‘पारी’च्या ‘जात्यावरील ओव्या’ या प्रकल्पातील पुढच्या २३ ओव्या पुणे जिल्ह्यातील राजमाची गावातल्या रेणुका उंबरेने गायल्या आहेत. एका स्त्रीचं वाढत चाललेलं दुखणं आणि त्यात तिचा अंत आणि या सगळ्या काळात तिची भावंडं आणि आईवडील यांच्या शोकाने तिच्या हळव्या मनाला मिळणारे समाधान याबद्दलच्या या ओव्या आहेत.

“मी फक्त जात्यावरच्या ओव्या आणि सणाची गाणी म्हणते.”, रेणुकाने या प्रकल्पाच्या मूळ गटाला १९९७मध्ये सांगितलं. ‘पण तेही काही वर्षांपासून कमी होतंय’, तिने सांगितलं. ‘आताशा टूरिस्ट येतात’, गावात राहायला येणाऱ्या प्रवाशांबद्दल ती सांगत होती, ‘आम्हाला त्यांचा पाहुणचार करावा लागतो त्यामुळे गायला वेळ मिळत नाही. मला आता बऱ्याच ओव्या आठवतही नाहीत पण मला त्या गाऊन मन मोकळं करायला आवडतं.’

वीस वर्षांपूर्वी जेव्हां या प्रकल्पाची मूळ टीम तिला भेटली तेव्हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राजमाची गावातल्या डोंगराच्या पायथ्याशी रेणुका राहत होती. तिचं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात नागली पिकवत असे. नुकतीच त्यांनी रायगड जिल्ह्यात थोडी जमीन घेऊन भातशेती सुरु केली होती. ते कधी कधी एका आठवड्यासाठी किंवा दिवसभरासाठी तिथे जात. त्या शेतात पोचायला त्यांना एक डोंगर पायी पार करावा लागे.

रेणुकाचा आवाज फार सुरेल/गोड होता. तिला अनेक ओव्या पाठ होत्या; ती त्या लहानपणी आपल्या आईकडून आणि पुढे आपल्या आते-मावस सासूकडून शिकली होती. रेणुका सांगत होती की ओव्या गाताना बाया साधारणपणे वरचा सूर लावत नाहीत कारण दळता दळता तसं गायलं तर थकायला होतं. इतर पट्टीत ओव्या गाणाऱ्या बायांसारखीच रेणुका एक विषय सुरु केला की निदान दहा ओव्या त्याच्याच गाते.

रेणुका सांगते की ती भजनं किंवा गौळणी गात नाही. (राजमाचीतही पाण्याचे नळ नाहीत त्यामुळे नदीवर पाण्याला जावं लागे आणि तेव्हा बाया गौळणी गात)

रेणुकाने त्यावेळी गायलेल्या ओव्या पारीच्या मंचावर प्रथम ‘जात्यावरील ओव्या’ प्रकल्पाच्या  २९ मार्च २०१७च्या आवृत्तीत प्रसिद्ध झाल्या आहेत.

इथे प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रणात २३ ओव्यांत एका स्त्रीची कहाणी आहे. एका सध्या डोकेदुखीतून तिला मोठा आजार होतो आणि त्यातच ती मृत्युमुखी पडते. प्रत्येक ओवी तिचं तिच्या बहिणी-भाऊ आणि आई-वडिलांबद्दलचं प्रेम दर्शवते; त्यांनाही तिच्याबद्दल असाच जिव्हाळा असावा अशी अपेक्षाही त्यांतून दिसते.


PHOTO • Bernard Bel

राजमाचीच्या पायथ्याला असलेला रेणुका उंबरेचं गाव (१९९७ मधील फोटो)

ही आहे ओव्यांतून सांगितलेली कहाणी :

माझं डोकं दुखतंय आणि माझा भाऊ कपाळावर लावायला सुंठ उगाळतोय. डोकेदुखी आता वाढलीय आणि भांगामधून डोकं ठणकतय. माझ्या भावाला, वैद्याला/डॉक्टरला* सांगावा पाठवून बोलवून घ्या.  आजाराने आणि अस्वस्थतेने मी बिछान्यात तळमळतेय, कूस बदलतेय. असं वाटतंय माझा लाडका भाऊ माझं डोकं उशीवर ठेवील आणि मला थोडा आराम मिळेल.

माझा भाऊ शेतात (काम करतो) आहे, त्याला माझ्या आजाराचं सांगू नका, त्याचं जेवण त्यामुळे कडू होईल. माझा भाऊ डोंगरावर आहे, त्याला माझ्या आजाराचं सांगू नका, त्याच्या खांद्यावरचं घोंगडं त्याला अधिकच भारी वाटेल. मला वाटतं मी आता जाईन पण माझी पाठची बहीण दूर राहते, तिला हे कळवू नका. ती तर धरणीवर अंग टाकील. माझ्या भावाला हे अचानक सांगू नका कारण त्याला धक्का बसेल आणि (दमून आल्यावर) तोंड धुताना हातातला तांब्या निसटून खाली पडेल. बातमी ऐकून तो अंधाराचा, कंदील घेऊन मला भेटायला येईल.

माझं मन जड झालंय आणि मला अस्वस्थ वाटतंय आणि मला बरं वाटावं म्हणून माझी धाकटी बहीण आपल्या मांडीवर माझं डोकं ठेवतेय. माझी छोटी बहिण, माझी मैना मला भेटायला आलीय आणि सोयरा मात्र उन्हाचा आलेला नाही.

माझ्या भावाच्या ओटीवर, त्याच्या मांडीवर मी शेवटचा श्वास घेतेय...(त्याने आणलेली) माझी कोरी साडी-चोळी खुंटीवर तशीच टांगलीय आणि माझे वापरातले कपडेही तसेच दांडीवर राहिलेत. माझा जीव आता कुडी सोडून गेलेला आहे, तो झाडावर बसून बघतोय की माझी बाई, माझी बहीण माझ्या कुडीची काळजी घेतेय.

विवाहित बाईला ‘अहेवपणी’ (म्हणजे नवरा जिवंत असताना) मरण येणं भाग्याचं मानतात. स्वर्गातले देव तिच्या स्वागताला आरती ओवाळतील. माझ्या सख्यांना मी सांगते की विवाहिता मरण पावली पण तिच्या मुलांनी आई आईचा धोशा लावला आहे. त्यांना कसं समजावू? सखी म्हणते की अहेवपणी मरून तू चांगलं केलंस, पण तुझी लेकरं मात्र आईविना हाल सोसतील.

आपली नथ शाबूत ठेवून, अहेवपणी मृत्यू आला म्हणून ती समाधानी आहे. चितेचा धूर टेकडीच्या पायथ्याला पसरतोय. तिचे माय-बाप म्हणताहेत, आमची पोर गेली पण आमचा जावई भला माणूस आहे. पण आता लेक गेली आणि जावयाशी नातंही संपलं. अनेक गोत जमलेत पण त्या सगळ्यात एकट्या बापालाच दुःख झालंय. सगळा गोतावळा आजूबाजूला असला तरी त्यात आईला एकटीलाच आपल्या मुलीच्या मृत्यूचं दु:ख सहन करावं लागतंय.

PHOTO • Samyukta Shastri

'माझा जीव आता गेलाय आणि तो झाडावर बसलाय', रेणुका उंबरे गातेय.

टीपः भारतात पूर्वी आणा चलनात होता. चार पैसे म्हणजे एक आणा. १६ आणे म्हणजे एक रुपया, ६४ पैशांचा एक रुपया. आता १०० पैशांचा एक रुपया होतो. कुर्डू ही एक रानभाजी आहे. तिची पानं हिरवी असतात आणि तिला दांड्याला पांढरा, गुलाबी तुरा येतो.

आता जीवाला जड भारी, डोकं दुखतं कपाळी
ताईत बंधुराई, सुंठ उगाळी गोपाळी

आता जीवाला जड भारी, डोकं दुखतं भांगपट्टी
ताईत बंधुराई माझ्या, वैदाला धाडा चिठी

आता जीवाला जड भारी, डोकं दुखतं केसामधी
पाठीची माझी बाई, हाये दूरला देशामधी

आता जीवाला जड भारी, माझ्या उश्याचा पायथार
येईल बंधुराज, मला करील सोईवार

आता जीवाला जडभारी, नका कळवू रानामधी
माझ्या ना बंधवाची, कडू लागंल पानामधी

आता जीवाला जडभारी, नका कळवू डोंगयरी
बंधवाला माझ्या, जड होईल घोंगयडी

आता जीवाला जड भारी, नका कळवू हरणीला
पाठीची माझी बाई, अंग टाकील धरणीला

आता जीवाला जडभारी, नका कळवू येतायेता
असा ताईत बंधुराया, तांब्या ठेवील तोंड धुता

आता जीवाला जड भारी, नका कळवू जावूनी
ताईत बंधुराई, येईल कंदील लावूनी

आता जीवाला जडभारी, जीव करीतो उलघाली
जीव करीतो उलघाली, सोयरा माणूस उन टाळी

जीवाला जडभारी, जीव करीतो उलघाली
पाठीची माझी बहिण, हिनी उशाशी मांडी दिली

जीवाला जडभारी, जीव करीतो उलघाल
आता ना माझी बाई माझी, साळुंखी वाट चालं

आता जीव ना काही गेला, माझ्या बंधुच्या वटीवरी
अशी चोळी ना पातळाची घडी, राहीली खुंटीवरी

आता जीव ना काही गेला, माझ्या बंधुच्या मांडीवरी
आता चोळीना पातळाची घडी, राहीली दांडीवरी

आता जीव ना काही गेला, जाऊन बसला झाडावरी
अशी आता ना माझी बाई, माझ्या कुडीची सेवा करी

आता अहेव मेली नार, गेली नवरी होवूनी
आता सरगीच देव उभे, आरती घेवूनी

आता आहेव मेली नार, बाळ करीतो आई आई
आता सांगते सयेपाशी, तान्ह्या बाळाला करु काई

आता आहेव मेली नार, हे गं तुपल बरं केलं
तुपल बरं केलं, तान्ह्या बाळाचं हाल झालं

आहेव मेली नार, हिच्या नाकामधी नथ
अशी भरतार राजाआधी, गेली डंका ही वाजवीत

आता आहेव मेली नार, धूर गंगंला पांगयला
आता बाप गं काही बोलं, लेकी सोईरा चांगयला

आता आहेव मेली नार, धूर गंगंला दाटयला
आता बाप गं माई बोलं, लेकी सोईरा तुटयला

आता आहेव मेली नार, सरण जळतं टेपायाला
आता येवढ्या गोतामंदी दुख एकल्या बापायाला

आता आहेव मेली नार, सरण जळतं सावलीला
आता येवढ्या गोतामंदी दुख एकल्या मावलीला


कलावंत – रेणुका उंबरे

गाव – राजमाची

तालुका – मावळ

जिल्हा – पुणे

लिंग – स्त्री

जात – महादेव कोळी

वय – ३७/३८

मुलं – २ मुली

व्यवसाय – शेती, नाचणीचं पीक घेतात

दिनांक – ह्या ओव्या १५-१६ मार्च १९९७ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत.

फोटो – बर्नार्ड बेल

पोस्टर – श्रेया कात्यायिनी व सिंचिता माजी

अनुवाद - छाया देव

PARI GSP Team

پاری ’چکی کے گانے کا پروجیکٹ‘ کی ٹیم: آشا اوگالے (ترجمہ)؛ برنارڈ بیل (ڈجیٹائزیشن، ڈیٹا بیس ڈیزائن، ڈیولپمنٹ اور مینٹیننس)؛ جتیندر میڈ (ٹرانس کرپشن، ترجمہ میں تعاون)؛ نمیتا وائکر (پروجیکٹ لیڈ اور کیوریشن)؛ رجنی کھلدکر (ڈیٹا انٹری)

کے ذریعہ دیگر اسٹوریز PARI GSP Team
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

کے ذریعہ دیگر اسٹوریز چھایا دیو