बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या या माय-लेकी गौतम बुद्धाची स्तवनं गातात. लोकांच्या रोजच्या आयुष्यात बुद्धाचा वास आहे आणि तो आपल्या शिकवणीतून त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतो हे या ओव्यांमधून दिसून येतं.
२६ मे.
आज बुद्ध पौर्णिमा. पण यंदा गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यासाठी कसलेच
सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत. “जिथं तिथं करोना झालाय ना, कसलंच काही साजरं करता येईना गेलंय,” बीडच्या
सावरगावमधल्या ७५ वर्षीय राधा बोऱ्हाडे म्हणतात.
“आम्ही घरीच प्रार्थना करू आणि पोरांसाठी गोडाचं म्हणून खीर करणारे.” कोविड-१९ महासाथीमुळे २०२० साली देखील बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम झाले नव्हते, आणि यंदा पण तेच, फोनवर बोलणाऱ्या राधाबाईंच्या आवाजातली खंत स्पष्ट जाणवते.
एप्रिल २०१७ मध्ये पारीची टीम बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पामधल्या कलावंतांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा आम्हाला सावरगावला राधाबाईंना भेटायला जा असं सांगितलं होतं. हे गाव माजलगावपासून १० किलोमीटरवर आहे. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूने रेकॉर्ड केलेल्या काही ओव्या त्यानंतर आम्ही सादर केल्या होत्या. राधाबाईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्तुतीत गायलेली ‘एक लाख ववी माझ्या भीमाला पुरंना’ ही ओवी आणि सोबतच्या इतर ओव्यांमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण, एकी आणि स्वाभिमानाला दिलेलं महत्त्व अधोरेखित होतं.
माजलगावची गाणी, महूच्या आठवणी या ओव्यांमध्ये नवबौद्ध असणाऱ्या राधाबाई आणि इतर काही जणी डॉ. आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जातीने केलेल्या छळाला छेद देऊन त्यांनी नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांना नवी ओळख दिली. धन्यतेची गाणी, उत्सवाचा जागर या ओव्यांमध्ये राधाबाई बुद्धाची शिकवण सांगतात, दलितांच्या कल्याणासाठी आणि अस्पृश्यतेचा कलंक धुऊन टाकण्यासाठी बौद्ध धर्म आला असल्याचं त्या या ओव्यांमधून गातात.
आम्ही जेव्हा माजलगावला गेलो होतो तेव्हा आम्हाला कमल साळवे (राधाबाईंची मुलगी) आणि रंगू पोटभरे अशा दोघींचीही भेट घ्यायची होती. पण त्या बाहेरगावी नातेवाइकांकडे गेल्या होत्या. रंगूबाईंच्या आई, पार्वती भादरगेंना भेटणं आमच्या नशिबात नव्हतं. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं.
कमलबाई आता साठीच्या आहेत. सावरगावहून सात किलोमीटरवर असलेल्या भातवडगावात त्या राहतात. त्या सांगतात, “होय, खूप वर्षं झाली मी बुद्धावरच्या काही ओव्या गायले होते. आता माझ्या फार काही ध्यानात नाही. आईला सगळ्या येतात.”
जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत ओव्यांचे दोन संच आहेत. पहिल्या संचात राधाबाई आणि रंगूबाईंनी गायलेल्या बुद्धावरच्या पाच ओव्या आहेत. दुसऱ्या संचात पार्वतीबाईंनी गायलेल्या बुद्धावरच्याच नऊ ओव्या. सकाळी उठल्यापासून दैनंदिन व्यवहार सुरू असताना बुद्धाचा सतत वास असतो हेच या ओव्यांमध्ये गायलंय. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ गटाने माजलगावात १९९६ साली या ओव्या रेकॉर्ड केल्या आहेत.
पहिल्या दोन ओव्यांमध्ये या तिघी जणी गातायत की त्यांनी त्यांचं आयुष्य बौद्ध धर्माला अर्पण केलंय. बौद्ध धर्माच्या तीन रत्नांना – बुद्ध, धम्म (बुद्धाची शिकवण) आणि संघ (बौद्ध धम्माचं पालन करणाऱ्यांचा समुदाय) शरण जात असल्याचं त्या गातात. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शील सांभाळू, दुसऱ्याला इजा करणार नाही हे वचन देणाऱ्या पंचशील तत्त्वांचं पालन करू असं या ओवीत गायलंय.
पुढची ओवी अष्टशीलासाठी गायली आहे, महामंगल गाथेचं वाचन करण्याबद्दलही त्या पुढच्या ओवीत गातात. राग आणि मोहावर नियंत्रण आणण्याविषयीची ही गाथा आहे. शेवटची ओवी नरसिंह गाथेचा उल्लेख करते आणि भगवान बुद्धाला शतकोटी प्रणाम करते.
पहिली माझी ओवी गं भगवान बुद्धाला
सरण मी जाईल बुद्ध धम्म संघाला
दुसरी माझी ओवी गं पंचशील त्रशरणाला
अखेरच्या क्षणापर्यंत सांभाळील शिलाला
तिसरी माझी ओवी गं पंचशील तत्वाला
अष्टशील पालन करुन पटवील मनाला
चवथी माझी ओवी गं महा मंगल गाथाला
चित्त शुद्ध करुन सोडील राग मोहाला
पाचवी माझी ओवी गं नरसिंह गाथाला
शतकोटी प्रणाम गं माझा भगवान बुद्धाला
इथे सादर केलेल्या पुढच्या ओव्या पार्वती भादरगे यांनी गायल्या आहेत. त्यांचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना जात्यावर ओव्या गायला आवडायच्या असं त्यांची कन्या, रंगूबाई सांगतात. त्यांनी स्वतः आता सत्तरी पार केली आहे. “ती मला सांगायची, ‘तू पण माझ्या संगं गात जा. गळ्याला चांगला व्यायाम होतोय आणि ओव्या बी ध्यानात राहतात’.”
“पण लग्न झाल्यावर पहिली काही वर्षंच मी जातं वापरलं. गव्हाचं, ज्वारीचं दळण असायचं,” रंगूबाई मला फोनवर सांगतात. सुमारे २५ वर्षांपूर्वी माजलगावला गिरण्या आल्या आणि घरी दळणं करायची पद्धत मागे पडली. आणि मग हळूहळू ओव्याही विरत गेल्या.
नऊ ओव्यांमधल्या पहिल्या ओवीत पहाटेच्या प्रहरी उठल्यावर सम्राटाचा पुत्र गौतम बुद्ध बोट धरून पुढे नेतोय. रात्रीच्या अंधारातून पहाटेच्या प्रकाशात बुद्ध आपल्याला घेऊन जातोय असा याचा अर्थ आहे. येणाऱ्या ओव्यांमध्ये असं गायलंय की बुद्धाचं नाव, त्याची शिकवण आपल्या आयुष्यात गोडवा घेऊन येते, मनाला विश्रांत करते उभारी देते.
अंगण लोटताना गायिकेला तिथे बुद्धाचा वास असल्याचं भासतं. आणि अंगणात पाण्याचा व दुधाचा सडा घालताना असं वाटतं जणू ती बुद्धाची बहीण किंवा भाची आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे बुद्धाच्या घरी रहायला जाण्यासारखं आहे, असं ती गाते.
पहाटंच्या पाऱ्यात गौतम बुध्दाच्या गं बोटी
असा जलम घेतला सम्राटाच्या पोटी
पहाटंच्या पाऱ्यात बुध्दाच नाव घ्यावा
धरणी मातावरी मग पावूल टाकावा
बुध्द धम्माचं गं नाव खडीसाखर चाखावा
बुध्दाचं नाव घेता इसरांत माझ्या जीवा
बुध्द भगवंताचं नाव खडी साखरेची रेजी
बुध्दाचं नाव घेता गोड जीभ झाली माझी
बाई पहाटंच्या पाऱ्यात अंगण झाडीते खड्यानं
माझ्या गौतम बुध्दाचे झाले दर्शन जोड्यानं
बाई पहाटंच्या पाऱ्यात अंगण झाडीते सोयीचं
माझ्या गौतम बुध्दाचं झालं दर्शेन दोहीचं
बाई पहाटंच्या पाऱ्यात सडा टाकीते दुधाचा
सडा टाकीते दुधाचा वाडा गौतम बुधाचा
पहाटंच्या पाऱ्यात सडा टाकीते सईल
सडा टाकीते सईल गौतम बुध्दाची बहीण
बाई पहाटंच्या पाऱ्यात सडा टाकीते मी कशी
सडा टाकीते मी कशी गौतम बुध्दाची मी भाशी
कलावंतः राधा बोऱ्हाडे, कमल साळवे, रंगू पोटभरे, पार्वती भादरगे
गावः माजलगाव
वस्तीः भीमनगर
तालुकाः माजलगाव
जिल्हाः बीड
जातः नवबौद्ध
व्यवसायः राधा बोऱ्हाडे शेतमजुरी करायच्या, त्यांचं सावरगावात छोटं दुकान आहे. कमल साळवे गृहिणी आहेत. रंगू पोटभरे काही वर्षं घरची शेती करत होत्या. पार्वती भादरगे शेतकरी आणि शेतमजूर होत्या.
दिनांकः या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी ध्वनीमुद्रित करण्यात आल्या आहेत.
पोस्टरः ऊर्जा
माजलगावच्या रत्नराज साळवे आणि विनय पोटभरेंनी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार.
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.
अनुवादः मेधा काळे