१९९७ मध्ये ओवी प्रकल्पाचे आम्ही काही जण पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या राजमाची गावात यशोदा उंबरेंना भेटलो. यशोदाताई आणि त्यांचं कुटुंब भूमीहीन शेतकरी. ते शेतमजूर होते, का दुसऱ्याचं रान कसत होते ते स्पष्ट नव्हतं. त्यांचं घर ऐसपैस होतं. त्या सांगतात, “माझ्या सासूनं मला आणि माझ्या नवऱ्याला आमच्या पिढीजाद घरातून हाकलून लावलं. आता राहतो ते हे घर मी आणि माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या कष्टानी बांधलंय.”

राजमाची किल्ला तसा प्रसिद्ध. १९९० च्या आसपास पर्यटकांची वर्दळ वाढली आणि स्थानिकांच्या घरी राहण्याच्या सोयी सुरू झाल्या. इथले गावकरी गवंडीकाम आणि सुतारकामात कुशल. पर्यटकांना राहता यावं या दृष्टीने त्यांनी चांगली मोठी घरं बांधायला सुरुवात केली. यशोदाताई आणि त्यांच्या नवऱ्याने पर्यटकांच्या सोयीसाठी घरात चांगलं न्हाणीघरही बांधून घेतलंय, तेही दार नीट बंद होणारं. त्यांच्या एक मुलाने आमच्या हातात त्यांचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ ठेवलं होतं.

यशोदाताईंचा थोरला मुलगा मतिमंद होता. इतर तिघं शिकत होते. एक जण मुंबईला कॉलेजमध्ये तर धाकटी दोघं गावातल्याच शाळेत.

यशोदाताई (तेव्हाचं वय ४६) त्यांच्या आईकडून ओव्या गायला शिकल्या. त्यांचं माहेर मावळातलं दुधिवरं. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा आधी त्या ओव्या गायला राजी नव्हत्या. नुकतंच त्यांच्या भावाच्या मुलीला सासरच्यांनी विष पाजून मारलं होतं. घरचं कुणी गेल्यावर किमान वर्षभर कुणी जात्यावर गात नाहीत अशी रीत आहे.

Grindmill with two women

प्रत्येक ध्वनीफितीत चार ओव्या आहेत. यशोदाताईंना सुभद्रा उंबरेंनी साथ दिली आहे.

ऑडिओ १ – या ओवीत यशोदाबाई गातात – दळणं पहाटेच उरकायला हवीत म्हणजे लेकरांना न्याहरी मिळेल. आपल्या मुलाच्या ‘राणीला’, सुनेला रागाने बोलल्याचंही त्या गातात.

ओवी

पहाटेच्या पाऱ्यामंदी कोंबडा आरवला
बाळायाची राणी झोपेची जागी झाली
राणी झोपेची जागी झाली, दुरडी दळण झालं पायली

पहाटे पहाटे, कोंबडा आरवलाय. माझ्या मुलाची राणी, माझी सून झोपेतून जागी झालीये. एक पायली दळण दळून झालंय.

टीपः पायली हे धान्याचं जुनं माप आहे. किलोला किंचित कमी. एक शेर – किलोला थोडा कमी असतो. पायली कमीत कमी दोन-अडीच किलोची असते.  एक पायली म्हणजे चार शेर, दहा, बारा किंवा सोळा पायल्यांचा एक मण आणि एक मण म्हणजे सुमारे ३७ किलो.

ओवी

बारा बैलाचा गाडा, माझ्या शेता जायाचा गं
दुरडी दळण, तान्ह्या बाळाची, यांची न्याहरी गं

बारा बैलाचा गाडा माझ्या शेताला जायचाय
दुरडीभर दळण झालं की पतीची आणि लेकरांची न्याहरीची सोय होईल

ओवी

दुरडी दळण हाये माझ्या ना गं दैवाचं
दुरडी दळण हिनी दुरडी गं हेलवली

दुरडीभर दळण करणं हेच माझ्या नशिबात आहे.
दुरडीभर दळण करता करता हिनी दुरडी हलवली

ओवी

दुरडी दळण हिनी दुरडी हेलवली
बाळाच्या राणीला गं, मी रागानी बोलली

दुरडीभर दळण करता करता हिनी दुरडी हलवली
माझ्या मुलाच्या राणीला, माझ्या सुनेला मी रागाने बोलले

ऑडिओ २ – यात यशोदा आणि सुभद्राताई एका आळशी बाईबद्दल गातात. तिला लवकर उठून दळायचं म्हटलं की फार राग येतो. आणखी एका ओवीत त्या म्हणतात, एकत्र दळण करणं मायलेकीला शोभून दिसतं.

ओवी ५

पहाटेच्या दळणाचा, येतो आळशीला राग
बाई माझ्या तू उषाबाई, उठ भाग्याच्या गं, दळू लाग

एखादी आळशी बाई पहाटे उठून दळण करायचं म्हटल्यावर राग राग करते.
पण, माझ्या भाग्याच्या उषाबाई, उठ आणि दळू लाग.

ओवी ६

दुरडी दळण लागायतं कोण्या राजाला गं
बाळ याच घरी माझ्या गोकुळ नांदतं गं

दुरडीभर दळण कोणाला बरं लागतं?
या माझ्या बाळाच्या घरी, गोकुळ नांदतं.

ओवी ७

पहाटंचं दळण, राहतं गं कुणाच्या वाड्यावरी
मायलेकी दळित्यात गं सात खणाच्या माडीवरी

पहाटे पहाटे, कुणाच्या वाड्यावर दळण चालू आहे?
मायलेकी सात खणाच्या माडीवर दळतायत.

टीपः खण हे जुन्या घरांचं, माळवदाचं क्षेत्रफळ मोजण्याचं मापक आहे. दोन लाकडी खांबांच्या मधलं अंतर म्हणजे एक खण. शक्यतो, ४ x ५  किंवा १० x १२ फूट. सात खणी माडी असणारं म्हणजे चांगलंच ऐसपैस आणि दुमजली घर.

ओवी ८

सयांना सया पुस गं, काय अबदुल वाजयतं?
पहाटंचं दळण मायलेकीली सजयतं

मैत्रिणी एकमेकींना विचारतायत, (पहाटेच्या पारी) अबदुल कुठे वाजतंय?
माय लेकींनी एकत्र दळण करणं त्यांना खरंच शोभून दिसतंय.

टीपः पहाटे पहाटे संन्यासी, फकीर पावा वाजवतात. त्याला ‘अबदुल’ म्हणतात. अब्दुल नावाशी त्याचा संबंध नाही. गावाकडे अबदुल्या, गबदुल्या असा शब्द वापरला जातो, त्यातलं हे अबदुल. जात्यावर गाताना, पहाटे दुरून जो पाव्याचा आवाज येतोय, त्याला अबदुल हा शब्द वापरलेला आहे.


PHOTO • Bernard Bel

कलावंत – यशोदा उंबरे

गाव – राजमाची

तालुका – मावळ

जिल्हा – पुणे

लिंग – स्त्री

जात – महादेव कोळी

वय – ४५-४६

मुलं – ४ मुलगे

व्यवसाय – भूमीहीन शेतकरी

दिनांक – १५-१६ मार्च १९९७

लेखमाला - शर्मिला जोशी

पोस्टर – श्रेया कात्यायिनी व सिंचिता माजी

लेखन - पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम

PARI GSP Team

پاری ’چکی کے گانے کا پروجیکٹ‘ کی ٹیم: آشا اوگالے (ترجمہ)؛ برنارڈ بیل (ڈجیٹائزیشن، ڈیٹا بیس ڈیزائن، ڈیولپمنٹ اور مینٹیننس)؛ جتیندر میڈ (ٹرانس کرپشن، ترجمہ میں تعاون)؛ نمیتا وائکر (پروجیکٹ لیڈ اور کیوریشن)؛ رجنی کھلدکر (ڈیٹا انٹری)

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI GSP Team
Editor and Series Editor : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے