५ एप्रिल २०१७ रोजी पारीवर प्रकाशित झालेल्या ओव्यांपैकी पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या होत्या. १४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी हा महिनाभर आम्ही पारीवर ओव्यांची मालिका सादर करत आहोत. त्यातल्या या पहिल्या काही ओव्या.
या पाच ओव्या, बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाई आंबेडकरांना वाहिल्या होत्या. या मालिकेतल्या या शेवटच्या १० ओव्या राधाबाईंच्याच खड्या आवाजात आहेत. इतर स्त्रियांनी त्यांना साथ दिली आहे.
या संचातल्या ओव्यांमधली पहिली ओवी, (म्हणजे त्यांनी गायलेली सहावी ओवी) राधाबाईंनी जोतिबांना वाहिली आहे. जोतिराव फुले हे ज्येष्ठ समाज सुधारक, लेखक आणि विचारवंत होते. जाती अंताची चळवळ, स्त्री-पुरुष समानता आणि इतरही अनेक सामाजिक प्रश्नांवरचं त्यांचं काम लाखमोलाचं आहे.
दुसरी ओवी बौद्ध धर्माचं प्रतीक असणाऱ्या पंचरंगी झेंड्यासाठी गायली आहे. हा झेंडा जगभर बौद्ध धर्माचं प्रतीक मानला जातो. सात कोटी लोकांना या झेंड्याने बौद्ध धर्म सांगितला आहे असं दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तेव्हा त्यांच्यासोबत भारतातल्या सात कोटी दलित जनतेने बौद्ध धर्म स्वीकारला, त्याचा हा संदर्भ आहे.
तिसऱ्या ओवीमध्ये राधाबाई सगळ्यांना उद्धाराच्या दिशेने वाटचाल करण्याचं आवाहन करतात. गरिबी जरी आली तरी शिक्षण सोडू नक्का असा सल्लाही त्या देतात. चौथ्या ओवीमध्ये एकी ठेवण्याचं आणि आपसातली फाटाफूट थांबवण्याचं आवाहन करतानाच राधाबाई सगळ्यांना बुद्धाची शिकवण लक्षात ठेवायला सांगतात. पाचव्या ओवीमध्ये त्या सगळ्यांना आठवण करून देतात की बाबासाहेबांनी त्यांना बुद्धाच्या मार्गावर आणलं आहे, ते आता गेले असले तरी आपण आता त्या धर्माचं नीट पालन करायला पाहिजे.
सहाव्या ओवीमध्ये राधाबाई सगळ्यांना सांगतात, बुवा बाबांचं, देव म्हणून दगडाच्या मूर्तींचं पूजन करणं थांबवा. रुढी परंपरा आणि चाली रीतींमध्ये अडकू नका, त्यामुळे समाज बुडाला आहे असा शहाणपणाचा सल्ला राधाबाई देतात. सातव्या ओवीमध्ये त्या म्हणतात, गुलामी नष्ट करा, स्वाभिमान जागवा. एकी करून सर्वांची संघटना मजबूत करा.
आठव्या ओवीमध्ये ज्ञानाचा दीप लावून, पंचशीलाचं अनुसरण करून आपण आपलं आयुष्य चांगलं घडवू शकतो, ते आपल्याच हातात आहे हे राधाबाई पटवून देतात. नवव्या ओवीमध्ये त्या सर्वांना भीमरावांचा संदेश ऐकण्याचं आवाहन करतात. बुद्धाच्या धम्मानेच साऱ्या जगाचा उद्धार होणार आहे असं त्या सांगतात.
दहाव्या ओवीमध्ये राधाबाई बाबासाहेबांना वंदन करतात. त्यांची स्तुती करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतील, माझी वाणीच चालणार नाही, आणि एक लाख ओव्या गायल्या तरी त्यांच्यासाठी त्या अपुऱ्याच पडतील असं फार सुंदर वर्णन राधाबाई करतात.
सहावी माझी ओवी गं, जोतीबाला वंदन
बहुजन हितासाठी, कार्य केले नेमानं
सातवी माझी ववी गं, पंचरंगी झेंड्याला
बुध्द धम्म सांगतो, सात कोटी लोकाला
पुढे पुढे चला गं, उध्दाराच्या मार्गानं
आली जरी गरीबी, सोडू नका शिक्षण
फाटाफूट सोडा गं, एकजूट असू द्या
बुध्दाच्या धम्माची, आठवण असू द्या
बुध्द धम्म देवूनी, बाबा गेले निघून
खरोखर करा आता, धम्माचे पालन
पुंजू नका अवलियाला, दगडाच्या देवाला
जून्या रुढ्या सोडा गं, समाज बुडाला
नष्ट करा गुलामी, स्वाभिमान जागवा
एक एक मिळा गं, एक संघटना वाढवा
ज्ञानदिप लावा गं, करा पंचशील पालन
आपल्याचं हाती आहे, आपले कल्याण
ऐका ऐका संदेश, बाबा भीमरायाचा
बुध्दाच्या धम्मानं, उध्दार जगाचा
किती वव्या गावू गं, माझी वाणी चालेना
एक लाख ववी, माझ्या भिमाला पुरेनाट
कलाकार – राधा बोऱ्हाडे
गाव – माजलगाव
वस्ती – भीम नगर
तालुका – माजलगाव
जिल्हा – बीड
जात – नवबौद्ध
तारीख – या ओव्या आणि तपशील २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आले.
फोटो – संयुक्ता शास्त्री
पोस्टर – सिंचिता माजी
लेखन – पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम