मराठवाड्याच्या उस्मानाबादमधलं ताकविकी हे गाव. हंडे आणि घागरींच्या आवाजानेच इथली पहाट होते. जवळ जिथे कुठे पाणी आहे तिथे जायला लोकांची लगबग सुरू होते. लवकरच गावातल्या गल्ल्या पाणी भरायला आलेले लोक आणि त्यांच्या हंडे-घागरींनी भरून जातील. सर्वात मोठी व्यक्ती आहे साठीची आणि सर्वात लहान, फक्त पाच.

पृथ्वीराज शिरसाट, वय १४ आणि आदेश शिरसाट, वय १३ रांगेत थांबलेत. त्यांच्या घरासमोर राहणारे शिक्षक आठवड्यातून दोन-तीनदा त्यांच्या घरची बोअरवेल सगळ्यांसाठी खुली करतात. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यात आणि ‘शाळा आहे’ हे कारण देऊन या दोघांना सकाळी सकाळी पाणी भरण्यापासून सुटका करून घेता येणार नाहीये. “सरांच्या घरी पाणी मिळालं नाही तर आम्हाला एक किलोमीटर तरी चालत जावं लागतं,” पृथ्वीराज सांगतो. त्याचा भाऊ १० हंडे भरायला दोन तास लावतो, तर त्याचे दीड तासात १५ भरून होतात म्हणून तो त्याची मस्करीही करतोय. “तू कधी मला सायकल नेऊ देतोस काय,” आदेश हसत-हसत पलटवार करतो.

थोड्या अंतरावर, ४० वर्षांच्या छाया सूर्यवंशी मात्र असल्या उन्हाच्या कारात रानातून वाट काढत जायचं म्हणून फार उत्साही नाहीत. त्यांच्यासाठी सर्वात जवळचा पाण्याचा स्रोत म्हणजे एक किलोमीटरवरची बोअरवेल. पाणी भरण्याची जबाबदारी त्यांची तर त्यांचा नवरा रानात काम करतो. “आम्ही घरी सहा माणसं, आम्हाला दिवसाला १५ हंडे तरी पाणी लागतंच,” डोक्यावरचा हंडा उजव्या हाताने तोलत त्या आम्हाला सांगतात. कंबरेवर आणखी एक हंडा. “मी एका टायमाला दोन हंडे नेऊ शकते. तरी ७-८ खेपा कराव्याच लागतात. दर खेपंला ३० मिनिटं. हा उन्हाळा गेल्या सालापेक्षा बराच म्हणायचा [२०१६ साली पाऊस चांगला झाला म्हणून].”


Brothers sitting together at the door step

शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात , त्यामुळे पृथ्वीराज ( डावीकडे ) आणि आदेश शिरसाट ( उजवीकडे ) सकाळचा वेळ घरच्यासाठी पाणी भरण्यात घालवतात

उन्हाळ्यामध्ये ताकविकीच्या ४००० रहिवाशांचं आयुष्य हे असं असतं. पाण्यासाठी रोज करावी लागणारी वणवण, या दुष्काळी पट्ट्यात ते मिळवण्यासाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा यामुळे इथल्या गावकऱ्यांना बोअरवेलशिवाय दुसरं काही सुचत नाही.

स्वतःचं पाणी असणं  म्हणजे आपलं आयुष्य तर सुकर होतंच पण त्यामुळे तुमच्याकडे एक प्रकारची सत्ता येते आणि पत मिळते. ताकविकीचे शिक्षक गावातून ताठ मानेने फिरतात. ते आपली बोअरवेल सर्वांसाठी खुली करतात त्यामुळे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

पण त्यांच्याइतके आदरणीय नसणारे मात्र या पाण्याच्या टंचाईचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून पाण्याचा बाजार करताना दिसतात. “मी पंधरा लिटरला – एका हंड्याला २ रुपये देते,” छाया सांगतात. ज्यांच्या बोअरला पाणी आहे अशांकडून पाणी विकत घेणारे छायाताईंसारखे अनेक जण गावात आहेत.


Pots parked outside the teachers house

आठवड्यातले काही दिवस आपली बोअरवेल सर्वांसाठी खुली करणाऱ्या सरांच्या घरासमोरची केशरी हंड्यांची रांग

बोअरला पाणी लागावं या नादात मराठवाड्यातल्या या कृषीप्रधान पट्ट्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. बोअर पाडणं फार जिकिरीचा मामला आहे. लाखभराचा खर्च आणि पाणी लागेल याची कसलीच शाश्वती नाही. बोअर मारून पाणी लागलं नाही तर पैसा वायाच. एक बोअर फेल गेली म्हणून नैराश्य आलं तरी दुसऱ्या बोअरला पाणी लागेल या आशेत ती खिन्नता दूर होते.

साठ वर्षीय दत्तूसिंग बयास यांनी त्यांच्या ८ एकर रानात गेल्या तीन वर्षांत आठ बोअर मारल्यात. त्यातली सध्या एकच चालू आहे. दिवसाला या एका बोअरचं १०० लिटर पाणी मिळतं. “माझं रान आणि माझी जनावरं वाचवायची तर माझ्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता,” ते सांगतात. रानात तूर आणि सोयाबीन आहे. “गेल्या साली माझ्या आठ बैलांपैकी तीन देऊन टाकावे लागले मला. पाणीच नाही, काय करावं?”

पाण्यापायी त्यांच्यावर खाजगी सावकारांचं ३ लाखाचं कर्ज झालंय. “व्याजाचे दर तर दिसागणिक वाढायलेत,” दत्तूसिंग म्हणतात. त्यांची दोन मुलं मजुरी करतात, दोन्ही मुलींची लग्नं झालीयेत. “मी गावात सुतारकी करतो. दिवसाला साधारणपणे ५०० रुपये मिळतात. या संकटकाळात, त्याच्यावरच तगलोय म्हणायचं.”


Portrait of Bayas

जेव्हा काहीही करून तुम्हाला पाणी हवं असतं , तेव्हा तुम्ही खोल जातच राहता ,’ आठ बोअर पाडण्यासाठी तीन लाखांचं कर्ज कसं झालं ते सांगताना दत्तूसिंग बयास

मराठवाड्यातल्या बहुतेक बोअरवेल जूनच्या आधी तीन चार महिन्यात पाडल्या गेल्या आहेत. याच काळात पाण्याचे स्रोत आटायला लागतात आणि पिकाला आणि जनावराला पाणी कसं द्यायचं याची चिंता वाढायला लागते. मराठवाड्यात कोणत्याच नदीचा उगम नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे बोअरवेल सोडून फार कमी पर्याय आहेत. भरीस भर म्हणून निसर्गाचा लहरीपणा आणि प्रचंड पाणी उपसणाऱ्या उसासारख्या पिकावर भर देणारी सरकारी धोरणं. पाण्याची टंचाई इतकी भीषण आहे की प्यायलाही कमी पडणारं बोअरचं पाणी आता इथले शेतकरी सिंचनासाठी वापरू लागले आहेत.

भूजलाच्या वापराचे नियम इतके शिथिल आहेत की बोअरवेलचा धंदा त्यातून चांगलाच फोफावला आहे. दोनच नियम आहेत आणि तेही बहुतेक वेळा मोडलेच जातातः प्रशासन सांगतं की शेतकरी २०० फुटाहून खोल आणि पाण्याच्या सार्वजनिक स्रोतापासून ५०० मीटरच्या आत बोअर मारू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र शेतकरी अगदी १००० फुटाहून खोल पोचले आहेत. बयासांच्या आठपैकी चार बोअर ४०० फुटाहून खोल आहेत. “जेव्हा तुम्हाला काहीही करून पाणी हवं असतं तेव्हा तुम्ही खोल जातच राहता,” ते सांगतात. याचा पाणीसाठ्यावर विपरित परिणाम होतो, जो मुळात तयार होण्यासाठी शेकडो वर्षं लागतात. ही सगळी प्रक्रिया या विभागासाठी प्रचंड विनाशकारी ठरत आहे.

गेल्या हंगामात सरासरीच्या १२०% पाऊस झाला असला तरी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा भूजलाची पातळी मराठवाड्यातल्या ७६ पैकी ५५ तालुक्यात घटली आहे असं भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल सांगतो. बीड (११ पैकी दोन तालुके) आणि लातूर (१० पैकी ४ तालुके) वगळता सहाही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहेः उस्मानाबादमधल्या ८ पैकी ५, औरंगाबादच्या सर्व ९, नांदेडच्या सगळ्या १६ तालुक्यात भूजलाची पातळी खालावली आहे.


Man carrying pots on a bicycle

मराठवाड्यातलं पाणी संकट जसजसं गहिरं होत आहे तसंतसं लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायी तुडवावे लागत आहेत

एवढं असूनही एका कुटुंबाकडे किती बोअर असाव्यात यावर कसलेही निर्बंध घातले गेलेले नाहीत. मराठवाड्यातल्या कोणत्याच जिल्ह्यात एकूण बोअरवेल किती याचा अंदाज प्रशासनाला नाही. उस्मानाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी (एप्रिल), सुनील यादव सांगतात की प्रत्येक ग्राम पंचायतीने बोअरवेल किती खोल आहेत यावर देखरेख ठेवणं अपेक्षित आहे, पण तसं केलं जात नाहीये. पण शेवटी जिल्हाधिकारी आणि राज्य सरकार अशी देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार आहेत हेही खरंच.

जिल्ह्यात बोअर पाडणारे किती दलाल आहेत याचीही प्रशासनाला कल्पना नाही. हे सगळे विनापरवना काम करतात असाच याचा अर्थ होतो. उस्मानाबादमध्ये फिरताना अक्षरशः दर तीन मिनिटाला बोअरवेल पाडणाऱ्या एंजटचं दुकान तुमच्या नजरेस पडतं. हेच एजंट शेतकऱ्याला बोअर मारायला मदत करतात.

ताकविकीच्या सीमेवरच असणारे दयानंद ढगे असेच एक एजंट आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी ३० बोअर पाडून दिल्या आहेत अशी माहिती ते देतात. “शेतकरी आम्हाला संपर्क करतात, मग बोअरचं मशीन आणि इतर साहित्य आणायची जबाबदारी आमची,” ते म्हणतात. “शेतकरी रोखीने पैसा देतात, बोअर मशीनच्या मालकांसोबत आम्ही महिन्याला हिशेब चुकता करतो.”

हे बोअर मशीनमालक बहुतकरून तमिळ नाडू आणि आंध्रातून येतात आणि महाराष्ट्रात अशा दलालांमार्फत काम करतात. मराठवाड्यात असे किती बोअर पाडणारे ट्रक आजमितीला फिरतायत याची कसलीही गणती नाही.

ही सगळी अर्थव्यवस्थाच अनियंत्रित आहे आणि त्यामुळे कसल्याही सेवा कराचा प्रश्नच येत नाही. या एजंटना काही पूर्वपरवानगी घ्यावी लागते का किंवा त्यांच्यासाठी काही नियमावली आहे का या प्रश्नावर सुनील यादव आणि भूजल विभागातल्या एका अधिकाऱ्याकडे कसलंच स्पष्ट उत्तर नव्हतं.

नियंत्रण आणणारा कसलाच कायदा न करून राज्य सरकारने या बोअरवेल लॉबीला मैदान खुलं करून दिलं आहे. “या सगळ्या परिस्थितीकडे काणाडोळा करून सरकार बोअरवेलचा धंदा तेजीत राहील याचीच बेगमी करतंय,” उस्मानाबाद जिल्हा मंडळाचे एक अधिकारी नाव न उघड करण्याच्या अटीवर आमच्याशी बोलतात. “कसलंच धोरण नाही हे या संकटात आपली पोळी भाजून घेणाऱ्यांच्या पथ्यावरच पडलंय.”


A kid with a pot in Takwiki

पाण्यासाठी वाटेल तेः ताकविकीत अगदी पाच वर्षाची लेकरंही पाण्याच्या रांगांमध्ये हंडे घेऊन उभी आहेत

तिथे, ताकविकीत बयास जादा काम करून पैसा साठवतायत. त्यांच्यावर ३ लाखाचं कर्ज आहे. पेरणी तोंडावर आलीये, बियाण्याला पैसे लागणार. पण ते त्यासाठी बचत करत नाहीयेत. “आणखी एक बोअरवेल?” मी विचारलं. माझा अंदाज अगदीच काही चुकीचा नव्हता.

फोटोः पार्थ एम एन

अनुवादः मेधा काळे

Parth M.N.

پارتھ ایم این ۲۰۱۷ کے پاری فیلو اور ایک آزاد صحافی ہیں جو مختلف نیوز ویب سائٹس کے لیے رپورٹنگ کرتے ہیں۔ انہیں کرکٹ اور سفر کرنا پسند ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Parth M.N.
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے