घरी परतल्यावर सगळ्यात आधी श्रीरंगन आपल्या हातावरचा सुकलेला चीक काढतात. ५५ वर्षीय श्रीरंगन किशोरवयापासून रबराच्या झाडाचा चीक काढण्याचं काम करत आहेत. ह्या सुकून तपकिरी होणाऱ्या पांढऱ्या चीकाशी त्यांची ओळख जुनीच. घरी परतल्यावर तो हातावरून काढून टाकणं हे त्यांच्यासाठी मोठं कामच असतं.
त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरु होतो. सहा-सात इंच लांब व आकडा असलेली 'पाल वीटूर काठी' (रबराचा चीक काढण्यासाठी वापरात येणारे साधन) घेऊन ते सुरुलकोडे गावातील आपल्या रबराच्या राईकडे निघतात. शासनाकडून त्यांच्या वडिलांना मिळालेली ही पाच एकर जागा त्यांच्या घरापासून पाच मिनिटांवर आह. या जागेत ते रबर, काळी मिरी आणि लवंग ही पिकं घेतात.
आपल्या पत्नी लीला यांच्यासोबत ते रबराच्या झाडांचं काम करतात. दोघे काणीकरन आदिवासी समाजातील असून त्यांच्या लग्नाला २७ वर्षं झाली आहेत.
श्रीरंगन (स्वतःचे केवळ नावच वापरतात) आदल्या दिवशी झाडांना बांधलेल्या, काळ्या रंगाच्या वाटीत जमलेला कोरडा चीक गोळा करतात. "हा आहे ओट्टूकारा" ते समजावून सांगतात "दिवसाचा ताजा चीक गोळा झाल्यानंतर उरलेला चीक वाटीत ओघळून रात्रभर सुकतो."
सुकेलेला चीक साधारण ६०-८० रुपये किलोने विकला जातो. तेवढेच चार पैसे जादा मिळतात. दोन आठवडे ओट्टुकारा गोळा केल्यानंतर ते बाजारात विकतात.
वाटी रिकामी करून त्यात ताजा चीक जमवण्यासाठी ते झाडाच्या खोडाला नवा एका इंची काप देतात. आणि हीच प्रक्रिया त्यांच्या राईतल्या एकूण २९९ झाडांवर करावी लागते.
श्रीरंगन चिकाचे काम करत असताना लीला घरातील कामे आटपून नाश्ता बनवतात. तीन तास काम उरकून श्रीरंगन घरी नाश्ता करण्यासाठी येतात. थोट्टमलाई डोंगरापाशी त्यांचं घर आहे. जवळून कोडाईयार नदी वाहते. घरी हे दोघंच राहतात - त्यांच्या दोन्ही मुलींची लग्नं झाली असून त्या आपापल्या सासरी नांदत आहेत.
सकाळच्या साधारण दहा वाजता लीला आणि श्रीरंगन वाटीत जमलेला पांढरा शुभ्र चीक गोळा करण्यासाठी एकेक बादली घेऊन राईत परतात. दीड तासात हे काम संपवून दुपारपर्यंत दोघे घरी येतात. येथे आराम करण्यासाठी वेळच नाही, रबराच्या शीट्स बनवण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरु झाली पाहिजे नाही तर चीक सुकायला सुरुवात होते.
लीला चिकात पाणी मिसळायला सुरुवात करतात. "जर चीक घट्ट असेल तर आपण वरून पाणी टाकू शकतो. पण त्याच्या शीट्स बनवायला खूप वेळ लागतो," ५० वर्षीय लीला सांगतात.
लीला आयताकृती साचा धरतात आणि श्रीरंगन त्यात मिश्रण ओततात. सर्व साच्यांमध्ये चीक ओतण्याचं काम होईपर्यंत लीला सांगतात, "ह्या साच्यात आम्ही दोन लिटर मिश्रण आणि थोडं ॲसिड भरतो. पाणी किती आहे त्यावर ॲसिडचं प्रमाण ठरतं. आम्ही ते मोजत नाही."
मे महिन्यात पारीने त्यांची भेट घेतली तेव्हा रबराचा हंगाम नुकताच सुरु झाला होता आणि त्यांना दिवसभरात फक्त सहा शीट रबर मिळत होतं. हंगाम मार्च पर्यंत चालू राहतो आणि एका वर्षभरात ते सुमारे १३०० शीट्स तयार करू शकतात.
श्रीरंगन सांगतात, "प्रत्येक शीटमध्ये ८००-९०० ग्राम चीक असतो,” लीला काळजीपूर्वक ॲसिड मिसळायला सुरुवात करतात.
१५ मिनिटांनी चीक गोठतो आणि त्यापासून रबराची शीट बनण्याची प्रक्रिया सुरु होते. हा चीक दोन प्रकारच्या रोलर मशिनींतून जातो. पहिली मशीन ४ वेळा वापरून एक सामान जाडीची पातळ शीट बनवली जाते, दुसरी मशीन वापरून तिला आकार दिला जातो. ह्या शीट्स नंतर पाण्याने धुतल्या जातात. “काही जण एका शीटमागे २ रुपये भावाने मजूर लावून हे काम करतात. पण आम्ही ह्या रबराच्या शीट्स स्वतःच बनवतो,” लीला सांगतात.
आकार दिलेल्या रबराच्या शीट्स प्रथम उन्हात सुकवल्या जातात. श्रीरंगन आणि लीला ह्या शीट्स कपड्याच्या वळणीवर टाकतात. दुसऱ्या दिवशी ह्या शीट्स ते आपल्या स्वयंपाकघरात ठेवतात.
लीला एक लहान पडदा सरकवून सरपणाच्या वरती टांगलेल्या रबर शीट्स दाखवतात. "चुलीच्या उष्णतेने शीट्स सुकतात. एकदा ह्या शीट्स तपकिरी रंगाच्या झाल्या म्हणजे त्या पूर्णपणे सुकल्या असं समजायचं," गठ्ठयातील एक शीट काढून दाखवत त्या सांगतात.
पैशाची निकड असेल तेव्हा हे दोघं काही शीट्स जमा करून आठ किलोमीटर दूर असलेल्या रबर शीट्सच्या दुकानात विकतात. "ह्याचा काही निश्चित दर नसतो," श्रीरंगन सांगतात. त्यांचं उत्पन्न दर दिवशीच्या बाजारभावानुसार बदलतं. "सध्या १३० रुपये किलो असा भाव आहे," ते सांगतात.
“गेल्या वर्षी साधारण ६०,००० मिळाले (रबर शीट्स चे उत्पन्न)” ते सांगतात." जर खूप पाऊस असेल किंवा खूप उकाडा असेल तर आम्ही चीक काढायला जाऊ शकत नाही," लीला सांगतात. तेव्हा फक्त ऊन किंवा पाऊस थांबण्याची वाट बघावी लागते.
रबराची २० वर्षांची जुनी झाडं काढून त्या जागी नवी रोपं लावली जातात कारण जुन्या झाडातून पुरेसा चीक मिळत नाही. ह्या नवीन झाडांपासून चिकाचं उत्पादन सुरू व्हायला ७ वर्षे लागतात. "काही लोक १५ वर्षानंतर तर काही ३० वर्षांनंतरही झाडं काढतात. झाडापासून किती चीक निघतो यावर ते अवलंबून असतं,” श्रीरंगन सांगतात.
भारत सरकारच्या रबर बोर्डाच्या माहितीनुसार, गेल्या १५ वर्षात रबर लागवडीचे क्षेत्रफळ ३७ टक्क्यांनी वाढलं तरी ह्याच कालावधीमध्ये उत्पन्न मात्र १८ टक्क्यांनी घसरलं आहे.
"आमच्या कामातील नफा ऋतूनुसार बदलतो," श्रीरंगन सांगतात. म्हणूनच त्यांनी कमाईचे इतर पर्यायही ठेवले आहेत - वर्षातून एकदा ते लवंग आणि काळ्या मिरीची लागवड करतात.
“कापूस आणि इतर पिकांप्रमाणे काळ्या मिरीच्या हंगामातील नफा मिरीच्या बाजार विक्रीवर अवलंबून असतो. ह्या काळामध्ये [मे महिना] हिरव्या मिरीचे १२० [रुपये] प्रति किलो मिळतात. एका लवंगीचे १.५० रुपये आम्हाला मिळतात.” हंगाम चांगला असेल तर त्यांना २०००-२५०० लवंगा मिळतात.
श्रीरंगन गेल्या १५ वर्षांपासून ऊर थलैवर (समाज प्रमुख) सुद्धा आहेत. “लोकांनी मला माझ्या चांगल्या वक्तृत्वकलेमुळे निवडला. पण आता वयामुळे मला सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही,” ते म्हणतात.
“मी गावात प्राथमिक शाळा [जीपीएस -थोट्टमलाई] आणली आणि रस्ता बनण्यासाठीही प्रयत्न केले,” ते आनंदाने सांगतात.