वैशाली येडे तिच्या गावातील गल्लीतून पटकन चक्कर मारते, लोकांना हसून नमस्कार करते आणि तिला पाठिंबा द्यावा म्हणून परत एकदा विनंती करते. “मी तुमचीच मुलगी आहो,” ती स्थानिक वऱ्हाडी भाषेत म्हणते.
लोक तिच्याकडे लक्ष देतायत म्हणून ती खूश आहे, तरीही ती विनंती करते - “माह्यावर लक्ष असू द्या जी” - यामध्ये अशीही विनवणी आहे की लोकांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचा विसर पडू नये, त्यांच्या नवऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर जे भावनिक आणि आर्थिक दुःख सहन करतात त्यांना विसरू नये.
मध्येच २८ वर्षांची वैशाली ज्येष्ठ लोकांना वाकून नमस्कार करते. तरुण मुलींच्या हातात हात मिळवते. हापश्यावर पाणी भरणाऱ्या स्त्रियांना हात हलवून अभिवादन करते. नंतर सहा सात गाड्यांच्या साधाशा ताफ्यातल्या एका कारकडे जाते आणि मग ४२ डिग्री उन्हाच्या कडाक्यात हा ताफा पुढच्या गावी प्रचारासाठी निघतो.
महाराष्ट्रातील पूर्व मतदारसंघातील यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून वैशाली २०१९ ची लोकसभेची निवडणूक लढवत आहे. जवळजवळ १७.५ लाख मतदार इथे ११ एप्रिलला मतदान करतील. वैशाली ओमप्रकाश (बच्चू )कडू या पक्षाचे नेतृत्वाखालील स्थानिक प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवार आहे. ४८ वर्षीय कडू अमरावती जिल्हयातील अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या पक्षाला विदर्भात हळूहळू लोकप्रियता मिळत असून, शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या समस्यांवर काम करत ते आपला ठसा उमटवत आहेत.
दोन दशकांपासून गहिऱ्या होत जाणाऱ्या कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ हे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे केंद्र झाले आहे. या जिल्ह्यातील शेकडो कपास आणि सोयाबीन शेतकऱ्यांनी वाढतं कर्ज, कमी उत्पन्न आणि ठप्प पडलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि इतरही काही कारणांमुळे आत्महत्या केली आहे.
“आज आम्ही राळेगाव केलं,” वैशाली म्हणते, “उद्या आम्ही वाशीमला निघणार.” ती म्हणते, मतदारसंघातील जवळपास २००० हजार गावांना भेट देणं अशक्य आहे, म्हणून ती काही ठिकाणी सार्वजनिक सभा घेणार आहे.
सुधाकर येडेशी लग्न झालं तेव्हा, म्हणजेच २००९ मध्ये वैशाली फक्त १८ वर्षाची होती आणि जेव्हा तिचा नवरा मरण पावला तेव्हा तिचं वय होतं २० वर्षं. त्याच्या मालकीची तीन एकर कोरडवाहू जमीन होती, यवतमाळमधील कळंब तालुक्यातील राजूर गावी तो कपास आणि सोयाबीनचं पीक घ्यायचा. हे गाव त्याच तालुक्यातील वैशालीच्या डोंगरखरडा गावापासून फक्त २० किमी दूर आहे. वैशाली जेव्हा तिच्या माहेरी गेली होती तेव्हा, २ ऑक्टोबर २०११ रोजी त्याने आत्महत्या केली. त्यावेळी वैशालीचं दुसरं मूल जानव्ही नुकतीच जन्माला आली होती आणि तिचा थोरला मुलगा कुणाल फक्त दीड वर्षांचा होता. “संध्याकाळी समजलं की माझ्या नवऱ्याने विष प्यायलंय आणि तो वारलाय,” ती आठवून सांगते. “तो गेला, तसाच, माझा आणि मुलांचा विचार न करता तो आम्हांला सोडून गेला.” त्याने स्वतःला का संपवलं हे नीटसं कळलं नाही, ती म्हणते, त्याच्यावर कर्ज होतं, त्या वर्षी पीकही चांगलं आलं नव्हतं.
यानंतर जानेवारी २०१९ मध्ये वैशालीला मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. खरं तर या कार्यक्रमाचे उदघाटन नयनतारा सहगल करणार होत्या, पण स्थानिक आयोजकांनी त्यांचे निमंत्रण मागे घेण्यास लावले. या उदघाटना मुळे वैशालीला एक ओळख मिळाली.
प्रहार जनशक्ती पक्षाने फक्त यवतमाळ-वाशिम मध्येच लोकसभेसाठी आपला उमेदवार उभा केला आहे, कडू म्हणतात. ग्रामीण विदर्भात त्यांना मोठा जनाधार आहे. ते म्हणतात की, “संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्याकडून वैशालीताईंच्या प्रचारासाठी देणग्या येत आहेत.”
कडू आणि त्यांची संघटना वैशालीचा प्रचार करत आहेत, आणि त्यांचे प्रचाराचे मुद्दे - शेती उत्पन्नाला भाव ते राजकीय दुर्लक्ष आणि विनाशकारी शेतकरी आत्महत्या. २०१७ मध्ये प्रहार पक्षाने दक्षिण यवतमाळ मधिल पांढरकवडा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती, त्यांनी १९ पैकी १७ जागा जिंकून भाजप आणि काँग्रेसला पराभूत केलं होतं.
इतर उमेदवार शक्तिशाली आहेत: चार वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि महाराष्ट्र विधानसभेचे काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे
वैशालीला उमेदवारी देऊन पक्षाला यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही ठिकाणच्या ग्राम पंचायती, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे. वैशालीला किती मते मिळतात, कोणत्या बूथ वरून तिला मते मिळतात यावरून हे लोक पक्षाला पाठिंबा द्यायला तयार आहेत का आणि स्थानिक निवडणुकीसाठी कोणता उमेदवार उभा करावा हे समजू शकेल.
“मला यात पडायचं नव्हतं,” वैशाली म्हणते, “पण जेव्हा बच्चू भाऊ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीयेत आणि तुम्ही निवडणुकीला उभे राहून शेतकऱ्यांच्या समस्या मांडायला पाहिजे, मी त्यात उडी घ्यायची असं ठरवलं,” ती म्हणते. “मी राजकारणासाठी नाही तर समाज कार्यासाठी निवडणूक लढवत आहे.”
तिच्या प्रचारातील भाषणांमध्ये आणि सभांमध्ये वैशाली तिला संसदेत निवडून देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करते जेणेकरून ती शेतमालाला रास्त भाव, शेतमजूर स्त्रियांसाठी रास्त मजुरी, याशिवाय शेतकरी विधवा आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या संसदेत मांडू शकेल. शेतकरी कुटुंबामध्ये दारूचीसुद्धा समस्या आहे, म्हणून यवतमाळ मध्ये तिला दारूबंदी करायची आहे, वैशाली म्हणते, कठोर परिश्रम आणि हिंसा यापासून महिलांचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. ती पुढे म्हणते की, आदिवासी समाजातील तरुण मुली ज्यांचं लैंगिक शोषण झालं आहे आणि पुरुषांनी त्यांना सोडून दिलं आहे अशांचं पुनर्वसन करण्याचं कामही तिला प्राधान्याने करायचं आहे.
निवडणुकीतील इतर उमेदवार तगडे आहेत: संसदेत चार वेळा निवडून गेलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी परत निवडणुकीला उभ्या आहेत. वैशालीपुढे मुख्य आव्हान आहे ते काँग्रेस पार्टीचे विधानपरिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत.
“तुम्ही या मोठ्या नेत्यांना निवडून द्याल आणि ते तुम्हाला विसरून जातील,” कडू थोडा वेळ डोंगरखरडा गावात थांबले असता जमलेल्या गावकऱ्यांना सांगतात, “पण जर तुम्ही तुमचीच मुलगी निवडून दिली, तर ती चोवीस तास तुमच्यासाठी काम करेल.”
वैशाली सकाळी शेतमजूर म्हणून काम करते, दुपारी राजूर गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करते, आणि संध्याकाळी वरकमाईसाठी शिवणकाम करते. तिला महिन्याला जवळजवळ ७००० - ८००० रु. मिळतात. “गेली नऊ वर्षं संघर्षाने भरलेली होती,” तिचा एकमेव आधार असणारा तिचा मोठा भाऊ संजय म्हणतो.
वैशालीच्या सासरचे म्हणजे येडे यांचं मोठं कुटुंब राजूर येथे आहे. तिचे चुलत सासरे म्हणतात की, जवळजवळ ५० घरं येड्यांची आहेत, वैशालीचे पालक भूमिहीन आहेत. तिचे वडील माणिकराव धोटे गवंडी आहेत आणि आई शेतमजूर आहे. संजय आणि तिचा लहान भाऊ विनोद हे भटके मजूर आहेत. धोटे यांचं डोंगरखर्डा येथे स्वतःचं लहान घर आहे. त्याचे दोन भाग असून, एका खोलीत संजय त्याची पत्नी आणि मुलाबरोबर राहतो आणि दुसरा भाग वैशालीचे आई-वडील, धाकटा भाऊ विनोद आणि आता नऊ वर्षांचा असलेला वैशालीचा मुलगा यांच्यासाठी आहे. वैशाली आणि तिची पहिलीत शिकणारी मुलगी वैशालीच्या सासूबाई पंचफुला शेषराव येडे यांच्याबरोबर राजूरला राहतात.
तिचे वडील म्हणतात, “वैशालीला निवडणूक उमेदवाराच्या भूमिकेत पाहणं आमच्या कल्पनेपलिकडचं आहे. मला खात्री आहे तिला चांगली मतं पडतील, शेतकरी तिला मतं देतील.”
पण तिच्या उमेदवारीमुळे अनेकांना कोड्यात टाकलं आहे. “माझी फार अवघड स्थिती झालीये,” डोंगरखर्डाचा ३० वर्षांचा सरपंच निश्चल ठाकरे म्हणतो. वैशाली या गावची आहे म्हणून भावनिक पातळीवर त्याने तिच्या निवडणूक प्रचारात सामील व्हावं की गावाचे रस्ते, पाणी पुरवठा आणि सिंचन यासारख्या व्यापक विकासाकडे व्यावहारिकदृष्ट्या लक्ष द्यावं. “कारण जेव्हा मी परत निवडणूक लढवेन तेव्हा मी गावासाठी काय केलं असा सवाल मला गावकरी करतीलच,” तो म्हणतो. तो याकडेही लक्ष वेधतो की, यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या निकालाचा परिणाम पुढे सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आणि नंतर स्थानिक निवडणुकीवरही होणार आहे. “जर तुम्ही प्रवाहा बरोबर राहिलात,” तो म्हणतो “तर गावासाठी निधी मिळवणं तुम्हाला सोपं जातं.”
ठाकरे याची भाजप-शिवसेनेच्या नेत्यांशी जवळीक आहे, पण वैशाली ही त्याच्याच पोटजातीची, कुणबी समाजातली आहे, याकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही. यवतमाळ जिल्हयातल्या या पट्ट्यावर खैरे कुणबी समाजाचं प्राबल्य आहे.
बड्या आणि अनुभवी उमेदवारांच्या या लढतीत वैशालीकडे ना पैसा आहे ना ताकद. ती म्हणते, निवडणुका उरकल्या की तिला कदाचित तिच्या मजुरीकडेच परत जावं लागेल. पण सध्या मात्र ती आपल्या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांपैकीच एक जण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष देणार नाही. “शेतकऱ्यांच्या आणि स्त्रियांच्या समस्या मला नाही तर इतर कोणाला कळतायत? जर मी निवडून आले, तर मी माझ्या लोकांचे प्रश्न संसदेत उठवेन.”
अनुवादः अश्विनी बर्वे