असं एकही वर्ष नाही जेव्हा जंगलात जाऊन मोहाची फुलं गोळा केली नाहीत, सुखरानी सिंह सांगतात. “मी अगदी लहान होते तेव्हा आईबरोबर जंगलात जायचे. आता माझी मुलं माझ्या सोबत येतात,” ४५ वर्षीय सुखरानी सांगतात. पहाटे ५ वाजता त्यांनी घर सोडलं होतं. तेव्हाच मोहाच्या झाडावरच्या पोपटी फुलोऱ्यातून फुलं खाली पडायला सुरुवात होते. दुपारपर्यंत त्या तिथेच फुलं गोळा करतात. उन्हाची तलखी वाढत जाते. घरी परतल्यावर त्या फुलं उन्हात वाळत घालतात.
मध्य प्रदेशाच्या उमरिया जिल्ह्यात असलेल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ राहणाऱ्या सुखरानीसारख्या अनेक छोट्या शेतकऱ्यांना मोहाच्या फुलातून खात्रीशीर उत्पन्न मिळतं. वाळलेली किलोभर फुलं विकून उमरियाच्या बाजारपेठेत सुखरानी ४० रुपये कमवू शकतात. मानपूर तालुक्यात असलेल्या परासी या त्यांच्या गावापासून उमरियाचा बाजार ३० किलोमीटरवर आहे. एप्रिलच्या २-३ आठवड्यांच्या हंगामात त्या सहसा २०० किलो फुलं गोळा करतात. “आमच्यासाठी हा वृक्ष फार मोलाचा आहे,” सुखरानी सांगतात. फुलांप्रमाणेच झाडाची फळं आणि सालही पोषक आणि औषधी आहेत.
फुलांचा हंगाम असतो तेव्हा सुखरानी जंगलातून दुपारी १ वाजेपर्यंत परततात आणि त्यानंतर स्वयंपाक पाणी करतात. पती आणि पाच मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्या आपल्या पतीसोबत शेतात जातात आणि गव्हाची कापणी करून माल घरी आणतात. सुखरानी आणि त्यांचे पती गोंड आदिवासी आहेत. आपल्या चार बिघा (सुमारे एक एकर) जमिनीत ते खरिपाला गहू पेरतात आणि घरी खाण्यापुरतं पीक काढतात.
परासीत कुंभारकाम करणारे सुरजन प्रजापती देखील जंगलातून मोहाची फुलं गोळा करून आणतात. “गावात एक व्यापारी येतो त्याला मी फुलं विकतो, किंवा कधी कधी हाटमध्ये,” ६० वर्षीय प्रजापती सांगतात. ते कुम्हार समाजाचे आहेत (उमरियामध्ये इतर मागासवर्गात समाविष्ट). “याचा [मोहाचा] आधार आहे. नुसती मडकी विकून आलेल्या पैशात भागवणं अवघड आहे. मी [दुपारी] परतल्यावर रोजंदारीला जातो.” घरातलं तेल मीठ संपलं की ते काही किलो फुलं विकतात आणि वेळ मारून नेतात.
उमरियाचे रहिवासी म्हणतात की जंगलात झाडं तोडली तर त्यात मोहाच्या झाडाला शेवटपर्यंत कुणी हात लावत नाही. या जिल्ह्याच्या आदिवासींची या झाडावर श्रद्धा आहे कारण त्यांच्या मते हा वृक्ष कुणालाच उपाशी ठेवत नाही. फुलं आणि फळं खाल्ली जातात. वाळलेल्या फुलांचं पीठ करतात आणि दारूही गाळतात.
मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातलं देशी झाड असलेला मोह (Madhuca longifolia) या राज्यांमधलं महत्त्वाचं गौण वनोपज आहे. ट्रायफेडच्या माहितीनुसार मध्य प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातले सुमारे ७५% आदिवासी मोहोची फुलं वेचतात आणि त्यातून वर्षाला ५,००० रुपयांची कमाई करतात.
बांधवगड अभयारण्याच्या आसपासच्या गावात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हंगाम सुरू झाला की मोहाची फुलं वेचण्यासाठी लोकांना जंगलात जाण्याची परवानगी आहे
होळीचा सण झाला की लगेचच मोहाची फुलं पडायला लागतात आणि तेव्हा, एप्रिलच्या सुरुवातीला बांधवगड अभयारण्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना फुलं वेचण्यासाठी जंगलात जाण्याची परवानगी दिली जाते. हे अभयारण्य १,५३७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलं आहे. बहुतेक मोठी मंडळी आपल्या लेकरांना सोबत घेऊन येतात. त्यांना पटापट फुलं दिसतात आणि छोट्या टोपल्यांमध्ये ती ते गोळा करतात.
जंगलामध्ये दर १००-२०० मीटरवर मोहाची झाडं विखुरलेली आहेत. फुलोऱ्याच्या काळात प्रत्येक वृक्षाच्या खालच्या फांदीला एखादं कापड किंवा चिंधी बांधलेली दिसते. “गावातल्या प्रत्येक कुटुंबाला काही झाडं वाटून दिलेली आहेत. किती तरी पिढ्यांपूर्वी ही वाटणी झालीये,” सुरजन सांगतात. कधी कधी एखाद्याला खूप जास्त नड असेल तर काही जण आपल्या वाट्याच्या झाडांचं उत्पन्न त्या व्यक्तीला देऊ करतात.
२००७ साली बांधवगड व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य जाहीर करण्यात आलं. अभयारण्याचा भाग आता कोअर झोन जाहीर झाला असून माणसांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली. अभयारण्याच्या भोवती माणसांची मर्यादित ये-जा होऊ शकेल असा बफर झोन तयार करण्यात आला. सुखरानीच्या कुटुंबाची आणि इतर काही आदिवासींची शेतजमीन अभयारण्याला लागून होती. त्या क्षेत्राचं रुपांतर बफर झोनमध्ये झालं. त्या सांगतात की गेली १० वर्षं ही जमीन पडक ठेवलीये. “जंगलात कोणतंच पीक हाती लागत नाही. तिथल्या जमिनीत आम्ही पिकं घेणं थांबवलं कारण राखण करायला काही आम्ही तिथे राहू शकत नाही. हरभरा आणि तूर तर माकडंच खाऊन टाकायचे.”
जेव्हा बांधवगड फक्त अभयारण्य होतं तेव्हा आदिवासी शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी, जंगली जनावरांना शेतातून हाकलून लावण्यासाठी तात्पुरत्या खोपी बांधायचे. पण आता त्याला परवानगी नाही. आता ते केवळ मोहासारखं इतर गौण वनोपज गोळा करण्यासाठी बफर झोनमध्ये जातात. “आम्ही तांबडं फुटायच्या आधीच जंगलात जातो. एकट्याने वाघाची भेट घ्यायची भीती वाटते त्यामुळे सगळे सोबत चालत जातो,” सुखरानी सांगतात. त्या सांगतात की त्यांना आजवर वाघोबा भेटला नसला तरी तो आसपासच असतो याची त्यांना कल्पना आहे.
सुमारे ५.३० वाजता, सूर्याची किरणं वनभूमीवर पडायच्या आत मोहाची फुलं वेचणारे कामाला लागलेले असतात. झाडाखालचा पाचोळा झाडून काढतात. “फुलं जड असतात त्यामुळे पाचोळ्याबरोबर झाडली जात नाहीत,” सुखरानी यांची १८ वर्षांची मुलगी, रोशनी सिंह सांगते. २०२० साली रोशनीचं शालेय शिक्षण पूर्ण झालं, पण कोविड-१९चं संकट आलं आणि तिने पुढचं सगळं नियोजन जरा बाजूला ठेवलं आहे. परासीच्या १,४०० लोकसंख्येपैकी २३ टक्के आदिवासी आहेत. साक्षरतेचं प्रमाण ५० टक्के आहे (जनगणना, २०११). रोशनी तिच्या कुटुंबातली शिकणारी पहिलीच आणि तिने ठरवलंय की कॉलेजमध्ये जाणारी देखील ती पहिलीच असणार आहे.
पहाटेची बोचरी थंडी फुलं गोळा करणाऱ्यांसाठी त्रासाचीच. “हात सुन्न पडतात. मग [झाडाखालची] मोहाची छोटी फुलं वेचणं कठीण होतं,” सुखरानीसोबत आलेली तिची पुतणी, १७ वर्षांची दुर्गा सिंह सांगते. “आज रविवार आहे, त्यामुळे शाळेला सुट्टी. म्हणून मी माझ्या चुलतीला मदत करायला आलीये,” ती म्हणते. दुर्गा परासीहून दोन किलोमीटरवर असलेल्या धामोखार इथल्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीमध्ये शिकत आहे. इतिहास, अर्थशास्त्र, हिंदी आणि कला असे तिचे विषय आहेत. टाळेबंदीच्या काळात तिची शाळा बंद झाली होती. या जानेवारी महिन्यात ती परत सुरू झालीये.
