अनिल नारकंडेंनी नेहमीप्रमाणे लग्नाचा मांडव वगैरे टाकला. पुढ्यात काय वाढून ठेवलंय ते काही त्यांना माहित नव्हतं.

भंडाऱ्याच्या अलेसुर गावातल्या ३६ वर्षीय अनिलभाऊने शेजारच्या गावात एका लग्नासाठी मोठा पिवळा शामियाना उभारला होता. शेती करणारा अनिल भाऊ सणासमारंभांना सजावट आणि डीजे, साउंड वगैरे पुरवतो. लग्नस्थळी अनेक प्लास्टिकच्या खुर्च्या लावल्या. वधुवरांसाठी खास गडद लाल रंगाचे सोफे. डीजेसाठी सगळी तयारी आणि रोषणाई तयार ठेवली.

नवऱ्या मुलाच्या साध्याशा विटामातीच्या घराला रंगरंगोटी झाली. नवरी मुलगी सातपुड्यापलिकडच्या मध्य प्रदेशातल्या सिवनीहून येणार होती.

“सगळाच इस्कोट झाला,” अनिलभाऊ सांगतो. या वर्षीच्या लगीनसराईला अशी धडाक्यात सुरुवात झाली म्हणून तो भलताच खूश होता. लग्न लागण्याआधी २७ वर्षांचा नवरा मुलगाच पळून गेला.

“त्याने घरच्यांना फोन केला आणि म्हणाला, हे लग्न आताच्या आता थांबवा नाही तर मी औषध पिऊन घेईन,” अनिल भाऊ सांगतो. “त्याचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे म्हणे.”

लग्न मोडलं पण तोपर्यंत नवरी मुलगी आणि तिथलं बिऱ्हाड इथे येऊन पोचलं होतं. आनंदाचा सोहळा होणार होता तिथे आता मुलाकडच्यांसाठी फारच लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती.

नवऱ्या मुलाच्या वडलांवर आभाळच कोसळलं होतं. त्यांनी अनिलला सांगितलं की त्याचे पैसे देणं काही त्यांच्याच्याने होणार नाही.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या अलेसुरमध्ये लग्नासाठी घातलेला मांडव. लग्न लागण्याच्या आदल्या दिवशी नवरा मुलगाच पळून गेला आणि लग्नच मोडलं. मुलाच्या वडलांना मांडवासाठी आलेला खर्चसुद्धा देता आला नाही. उजवीकडेः शेती आतबट्ट्याची झालीये तेव्हापासून अनिल सारख्या अनेकांनी पोटापाण्यासाठी छोटेमोठे व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत समारंभांसाठी सजावट करण्याच्या या व्यवसायात अनिल यांनी १२ लाखांची गुंतवणूक केली आहे

“त्यांना पैसे तरी कसे मागावे? माझं काही मन झालं नाही,” भंडाऱ्याच्या अलेसुरमध्ये आपल्या घरी अनिल भाऊ मला सांगतो. गावात बहुतेकांचा प्रपंच शेती आणि शेतमजुरीतून चालतो. “धीवर लोक आहेत, जमीन नाही काही नाही. मुलाच्या वडलांना नातेवाइकांकडून पैसे उधार घ्यावे लागले होते,” तो सांगतो.

लग्नाचा असा गोंधळ झाला आणि अनिलला मात्र १५,००० चा फटका बसला. बोलत बोलत तो आम्हाला त्याच्या गोडाउनमधलं सजावटीचं सगळं सामान दाखवतो. बांबू, स्टेजसाठीच्या फळ्या, डीजेला लागणारे स्पीकर वगैरे, कनात आणि मांडवासाठीचं कापड असं बरंच काही. वधुवरांसाठी खास सोफासेटही आहे त्याच्याकडे. हे सगळं सामान ठेवायला त्याने आपल्या साध्याशा घराशेजारी मोठा हॉल बांधून घेतलाय.

अलेसुर हे गाव सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी तुमसर तालुक्यातल्या जंगलपट्ट्यात येतं. इथली शेती एकपिकी आहे. आपापल्या जमिनीच्या छोट्या तुकड्यांमध्ये लोक धान घेतात. माल आला की कामासाठी स्थलांतर करतात. इथे मोठे उद्योग नाहीत, रोजगार निर्माण होतील असं सेवाक्षेत्र नाही. आदिवासी आणि मागास वर्गीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये वनोपजावर अवलंबून असते. मनरेगाचा विचार केला तर तुमसरची कामगिरी फारशी बरी नाही.

त्यामुळे अनिलसारख्या अनेकांना पोटापाण्यासाठी अशी कसरत करावी लागते. शेतीतल्या उत्पन्नात वाढ सोडा घटच होऊ लागली आहे.

खेडोपाड्यांमध्येसुद्धा आता डीजे आणि सजावटीचं लोण पसरलंय. पण घरची हालाखी असताना असा कुठलाही धंदा करणं काही सोपं काम नाही असं अनिल सांगतात. “गावातल्या लोकांची परिस्थिती फार नाजूक आहे.”

अनिल भाऊचं मत आजवर भाजपलाच पडलंय. त्यांच्या गवळी समाजाचं आणि स्थानिक भाजप नेत्यांचं सख्य आहे पण भंडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान झालं आणि राजकीय समीकरणं बदलत असल्याचं त्यांच्या निदर्शनास येऊ लागलं आहे. “लोकांना काम नाही, त्रस्त आहेत,” तो सांगतो. इथले विद्यमान भाजप खासदार सुनील मेंढे पाच वर्षांत एकदाही इथे फिरकलेले नाहीत त्यामुळे या वेळी बदलाचं वारं वाहत असल्याचं इथल्या अनेकांनी पारीला सांगितलं.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

आपल्या घराशेजारच्या गोदामात अनिल सजावटीसाठी लागणारं सगळं सामान ठेवतो – वधुवरांसाठी सोफा, डीजेची सिस्टिम, स्पीकर, शामियान्याचं कापड, लोखंडी चौकटी, इत्यादी

अनिल भाऊ सांगतो की गावातल्या बाया मोठ्या शेतांमध्ये मजुरीला जातात. तुम्ही सकाळी गावात आलात तर मोटरसायकलवरून त्या मजुरीसाठी निघालेल्या दिसतात आणि संध्याकाळी उशीरा त्या घरी परततात. “तरुण मुलं दुसऱ्या राज्यांमध्ये कारखान्यांमध्ये, रस्त्याच्या किंवा कालव्यांच्या बांधकामावर मजुरीला जातात. सगळी अंगमेहनतीची कामं,” तो सांगतो.

तब्येतीने साथ दिली असती तर कदाचित तो देखील कामासाठी गाव सोडून परगावी गेला असता. त्याला दोन मुलं आहेत आणि त्यातल्या एकाला डाउन्स सिन्ड्रोम आहे. “मी दहावीत नापास झालो आणि त्यानंतर नागपूरला जाऊन वेटरचं काम केलं.” पण तिथून परत येऊन त्याने एक टेम्पो विकत घेतला आणि त्यातून महिला मजुरांची ने-आण करायला सुरुवात केली. काही काळाने त्यातून फार काही कमाई होत नाही असं दिसल्यावर त्याने गाडी विकली आणि पाच वर्षांपूर्वी हा सजावटीचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. पण यातही सगळं काम उधारीवर असल्याचं तो सांगतो. “लोक माझ्याकडून काम करून घेतात आणि पैसे नंतर द्यायचा वायदा असतो,” अनिलभाऊ सांगतो.

“कुणाकडे मयत झाली असेल आणि मांडव टाकायचा असेल तर मी त्याचे पैसे घेत नाही,” तो पुढे सांगतो. “लग्नासाठी सुद्धा मी १५-२०,००० रुपये घेतो. कारण लोकांना तेवढंच परवडतं.”

अनिलभाऊने त्याच्या धंद्यामध्ये किमान १२ लाखांची गुंतवणूक केली असेल. त्यांची सात एकर जमीन तारण ठेवून बँकेचं कर्ज काढलं आहे. त्याचे हप्ते सुरू आहेत.

“शेती आणि दुधाच्या धंद्यातून फार काही हातात पडत नाही,” तो म्हणतो. “बिछायत करून नशीब आजमावून पाहतोय. पण या धंद्यातही नवीन लोकं येतायत.”

*****

या भागात एक दुर्घटना घडलीये आणि त्यामुळे देखील लोकांमध्ये राग आहे. दूरदेशी कामासाठी गेलेल्या तरुण पोरांचा कामावर जीव जातो. आणि तपासात अखेर हाती काहीच लागत नाही.

एप्रिलच्या सुरुवातीला आम्ही दोन कुटुंबांना भेटलो. विजेश कोवाळे हा गोवारी आदिवासी असलेला २७ वर्षांचा अविवाहित तरुण आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात सोन्नेगोवनीपल्ले इथे एका मोठ्या धरणावर भूमीगत कालव्याच्या बांधकामावर मजुरीसाठी गेला होता. ३० मे २०२३ रोजी तिथे काम करत असतानाच मृत्यू झाला.

PHOTO • Jaideep Hardikar

भंडाऱ्याच्या अलेसुरमध्ये रमेश कोवाळे आणि त्यांची पत्नी जनाबाई. त्यांचा मुलगा विजेश दर वर्षी आंध्र प्रदेशाच्या चित्तूरमध्ये कामासाठी जायचा. मागील वर्षी मे महिन्यात कामावर असताना विजेश मरण पावला त्याचं पहिलं वर्षश्राद्ध मे महिन्यात असेल. त्यांचा थोरला मुलगा राजेश ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्याच्या लग्नाची घरात लगबग सुरू आहे. विजेशच्या मृत्यूनंतर इतर मुलांना कामासाठी परगावी पाठवायची आता या कुटुंबाची तयारी नाही

“त्याचं कलेवर इथे आणलं आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दीड लाख रुपये खर्च आला आम्हाला,” विजेशचे वडील रमेश कोवाळे सांगतात. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचं कारण “विजेचा धक्का” असं नोंदवण्यात आलं आहे.

प्राथमिक तक्रार अहवाल म्हणेच एफआयआरनुसार विजेशने दारूच्या नशेत विजेच्या तारेला स्पर्श केला. त्यानंतर त्याला एरिया रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथेच तो मरण पावला.

“त्याला कामावर घेणाऱ्या कंपनीकडून आम्हाला शब्द मिळाला होता पण कसलीही भरपाई मिळालेली नाही,” कोवाळे सांगतात. “गेल्या वर्षी आमच्या नातेवाइकांकडून हातउसने घेतलेले पैसे मी अजून फेडतोय.” विजेशच्या थोरल्या भावाचं, राजेशचं लग्न तोंडावर आलं आहे. तो ट्रक चालक आहे. धाकटा भाऊ सतीश गावातल्या शेतांमध्ये कामाला जातो.

“अँब्युलन्समधून त्याचा देह इथे आणायला आम्हाला किती तरी दिवस लागले,” कोवाळे सांगतात.

गेल्या वर्षभरात असेच दूरदेशी कामाला गेलेले गावातले चार-पाच जण तिथेच मरण पावल्याच्या घटना घडल्याचं अनिल भाऊ सांगतो.

चिखलीमध्ये सुखदेव उइके यांचा एकुलता एक मुलगा अतुल मरण पावला तेव्हापासून त्यांच्या जिवाला चैन नाहीये.

“त्याच्या सोबतच्यांनी त्याचा खून केला का अपघात झाला, आम्हाला काही माहीत नाही,” उइके सांगतात. त्यांची थोडीफार शेती आहे आणि गावातच ते मजुरी देखील करतात. “आम्हाला तर त्याचा मृतदेह पण पहायला मिळाला नाही. आम्हाला कळवलं सुद्धा नाही आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याचा मृतदेह जाळून टाकला.”

PHOTO • Jaideep Hardikar

मे २०२३ मध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंड्रीमध्ये कामावर असताना अतुल उइके मरण पावला. कसा ते त्याच्या घरच्यांना आजही माहीत नाही. अशा परिस्थितीत लोकसभेचं मतदान वगैरे त्यांच्यासाठी फोल आहे

२०२२ साली डिसेंबर महिन्यात अतुल आंध्र प्रदेशातील राजमुंड्रीमध्ये भाताच्या खाचरात काम करण्यासाठी म्हणून इथल्याच काही लोकांबरोबर गाव सोडून गेला. २२ मे २०२३ रोजी त्याने आपण घरी परतत असल्याचं आपल्या आईवडलांना फोन करून सांगितलं होतं.

“तो त्याचा शेवटचा फोन,” उइके सांगतात. त्यानंतर अतुलचा फोन बंदच होता. त्याची बहीण म्हणते की तो घरी परतलाच नाही. “आम्हाला एका आठवड्याने तो गेलाय असं कळलं. आम्हीच कामाच्या ठिकाणी चौकशी केली तेव्हा.”

त्याच्या घरच्यांना कुठल्या तरी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आल्या आणि त्याने त्यांचा गोंधळ आणखीच वाढला. तिथे एका वाइन बारबाहेर अतुल रस्त्यात कडेला पडल्याचं दिसतंय. “लोकांना वाटलं त्याला दारू चढलीये. पण त्याला कुणी तरी मारलेलं असणार,” त्याचे वडील म्हणतात. शवविच्छेदन अहवालात म्हटलंय की डोक्याच्या मागच्या बाजूला मोठी कापल्याची जखम आहे. “त्याला जाळलं ती जागा पोलिसांनी आम्हाला दाखवली,” हे सांगतानाही उइके अस्वस्थ होतात. एफआयआर आणि शवविच्छेदनाचा अहवाल आम्हाला दाखवतात. “आमच्या पोराचं काय झालं ते कोडंच आहे.” त्याच्याबरोबर गेलेले लोक मूग मिळून गप्प आहेत. या हंगामातल्या कामासाठी त्यातले बरेच परत गाव सोडून बाहेरगावी गेले आहेत.

“स्थलांतरित कामगारांचं असं मरण काही नवीन नाही, पण आम्ही तरी काय करणार?” चिखलीच्या सरपंच सुलोचना मेहर म्हणतात. भंडारा पोलिसांसोबत या घटनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात काही यश आलं नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत मत देण्यापेक्षा आपला मुलगा कसा मेला हे समजून घेणं उइकेंसाठी जास्त महत्त्वाचं आहे. “काय उपयोग आहे त्यांचा?” लोकप्रतिनिधींबद्दल उइकेंची ही तिखट प्रतिक्रिया. आमदार आणि खासदारांचा जमिनीशी काहीही संबंध राहिलेला नाही हेच त्यांना सांगायचं असावं.

तिथे अलेसुरमध्ये अनिलभाऊला ही दोन्ही कुटुंबं माहीत होती कारण दोघांच्याही घरी त्याने दहाव्या-बाराव्यासाठी मांडव टाकला होता. त्याचे पैसे त्याने घेतले नाहीत. “आपली शेती आणि आपलं काम भलं. कमाई कमी का असेना,” तो म्हणतो. “किमान आज जिवंत तरी आहे.”

Jaideep Hardikar

جے دیپ ہرڈیکر ناگپور میں مقیم صحافی اور قلم کار، اور پاری کے کور ٹیم ممبر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز جے دیپ ہرڈیکر
Editor : Sarbajaya Bhattacharya

سربجیہ بھٹاچاریہ، پاری کی سینئر اسسٹنٹ ایڈیٹر ہیں۔ وہ ایک تجربہ کار بنگالی مترجم ہیں۔ وہ کولکاتا میں رہتی ہیں اور شہر کی تاریخ اور سیاحتی ادب میں دلچسپی رکھتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sarbajaya Bhattacharya
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے