शारीरिक किंवा मानसिक अक्षमता असणाऱ्या मुली आणि स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता जास्त असल्याचं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये संवाद साधण्यात असलेले अडथळे आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीवर विसंबून असणे ही दोन कारणं महत्त्वाची ठरतात. तक्रार दाखल केल्यानंतरही कायदे प्रक्रिया ही दुसरी शिक्षाच ठरते. २१ वर्षीय कजरी मनोरुग्ण आहे. २०१० साली कजरीचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतरची १० वर्षं तिने लैंगिक छळ, मानवी तस्करी आणि बालमजुरीचा सामना केला. तिचे वडील म्हणतात, “मला माझी नोकरी करणं मुश्किल झालंय कारण मला कजरीच्या तपासण्या किंवा पोलिसांसमोरचे जबाब इत्यादीसाठी सुटी काढावी लागते. सतत रजा मागितली कामावरून काढून टाकतात.”
अर्वाचीन भारतातील ब्राह्मणी पितृसत्तेचा संकल्पनात्मक विचार या आपल्या निबंधात प्रा. उमा चक्रवर्ती “स्त्रियांवर सतत पहारा ठेवण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा उभी करण्याचं वेड” सातत्याने दिसत असल्याचं लिहितात. पितृसत्तेच्या चौकटीत राहणाऱ्या स्त्रियांचं कौतुक आणि ज्या ती चौकट मान्य करत नाहीत त्यांना दूषणं या पद्धतीने हे नियंत्रण ठेवलं जात असल्याचं त्या लिहितात. स्त्रियांच्या संचारावर बंधनं घातली जातात, त्यासाठी बळाचा वापर केला जातो. यामागे स्त्रिया लैंगिकता आणि आर्थिक बाबींमध्ये स्वतंत्र होण्याची भीती दडलेली असते. “सुरुवातीला मी गावातल्या गरोदर स्त्रीला भेटायला जात असेन किंवा एखादीला दवाखान्यात घेऊन जाणार असले तरी माझ्या सासरचे लोक म्हणायचे की मी कुणा पुरुषाला भेटायला चालले आहे. आशा म्हणून माझं हे कामच आहे,” ३० वर्षीय गिरिजा सांगते. उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्याची रहिवासी असलेल्या गिरिजांवर ही नोकरी सोडण्यासाठी घरच्यांचा दबाव आहे. “काल माझ्या आजेसासऱ्यांनी मला लाठीने मारलं आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला,” ती सांगते.
अशा सगळ्या परिस्थितीतही स्त्रिया काम करतात, पैसे कमवतात. मात्र तिथेही कामाच्या ठिकाणी होणारा छळ त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा ठरतो. बंगळुरू आणि दिल्ली राजधानी परिसरातील कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या एक सर्वेक्षणानुसार १७ टक्के महिला कामगारांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याचं सांगितलं. “पुरुष व्यवस्थापक आणि मेकॅनिक आमच्या अंगाला हात लावू बघायचे. आम्ही तक्रार तरी कुणाकडे करणार?” कपड्याच्या कारखान्यात काम करणारी लता सांगते. (वाचाः दिंडिगलच्या दलित स्त्रियांची एकजूट). महिला कामगारांना संघटितपणे आपलं म्हणणं मांडता यावं, त्याला जोर मिळावा यासाठी विशाखा मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्व आस्थापनांमध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी, तिच्या प्रमुखपदी महिला असावी आणि या समितीच्या निम्म्याहून अधिक सभासद महिला असाव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे. या सूचना असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी अगदीच त्रोटक असल्याचं दिसून येतं. स्त्रियांवर घरात आणि घराबाहेरही हिंसा होतच आहे.