डोक्यावरच्या भव्य वृक्षाकडे पाहणाऱ्या सुखरानी मान हलवतात आणि म्हणतात, “यंदा बहरच नाहीये, एरवी येतो त्याच्या निम्माही नाही.” त्यांचा अंदाज सुरजन यांना पटतो. “यंदा फुलं पडलीच नाहीत.” २०२० साली पुरेसा पाऊस झाला नाही त्याचा हा परिणाम असल्याचं दोघांचं म्हणणं आहे. पण सुखरानीपेक्षा जास्त पावसाळे आणि मोहाचे हंगाम पाहिलेले सुरजन मात्र एखादं वर्ष असं जायचंच म्हणून फार काही मनावर घेत नाहीत. “कधी बहर जास्त येणार, कधी कमी. दर वेळी सारखाच येईल असं थोडीच आहे.”
परासीहून सहा किलोमीटरवर, व्याघ्र प्रकल्पाच्या पलिकडे मरदारी गावात मणी सिंग यांच्या अंगणात उन्हात मोहाची फुलं सुकत घातलेली आहेत. पिवळट हिरवी चकाकी असलेली ही फुलं सुकून विटकरी रंगाची होऊ लागलीयेत. मणी आणि त्यांच्या पत्नी, सुनीता बाई पहाटे जंगलात जाऊन पाच झाडांखालची फुलं वेचून आलेत. हे दोघंही पन्नाशीचे आहेत. त्यांची मुलं मोठी झालीयेत आणि दुसरी काही कामं करतात. त्यामुळे हे दोघंच फुलं वेचायला जातात. “यंदा वेचायला फार फुलंच नाहीत. शोधावी लागतायत. गेल्या साली मला १०० किलो तरी मिळाली असतील. पण यंदा त्याच्या निम्मी तरी मिळतील का ते माहित नाही,” ते म्हणतात.
मणी मोहाच्या फुलांचं पीठ करतात आणि वैरणीत मिसळून एकरभर जमिनीची नांगरट करणाऱ्या आपल्या बैलजोडीला खाऊ घालतात. “त्यांना ताकद येते,” ते सांगतात.
मरदारी हा १३३ उंबऱ्याचा छोटासा पाडा आहे आणि जवळ जवळ प्रत्येक घरासमोरच्या अंगणात मोहफुलं सुकत घातलेली आणि वाळलेली फुलं पोत्यात भरलेली दिसतात. दुपार टळून गेलीये. चंदाबाई बैगा अनेक चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन जंगलातून परत आल्या आहेत. त्यांची काही आणि नातलगांची काही अशी सगळी मुलं हातात एकेक टोपली भरून फुलं घेऊन आलेत. जेवणाआधी हातपाय धुऊन घ्यायला त्यांना पिटाळतात आणि चंदाबाई माझ्याशी बोलू लागतात.
चंदाबाई आणि त्यांचे पती विश्वनाथ दोघं बैगा आदिवासी आहेत. दोघंही चाळिशीतले आहेत. आपल्या अडीच एकर रानात ते भात आणि तूर काढतात. शिवाय, मिळेल तेव्हा मनरेगाच्या कामावरही जातात.
“यंदा फारशी मोहफुलं मिळणार नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे बहर कमी आहे,” सकाळच्या कामाने थकून गेलेल्या चंदाबाई म्हणतात. फुलं कमी कमी होत असल्याने चिंतातुर झालेल्या चंदाबाई हरणांच्या वाढत्या संख्येलाही दोष देतात. “ते सगळी फुलं खाऊन टाकतात. रात्री पडलेली तर सगळीच. त्यामुळे आम्हाला त्यांच्याआधी तिथे पोचावं लागतं. फक्त माझ्या झाडांचं नाही. सगळ्यांची तीच रड आहे.”
एका महिन्यानंतर, मे महिन्यात मरदारीहून चंदाबाई माझ्याशी फोनवर बोलत होत्या. आणि त्यांची भीती खरी ठरली होती. “यंदा फुलं वेचण्याचा हंगाम १५ दिवसांतच संपला. आम्हाला फक्त दोन क्विंटल फुलं मिळाली. गेल्या वर्षी तीन क्विंटल वेचली होती,” त्या सांगतात. पण भाव वाढल्याने त्यांना जरा दिलासा मिळालाय. पुरवठा कमी असल्याने यंदा ५० रुपये किलो भाव मिळतोय. गेल्या वर्षी तो ३५-४० रुपये इतका होता.
परासीतही बहर कमीच होता. सुखरानी आणि सुरजन यांचा अंदाज खरा ठरला होता. सुरजन यांचं त्यामागचं तत्त्वज्ञान मात्र असं आहे – “कधी कधी तुम्हाला पोटाला पुरेसं मिळतं, कधी चार घास कमी, हो की नाही? तसंच आहे हे.”
वार्तांकनासाठी मोलाची मदत केल्याबद्दल दिलीप अशोका यांचे मनापासून आभार.