सात वर्षांची एक मुलगी वडलांसोबत पंढरपूरची आषाढी वारी करताना लातूर जिल्हयातील म्हैसगाव येथे मुक्कामाच्या गावी पोचली. गावात खंजिरीवर कीर्तनाचा आवाज आला. त्या मुलीने वडलांजवळ कीर्तनाला जाण्याचा आग्रह धरला. "महार-मांगाचा विटाळ धरतात ते लोक. तुच्छ समजतात आपल्याला. तिथे आपल्याला येऊ द्यायाचे नाहीत," वडील म्हणाले. पण मुलगी हट्टच करून बसली. ‘लांब उभे राहून ऐकूयात’ असा विचार करून मुलगी आणि वडील कीर्तनाच्या मंडपात गेले.

कीर्तन सुरू होतं. समोर एक महाराज खंजिरी वाजवून कीर्तन करत होते. मुलीची इच्छा झाली स्टेजवर जावं. तिची चुळबुळ वाढली आणि एका क्षणात ती वडलांचा हात सोडून स्टेजवर गेली. “मलाही एक भारुड म्हणायचंय,” ती म्हणाली. लोक अचंबित होऊन या मुलीकडे बघू लागले. स्टेजवरच्या महाराजांनी मुलीला परवानगी दिली आणि मुलीने महाराजांचं भारुड त्यांच्यासमोरच हातातील पातेलं वाजवत सादर केलं.

माझा रहाट गं साजनी
गावू चौघी जनी
माझ्या रहाटाचा कणा
मला चौघी जनी सुना

त्या मुलीचं भारुड आणि पातेलं वाजवण्यावर महाराज इतके खूश झाले की त्यांनी स्वतःची खंजिरी त्या मुलीला भेट दिली. आणि म्हणाले, “तुझ्या पाठीशी मी आहे. तू फार मोठी प्रबोधनकार होशील.”

मीरा उमप यांच्या आवाजात एक पारंपरिक भारूड ऐका. उपहास तसंच विनोदाचा भरपूर वापर असलेल्या एकाच भारुडाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात

ते वर्ष होतं १९७५. मंचावरचे महाराज होते ग्रामगीताकार संत तुकडोजी महाराज आणि तीच खंजिरी घेऊन गेली पन्नासहून अधिक वर्षं महाराष्ट्रभर आपल्या गाण्यातून, कार्यक्रमांमधून आजही लोकांना भारावून टाकणारी ती मुलगी म्हणजे शाहीर मीरा उमप. हातात दिमडी, डोक्यावर गठुडं आणि सुया-बिब्बे घेऊन मीराबाई स्टेजवरून भारूड सादर करतायत. आणि फक्त लोकसंगीत नाही तर भीमगीतही.

खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे
डोईवरची
गेली मोळी भीमा तुझ्यामुळे
काल
माझी माय बाजारी जाऊन
जरीची
घेती चोळी भीमा तुझ्यामुळे
साखर
दुधात टाकून काजू दुधात खातो
भिकेची
गेली झोळी भीमा तुझ्यामुळे

*****

मीरा उमप यांचा जन्म मातंग कुटुंबात झाला. त्यांचे वडील वामनराव उमप गरीब होते. ते अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड या आपल्या वतनाच्या गावी राहायचे. शाळेत न गेल्यामुळे मीरा उमप यांना आपली जन्मतारीख माहीत नाही. घरात गायन वादनाचा वारसा होता. वामनरावांप्रमाणेच पत्नी रेशमाबाईचा गळा गोड होता.  उमपांचं घराणं गुरू घराणं असल्याने अनेक संतांचे अभंग, पोवाडे आणि कीर्तन त्यांना पाठ होते.

PHOTO • Vikas Sontate

दिमडी किंवा खंजिरी ही वाद्यं पूर्वी केवळ पुरुष वाजवत. पण मीराबाई उमप यांनी ही रुढ पंरपरा मोडीत काढली. आज दिमडी किंवा खंजिरी वाजवणाऱ्या त्या एकमेव महिला कलावंत आहेत

मीराबाईंचे आई-वडील गाणे बजावणे करून पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षापात्र हातात घेवून गावोगावी वणवण भटकत असत. मीरा, कोमल, अनुसया, जनाबाई, सावित्री या पाच पोरी आणि महावीर, दीपक, नामदेव हे तिघं पोरं असा आठ लेकरांचा संसार चालवणं सोपं नव्हतं. मीराबाईच्या सात वर्षांच्या असतानापासून भिक्षा मागू लागल्या. मीराबाई सर्वात मोठी. शाळा तिने पाहिलीच नाही. धाकटा चुलता भाऊराव दिमडी वाजवायचा, वडील एकतारी वाजवायचे. आणि मीराबाई गात सुटायची. गुरंढोरं सांभाळणारी लहान मीरा, आता दिमडीवर तिची बोटं थिरकायला लागली. मीराबाईंच्या घराच्या आजूबाजूला नेहमी भजनं चालायची. हळूहळू या भजनात सहभागी होऊन त्या भजने सादर करू लागल्या.

त्या साांगतात, “लहानपणी घरातली पातेली वाजवायची. पाणी आणता आणता डोक्यावरची कळशी वाजवायची. माझा छंदच बनला तो. मी कोणत्याही शाळेशिवाय इथेच शिकले.” त्या पुढे म्हणतात, “मी गायला सुरुवात केली त्याची कहाणी आहे. सुरुवातीला वडील आणि चुलते भिक्षा मागायला एकत्र जायचे. परंतु एकदा त्यांच्यात मतभेद झाले. कशावरून? तर आणलेली भिक्षा वाटण्यावरून. आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. चुलते गेले बुलडाण्याला. आणि मग वडलांनी मला सोबत घेतलं. तेव्हा मी बोबड्या भाषेत वडलांच्या मागे भक्तीगीत, अभंग म्हणू लागले. माझे ते बोबडे बोल ऐकून वडलांना खात्री वाटायची की मुलगी गायक बनेल.”

राम नाही सीतेच्या तोलाचा
राम बाई हलक्या दिलाचा”

“मी शाळेची पायरी कधी चढली नाही पण मला ४० कथांचं रामायण पाठ आहे. श्रावण बाळाची कथा,  महाभारत आणि त्या मधील पांडवांची कथा आणि शेकडो कबीर भजनं मुखोद्गत आहेत,” त्या सांगतात. रामायण ही एकसाची, एकरेषीय गोष्ट नाही. ती वेगवेगळ्या समूहातल्या माणसांनी, त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह, वैश्विक दृष्टिकोन, निरीक्षण आणि परतवलेल्या पारंपरिक आव्हानांसह सांगितलेली परिचित पात्रांशी जोडलेली परंतु बहुढंगी आणि बहुरंगी गोष्ट आहे.

रामायणातील कथानकांचा उच्चवर्णीय हिंदू जसा अर्थ लावतात तसा अर्थ मीराबाई लावत नाहीत. मीराबाईंचे रामायण स्त्री प्रधान आहे. सीतेच्या अंगाने समजून घेतलेले, सांगितलेले आहे. त्या गोष्टीच्या केंद्रस्थानी एक स्त्री आहे, दलित आहेत. सीतेला रामाने वनवासात एकटीला का सोडलं? त्याने शंबुकाला का मारलं? त्याने वालीचा खून का केला? असे अनेक प्रश्न विचारत मीराबाई समोरच्यांना रामायणाचा अर्थ शोधायला लावतात. त्यामागचा तर्क पुढे आणतात.

PHOTO • Ramdas Unhale
PHOTO • Labani Jangi

डावीकडेः वयाच्या सातव्या वर्षी संत तुकडोजी महाराजांनी भेट म्हणून दिलेली खंजिरी आजही मीराबाईंकडे आहे. उजवीकडेः दिमडी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटेसे चर्मवाद्य आहे. गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवल्या असल्या तर त्याला खंजिरी म्हणतात. देवतांच्या आराधनेत, कथा सांगत असताना, लोकसंगीतात आणि ग्रामीण धार्मिक विधींमध्ये दिमडी/खंजिरीचा नियमित वापर होतो

मीराबाईंची गाण्यातील समज उच्च दर्जाची आहे. गाण्यातील तांत्रिकता व त्यातील तांत्रिक समज, सादरीकरण उत्तम आहे. त्या दिमडीच्या वेगवेगळ्या भागावर आघात करून वेगवेगळे सूर काढतात. कीर्तनात, भजनात, पोवाड्यात त्यांचे ताल सूर बदलतात. त्यात कमालीचा समन्वय असतो. सगळ्या चर्मवाद्यांचा तसा परिचितच ठेका आहे, पण तो ठेका हळूहळू पकड घेतो. हे शास्त्रीय संगीत नाही. तो एक रांगडा मस्त खेळ आहे. त्या मधली सहजता भारी आहे. त्यांनीच खंजिरीला जिवंत ठेवले आहे.

खंजिरी हे वाद्य ग्रामगीताकार संत तुकडोजी महाराज त्यांच्या भजनांत वाजवीत असत. सध्या त्यांचे शिष्य सत्यपाल चिंचोलीकर सप्त-खंजिरी वाजवतात. यामध्ये सात खंजिरींचे आवाज आणि स्वर निर्माण होतात. सांगलीचे देवानंद माळी आणि साताऱ्याचे म्हलारी गजभरे असे खंजिरी वादन करणारे अनेक पुरुष कलाकार महाराष्ट्रात आहेत परंतु मीरा उमप यांच्याइतके प्रभावी खंजिरीवादन करणारी स्त्री कलाकार दुसरी नाही. उत्कृष्ट अभिनय, खड्या परंतु सुरेल आवाजात गायन, अधून-मधून विनोदी कोट्या करीत मीरा उमप संपूर्ण श्रोत्यांना खिळवून ठेवतात.

मराठवाड्यातील या तरुणीचा गोड गळा आणि खंजिरीवरची पकड संगीतातील जाणते शाहीर रत्नाकर कुलकर्णी यांनी हेरली आणि तरुणपणीच मीरा उमप यांना प्रोत्साहन दिले. बीड जिल्ह्यातील शासकीय प्रचार कार्यक्रमात मीरा उमप यांनी वयाच्या विसाव्या वर्षी शाहिरी क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्यातील अंगभूत शाहिरी कौशल्य जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रशासकीय प्रचार कार्याचे कार्यक्रम करण्याची संधी दिली. मीराबाईंनी या संधीचे सोने केले. आरोग्य, दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती यावर आधारित समाज प्रबोधन गीते त्या अतिशय प्रभावीरित्या सादर करतात.

“मला सगळ्या कथा, सप्ताह, सगळे रामायण पाठ, महाभारत पाठ, सत्यवान सावित्री पाठ. महादेवाची सगळी शास्त्रं, पुराणं यांची पारायणं करत सगळा महाराष्ट्र मी पालथा घातला. पण यामध्ये मला काही समाधान मिळाले नाही. आणि समाजाला काही दिशा मिळाली नाही.

बहुजन समाजाच्या सामाजिक दुःखावरील उपाय बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा आदी महापुरुषांच्या विचारधारेत आहे. विजयकुमार गवई यांनी आंबेडकरी चळवळीचं गाणं शिकवलं. आणि मी प्रथमच वामन दादा कर्डक यांचं गाणं गायले.”

पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
लयी नाही मागत भर माझं इवलंसं गाडगं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं

आणि मी सगळे पोथी पुराण त्या दिवशी सर्व सोडून दिलं आणि भीमगीत गायला सुरुवात केली. मी प्रथम नागपूरला वामन दादांच गाण गायले आणि लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला.”

मीराबाई उमप यांच्या आवाजात एक भीमगीत

शाहीर हा शब्द फारसीतल्या शायर किंवा शाइर या शब्दावरून आला आहे. महाराष्ट्राच्या गावोगावी शाहीर पोवाडे गात आले आहेत. आत्माराम साळवे हातात डफ घेऊन, दादू साळवे हार्मोनियम आणि कडूबाई त्यांच्या एकतारीच्या संगतीने आपल्या गाण्यांमधून, शाहिरीतून दलितांचं आत्मभान जागवत आले आहेत. महाराष्ट्रातल्या ज्या मोजक्या शाहिरा आहेत त्यात मीराबाईंचं नाव अग्रणी आहे. आजवर दिमडी फक्त पुरुषांच्या हातात वाजणारं एक रणवाद्य मानलं जायचं. मीराबाईंनी आणखी एक परंपरा मोडली आणि त्यांच्या हातात दिमडी वाजलीच नाही कडाडली.

मीरा उमप यांची बोटं ज्या प्रकारे थिरकतात, त्यात आणि इतरांमध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे लोककला अकादमीत इतरांना त्यांच्यासारखी दिमडी वाजवता येत नाही. त्या अर्थाने दिमडी हे केवळ मीराबाई यांचे वाद्य आहे. आणि ते केवळ मीराबाईच्या हातातच वाजते. अनेक लोकांना आवाज आहे पण तालाचा रिदम नाही मीरा उमप यांना मात्र आवाजाबरोबर तालाचा रिदमही आहे. मीराबाई एकदाच गायन, त्याबरोबर खंजिरीवादन तसेच एकपात्री अभिनय करून अभिनयाचे चालते बोलते नाट्यशास्त्र उभे करतात. मीराबाईच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज त्या लोकमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत.

हळू हळू वेग पकडत खड्या आवाजात गायलं जाणारं भारुड असो नाही तर भीमगीत त्यांचं गाणं या मातीतलं आहे. त्यात एक सच्चा रांगडेपणा आहे. आज त्यांच्यामुळे दिमडी आणि खंजिरी टिकली आहे.

भारुड सादर करणाऱ्या मोजक्या स्त्री कलावंतांपैकी एक म्हणजे मीराबाई. भारुड हा वारकरी संत कवींनी त्यांचे तत्वज्ञान पसरवण्यासाठी वापरलेला गायनाचा एक प्रकार आहे. भारुड दोन मोठ्या प्रकारांमध्ये वगीकृत केले जाऊ शकते. भजनी भारुड जे धर्म/अध्यात्माशी संबंधित आहेत आणि सोंगी भारुड ज्यात पुरुष स्त्रियांची वेषभूषा करून सादरीकरण करतात. ऐतिहासिक, सामाजिक पोवाडे, भारुड यावर खरं तर पुरुषांची मक्तेदारी, पण मीरा उमप यांनी ही मक्तेदारी मोडीत काढत खास वीररसात किती तरी पोवाडे गायले आहेत. ते अधिक लोकप्रिय आहे. शाहिरी कला व भक्तीसंगीत व दोन्ही प्रांतात त्यांनी कलेच्या माध्यमातून सारखेच यश मिळवले आहे. मराठवाडा-विदर्भावर संत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा फार मोठा प्रभाव आहे. त्याच शैलीने मीरा उमप यांनी आपली कला विकसित केली.

आणि त्यांच्यासाठी ही कला केवळ मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी नाही.

*****

भारतात कला ही जातीशी बद्ध आहे. सर्व चर्मवाद्यं ही आदिम काळातच बनली आहेत. चर्मवाद्यांचा संबंध जनावरांच्या कातड्याशी आहे. कातडी वाळवून ताणून त्यामध्ये जे ताणे नघाले ते इथल्या शूद्र समूहाने बांधले, त्यांचे संगीत बनवले. हे संगीत, तालवाद्य त्यांच्या जीवनाविषयीची अभिव्यक्ती आहे. या संगीत शैलीत आणि तालवाद्य वाजवण्याचा प्रक्रियेत कोणतीही लेखी परंपरा नसताना प्रत्येक पिढीने आपापल्या मौखिक पद्धतीने सुधारित केले आहे.

