राजू चौधरी एक बहुरुपी आहेत – अनेक सोंगं वठवणारे. सध्या चाळीस वर्षांचे असणारे चौधरी १४ वर्षाचे असल्यापासून हे काम करतायत. “मी किती तरी काळापासून हेच करतोय,” ते सांगतात. “आमचे बापजादे बहुरुपी होते, आणि आता माझी मुलंदेखील सोंगंच वठवतात...”

राजू बेदिया समुदायाचे आहेत. ही एक आदिवासी जमात आहे आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी लोकसंख्येपैकी ५.८ टक्के बेदिया आदिवासी आहेत (जनगणना २०११). बिरभुम जिल्ह्याच्या लाबपूर तालुक्यातल्या बिशयपूर या त्यांच्या गावात ४० बेदिया घरं आहेत. आणि सगळे पिढीजाद बहुरुपी आहेत.

या चित्रफितीत राजू ‘तारा सुंदरी’ ही काल्पनिक भूमिका वठवतायत. स्थानिक मिथकांमध्ये ती कालीचं एक रूप आहे. या कथेतून ते बरद्वानच्या राजाची गोष्ट सांगतात – या कथेत खूप सारी भर पडत गेली आहे, अनेक नवनवे शब्द आणि म्हणी, यमकांमधून, ज्यातले काही बंगालीत आहेत - ही कथा सांगितली जाते. मे महिन्याच्या (सन २०१७, जेव्हा ही चित्रफीत तयार केली होती) ४० अंश तलखीतही पायात चाळ बांधून ते प्रचंड जोशात नाचतात, टीपेच्या स्वरात गातात, हातात फक्त एक लाकडी काठी, ठेक्यासाठी.

व्हिडिओ पहाः जोशपूर्ण गायक, देवांचं सोंग घेणारा, गोष्टी सांगणारा आणि नर्तक

रोज सकाळी, राजू स्वतःच स्वतःचा मेक अप करतात – त्यात अर्धा तास तरी जातो – आणि मग (जी भूमिका करायची त्यानुसार) वेशभूषा करतात, आणि नंतर प्रवास सुरू – गुरुवार सोडून दररोज. वेगवेगळ्या गावांना आणि शहरांना जायचं, तिथे मेळ्यांमध्ये, सण-सोहळ्यांमध्ये किंवा दुर्गा पूजा, होळी अशा मोठ्या उत्सवांमध्ये आणि बंगाली नववर्षाच्या दिवशी आपली सोंगं, प्रवेश सादर करायचे. त्यांची अख्ख्या घराची महिन्याची कमाई २०० ते ४०० रुपये आहे. मोठ्या मेळाव्यांमध्ये दिवसाला अगदी १००० रुपयांपर्यंतदेखील कमाई वाढू शकते.

शक्यतो ते पश्चिम बंगालमध्येच त्यांची कला सादर करतात मात्र क्वचित प्रसंगी राजू, आसाम, दिल्ली आणि बिहारलाही गेले आहेत. कधी कधी ते बसने जातात आणि कधी रेल्वेने. रेल्वेतही त्यांची कला ते सादर करतात. बहुतेक वेळा ते दिवसाला १०-१२ किमी पायी चालतात. कधी कधी जर ते कोणत्या मेळाव्याला चालले असले तर ते त्यांच्या मुलीला, पंचमीला सोबत घेऊन जातात. प्रत्येक प्रवेश एक तासाचा किंवा त्याहूनही मोठा असतो. मग ते लोकांकडून बक्षीस मागतात आणि मग हा नव्या सोंगाचा नवा खेळ करत करत पुढच्या दिवशी संध्याकाळकडे ते घरी परततात.

Raju posing with his family
PHOTO • Sinchita Maaji
Raju With make-up
PHOTO • Sinchita Maaji

बिशयपूर गावात राजू चौधरी, मुलगी पंचमी आणि पत्नी आशासोबत

पूर्वी बहुरुपी वेगवेगळ्या गावांमध्ये भटकायचे आणि रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगायचे, त्या बदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून धान्य मिळायचं. आता गावाकडे बहुरुप्याची फार कुणी वाट बघत नाही, एक तर शेतीतलं उत्पन्न घटलंय, बरीच शेतकरी कुटुंबं शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत आणि करमणुकीसाठी टीव्हीसारखं सहज उपलब्ध साधन आहे. त्यामुळे बहुरुप्यांना पैसे कमवण्यासाठी लांब लांब, कोलकाता, शांती निकेतन, दुर्गापूर आणि इतर शहरांमध्ये फिरावं लागतं.

पूर्वी ते सोंगांमार्फत रामायण आणि महाभारतातल्या कथा मांडायचे, किंवा बालविवाहांसारख्या विषयावर काही सामाजिक संदेश असणाऱ्या गोष्टी सांगायचे. मात्र आता बहुरुपी त्यांच्या नाटकांमधून बंगाली सिनेमांमधली गाणी आणि विनोदांची गुंफण करू लागले आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा एक मार्ग आहे तो. वीस वर्षं झाली असतील, राजू चौधरीदेखील पुराणातल्या गोष्टी, राजेरजवाड्यांचा इतिहास आणि लोकप्रिय बंगाली सिनेगीतांचं मिश्रण करून त्यांची नाटकं लिहू लागले. त्यांच्या कथनाची परंपरागत रचना आणि त्याचा गहिरा अर्थ, हे दोन्हीही आता विरून गेलं आहे.


अनुवादः मेधा काळे

Sinchita Maji

سنچیتا ماجی، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سینئر ویڈیو ایڈیٹر ہیں۔ وہ ایک فری لانس فوٹوگرافر اور دستاویزی فلم ساز بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز سنچیتا ماجی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے