बाउल हा शब्द संस्कृतातल्या वातुल या शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ वेडा, असंतुलित किंवा भान हरपलेला असा होतो. बाउल म्हणजेच, बंगालच्या मातीत तयार झालेलं संगीत.

बाउल समुदाय हा बहुतकरून भटका समाज आहे. बाउल लोकांची शिकवण इस्लाम, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या समन्वयावर आधारित आहे, हे लोक वेगवेगळ्या समुदायांबरोबर मिळून राहत आले आहेत. समाजाचे पारंपरिक नियम नाकारत सगळ्यांना एकत्र आणणारं तत्त्व म्हणून ते संगीताचा विचार करतात. त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनाचं स्पष्ट तत्त्वज्ञान सापडतं. बाउल या समाजात जन्माला येत नाहीत, तर ते जगण्याचा हा मार्ग निवडतात आणि या समाजामध्ये एक गुरू त्यांना दीक्षा देतो.

बाउल – स्त्रिया आणि पुरुष – लगेच ओळखू येतात. न कापलेले कुरळे केस, भगवी वस्त्रं, रुद्राक्षांच्या माळा आणि हातात एकतारा. पिढ्या न् पिढ्या केवळ ऐकून शिकलेली गाणी आणि त्यासाठी लोकांनी दिलेलं दान हेच त्यांचं जगण्याचं साधन. त्यांच्या लोकप्रियतेप्रमाणे त्यांच्या कमाईत फरक पडतो, साधारणपणे ते एका कलाविष्कारासाठी २०० ते १००० रु. कमाई करतात.  

PHOTO • Sinchita Maji

जीवनाचं तत्त्व सांगणारी आपली गाणी गाताना बाउल गायक अनेक वाद्यं वापरतात, त्यातील दोतारा आणि खमक ही दोन.

बाउल गाण्यांमध्ये अनेक वाद्यांचा वापर होतो. बासरी, ढोलकी, खमक, कोरताल, दोतारा, तबला, घुंगरू, डुपकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतारा. बाउल गाण्यांमध्ये प्रामुख्याने दोन विषय येतातः देह साधना (शरीराचं गाणं) आणि मन साधना (मनाचं गाणं).

जिल्ह्यात बाउल संगीताचे दोन महोत्सव आयोजित केले जातात – जयदेव-केंडुली गावातला जानेवारीच्या मध्यावर भरणारा केंडुली मेळा आणि डिसेंबरच्या शेवटी बोलपूरच्या शांतीनिकेतन परिसरात भरणारा पौष मेळा. या महोत्सवांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाउल गायक हजेरी लावतात. याशिवाय इतरही अनेक छोट्या-मोठ्या उत्सवांमध्ये बाउल गायक आपली कला सादर करतात. 

PHOTO • Sinchita Maji

आपण बाउल जीवनपद्धतीत कसे आलो हे बोलपूरच्या आपल्या घरी बासुदेब बाउल सांगतायत

पंचेचाळीस वर्षांचे बासुदेब दास बाउल पश्चिम बंगालच्या बोलपूर गावचे. ते गायक आहेत आणि अनेकांसाठी संगीताचे शिक्षक. कुणाहीसाठी त्यांच्या घराची दारं कायम उघडी असतात, इतकंच नाही त्यांच्या घरी गेलेला माणूस त्यांच्या कुटुंबाचा भागच बनून जातो. बाउल जीवनपद्धती काय आहे ते विद्यार्थी त्यांच्या घरी राहूनच शिकतात.

या चित्रफीतीत त्यांनी दोन गाणी गायली आहेत. पहिलं गाणं त्या सर्वोच्च शक्तीच्या शोधाबद्दलचं आहे. त्यात असं म्हटलंय, देव माझ्या आसपास आहे पण मला तो दिसत नाहीये. आयुष्यभर मी देवाचा शोध घेतला आहे, पण आता त्याची भेट व्हावी यासाठी हे सर्वशक्तिमाना, तूच मला दिशा दाखव.

दुसरं गाणं गुरूबद्दल आहे. या गाण्यात गुरू/शिक्षकाला वंदन केलं आहे. त्यात म्हटलंय, तुम्हाला जो शिकवतो, त्याची आराधना करा. कोणतीच वस्तू कायम तुमच्यासोबत राहणार नाहीये. मात्र गुरूने दिलेलं ज्ञान कायम तुमच्या जवळ राहणार आहे. त्यामुळे गुरूबद्दल कृतज्ञतेची भावना बाळगा आणि ती व्यक्त करा. हे घर, जमीन सगळं मागेच राहणार आहे, तुम्ही काही ते घेऊन वर जाणार नाही... खरं तर या प्रचंड विश्वात तुमचं स्थान ते काय, तुम्ही नगण्य आहात, तुम्ही कोण आहात हे तुम्हीही जाणत नाही, त्यामुळे गुरुने दाखवलेल्या वाटेवर चालत रहा. 

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Sinchita Maji

Sinchita Maji is a Video Coordinator at the People's Archive of Rural India, and a freelance photographer and documentary film maker. This story was done as a part of her 2015-16 PARI fellowship.

Other stories by Sinchita Maji