बहुजन, शोषित जात समूहांसाठी कला म्हणजे जणू जैविक मातृ-वारसाच होता, परंपरेने चालत आलेला. प्रत्येक जात समूह पारंपरिक व मौखिक परंपरेत शिकला. मांग दिमडी शिकले, गोंधळी संबळ शिकले, डक्कलवार किंगरी शिकले, देवदासी झुंबरुक शिकल्या. या कला अभिजनांच्या कधीच नव्हत्या. त्या केवळ बहुजनांच्याच कला होत्या, त्यातही निम्नस्तरातील कायमच अव्हेरल्या गेलेल्या समाजाच्या. दलित मुलांना वाजवता येते. ज्यांचा पिढ्या न पिढ्या दमडीशी संबंध नाही आणि तो नव्याने दिमडी वाजवायला शिकला तर तो नोटेशनचा प्रयोग यशस्वी झाला, असे आपण म्हणू शकतो. दलितेतर, बहुजनेतर कुणी ही वाद्यं शिकू शकेल का? आणि इतरांना शिकायचंच तर दिमडी, संबळ, झुंबरुक शिकण्यासाठी त्याचे नोटेशन नाही.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत आणि कला विभागाकडून दिमडी/खंजिरी हे तालवाद्य मुलांना शिकवले जाते. लोककला अकादमीत मुलांना दिमडी शिकवण्यासाठी प्रा. कृष्णा मुसळे आणि विजय चव्हाण यांनी भाषाशास्त्रीय बोल बनवले आहेत. परंतु हे मोठं आव्हान असल्याचं इथल्या लोक कला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे म्हणतात.

PHOTO • Medha Kale
PHOTO • Ramdas Unhale

डावीकडेः गणेश चंदनशिवे, मुंबई विद्यापिठाच्या लोक कला अकादमीचे संचालक. ‘संबळ आणि दिमडीचे वेगळे असे शास्त्र निर्माण झालेले नाही. त्याचे वेगळे असे बोल लिहून ठेवलेले नाहीत आणि त्यामुळे त्याला अभिजात शास्त्रीय वाद्याचा दर्जा मिळालेला नाही,’ ते म्हणतात. उजवीकडेः मीरा उमप यांना खंजिरीचे व्याकरण आणि शास्त्र माह त नव्हते. कशाला धा आणि कशाला ता म्हणतात ते माहीत नसतानाही त्यांनी त्याचं शास्त्र, बोल आणि व्याकरण तयार केलं, पुढे नेलं

“दिमडी, संबळ, खंजिरी ही क्लासिकल पद्धतीने शिकवली जाऊ शकत नाहीत. फक्त तबल्याचे बोल क्लासिकलमध्ये लिहिले जाऊ शकतात. तबल्याचे बोल दिमडीसाठी शिकवतात. तेच बोल संबळसाठी शिकवतात. संबळ आणि दिमडीचे वेगळे असे शास्त्र निर्माण झालेले नाही. त्याचे वेगळे असे बोल लिहून ठेवलेले नाहीत. या वाद्याचे अजून शास्त्रीयकरण झालेले नाही. मीरा उमप यांना खंजिरीचे व्याकरण आणि शास्त्र माहित नव्हते. कशाला धा आणि कशाला ता म्हणतात? परंतु तालाबरोबर ज्या पद्धतीने त्या वाजवतात ते कोणत्याही शास्त्रशुद्ध वादनाइतकेच गुणवत्तापूर्ण आहे.”

जसजसे बहुजन समाजातील लोकांचे मध्यमवर्गीकरण होत आहे, ते शहरात येत आहेत. त्यामुळे परंपरेने आलेल्या कला सोडून दिल्या जात आहेत. लोककलांचा अभ्यास व्हायला हवा. ज्या काळात हा आशय लिहिला गेला आहे त्याचाही अभ्यास व्हायला हवा. त्यामधल्या जातीचा संघर्ष, सामाजिक जाणिवा काय दिसतात? त्यामधील आशय आणि सादरीकरण याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हे सर्व करण्याची दृष्टी भारतीय विद्यापीठांमध्ये दिसत नाही.

जेवढ्या जाती तेवढ्या लोककला आहेत. त्याचा अभ्यास आणि जतन करायचे असेल तर एक मोठ्या रिसर्च सेंटरची आवश्यकता आहे. त्याचे डॉक्ट्युमेंटेशन करण्याची गरज आहे. याकडे कोणत्याही ब्राह्मणेतर सांस्कृतिक चळवळीचे लक्ष दिसत नाही. रायरंद संपले तर त्यांच्यासोबत त्यांची कलाही संपेल. हे चित्र बदलण्यासाठी आणि या कला पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी मीराबाई गेल्या कित्येक वर्षांपासून समाजाला आणि सरकारला जमिनीची मागणी करत आहेत. त्यांना खंजिरी, एकतारी, ढोलकी यांचे शिक्षण देणारी संस्था उभी करायची आहे. पण सरकार काही लक्ष देत नाही. सरकार कडे अर्ज निवेदन केले का? या प्रश्नावर मीराबाई म्हणतात, “मला कुठं लिहायला वाचायला येतं बाबा! पण एखाद्या कार्यक्रमात कोणी सरकारचा माणूस भेटला की मी आपलं गरान सांगत राहते. पण सरकारला गरिबांच्या कलेची कदर हाय का?”

PHOTO • Labani Jangi
PHOTO • Labani Jangi

डावीकडेः शाहीर पोवाडा सादर करतात तेव्हा डफावर थाप पडते आणि गाण्यात रंग भरतो. भवानीआईच्या गोंधळामध्ये गोंधळी किंवा आराधी तुणतुणं वाजवतात. उजवीकडेः डक्कलवार समाजाने किंगरी तयार केली. मातीचा छोटा भोपळा आणि त्यातून लाकडी दंड असलेलं हे साधंसं तंतुवाद्य. किंगरीचा आणखी एक प्रकार असतो. त्यामध्ये तीन भोपळे आणि लाकडी मोर असतो

PHOTO • Labani Jangi
PHOTO • Labani Jangi

डावीकडेः देवतांना गोंधळाला येण्याचं आवतन देताना संबळ वाजतो. तो फक्त पुरुष वाजवतात. उजवीकडेः हलगी गोल आकाराचं तालवाद्य आहे. त्याची बाहेरची रिंग लाकडी किंवा धातुची असते. सणसोहळे, लग्नं, वरात किंवा देवळात, दर्ग्यांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मांग समाजाचे पुरुष हलगी वाजवतात

*****

आजवर संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे. केंद्र शासनाच्या गीतनाट्य प्रभागाने त्यांची सन्माननीय निवड करून शाहिरी कार्यक्रम घडवून आणले. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. दारुबंदी, आरोग्य, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी अशा अनेक विषयांवर त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत.

बाई दारुड्या भेटलाय नवरा
माझं नशीब फुटलंय गं
चोळी अंगात नाही माझ्या
लुगडं फाटलंय गं

हे गाणं  सादर करण्याची त्यांची लकब तर सर्वांनाच मंत्रमुग्ध करुन टाकते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्काराने सन्मानित केलं. असं असूनही मीराबाईंच्या आयुष्याचा संघर्ष फार मोठा होता.

*****

मीरा उमप सांगतात, “मी गेली वीस वर्षे बेघर, बेसहारा भटकत होती. आता आंबेडकरी अनुयायांनी औरंगाबादमध्ये पत्र्याचं स्वतःचं घर बांधून दिलं. पण लॉकडाऊनच्या काळात चिखलठाण्याच्या शुक्रवार आठवडे बाजारातील घर शॉटसर्किटने जळालं. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. घर विकावं लागलं. कुटुंब उघड्यावर आलं.”

PHOTO • Ramdas Unhale
PHOTO • Ramdas Unhale

शाहीर मीरा उमप यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. राज्य शासनाने गौरविलेल्या मीराबाई छत्रपती संभाजीनगरमधल्या चिखलठाण्यातल्या या पत्र्याच्या घरात राहतात

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन साांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे. अशा हजारो पुरस्कारांनी त्यांचे घर सजले आहे.

“सरकारने अन् लोकांनी सन्मान म्हणून दिलेलं चिन्हं घरातल्या शोभेसाठी चांगलं दिसतं पण त्यांच्याकडे बघून पोट नाही भरता येत. कोविडमधे घर उपाशी राहू लागलं तेव्हा हे चिन्हच मी जळण म्हणून चुलीत घालून घरची चूल पेटवली. या चिन्हापरीस माणसाची भूक लय मोठी हाय बाबा!”.

सन्मान, पुरस्कार मिळोत न मिळोत, मीरा उपम महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, स्वयंरोजगार, स्वावलंबन, जातीअंत याचे तरुणांना धडे देऊन महापुरुषांची मानवता, प्रेम, करुणा पेरीत आहेत. मीरा उमप आपल्या प्रबोधनातून सामाजिक आग लावीत नसून तथाकथित लोकांनी लावलेल्या आगीवर प्रेम, मैत्री, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेची फुंकर घालत आहेत. महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपत आहेत.

मीराबाई म्हणतात, "मला कलेचा बाजार करणं आवडत नाही. सांभाळली तर कला आहे, नाही तर ती बला आहे. कलेचं चारित्र्य मी सांभाळलं आहे. कला हीच माझ्यासाठी सर्वोच्च आहे. संत कबीर, तुकाराम, तुकडोजी महाराज आणि फुले-आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा गात तब्बल चाळीस वर्षांपासून सामाजिक परिवर्तनासाठी देशाच्या विविध कोपऱ्यात भटकंती करत आहे.”

“आता हे भीमगीत गातच मरायचे आहे. हाच माझा शेवट आहे. हेच आयुष्याचे समाधान आहे.”

हा लेख आणि चित्रफिती 'Influential Shahirs, Narratives from Marathwada’ (मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्याची गीते-कथने) या मालिकेतील असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे राबवण्यात येणाऱ्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमाचा भाग आहेत. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पास गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य लाभले आहे.

Keshav Waghmare

କେଶବ ୱାଘମାରେ ମହାରାଷ୍ଟ୍ରର ପୁଣେଠାରେ ଅବସ୍ଥାପିତ ଜଣେ ଲେଖକ ଓ ଗବେଷକ। ସେ ୨୦୧୨ରେ ଗଠିତ ହୋଇଥିବା ଦଳିତ ଆଦିବାସୀ ଅଧିକାର ଆନ୍ଦୋଳନ (ଡିଏଏଏ)ର ଜଣେ ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସଦସ୍ୟ ଏବଂ ବହୁ ବର୍ଷ ଧରି ମରାଠୱାଡ଼ା ସମ୍ପ୍ରଦାୟକୁ ନେଇ ଅଧ୍ୟୟନ ଜାରି ରଖିଛନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Keshav Waghmare
Editors : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ
Editors : Pratishtha Pandya

ପ୍ରତିଷ୍ଠା ପାଣ୍ଡ୍ୟା ପରୀରେ କାର୍ଯ୍ୟରତ ଜଣେ ବରିଷ୍ଠ ସମ୍ପାଦିକା ଯେଉଁଠି ସେ ପରୀର ସୃଜନଶୀଳ ଲେଖା ବିଭାଗର ନେତୃତ୍ୱ ନେଇଥାନ୍ତି। ସେ ମଧ୍ୟ ପରୀ ଭାଷା ଦଳର ଜଣେ ସଦସ୍ୟ ଏବଂ ଗୁଜରାଟୀ ଭାଷାରେ କାହାଣୀ ଅନୁବାଦ କରିଥାନ୍ତି ଓ ଲେଖିଥାନ୍ତି। ସେ ଜଣେ କବି ଏବଂ ଗୁଜରାଟୀ ଓ ଇଂରାଜୀ ଭାଷାରେ ତାଙ୍କର କବିତା ପ୍ରକାଶ ପାଇଛି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Pratishtha Pandya
Illustrations : Labani Jangi

ଲାବଣୀ ଜାଙ୍ଗୀ ୨୦୨୦ର ଜଣେ ପରୀ ଫେଲୋ ଏବଂ ପଶ୍ଚିମବଙ୍ଗ ନଦିଆରେ ରହୁଥିବା ଜଣେ ସ୍ୱ-ପ୍ରଶିକ୍ଷିତ ଚିତ୍ରକର। ସେ କୋଲକାତାସ୍ଥିତ ସେଣ୍ଟର ଫର ଷ୍ଟଡିଜ୍‌ ଇନ୍‌ ସୋସିଆଲ ସାଇନ୍ସେସ୍‌ରେ ଶ୍ରମିକ ପ୍ରବାସ ଉପରେ ପିଏଚଡି କରୁଛନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Labani Jangi