तालुक्यातल्या तारा उभे जात्यावरची ओवी हा प्रकल्प कसा सुरू झाला त्याची गोष्ट सांगतात आणि गावातल्या सुइणीचं महत्त्व, तिच्याकडच्या ज्ञानाचा ऱ्हास याबद्दलच्या काही ओव्या गातात

“बाई म्हणजे तुम्हाला वाटली तरी काय? ती काही एखादं खेळणं आहे का किंवा वस्तू? ती पण हाडामासाची जिवंत व्यक्ती आहे ना? मग तिच्या आयुष्याबद्दल आपण विचार करायला नको? पण आतापर्यंत बाईला माणूस म्हणून वागवलंच नाहीये. काही लोक बाईला चुलीची राख म्हणतात तर कुणी कांद्याची पात. आपण बाईला माणूस म्हणून वागवणार का नाही?”

तारा उभेंचे प्रश्न आपल्याला विचार करायला लावतात. आपला वेध घेणारे त्यांचे डोळेही. पुण्यापासून ४० किलोमीटरवर कोळावडे गावाच्या खडकवाडीत आम्ही फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या घरी त्यांची भेट घेतली. मुळशी तालुक्याच्या डोंगराळ भागातल्या गावागावांमध्ये काम करणाऱ्या गरीब डोंगरी संघटनेत त्या कशा काम करायच्या ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि जात्यावरची ओवी हा प्रकल्प कसा सुरू झाला त्याचे किस्सेही. सुरुवातीच्या काळात त्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ओव्या गोळा करायला सुरुवात केली होती.

१९७५ साली समाजशास्त्रज्ञ हेमा राइरकर आणि गी प्वातवाँ या दोघांनी मिळून गरीब डोंगरी संघटना स्थापन केली. १९८५ च्या आसपास ताराबाई आणि कोळावड्यातल्या बाकी काही बायांची त्यांच्याशी गाठ पडली. त्या लगेचच संघटनेत सामील झाल्या. त्या काळात मुळशी तालुक्यातल्या गावांमध्ये नळाद्वारे पाणी, वीज किंवा पक्के रस्ते अशा कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. ताराबाई आणि गरीब डोंगरी संघटनेच्या इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली बायांच्या गटांनी मोर्चे काढून, राजकारणी लोकांना या प्रश्नांवर काम करायला भाग पाडलं. गावातल्या गड्यांची दारू हा प्रश्न देखील त्यांनी हातात घेतला होता. “मोठमोठी पिपं आणि कॅण्डात दारू घेऊन यायचे. आम्ही त्यांना रस्त्यात अडवलं आणि त्यांच्याकडची पिंपं फोडून टाकली,” ताराबाई सांगतात. “शाळेच्या पलिकडे एक दारूचं दुकान होतं. आम्ही तिथेच मोर्चा नेला आणि ते दुकानही फोडून टाकलं.”

PHOTO • Binaifer Bharucha
PHOTO • Binaifer Bharucha

तारा उभेंच्या स्वयंपाकघरात, लीला कांबळे आणि ताराबाई मेथीची भाजी करतायत. उजवीकडेः स्वयंपाकघरात कोपऱ्यात असलेली चूल

त्यांच्या गावातल्या हरिजन वस्ती या दलित वस्तीमध्ये लोकांना भेदभाव आणि अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येत होती, त्याबद्दलही त्यांनी पाऊल उचललं. ताराबाई सांगतात की गरीब डोंगरी संघटनेत काम करणाऱ्या लीलाबाई कांबळेंना त्यांनी घरी स्वयंपाकाचं काम दिलं. लीलाबाई दलित असून त्यांनीदेखील जात्यावरच्या ओव्या गायलेल्या आहेत. तेव्हा ताराबाईंच्या घराचं बांधकाम सुरू होतं. बांधकाम करणारे मजून मराठा समाजाचे होते. त्यांनी लीलाबाईंच्या हातचं जेवण घ्यायला नकार दिला होता. पण ताराबाई मागे सरल्या नाहीत आणि कालांतराने त्या कामगरांनी आपला हेका सोडला आणि लीलाबाईंच्या हातचं खायला सुरुवात केली. आजही दलित समाज हरिजन वस्तीतच राहतोय, गावापासून लांब. आणि समानतेसाठी त्यांच्या संघर्ष सुरूच आहे.

यातलं कुठलंच काम या बायांसाठी सहजसोपं नव्हतं. ८० च्या दशकात गावातल्या, खास करून मराठा कुटुंबातल्या बायांना उंबऱ्याबाहेर जायची देखील परवानगी नव्हती.

ताराबाईंचे पती, सदाशिवराव मुंबईतल्या एका कापडगिरणीत कामाला होते. कामगारांच्या संपानंतर गिरणी बंद पडली आणि ते घरी परतले. त्यांचे थोरले भाऊ आणि भावजयीने त्यांना आणि ताराबाईंना वेगळं काढलं. ताराबाईंचं गावातलं काम त्यांना पसंत नव्हतं. मग या दोघांनी काही काळ मजुरी केली आणि संसार स्थिरस्थावर केला. सध्या त्यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे. गहू, तांदूळ आणि नाचणी, वरई अशी पिकं ते घेतात. त्यांची तिन्ही मुलं लग्न करून पुण्यात स्थायिक झाली आहेत.

PHOTO • Binaifer Bharucha
PHOTO • Binaifer Bharucha

डावीकडेः खडकवाडीच्या आपल्या घराबाहेर ताराबाई आणि सदाशिव उभे. उजवीकडेः हरिजन वस्तीतल्या बुद्ध विहारात लीलाबाई मेणबत्ती पेटवतायत

कोळावड्याच्या तारा उभे, लीला कांबळे, नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि इतर काही महिला पुण्यात जाऊन हेमाताई आणि गी बाबाकडून गरीब डोंगरी संघटनेमार्फत लोकांना कसं संघटित करायचं याचं प्रशिक्षण घेऊन आल्या होत्या. “रोजच्या आयुष्यात त्यांच्यासारखाच आम्हाला पण त्रास सहन करावा लागतो असं सांगितलं की गावातल्या बाया आमच्याशी मन मोकळं करून बोलायच्या,” ताराबाई सांगतात. त्यांच्या आणि आसपासच्या १८ गावांमध्ये त्यांनी संघटनेचं काम पुढे नेलं होतं. बायांच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल, त्यांना बोलतं करायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे जात्यावरची ओवी हे त्यांच्या हळू हळू लक्षात यायला लागलं. “प्रत्येकीच्याच मनात काही ना काही दुःख साचलेलं असतं. तिला ते बोलायचं असतं आणि ते ऐकून घेणारं विश्वासू कुणी तरी तिला हवं असतं. आणि ते विश्वासाचं कुणी तरी म्हणजे जातं, रोज सकाळी ज्याच्याशी तिची भेटगाठ होते, ते जातं.”

*****

जातं नव्हं बाई हा तर डोंगराचा ऋषी
सांगते माझी मैना ह्रदय उकल त्याच्यापाशी

१९८० च्या दशकात मुळशी तालुक्यात जात्यावरची ओवी संकलित करण्याचा हा प्रकल्प सुरू झाला. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागातल्या १,१०० गावात पोचलेल्या या प्रकल्पामध्ये अनेक वर्षांच्या कालावधीत १ लाख १० हजारांहून अधिक ओव्या गोळा करण्यात आल्या.

१९९७ साली मार्च महिन्यात ओवी गाणाऱ्या काही महिला पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या पाबळमध्ये एकत्र आल्या. आपल्याला भेडसावणारे अनेक प्रश्न, समस्या त्यांनी एकमेकींना सांगितल्या. त्यांच्या चर्चेत आलेला एक महत्त्वाचा मुद्दा होता गावपाड्यातल्या सुइणींचा. हॉस्पिटलमध्ये पोचणं शक्य नाही, अचानक काही आजारपण आलं तर वैद्यकीय सेवाच नाहीत अशा परिस्थितीत सुईण म्हणजे बाळंत होणाऱ्या बाईसाठी वरदानच ठरायची.

इतर सुइणींचं काम बघूनच या बाया बाळंतपणाची कला शिकल्या – आपली आई, आजी, इत्यादी. यातल्या काही तर इतक्या निष्णात आहेत की शिकलेला डॉक्टरसुद्धा त्यांच्यापुढे फिका पडावा, ताराबाई सांगतात. म्हणून मग त्यांनी आणि इतर काही जणींनी सुईण आणि तिच्या कौशल्याविषयी काही ओव्या रचल्या. मधल्या काळात या ओव्या विस्मृतीत गेल्या. गरीब डोंगरी संघटनेचं काम करणारे आणि पारी-जीएसपी गटाचे सदस्य असणारे जितेंद्र मैड आणि ताराबाईंच्या शेजारी मुक्ताबाई उभे यांनी ओव्या वाचून दाखवल्यावर ताराबाईंना ओव्या आठवायला लागल्या.

व्हिडिओ पहाः ‘सुईणी बाईनी ज्ञानाची निर्मिती केली’

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत अशा अकरा ओव्या तुमच्यासाठी आणल्या आहेत. दवाखान्याच्या कसल्याही सोयी नसताना सुइणींनी बाळंतपणाची ही कला स्वतः कशी अवगत केली हे या ओव्यांमधून गायलं आहे. पण त्यांचं काम, त्यांच्याकडच्या ज्ञानाची आधुनिक वैद्यकव्यवस्थेने कधीच दखल घेतली नाही.

ओव्यांमध्ये म्हटलंय की सुईण तिच्या कामात अगदी तरबेज असायची. जणू काही चिखलात अडकलेल्या गायीला सोडवून काढण्याचं कसब तिच्या बोटांमध्ये होतं. गावात दवाखानाच नसताना बाळाचा जन्म सुकर होण्याचं काम सुईणच करायची. आणि कसं तर ‘बैलाच्या कासऱ्यासारखं’ हलकेच वाट दाखवत. एकीकडे गावातलं जनजीवन या ओव्यांमध्ये प्रतिबिंबत होतं तर दुसरीकडे तिथलं वास्तवही. ओवीत गायलंय की एकीकडे पैसे भरून डॉक्टर शिक्षण घेऊन येतात तर सुईण मात्र इतर बायांचं बघून आणि आपल्या अनुभवांच्या आधारे तज्ज्ञ होते.

शेवटच्या ओवीत ताराबाई गातात की सांगावा आला तर एखादी सुईण हातातलं सगळं तसंच टाकून धावत पळत गर्भिणीपाशी पोचते. बाळंतिणीसाठी ती देवासारखी धावून येते आणि आईच्या गर्भातून बाळाला अलगद बाहेर काढण्यासाठी तिच्याच हाती “सोन्याच्या चाव्या” दिल्या आहेत.

तारा उभे, लीला कांबळे आणि मुक्ता उभेंच्या आवाजात या ओव्या ऐका

जातं नव्हं बाई हा तर डोंगराचा ऋषी
सांगते माझी मैना ह्रदय उकल त्याच्यापाशी

सुईणी बाईनी ज्ञानाची निर्मिती केली
डॉक्टर व्यवस्थेत तिला किंमत नाही दिली

सुईणबाईला ज्ञान कोठूनी मिळायालं
दर्या ना गं डोंगरात तिच्या अंतरी खेळयालं

डोंगरात माझं गाव तिथं कशाचा डाकतर
सुईण बाईच्या हाती ज्ञानाचं दप्तार

सुईण माझी बाई अनुभवानं झाली मोठी
शिक्षण घ्यायाला नाही गेली ती विद्यापिठी

पहिलं बाळंतपण मला जाईल अवघड
रुईच्या झाडाखाली ठेव जोडवं जामीन

डाक्टरानी ज्ञान घेतलं पैशाच्या किंमतीनं
सुईणीनं  तिचं  ज्ञान घेतलं आपल्या हिमतीनं

सुईणबाईला नका म्हणू साधं भोळं
चिखलात गायी, तिच्या पाची बोटात आहे कळ

हजार वरसाची परंपरा सुईणीनी जोपासली
नऊ महिन्याची गं माझी मैना एका दिसात सोडवली

बाई दर्या ना डोंगरात नाही कशाचा आसरा
बाई  सुईणीबाईनी केला हाताचा कासरा

बाई धावत पळत कुठं चालला देवराया
या गं सोन्याच्या चाव्या जातो गर्भिण सोडवाया

PHOTO • Binaifer Bharucha

डावीकडूनः मुक्ता उभे, लीला कांबळे आणि तारा उभे

कलावंतः मुक्ताबाई उभे

गावः कोळावडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

वयः ६५

अपत्यंः तीन मुली व एक मुलगा

व्यवसायः शेती


कलावंतः लीलाबाई कांबळे

गावः कोळवडे

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नवबौद्ध

वयः ५८

अपत्यं: तीन मुलगे

व्यवसायः कुळाने शेती


कलावंतः ताराबाई उभे

गावः कोळावडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

वयः ७० वर्षे

अपत्यं: तीन मुलं

व्यवसायः शेतकरी. त्यांच्या कुटुंबाची एक एकर जमीन असून त्यात तांदूळ, गहू, नाचणी आणि वरई अशी पिकं घेतात.

दिनांकः या ओव्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आल्या.

पोस्टरः ऊर्जा

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

نمیتا وائکر ایک مصنفہ، مترجم اور پاری کی منیجنگ ایڈیٹر ہیں۔ ان کا ناول، دی لانگ مارچ، ۲۰۱۸ میں شائع ہو چکا ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز نمیتا وائکر
PARI GSP Team

پاری ’چکی کے گانے کا پروجیکٹ‘ کی ٹیم: آشا اوگالے (ترجمہ)؛ برنارڈ بیل (ڈجیٹائزیشن، ڈیٹا بیس ڈیزائن، ڈیولپمنٹ اور مینٹیننس)؛ جتیندر میڈ (ٹرانس کرپشن، ترجمہ میں تعاون)؛ نمیتا وائکر (پروجیکٹ لیڈ اور کیوریشن)؛ رجنی کھلدکر (ڈیٹا انٹری)

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI GSP Team
Photographs : Binaifer Bharucha

بنائیفر بھروچا، ممبئی کی ایک فری لانس فوٹوگرافر ہیں، اور پیپلز آرکائیو آف رورل انڈیا میں بطور فوٹو ایڈیٹر کام کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز بنیفر بھروچا
Video : Jyoti

جیوتی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی ایک رپورٹر ہیں؛ وہ پہلے ’می مراٹھی‘ اور ’مہاراشٹر۱‘ جیسے نیوز چینلوں کے ساتھ کام کر چکی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Jyoti