गावाकडे अशी वाहतूक नेहमीचीच. रिकाम्या किंवा बाजारात माल सोडून परत जाणाऱ्या ट्रक किंवा टेम्पोचे ड्रायव्हर सिटा भरतात आणि दोन पैसे कमवतात. कुणीही यातून प्रवास करू शकतं – तुम्हीसुद्धा. पण आठवड्याचा बाजार करून परतणाऱ्यांच्या गर्दीत तुम्हाला गाडी सापडणं आणि त्यातही जागा मिळणं काही सोपं नाहीये. भारताच्या दुर्गम गाव पाड्यांवर जवळपास सगळेच ट्रक किंवा लॉरी ड्रायव्हर अशी भाडी घेत जातात, अर्थात आपल्या मालकाचा डोळा चुकवून. ज्या भागात दळणवळणाच्या बऱ्या सोयी नसल्यात जमा आहेत, तिथे खरं तर ते मोठी सेवाच पुरवत असतात म्हणा ना – अर्थात त्याचे पैसे मोजावे लागतात.

ओडिशाच्या कोरापुटमधल्या एका महामार्गाजवळचं हे दृश्य. अंधारून यायला लागलं होतं आणि लोकांची घरी परतायची लगबग सुरू होती. अशा वेळी एखाद्या गाडीत नक्की किती लोक चढलेत हे कळणं सुद्धा कठीण असतं. माहित असतं फक्त ड्रायव्हरला, कारण त्याने पैसे घेतलेले असतात. पण त्याचा अंदाजही कधी कधी चुकतोच. कारण तो लोकांकडून त्यांच्या सामानाप्रमाणे वेगवेगळे पैसे घेत असतो. कुणाकडे कोंबड्या असतात, तर कुणाकडे बकरं. काही जणांकडे बोजा मोठा असतो. म्हाताऱ्या-कोताऱ्यांकडून किंवा त्याच्यासोबत नेहमी ये-जा करणाऱ्यांना तो थोडी सूटही देत असतो. महामार्गावर ठरलेल्या ठिकाणी तो त्या त्या प्रवाशांना उतरवत जातो. तिथून अंधाऱ्या वाटेने, राना-वनातून झपाझप पाय टाकत ते आपापल्या घरी जातात.

इथल्या बाजारात यायला अनेकांना ३० किलोमीटरहून जास्त प्रवास करावा लागला होता कारण त्यांची घरं महामार्गापासून बरीच आतल्या भागात आहेत. १९९४ साली २० किलोमीटर अंतरासाठी दोन ते पाच रुपये भाडं पडत होतं. रस्ता किती खडतर आहे त्यावरही हे अवलंबून असायचं म्हणा. आणि ड्रायव्हरच्या मनावरही. प्रवाश्याला किती घाई आहे आणि दोघांचं वाटाघाटीचं कौशल्य किती ते इथे कामी यायचं. मी स्वतः हजारो किलोमीटर असाच प्रवास केलाय, त्यातून सांगतो,  माझ्यापुढची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मला मागच्या माणसांच्या गर्दीत बसायचं आहे हे ड्रायव्हरला पटवून सांगणं. अगदी गाडीच्या टपावर देखील चालेल, पण गाडीत नाही.

PHOTO • P. Sainath

माझ्या या विनंतीचा त्या भल्या आणि प्रेमळ ड्रायव्हरला काही अर्थच लागत नव्हता. “पण सर, माझ्याकडे इश्टिरियो आहे, माझ्या केबिनमध्ये कॅसेट प्लेयर आहे. प्रवासात तुम्हाला मस्त गाणी ऐकता येतील,” तो म्हणतो. तितकंच नाही त्याच्याकडे पायरेटेड गाण्यांचा खजिना देखील होता. प्रवासातला हा आनंदही मी लुटला आहे बरं. पण लॉरीत मागे कोंबलेल्या गावकऱ्यांचा बाजारातला आजचा दिवस कसा होता हे आज मला जाणून घ्यायचं होतं. मी त्याला विनवणी केली की बाबा, अंधार पडायच्या आत मला पटकन काही फोटो तरी काढू दे. घरी परतणाऱ्या या प्रवाशांशी मला बोलायचं सुद्धा होतं. अखेर तो राजी झाला. त्याच्या अंदाजानुसार नाजूक साजूक अशा महानगरात राहणारा हा प्राणी इतका चक्रम कसा काय हा भाव मात्र त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

असो. त्याने मला मागे घुसायला मदत केली. आतल्या अनेक हातांनी मला प्रेमाने आत ओढून घेतलं. बाजारातून परतणारे ते सगळे थकलेले असले तरी फार मायेने त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं.  अगदी कोंबड्या आणि बकऱ्यांनी सुद्धा. भन्नाट गप्पा झाल्या. फोटो मात्र एक दोनच निघू शकले. नंतर सगळीकडे मिट्ट अंधार पसरला.

या लेखाची छोटी आवृत्ती २२ सप्टेंबर १९९५ रोजी द हिंदू बिझनेसलाइलमध्ये प्रकाशित झाली आहे.

P. Sainath

ପି. ସାଇନାଥ, ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍ ଅଫ୍ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସମ୍ପାଦକ । ସେ ବହୁ ଦଶନ୍ଧି ଧରି ଗ୍ରାମୀଣ ରିପୋର୍ଟର ଭାବେ କାର୍ଯ୍ୟ କରିଛନ୍ତି ଏବଂ ସେ ‘ଏଭ୍ରିବଡି ଲଭସ୍ ଏ ଗୁଡ୍ ଡ୍ରଟ୍’ ଏବଂ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ହିରୋଜ୍: ଫୁଟ୍ ସୋଲଜର୍ସ ଅଫ୍ ଇଣ୍ଡିଆନ୍ ଫ୍ରିଡମ୍’ ପୁସ୍ତକର ଲେଖକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପି.ସାଇନାଥ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