पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातल्या दोघी जणींनी त्यांनी गायलेल्या या १३ ओव्यांमधून सीतेचा वनवास आणि तिचं जिवलगांशिवायचं दुःख चितारलं आहे
राम म्हणू राम,
राम सुपारीचं खांड
याचं नावू घेता,
देही झाली गार थंड
पुण्याच्या शिरुर तालुक्यातल्या सविंदण्याच्या रत्नाबाई पडवळ रामाची ही ओवी गातात. मुखी त्याचं नाव असलं तर जिवाला शांती मिळते. रामायणाभोवती गुंफलेल्या ओव्यांच्या तीन संचातल्या या १३ ओव्या तुमच्यापुढे सादर करत आहोत.
सोनुबाई मोटेंसोबत या ओव्या गाणाऱ्या रत्नाबाई रामायणातले विविध प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभे करतात. सीता पदराने रामाच्या भाळावरचा घाम पुसते, त्यांचा रथ बाजारातून जाताना कुणाची दृष्ट तर लागली नाही ना याची तिला चिंता वाटते.
पुढच्या संचामध्ये रत्नाबाई आपल्याला थेट लंकेला घेऊन जातात. रामाच्या सैन्याशी झालेल्या युद्धात रावणाचा पुत्र इंद्रजीत मारला जातो. इंद्रजिताची पत्नी सुलोचना त्याच्या मरणाचा लेखी पुरावा मागते. त्याचं शीर जरी अंगणात पडलेलं असलं तरी तिचा विश्वास बसण्यास तयार नाही. युद्धात दोन्ही बाजूच्या लोकांचे जीव जातात आणि जिवलगांच्या मरणाचं दुःखही दोन्ही बाजूच्या लोकांना होत असतं याची आठवणच ही ओवी आपल्याला करून देते.
सोनुबाई गातात, सीता वनवासाला निघते, तिचं कपाळ कुंकवाने भरलेलं आहे, तिची कसलीच चूक नसताना तिला वनवासात जावं लागतंय. पतीने सोडून दिल्याने प्रत्यक्षातल्या आणि नैतिकदृष्ट्या जाणवत असलेल्या यातना, एकाकीपणा तिला सहन करावा लागतोय. ती निघते तसे रामाचे डोळेही भरून येतात. पापी रावणामुळे सीतेवर ही पाळी आल्याचं ओवीत गायलंय.
वनामध्ये एकटीने आपल्याच लाल लुगड्याचं पाल बांधून सीता राहते. उशाला दगड घेते. वनात रडणाऱ्या सीतेची समजूत घालायला वनातल्याच बोरी आणि बाभळी येतात. काटेरी, भेगाभेगांची खोडं असलेली ही झाडं वनाच्या कडेला वाढतात आणि समाजात स्त्रियांचं असलेलं दुय्यम स्थान आहे, त्यांच्या वाट्याला येणारे भोग अशा सगळ्यांचं प्रतीक म्हणून गावाकडच्या बाया या झाडांचा उल्लेख आपल्या ओव्यांमध्ये करतात.
रामायणाचं पुनःकथन करताना आपल्या उपसंहारामध्ये सी. राजगोपालाचारी म्हणतात की “रामायण होऊन गेलं पण सीतेचं दुःख आजही संपलेलं नाही. आपल्याकडे बायांच्या आयुष्यात आजही तेच दुःख आहे.” पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्नीपरीक्षा देऊन, त्यातून सुखरुप बाहेर येऊनसुद्धा सीतेला वनवासात धाडलं गेलं. राजगोपालाचारी म्हणतात की “आपल्या समाजात स्त्रिया निमूटपणे ज्या अनंत यातना सहन करतात,” त्याचंच हे प्रतिबिंब आहे.
रामायणानुसार, राम, सीता आणि लक्ष्मणाने १४ वर्षांच्या वनवासात पंचवटीच्या अरण्यामध्ये आपला मुक्काम केला. आज महाराष्ट्रातील नाशिक शहर जिथे आहे तो हा भाग. रामायणातल्या उत्तरकांडामध्ये याच अरण्यात सीता एकटीच वनवासाला गेली आणि त्याचीच कल्पना या ओव्यांमध्येही केली आहे. लहु आणि अंकुस (लव-कुश) या आपल्या दोघा बाळांसाठी ती अंगाई गातीये आणि हे दोघं “पंचवटीचे दलाल” म्हणजे हुशार असल्याचंही ओव्यांमध्ये पुढे येतं.
शेवटच्या तीन ओव्यांमध्ये सीतेची मुलं लहु आणि अंकुसाचं कौतुक केलं गेलं आहे. गोदावरीवरच्या पवित्र अशा रामकुंडावर दोघं आंघोळीसाठी येतात. अयोध्येहून राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला आल्यावर याच ठिकाणी रामाने स्नान केलं असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
या १३ ओव्यांमधून रत्नाबाई पडवळ आणि सोनुबाई मोटे यांनी ज्याला पुरुषोत्तम आणि सदाचारी मानण्यात आलं आहे अशा श्रीरामाच्या वागण्यावरच प्रश्नचिन्ह लावलं आहे. तसंच फक्त सीतेचं नाही तर सुलोचनेचं दुःख त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. त्यातून या महाकाव्यांकडे, आयुष्याकडे आणि देशा-देशातल्या युद्धात दोन्ही बाजूच्या स्त्रियांच्या व्यथेकडे त्या आपलं ध्यान वळवतात.
राम म्हणू राम, राम गळ्याचं ताईत
घातिलं गळ्यामंदी, नाही जनाला माहित
राम म्हणू राम, राम संगतीला चांगला
माझ्या हुरद्यात, यानं बंगला बांधिला
राम म्हणू राम, राम सुपारीचं खांड
याचं नावू घेता, देही झाली गार थंड
रामाला आला घाम, सीता पुसी पदरानं
कोणाची झाली दृष्ट, रथ गेला बाजारानं
रामाला आला घाम, सीता पुसिती लहुलाया
कोणाची झाली तुला दृष्ट, माझ्या रामराया
* * *
मारिला इंद्रजीत, शीर पडलं अंगणी
सत्याची सुलोचना, कागद मागती अंगणी
सीता चालली वनवसा, कुंकू कपाळी भरुनी, गं सईबाई
राम देखले दुरुन, आली नेतरं भरुनी गं
सीता चालली वनवसा, हिला आडवी गेली गायी गं सईबाई
हे गं येवढा वनवास, पाप्या रावणाच्या पायी गं
हे गं येवढ्या वनामंदी, कोण रडतं आइका गं सईबाई
सीतेला समजावया, बोऱ्या बाभळ्या बाइका गं
येवढ्या वनामंदी, कोण करितं जु जु जु गं सईबाई
सीताबाई बोलं लहु अंकुस बाई निजू
हे गं येवढ्या वनामंदी, सीता झोप ना कशी आली गं साईबाई
सीताबाईनं केली दगडाची उशी गं
येवढ्या वनामंदी, काय दिसतं लाल लाल गं सईबाई
सीताबाईनं केलं, लुगड्याचं पाल गं
* * *
रामकुंडावरी कुण्या वाहिला गुलाल
आंघोळीला येती पंचवटीचं दलाल
रामकुंडावरी कोण्या वाहिली सुपारी
आंघोळीला येती लहु अंकुस दुपारी
रामकुंडावरी वल्या धोतराची घडी
आंघोळीला येती लहु अंकुसाची जोडी
कलावंत – सोनुबाई मोटे
गाव – सविंदणे
तालुका – शिरुर
जिल्हा – पुणे
व्यवसाय – शेतकरी आणि गृहिणी
जात
– मराठा
कलावंत – रत्नाबाई पडवळ
गाव – सविंदणे
तालुका – शिरुर
जिल्हा – पुणे
व्यवसाय – शेतकरी आणि गृहिणी
जात – मराठा
दिनांक – या ओव्या १३ डिसेंबर १९९५ रोजी ध्वनीमुद्रित
करण्यात आल्या.
पोस्टर - ऊर्जा
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या
जात्यावरच्या ओव्या
या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.