एप्रिलच्या सुरुवातीला आम्ही माजलगावमध्ये वाल्हाबाई टाकणखारांना भेटलो. २१ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये ओव्या गोळा करणारी टीम त्यांना भेटली होती तेव्हा त्यांनी गायलेल्या ओव्या वाल्हाबाईंना आठवत नव्हत्या. ‘जात्यावर बसलं तर कदाचित काही ओव्या आठवतील’, वाल्हाबाई म्हणाल्या.
त्यांच्या सुनेने लागलीच त्यांच्यापुढे जातं रचलं. जात्याचे दोन दगड आणि मध्ये लाकडाचा घट्ट खुंटा. सोबत सुपलीत गहू. वाल्हाबाई जात्यात गहू भरडू लागल्या आणि जसजसा खुंटा गोल फिरू लागला, काही ओव्यांचे शब्द त्यांच्या ओठी परत येऊ लागले.
पुढे त्यांनी गायलेल्या काही व राधाबाई बोऱ्हाडेंसोबत एकत्र गायलेल्या काही ओव्या दिल्या आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांवर या ओव्या बांधल्या आहेत. १९९६ साली जेव्हा या ओव्या रेकॉर्ड केल्या, तेव्हा वाल्हाबाई आणि राधाबाई दोघी भीमनगरमध्ये राहत होत्या. (राधाबाई आता त्याच तालुक्यातल्या सावरगावला राहतात.)
माजलगावमधली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांना वंदन करण्यासाठी १४ एप्रिलच्या त्यांच्या जयंतीचं निमित्त साधून या संपूर्ण महिन्यात पारी त्यांच्यावरच्या आणि जात व्यवस्थेवरच्या ओव्या प्रकाशित करत आहे.
पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्हाबाई आणि राधाबाई सहा ओव्या गातात. पहिल्या ओवीत म्हटलंय की औरंगाबादच्या स्टेशनात बाबासाहेब पाणी पितायत. आणि तेही चांदीच्या घासणीने घासलेल्या सोन्याच्या पेल्यात. इतकी श्रीमंती आणि मान बाबासाहेबांनी शिक्षणामुळे मिळवलाय.
दुसऱ्या ओवीत काचेच्या ग्लासमध्ये जाई, शेवंतीची फुलं ठेवलीयेत, जी सौंदर्याचं प्रतीक आहेत. औरंगाबादला कॉलेजमध्ये बाबासाहेंबांना दृष्ट लागल्याचं सांगितलं आहे.
तिसऱ्या ओवीत आंबेडकरांच्या खिशाला असलेल्या सोनेरी पेनचा उल्लेख येतो. उच्च शिक्षित आणि विचारवंत, बुद्धीमान नेत्याचं प्रतीक म्हणून खिशाच्या पेनचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्यासोबतच साऱ्या देशाला जय भीम ही नवी घोषणा मिळाल्याचं या ओवीत म्हटलं आहे.
चौथ्या ओवीत भीमराज आले आणि गावोगावी प्रत्येक मूल शाळेत घाला असा नारा गेल्याचं म्हटलं आहे. छत्रीचा आणि छत्रीच्या फुलाचा यमक म्हणून वापर झाला असावा.
पाचव्या आणि सहाव्या ओवीमध्ये बाबासाहेब घरी आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. जणू माझा भाऊ घरी आला आहे अशी भावना गाणाऱ्या बाईच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी ती शेजारणीला दुधाचा पेला आणि साखरेची वाटी आणायला सांगते. ज्या गातायत त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे, दूध-साखर अशा गोष्टी त्यांच्याकडे सहज उपलब्ध नसणार त्यामुळे शेजारणीला त्या आणायला सांगितल्या जातात असंही यातून प्रतीत होतं.
बाई सोन्याचा गिलास, ह्याला चांदीची घासणी
भीमराज पाणी प्याले, औरंगबादच्या गं ठेसणी
जाई शेवंतीचे फूल, काचंच्या गिलासात
भिमाला गं झाली दिष्ट, औरंगबादी गं कॉलीजात
बाई सोन्याचा गं पेन, भिमराजाच्या खिशला
भीमराजाच्या खिशला, झाला जयभिम गं देशला
आले आले भीमराज, याच्या छतरीला फूल
गावोगावी गेली हूल, साळामंदी गं घाला मूल
अग शेजारीणी बाई दूध कर पेला पेला
माझ्या घरला पाहुणा भीम माझा गं बंधू आला
अग शेजारीणीबाई साखर करा वाटी वाटी
साखर करा वाटी वाटी भीम आले गं भेटीसाठी
दुसऱ्या ध्वनीफितीत राधाबाईंनी पाच ओव्या गायल्या आहेत. पहिल्या ओवीत रमाबाईंचं माहेर दिल्लीच्या पल्याड आहे आणि बाबासाहेबांना निळ्या वस्त्रांचा आहेर चढवल्याचं सांगितलं आहे. (रमाबाई या बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी. निळा रंग दलित अस्मितेचा, आंबेडकरांच्या अनुयायांचं प्रतीक मानला जातो.)
दुसऱ्या ओवीतही दिल्लीमध्ये कसला निळा रंग दिसतो अशा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्या ओळीत स्वतःच उत्तर देताना म्हटलंय, रमाबाई निळी पौठणी नेसून बाबासाहेबांशेजारी उभ्या आहेत.
तिसऱ्या ओवीत म्हटलंय की रमाबाईंमुळे बाबासाहेबांच्या फोटोची शोभा वाढतीये. चौथ्या ओवीत बाबासाहेबांनी सगळ्या दलितांना दिल्लीमध्ये भेट दिल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही ओव्यांमधला काचेच्या बरण्यांचा उल्लेख ओव्यांमध्ये किंवा जुन्या उखाण्यांमध्ये घालण्याची जुनी पद्धत आहे.
पाचव्या ओवीत ओवी गाणाऱ्या स्त्रीला स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नात ती दिल्लीच्या दरबारात बाबासाहेबांना घटना/संविधान लिहिताना पाहतीये. अनेक ओव्या आणि गीतांमध्ये मायेने बाबासाहेबांचा उल्लेख माझा भीम असा केला जातो.
दिल्लीच्या पलीकडं, रमाबाईचं माहेर
बाई निळ्या कपड्याचा, चढं भिमाला गं आहेर
बाई दिल्ली शहरामंदी काय दिसतं निळं
रमा नेसली पैठणी उभी भीमाच्या गं जवळ
बाई दिल्ली शहरामंदी, काचंच्या बरण्या चार
अशी शोभा देती बाई, रमा भीमाच्या फोटुवर
बाई दिल्ली शहरामंदी काचंच्या बरण्या आट
माझ्या भीम गं राजानं दिली दलिताला भेट
मला सपन पडलं, सपनात आलं काई
बाई दिल्ली दरबारात, भीम माझा गं घटना लेही
कलावंत
–वाल्हा टाकणखार, राधा बोऱ्हाडे
गाव – माजलगाव
वस्ती – भीम नगर
तालुका – माजलगाव
जिल्हा – बीड
जात – नवबौद्ध
दिनांक – या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आल्या. २ एप्रिल २०१७ रोजी आम्ही पुन्हा एकदा माजलगावला त्यांना भेटलो तेव्हा व्हिडिओ तयार करण्यात आला.
पोस्टरः श्रेया कात्यायिनी