कोल्हापूर जिल्ह्यातल्या या बाया त्यांच्या लाडक्या बाळूमामांच्या ओव्या गातायत

जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या मूळ गटाने कोल्हापूर जिल्ह्याच्या मेतगे गावी भेट दिली होती. तेव्हा भेटलेल्या तिथल्या १९ जणींची यादी आमच्या हातात होती. ती घेऊन तिथे आम्ही पोचलो. आमच्या हातातले कॅमेरे वगैरे पाहून अर्थातच सान-थोर सगळेच गोळा झाले.

'पुण्यातून आलेल्या काही लोकांना तुम्ही ओव्या म्हणून दाखवल्या होत्या का' असं आम्ही घराच्या उंबऱ्यात बसलेल्या एका बाईला विचारलं. “होय, आम्ही जात्यावरच्या ओव्या गाऊन दाखवल्या होत्या. मी पण होते की त्यात.”

आमच्या यादीतल्या सोना भारमल आमच्यासमोर उभ्या होत्या. साठीच्या सोनाताईंनी आम्हाला सांगितलं की त्या गटातल्या आता फक्त लक्ष्मी डवरीच मेतग्यात राहतात म्हणून.

Left: Singer Sona Pandurang Bharmal, in her 60s.
PHOTO • Samyukta Shastri
Right: Singer Laxmi Shamrao Dawari
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः साठीच्या सोना पांडुरंग भारमल. उजवीकडेः लक्ष्मी शामराव डवरी

Left: Singer Sunita Shankar Jadhav.
PHOTO • Samyukta Shastri
Right: Singer Bayana Kamble, who had passed away in the years since they had sung for the original GSP team two decades ago.
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः सुनीता शंकर जाधव. उजवीकडेः वीसेक वर्षांपूर्वी जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या गटासाठी ओव्या गायलेल्या बायनाबाई कांबळे मधल्या काळात बुद्धवासी झाल्या

२०१८ सालची गोष्ट. आम्ही मेतग्यात पोचलो होतो. मधल्या काळात बायनाबाई कांबळेंसारख्या काही जणी निवर्तल्या होत्या. “माझी आई आणि सखुबाई कांबळे ओव्यांसाठी प्रसिद्ध होत्या,” बायनाबाईंचे पुत्र अशोक कांबळे आम्हाला सांगतात. “त्या उसात काम करता करता गाणी गायच्या.”

कागल तालुक्यातल्या या गावाचं नावच बाळूमामाचे मेतगे असं पडलं आहे. बाळूमामा जुन्या काळातले मेंढपाळ होते, संत होते. त्यांचं एक मंदिरही आहे. देवळाच्या बाहेर प्रवेशद्वाराशेजारीच दगडी मेंढे लक्ष वेधून घेतात. हे स्थान लोकप्रिय आहे कारण बाळूमामांचा महिमा आजदेखील कमी झाला नाहीये. तरुणाईलाही त्यांचं अजून वेड आहे.

पेरणीआधी मेतग्यातले शेतकरी बाळूमामांची मेंढरं शेतात बसवायचे, त्यासाठी त्यांची वाट पहायचे असं मेतग्याच्या बाया आम्हाला सांगतात. त्यांच्या मेंढ्या ज्या रानात बसायच्या तिथे भरपूर पिकायचं अशी सगळ्यांची श्रद्धा होती.

१८९२ साली कर्नाटकात जन्मलेले बाळप्पा पुढे जाऊन बाळूमामा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना संतपण लाभलं. ४ सप्टेंबर १९६६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर इथे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावरच्या पुस्तकांमधून, कन्नड आणि मराठी मालिकांमधून त्यांची ख्याती अजूनही सगळ्यांपर्यंत पोचत आहे.

Left: A billboard for the temple dedicated to the revered shepherd-saint Balumama and his wife Satyavadevi in Metage village, Kolhapur .
PHOTO • Samyukta Shastri
Right: The entrance to the temple is flanked by stone sculptures of rams
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः कोल्हापूर जिल्ह्याच्या मेतगे गावी संत बाळूमामा आणि त्यांच्या पत्नी सत्यव्वा यांच्या मंदिरापाशी लागलेला फलक. उजवीकडेः मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले दगडात घडवलेले मेंढे

*****

पारीने २०१८ साली बाळुमामाचे मेतगे गावाला भेट दिली. या वेळी दहाहून जास्त बाया ओव्या गायला गोळा झाल्या. वीस वर्षांपूर्वी ज्या १९ बाया आल्या होत्या त्यातल्या काही यामध्ये होत्या.

या बायांनी अनेक लोकगीतं गाऊन दाखवली आणि ओव्या गाण्याची आमची विनंती अगदी आनंदाने मान्य केली. त्यांनी एक जातं हुडकून काढलं. ते साफ करून त्यामध्ये खुंटा घट्ट बसवला. त्यानंतर हळद-कुंकू वाहिली. जात्यापुढे दिवा लावून त्यांनी हात जोडून मनोभावे पूजा केली आणि मग ओव्यांना सुरुवात केली.

हळूहळू ओव्यांचा वेग वाढायला लागला आणि सगळ्यांचे सूर एकसाथ येऊ लागले. सुलाबाई जाधव सगळ्या गटाच्या म्होरक्या. त्या गात होत्या आणि बाकी सगळ्या त्यांच्या मागे म्हणत होत्या. त्यांनी गायलेल्या आठ ओव्या पारीने ध्वनीमुद्रित केल्या.

Sulabai Ravishankar Jadhav, the lead singer of the group, explains the rhythms of the songs and ensures synchrony as the other singers join her
PHOTO • Samyukta Shastri
Sulabai Ravishankar Jadhav, the lead singer of the group, explains the rhythms of the songs and ensures synchrony as the other singers join her
PHOTO • Samyukta Shastri

सुलाबाई रविशंकर जाधव गटाच्या म्होरक्या, त्यांनी लय आणि चाली समजावून सांगत सगळ्यांना ओव्या गायला साथीला घेतलं

Left: Singer Gitanjali Diwan Dawari.
PHOTO • Samyukta Shastri
Right: Singer Hemal Ramchander Bharmal
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः गीतांजली दिवाण डवरी. उजवीकडेः हेमल रामचंदर भारमल

“बाई पहिली माझी ओवी, जोतिबाला माझ्या देव त्या गं,” ओवीला सुरुवात झाली. पहिली ओवी कोल्हापूरचं लोकदैवत असलेल्या जोतिबाच्य सन्मानात गायली आहे. त्याच्या जानव्याला मोत्याची दुहेरी माळ वाहत असल्याचं त्या गातात.

पुढच्या तीन ओव्या बाळूमामांसाठी गायल्या गेल्या. त्यातही बाळूमामा देवच असल्याचं या बाया गातात.

मध्यरात्री जेव्हा चंद्र ढगाआड लपलेला असतो, तेव्हा बाळूमामा शेतकऱ्याच्या रानात मोत्यांची रास देतो, अर्थात चांगलं पिकतं.

पुढच्या ओवीत बाई गाते की बाळूमामासाठी आंबिल करण्यासाठी ती जोंधळा आणि तांदूळ दळतीये. बाळूमामा पैलवान आहे, गोरापान आहे. मेंढरामागे जाणारं कुणीही उन्हात काळवंडेल पण दुधामुळे बाळूमामा कसा गोरापान आहे असं या बायांना म्हणायचं असावं.

Left: Singer Darkubai Ravan Mane.
PHOTO • Samyukta Shastri
Right: Singer Muktabai Anant Tambekar.
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः दारकूबाई रावण माने. उजवीकडेः मुक्ताबाई अनंत तांबेकर

Left: Anubai Govinda Mane.
PHOTO • Samyukta Shastri
Right: Suman Shivaji Satvekar
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः अनुबाई गोविंदा माने. उजवीकडेः सुमन शिवाजी सातवेकर

शेवटच्या चार ओव्या गाणाऱ्या बायांच्या मनातला भक्तीभाव व्यक्त करतात. एका ओवीत अंबिका देवीला मूळ चिठ्ठी धाडल्याचं त्या गातात. विठोबा-रखुमाईच्या पंढरपूर नगरीचं वर्णन त्या करतात. “राही रुख्मिण राज करी, लावुयिनी चौदा चौकटी गं” असं गातात.

पंढरपुरात तुळशीची इतकी गर्दी झाली आहे की “माझ्या विठ्ठल देवाजीचा, रथ फिराया नाही जागा गं” असंही त्या प्रेमाने सांगतात.

विठ्ठलाचं आपल्या भक्तांवर किती प्रेम होतं ते पुढच्या ओवीतून दिसतं. विठल्लाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या संत नामदेवाला मुलगा झाला तेव्हा विठ्ठलाने त्याचं बारसं घातल्याचं पुढच्या ओवीत गायलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाळूमामाचे मेतगे गावातल्या बायांच्या ओव्या नक्की ऐका.

व्हिडिओ पहाः बाळूमामांसाठी काही ओव्या

ओव्या ऐकाः

बाई पहिली माझी ओवी, जोतिबाला माझ्या देव त्या गं,
माझ्या देव त्या जोतिबाला, जानव्याला मोती दुहेरी गं

बाई मध्यान्ही रातरीत, घेरं घेतो चांद ढगात गं
आणि देवराची बाळू मामा वारं देतो रास मोत्याची गं,

बाई जुंधळं तांदूळ गं, आंबलीला मी का दळितो गं
माझा चिदाजी बाळूमामा गं, मध्यान्नीला ते चोखंल गं

कोण झोपिलं गोरं पान, माझा चिदाजी बाळूमामा
आकडी दुधाचा गं, पैलवान, आकडी दुधाचा गं

बाई धाडली मूळ चिठी आंबिकाला, माझ्या देव त्या गं
आंबिकाला, माझ्या देव त्या गं

बाई पंढरी बांधियली, पायिरी चढ-सखल गं,
राही रुख्मिण राज करी, लावुयिनी चौदा चौकटी* गं,

बाई पंढरपुरामंदी, तुळशी बागा गल्लो-गल्लीला गं,
माझ्या विठ्ठल देवाजीचा, रथ फिराया नाही जागा गं

बाई पंढरपुरामंदी, आराईस गल्लो-गल्लीला गं,
नामदेवाला झाला ल्योक,  बाराईस  घाली  विठ्ठल गं

नामदेवाला झाला
ल्योक,  बाराईस  घाली  विठ्ठल गं

*या ओवीमध्ये चौदा चौकटींचा उल्लेख आला आहे. पंढरपुरात विठ्ठल रखुमाई चौदा चौकटी लावून बसले आहेत म्हणजे चौदा चौकडी राज्य केलं असा त्याचा अर्थ होतो. एक चौकडी म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कलि असा चार युगांचा मिळून काळ मानला जातो. संत तुकारामांच्या अभंगांमध्येही चौकडीचा उल्लेख आढळतो.

कलाकारः सुनीता जाधव, सोना भारमल, लक्ष्मी डवरी, सुलाबाई जाधव , गीतांजली डवरी, हेमल भारमल, दारकुबाई माने, मुक्ताबाई तांबेकर, अनुबाई माने, सुमन सातवेकर

गावः बाळूमामाचे मेतगे

तालुकाः कागल

जिल्हाः कोल्हापूर

दिनांकः या ओव्या १७ मे २०१८ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आल्या आणि फोटो त्याच दिवशी घेण्यात आले.

पोस्टरः सिंचिता माजी

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

Namita Waikar

ନମିତା ୱାଇକର ହେଉଛନ୍ତି ଜଣେ ଲେଖିକା, ଅନୁବାଦିକା ଏବଂ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପରିଚାଳନା ନିର୍ଦ୍ଦେଶକ। ତାଙ୍କ ରଚିତ ଉପନ୍ୟାସ ‘ଦ ଲଙ୍ଗ ମାର୍ଚ୍ଚ’ ୨୦୧୮ରେ ପ୍ରକାଶ ପାଇଥିଲା।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ନମିତା ୱାକର
PARI GSP Team

PARIର ‘ଗ୍ରାଇଣ୍ଡମିଲ ସଙ୍ଗସ’ ପ୍ରକଳ୍ପ ଟିମ୍‌: ଆଶା ଓଗାଲେ (ଅନୁବାଦ); ବର୍ଣ୍ଣାଡ ବେଲ (ଡିଜିଟାଇଜେସନ୍‌, ଡାଟାବେସ୍‌ ଡିଜାଇନ୍‌, ପ୍ରସ୍ତୁତି ଏବଂ ରକ୍ଷଣାବେକ୍ଷଣ); ଜିତେନ୍ଦ୍ର ମୈଡ଼ (ଅନୁଲେଖନ, ଅନୁବାଦନରେ ସହାୟତା); ନମିତା ୱାଇକର (ପ୍ରକଳ୍ପ ମୁଖ୍ୟ ଏବଂ କ୍ୟୁରେସନ); ରଜନୀ ଖାଲାଡ଼କର (ଡାଟା ଏଣ୍ଟ୍ରି) ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ PARI GSP Team
Video Editor : Sinchita Parbat

ସିଞ୍ଚିତା ପର୍ବତ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍‌ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ଜଣେ ବରିଷ୍ଠ ଭିଡିଓ ସମ୍ପାଦିକା ଏବଂ ଜଣେ ମୁକ୍ତବୃତ୍ତିର ଫଟୋଗ୍ରାଫର ଓ ପ୍ରାମାଣିକ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ନିର୍ମାତା। ପୂର୍ବରୁ ସିଞ୍ଚିତା ମାଜୀ ନାମରେ ତାଙ୍କର କାହାଣୀଗୁଡ଼ିକ ପ୍ରକାଶ ପାଇଛି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Sinchita Parbat