या लेखातल्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकोर्डिंगमध्ये तब्बल २१ वर्षांचं अंतर आहे. यातल्या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या होत्या. योगायोग म्हणजे २१ वर्षांनी त्याच दिवशी आम्ही राधाबाईंना भेटलो आणि ओवी गाताना त्यांना आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करू शकलो.
२० वर्षांपूर्वी गायलेल्या या ओव्या राधाबाईंना आठवत नव्हत्या. मात्र सुरुवातीच्या एक-दोन ओळी आम्ही गाऊ लागताच त्यांना त्याचा गळा आठवला. १९९६ मध्ये गायलेल्या ओव्यांचे शब्द वाचायला मिळाले तर त्यांना नक्कीच अजून जास्त काही आठवेल याची त्यांना खात्री होती. (त्यांच्या गावातल्या प्रौढ साक्षरता वर्गात त्या लिहायला-वाचायला शिकल्या होत्या.)
१९९७ मध्ये राधाबाई, माजलगावच्या भीमनगर वस्तीमध्ये राहत होत्या. आता त्या बीड जिल्ह्यातल्याच माजलगाव तालुक्यातल्या सावगरगावला राहतात आणि एक छोटं किराणा मालाचं दुकान चालवतात. त्यांना चार मुली आहेत, सगळ्यांची लग्नं झाली आहेत.
माजलगावमध्ये राहत असताना त्या आणि त्यांचा नवरा खंडू बोऱ्हाडे दोघं शेतमजूर म्हणून काम करत होते. खुरपणीच्या नेहमीच्या कामासोबतच राधाबाई, कधी कधी धान्याच्या उफणणीचं, किंवा मोंढा मार्केटमध्ये धान्य निवडायचं काम करायच्या. गावातल्या मोठ्या घरांमध्ये कधी कधी केरफरशीची कामंही त्यांनी केलीयेत.
पण जसजसं वय झालं, तशी कामं मिळेनाशी झाली. मग दोघं म्हातारा-म्हातारी सावरगावला राधाबाईंच्या दिराच्या घरी रहायला आले. तिथे त्यांनी किराण्याचं दुकान सुरू केलं. दोघं भाऊ निवर्तले. आता राधाबाई त्यांची जाऊ राजूबाई आणि तिचा मुलगा मधुकर, असे सगळे एकत्र राहतात.
माजलगाव हे तालुक्याचं गाव. इथली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार. १४ एप्रिल रोजी असणारी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
सावरगावमध्ये त्यांच्या घराबाहेर बसलेल्या राधाबाईः सोबत ( डावीकडून ) त्यांच्या जाऊ राजूबाई , पुतणी ललिताबाई खळगे आणि पुतण्या मधुकर
बाबासाहेबांवरच्या ओव्यांमधल्या राधाबाईंनी गायलेल्या पहिल्या पाच ओव्या वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत. पहिली ओवी, भगवान बुद्धाच्या नावाने, ज्याने दलितांच्या उद्धारासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली.
दुसरी ओवी, बाबासाहेबांना, ज्यांना आदराने आणि प्रेमाने भीमराय म्हटलं जातं. जातीच्या अत्याचारांना विरोध करण्याचं बळ त्यांनी दिलं म्हणून दलिताच्या कुळात जन्मलेल्या या हिऱ्याच्या नावाने ही ओवी.
तिसरी ओवी, जगाचं रक्षण आणि पालन करणाऱ्या धम्माच्या नावानं.
चौथी ओवी संघाच्या नावाने. बौद्ध भिक्खूंच्या समुदायाला संघ म्हटलं जातं. या ओवीत बौद्ध धर्माने मांडलेल्या पंचशील मार्गाचं पालन करण्याचं त्या वचन देतात. बुद्धांनी सदाचरणाला महत्त्व देऊन दुःखाचं निवारण करण्याचा अष्टांग मार्ग सांगितला. त्याच्या आचरणासाठी जे पाच नियम सांगितले ते म्हणजे पंचशील.
राधाबाईंची पाचवी ओवी रमाबाई आंबेडकरांच्या नावाने आहे. त्या म्हणतात, मी रमाईला पूजीन, दलित समाजासाठी त्या धन्य अशा माउलीसमान आहेत.
पयली माझी ववी गं, भगवान बुध्दाला
दलिताच्या हितासाठी, बुध्द धम्म काढला
दुसरी माझी ववी गं, बाबा भिमरायाला
दलिताच्या कुळात, हिरा ग जलमला
तिसरी माझी ववी गं, धम्माला नमन
बुध्द धम्म मोठा करील, जगाचे पालण
चौथी माझी ववी गं, संघाला वाहीन
पंचशील तत्वाचे, करीन पालन
पाचवी माझी ववी गं, रमाबाई पुंजीनं
धन्य धन्य मावली, गेली एक होवून
कलावंत – राधा बोऱ्हाडे
गाव – माजलगाव
तालुका – माजलगाव
जिल्हा – बीड
लिंग – स्त्री
जात – नवबौद्ध
मुलं – ४ मुली
दिनांक – हे तपशील २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आले.
फोटोः संयुक्ता शास्त्री
पोस्टरः आदित्य दिपांकर , श्रेया कात्यायिनी , सिंचिता माजी
लेखनः पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम