८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली त्याच्या बरोबर एक आठवडा आधी तेलंगणच्या सिद्दीपेट जिल्ह्यातल्या धर्मारम गावच्या ४२ वर्षीय वरदा बालय्यांनी त्यांची एक एकर शेतजमीन विकायला काढली होती. सिद्दीपेट आणि रामायमपेटला जोडणाऱ्या महामार्गाला लागूनच त्यांचा हा जमिनीचा तुकडा आहे.
ऑक्टोबरच्या अवकाळी पावसाने त्यांचं मक्याचं पीक उद्ध्वस्त केलं. सावकारांकडून आणि आंध्र बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचं व्याज वाढत चाललं होतं. एकूण ८-१० लाखाचं कर्ज झालं होतं. हातात पैसा नसताना देणेकऱ्यांना सामोरं जावं लागू नये म्हणून त्यांनी त्यांच्या चार एकर रानापैकी सगळ्यात फायदेशीर असलेला एक एकराचा तुकडा विकायचं ठरवलं.
“जमिनीला खरीददार मिळाला आहे,” त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलीला, शिरीषाला सांगितलंही होतं. फक्त नोटाबंदी होण्याआधी.
२०१२ मध्ये बालय्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. शिरीषाच्या लग्नासाठी त्यांनी ४ लाखाचं कर्ज काढलं होतं. त्यात त्यांनी चार बोअरवेल खणण्यासाठी अजून २ लाखाचं कर्ज काढलं. त्यातल्या तीन बोअरला पाणीच लागलं नाही. या सगळ्यामुळे त्यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चालला होता.
काही महिन्यांपूर्वी बालय्यांची धाकटी मुलगी १७ वर्षांची अखिला कॉलेजमध्ये १२ वीत गेली; तेव्हाच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्नही झालं. बालय्यांना अखिलाच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. तसंच आतापर्यंत झालेलं कर्जही त्यांना फेडायचं होतं.
जो जमिनीचा तुकडा बालय्यांना विकायचा होता तो अगदी महामार्गाला लागून होता आणि त्याचे बालय्यांना सुमारे १५ लाख तरी सहज मिळाले असते असं धर्मारमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्या पैशातून त्यांच्या अनेक चिंता मिटल्या असत्याः मका हातची गेल्यामुळे झालेलं कर्ज, व्याज चुकतं करण्यासाठी सावकारांचा ससेमिरा आणि अखिलाच्या लग्नाचा घोर.
पण रु. ५०० आणि रु. १००० च्या नोट चलनातून बाद करण्याची घोषणा सरकारने केली आणि बालय्यांचे सगळं नियोजनच धुळीला मिळालं. जो खरीददार होता त्याने शब्द फिरवला. “माझे वडील आधी तसे ठीक होते. पण नंतर या नोटांचं काय होतंय हे पाहिल्यावर त्यांना कळून चुकलं की [या जमिनीसाठी] त्यांना कुणीही पैसा द्यायला तयार होणार नाही. मग मात्र ते फार दुःखी झाले,” अखिला आठवून सांगते.
तरीही, बालय्यांनी आशा सोडली नाही आणि खरीददाराचा शोध जारी ठेवला. पण अनेकांसाठी त्यांची पुंजी एका रात्रीत कवडीमोल झाली होती. इथल्या अनेकांकडे वापरात असणारी बँक खातीदेखील नाहीयेत.
१६ नोव्हेंबरपर्यंत, नोटाबंदी जाहीर केल्याच्या एक आठवड्यानंतर बालय्यांना पुरतं कळून चुकलं की सध्या तरी त्यांची जमीन खरेदी करायला कुणीही पुढे येणार नाहीये. मग सकाळी ते रानात गेले, मका आली नाही म्हणून त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती, त्यावर कीटकनाशक फवारलं. संध्याकाळी त्यांनी मयसम्मा देवीला दाखवायला रानात कोंबडं मारलं आणि घरी जेवायसाठी ते घेऊन आले.
बालय्यांच्या घरी फक्त सणाला किंवा शिरीषा तिच्या सासरहून माहेरी आली तरच चिकनचा बेत व्हायचा. आणि अशा वेळी बालय्या स्वतः कालवण करायचे. गेल्या बुधवारी कदाचित त्यांना त्यांचं शेवटचं जेवण असंच सणासारखं असावं असं वाटलं असेल. आपल्याकडची सगळ्यात चांगली मिळकत अचानक कवडीमोल करणाऱ्या त्या काळ्या आठवड्याच्या स्मृती विसरायला लावेल असा जंगी बेत त्यांना करावासा वाटला असेल कदाचित. बालय्यांनी चिकनच्या कालवणात कीटकनाशकाच्या गोळ्या मिसळल्या. त्यांनी असं काही केलंय याची त्यांच्या घरच्या कुणालाही काहीच कल्पना नव्हती. “आपल्यामागे आपल्या कुटुंबावर [आर्थिक/कर्जाचा] बोजा ठेवायला नको असंच त्याला वाटलं असणार. त्यामुळे आपल्यासोबत त्यांनाही घेऊन जायचं त्याने ठरविलं असेल,” बालय्याचे एक नातेवाईक सांगतात.
जेवताना बालय्या अगदी गप्प होते. त्यांच्या १९ वर्षीय मुलाने, प्रशांतने, कालवणाला काही तरी विचित्र वास येतोय असं म्हटल्यावर ते एकदाच काय ते बोलले. “मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत औषध फवारतोय, त्याचा वास येत असेल” – वडलांबरोबरच्या त्या अखेरच्या जेवणावेळचे त्यांचे हे शब्द अखिलाला नीट आठवतायत.
घरातल्या सहा जणांपैकी चौघांनी चिकनचं कालवण खाल्लं – बालय्या, त्यांची पत्नी बाललक्ष्मी, प्रशांत, जो बी टेकचा अभ्यास करतोय आणि बालय्यांचे ७० वर्षांचे वडील, गालय्या. अखिला आणि तिच्या आजीने कालवण खाल्लं नाही त्यामुळे त्या विषारी जेवणापासून त्या बचावल्या.
“जेवण झाल्यानंतर आजोबांना कसं तरी व्हायला लागलं. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती,” अखिला सांगते. “आम्हाला वाटलं त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे म्हणून आम्ही त्यांचे हात पाय चोळायला लागलो.” काही क्षणांतच गालय्यांनी प्राण सोडले.
बालय्यांनादेखील उलट्या होऊ लागल्या आणि ते जमिनीवर पडले. साशंक आणि घाबरून गेलेल्या अखिला आणि प्रशांतनी मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावलं. कालवणात कीटकनाशक मिसळलेलं होतं हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बालय्या, बाललक्ष्मी आणि प्रशांतला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. अखिला तिच्या आजीसोबत घरी थांबली, आजोबांच्या निष्प्राण देहाची काळजी घेत.
दवाखान्यात जाताना वाटेतच बालय्यांनी प्राण सोडला. त्यांची पत्नी आणि मुलावर सिद्दीपेट शहरातल्या एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत, त्यांच्या गावापासून २० किमी लांब. शिरीषा आणि तिचे पती रमेश दवाखान्यात काही करून पैसे भरतायत आणि तिच्या आईची आणि भावाची काळजी घेतायत. “प्रशांतला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं होतं त्यामुळे त्याच्यावर आरोग्यश्री योजनेअंतर्गत उपचार चालू आहेत. पण आईच्या उपचारांचा खर्च आम्हालाच करावा लागतोय. गावातल्या लोकांनी काही पैसे उसने दिले आहेत आणि आमच्याकडची काही बचत आहे त्यातनं आम्ही भागवतोय,” रमेश सांगतो. रुग्णालयाची सगळी बिलं तो काळजीपूर्वक जपून ठेवतो आहे कारण बालय्याच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने काही मदत जाहीर केली आहे.
इकडे, शेजाऱ्यांकडनं घेतलेल्या उसन्या पैशातून आणि जिल्हा पातळीवरच्या काही अधिकाऱ्यांनी देऊ केलेल्या १५,००० रुपयातून अखिलाने वडलांचे आणि आजोबांचे अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.
ती बरीच सावरली आहे पण भविष्याबद्दल मात्र ती फारशी आशावादी नाहीः “मला अभ्यासात खूप रस आहे. गणित फार आवडतं मला. आणि मी एमसेट [EAMCET – अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशपरीक्षा] देणार होते,” ती सांगते. “पण आता, मलाच काही माहित नाही...”
अनुवाद: मेधा काळे