तमिळ नाडूतल्या या छोट्याशा गावाचा संपूर्ण देशाशी जसा संबंध आहे तसा इतर कुठल्या गावाचा असण्याची शक्यता फार कमी आहे. इथली बोअर पाडायची यंत्रं देशभरात भूगर्भात खोलवर पोचली आहेत. (त्यांची मजल थेट आफ्रिकेपर्यंत गेली आहे) तिरुचेनगोडे ही बोअरवेलची राजधानी मानायला पाहिजे. इथली बोअर पाडायची यंत्रं आणि ती चालवणारे, जवळ जवळ वर्षभर कुठे ना कुठे जमिनीत बोअर पाडत असतात, दिवसाला १४०० फूट. सध्या पावसामुळे थोडा काळ त्यांचं काम थांबलं असलं तरी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात त्यांचा सगळ्यात जास्त धंदा होतोय. पण देशाच्या इतर भागात आताही पाण्याच्या शोधात त्यांचं जमिनीला भोकं पाडणं चालूच आहे.

महाराष्ट्रातल्या पाणी संकटामुळे – जे फक्त उन्हाळ्यात दिसायला लागतं – या वर्षीच्या (२०१३) पहिल्या तीन महिन्यातच एकट्या मराठवाड्यात हजारो बोअर पाडल्या गेल्या आहेत. बोअरचं यंत्र लादलेले ट्रक रानारानानी नजरेस पडत होते. आणि या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये बोअरवेल हा पाण्याचा नाही तरी कर्जाचा मात्र मुख्य स्रोत ठरलेला दिसला. रस्त्यांवर वेगाने धावणारी बहुतेक बोअर यंत्रं तमिळ नाडूची होती. (काही आंध्रातून आलेली होती). “ही बहुतेक सगळी यंत्रं एकाच गावातली आहेत,” महाराष्ट्र शासनातील एका वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांनी तेव्हा द हिंदू वर्तमानपत्राला माहिती देताना सांगितलं होतं. ते गावं होतं तिरुचेनगोडे, जि. नामक्कल, तमिळ नाडू.

“या वर्षी मी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या एका गावात चार महिने मुक्काम केला,” श्री बालमुरुगन बोअरवेल्सच्या सी. वैय्यापुरींनी मला तिरुचेनगोडे इथे सांगितलं. ते एकदम कष्टाळू आणि खटपटे बोअरयंत्रचालक आहे. या एका चालकाने, चार महिन्यात महाराष्ट्रात, तेही पाण्याची टंचाई असणाऱ्या मराठवाड्यात, ५०० बोअर पाडल्या. “तुम्ही एका दिवसात १३०० फूट ड्रिल करू शकता,” ते सांगतात, “जर माती सैल – लूज फॉर्मेशन- असेल तर. मग काम सोपं होतं. म्हणजे बोअर ३०० फुटाहून कमी असल्या तर दिवसात चारदेखील होतात. पण जर - हार्ड फॉर्मेशन – कातळ असेल तर एका दिवसात १००० फुटाहून जास्त काम करता येत नाही.”

PHOTO • P. Sainath

देशभरातल्या दुष्काळाने होरपळलेल्या राज्यांमध्ये, काही हजार बोअर यंत्रं काम करतायत, सिंचनासाठी पाण्याच्या शोधात अगदी १००० फुटाहून खोल जातायत

बोअरचं यंत्र लादलेल्या ट्रकसोबत इतर यंत्रसामुग्री आणि कामगारांना नेणारं आणखी एक मोठं वाहन असतं. सगळे मिळून २० एक जण असतात. व्यवस्थापक, दोन खणणारे, दोन सहाय्यक, दोन वाहनचालक, एक स्वयंपाकी आणि १२ मजूर. अशा कामाची एक देशव्यापी कामाची पद्धत इथे तिरुचेनगोडेपर्यंत पोचलेली दिसते. तमिळ नाडूच्या बोअरचालकांचे अगदी प्रत्येक राज्यात एजंट आणि दलाल आहेत. कामगार बहुतकरून बिहार, ओरिसा, झारखंड आणि छत्तीसगडचे आहेत. अगदी थोडे तमिळ नाडूचे आहेत. दिवसाला २०० रुपये आणि तीन वेळ जेवण हा ठरलेला पगार. काम कित्येक महिने चालू शकतं.

काम कष्टाचं आहे, आणि काम किती कठिण त्यावर त्याचा दर ठरतो. आंध्रातल्या काही कठिण भूभागामध्ये तुम्ही तासाला ८० फुटाहून जास्त खणू शकत नाही. तिथे फुटामागे ७५ रुपये मिळतात. त्यामुळे दिवसाला १००० फूट बोअर चालली तर ७५,००० रुपयांची कमाई होते. पण सैल मातीत, जिथे वैय्यापुरींच्या मते तासाला १२० फुटाचं काम होऊ शकतं तिथे फुटामागे ५६ रुपये दर आहे. पण तुम्ही १३०० फुटाचं किंवा ७३,००० पर्यंतचं काम करू शकता. धरून चाला, तुम्ही २०० दिवस काम केलं, बहुतेक वेळा त्याहून जास्तच काम असतं, तरीही तब्बल १.५ कोटीचा धंदा झाला.

तिरुचेनगोडे गावात आणि तालुक्यात एकूण किती बोअरयंत्रं आहेत? पाच हजारांपेक्षा जास्त नाहीयेत, पीआरडी या बोअर पाडणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, टी टी परंथमन सांगतात. स्वतः बोअरयंत्रमालक असणारे आणि तिरुचेनगोडे ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष एन पी वेलूंच्या मते, जवळ जवळ ७,०००. इतर बोअर चालकांच्या मते, हा आकडा नक्कीच २०,००० च्या आसपास आहे. हे तिन्ही अंदाज आपापल्या ठिकाणी बरोबर असू शकतात. या क्षेत्रातले एक ज्येष्ठ उद्योजक सांगतात, “इथे बरेच बोअरयंत्रमालक आणि बोअर यंत्रं आहेत. पण बऱ्याच यंत्रांची नोंदणी इतर राज्यात केलेली आहे, करांमुळे असेल कदाचित.”

दरम्यान, बोअर चालक पार राजस्थानच्या गावांमधून परतायला लागले आहेत. एकाने तर थेट जम्मूत बोअर पाडल्या आहेत. वर्षातले दोन किंवा तीन महिने गाड्यांच्या सर्विसिंगसाठी काम थांबतं. साधारणपणे पावसाळ्यामध्येच ही कामं काढली जातात.

वेगवेगळ्या राज्यात बोअरची खोली वेगवेगळी आहे, वेलू सांगतात. “कर्नाटकात आता सरासरी १४०० फूट आहे, तमिळ नाडूतही फार कमी नाही. १९७० च्या दुष्काळानंतर या कामांची सुरुवात झाली.” या क्षेत्रात संधी आहे हे लक्षात येताच, काही शेतकरी आणि विहीर खोदण्याचं काम करणाऱ्या कामगारांच्या गटांनी निधी उभारला आणि काही बोअर यंत्रं घेतली. (आजही एकूण यंत्रांच्या एक तृतीयांश यंत्रं अशा गटांच्या मालकीची आहेत).

“त्या काळी अगदी १००-२०० फुटावर पाणी लागायचं,” वेलू सांगतात. “जास्तीत जास्त ३००. गेल्या पाच वर्षात बोअर एवढ्या खोलवर पोचू लागल्या आहेत.”

या गावातल्या बोअर चालवणाऱ्यांची कहाणी एका गंभीर द्वंद्वावर उभी आहे. तिरुचेनगोडे आणि आसपासच्या भागात त्यांच्यामुळे पैसा आला, समृद्धी आली. त्यांच्यातलेच काही हे आधी निरक्षर मजूर होते, जे १९७० च्या सुमारास संघटित झाले आणि त्यांनी स्वतःची बोअर यंत्रं घेतली. यातून ते गरिबीतून बाहेरही आले. (कोइम्बतूर, करूर आणि तिरुरसकट तमिळ नाडूच्या या भागाला तळागाळातील लोकांनी स्वतःच्या मालकीचे उद्योग धंदे सुरू करण्याचा फार प्रभावी इतिहास लाभला आहे.) आणि हे बोअर यंत्रचालक शेतकऱ्यांच्या खऱ्या निकडीला धावून जातात. जी निकड हताशेतून तयार झाली आहे.

मात्र या सगळ्या प्रक्रियेचा भूगर्भातील पाणीसाठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या पाणीसाठ्याचा प्रचंड उपसा झाल्यामुळे देशभरात भूजलाची पातळी खालावलेली दिसत आहे. महाराष्ट्रातल्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या वर्षी (२०१३) मार्चमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जिल्ह्यात (जिथे मोठ्या प्रमाणावर बोअर चालू होत्या) पाण्याची पातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा पाच मीटरने खालावली आहे. जर एकट्या तमिळ नाडूच्या एका भागातली १०,००० बोअर यंत्रं देशभरात दिवसाला १००० फुटाचं काम करतात असं धरलं तरी सगळे मिळून १ कोटी फूट होतात. वर्षभरातले फक्त २०० दिवस काम झालं असं मानलं तरी २ अब्ज फूट. हे प्रचंड आहे. बहुतांश बोअर फेल गेल्या असं जरी मानून चाललो तरी फार मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा होतो आहे.

देशाच्या विकासाचा हा मार्ग तिरुचेनगोडेच्या बोअर यंत्र चालकांनी आखलेला नाही, त्यामुळे त्यासाठी त्यांना दोषी धरता येणार नाही. कसलंही नियंत्रण नसणारा भूजलाचा उपसा करण्याची लाट त्यांनी आणलेली नाही. त्यांचा यात फार मोठा सहभाग असला तरी देशभरात इतरही यंत्रचालक आहेतच की. आणि या यंत्रांचे इतरही उपयोग असतात. सगळ्यात जास्त मागणी मात्र बोअरवेलची आहे. आणि त्याची अनियंत्रित वाढ म्हणजे संकटाची नांदी आहे. (भारतामध्ये सिंचनासाठीचं दोन तृतीयांश तर पिण्याचं चार पंचमांश पाणी बोअरवेलद्वारे येतं.) या संपूर्ण प्रक्रियेबाबत सामाजिक संयम फार गरजेचा आहे. मात्र सध्याच्या ‘जल-शासनात’ ते होईलसं वाटत नाही.

तुमच्या इथे जवळपास फारशी काही बोअर यंत्रं काम करताना दिसत नाहीयेत, असं का? मी तिरुचेनगोडेच्या एका ज्येष्ठाला विचारलं. “आता इथे फारसं पाणीच उरलेलं नाहीये,” ते उत्तरले. “शेजारच्या इरोडे गावात आम्ही १४०० फुटापर्यंत खाली पोचलो आहोत.”

पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, २८ जुलै, २०१३.

नक्की वाचा – असा सुकत चाललाय निम्मा महाराष्ट्र...

२०१४ मध्ये पी साईनाथ यांना एका लेखमालेसाठी वर्ल्ड मीडिया समिट ग्लोबल अवॉर्ड फॉर एक्सलन्स हे पारितोषिक मिळालं. हा लेख त्या लेखमालेतील आहे.

अनुवादः मेधा काळे

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे