७ फेब्रुवारी २०२१. सकाळी १०.३० वाजता आपल्या नवऱ्याला, अनास शेखला फोन केला तो लागला नाही. पण रेहना बीबींना त्यात फार काही नवल वाटलं नाही. दोनच तासापूर्वी त्यांचं बोलणं झालं होतं. “सकाळीच त्यांची आजी वारली,” रेहना सांगतात. सकाळी ९ वाजताच त्यांनी फोनवर ही बातमी सांगितली होती.
“तसंही मयतीला ते पोचूच शकले नसते. म्हणून त्यांनी दफन करत असताना मला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं,” ३३ वर्षीय रेहना सांगतात. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात भगबानपूर गावातल्या आपल्या एका खोलीच्या घरात त्या बसल्या आहेत. अनास १७०० किलोमीटर दूर आहेत – उत्तराखंडच्या गढवालच्या पर्वतरांगांमध्ये. रेहनानी दुसऱ्यांदा त्यांना फोन केला तेव्हा काही तो लागला नाही.
रेहनांच्या या दोन फोनच्या मधल्या काळात उत्तराखंडच्या चमोलीमध्ये आभाळ कोसळलं होतं. नंदा देवी हिमनदीचा एक तुकडा तुटला आणि त्यामुळे अलकनंदा, धौली गंगा आणि ऋषी गंगा नद्यांना पूर आला. नदीकठावरची घरं त्या महापुरात वाहून गेली. या भागातल्या जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे कामगार तिथेच अडकून पडले.
अनास त्यांच्यातलेच एक. रेहनांना याची काहीच कल्पना नाही. आणखी काही वेळा त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र त्यांना चिंता वाटायला लागली आणि मग मात्र भीतीने मन व्यापून टाकलं. “मी सतत फोन करत होते,” अश्रूभरल्या डोळ्यांनी त्या सांगतात. “दुसरं काय करायचं मला सुचतच नव्हतं.”
चमोलीहून ७०० किलोमीटरवर, हिमाचल प्रदेशाच्या किन्नौरमध्ये अनास यांचा धाकटा भाऊ अक्रम याने टीव्हीवर बातमी पाहिली. “माझा भाऊ काम करायचा तिथनं पुराची जागा फार काही लांब नव्हती. मला वाईटाची चाहुल लागायला लागली,” तो म्हणतो.
पुढच्या दिवशी २६ वर्षीय अक्रम किन्नौर जिल्ह्यातल्या टापरी गावाहून बसने निघाला. अनास काम करायचा त्या चमोलीतल्या ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्पाचं काम जिथे सुरू होतं त्या रैनीला (रैनी चाक लाटा गावापाशी) तो पोचला. तिथे राष्ट्रीय आपत्ती निवारण समूहाचे लोक कुणी वाचलंय का त्याचा शोध घेत होते. “माझ्या भावाबरोबर काम करणाऱ्या एकाशी माझी गाठ पडली. ५७ जणांच्या गटापैकी तो एकटाच वाचला होता. बाकीचे सगळे वाहून गेले.”
अक्रमने चमोलीहून रेहनांना फोन केला पण ही बातमी देण्यास त्याचं मन धजावलं नाही. “मला अनासच्या आधार कार्डाची प्रत हवी होती म्हणून मी त्यांना ती पाठवायला सांगितली. मला ती कशासाठी हवी होती हे त्यांना लगेच समजलं,” तो म्हणतो. “मला पोलिसांना माझ्या भावाबद्दल कळवायचं होतं, त्याचा मृतदेह सापडलाच तर...”
३५ वर्षीय अनास ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्पाच्या उच्च दाब पारेषण वाहिनीवर लाइनमन म्हणून काम करत होते. महिन्याला २२,००० रुपये पगार होता. मालदाच्या कालियाचाक III तालुक्यातल्या त्यांच्या गावातल्या इतर पुरुषांप्रमाणेच तेही वयाच्या विशीपासूनच कामासाठी स्थलांतर करत होते. घरी केवळ काही दिवसांसाठी परत यायचे. चमोलीच्या पुरात गायब होण्याआधी ते १३ महिन्यात फक्त एकदाच आपल्या गावी भगबानपूरला परत आले होते.
अक्रम सांगतो की विद्युत प्रकल्पावर लाइनमनचं काम म्हणजे विजेचे टॉवर उभारायचे, वायरिंग चेक करायचं आणि काही दोष असतील तर ते दुरुस्त करायचे. अक्रम देखील हेच काम करतो. त्याचं १२ वी पर्यंत शिक्षण झालं आहे. वयाची २० वर्षं पूर्ण झाल्यानंतर तो कामासाठी स्थलांतर करू लागला. “आम्ही काम करता करताच शिकलो,” तो म्हणतो. तो सध्या किन्नौरमध्ये एका जलविद्युत प्रकल्पावर काम करतोय, जिथे त्याला महिन्याला १८,००० रुपये पगार मिळतो.
कित्येक वर्षांपासून भगबानपूरची पुरुष मंडळी उत्तराखंडमधल्या विद्युत प्रकल्पांवर कामासाठी जात आली आहेत. ५३ वर्षीय अखिमुद्दिन २५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिथे लाइनमन म्हणून कामासाठी गेले. “मी हिमाचल प्रदेशात होतो. मी सुरुवात केली तेव्हा दिवसाला २५० रुपये मिळायचे,” ते सांगतात. “जमेल तितकी कमाई करायची, थोडा पैसा जवळ ठेवायचा आणि बाकीचा घरी भागवण्यासाठी पाठवायचा.” त्यांच्या पिढीत ओळखी, संबंध प्रस्थापित झाले आणि अनास आणि अक्रमला त्यांच्या पावलावर पाऊल टाकून कामासाठी जाणं सोपं झालं.
पण त्यांचं काम म्हणजे कायमच धोक्याची टांगती तलवार. विजेचा धक्का बसून आपल्या कितीतरी सहकाऱ्यांचा जीव गेलेला किंवा त्यांना इजा झालेली अक्रमने पाहिली आहे. “भीतीदायक असतं ते. आम्हाला संरक्षण तसं फारसं नसतंच. कधीही काहीही होऊ शकतं.” उदा. एखादी नैसर्गिक आपत्ती. चमोलीत अनास वाहून गेले तशी (ते अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही). “पण आमच्यापाशी पर्याय नाही. आम्हाला पोटासाठी कमवायला तर पाहिजेच. मालदामध्ये काहीही काम नाही. त्यामुळे तिथून बाहेरच पडावं लागतं.”
देशातल्या सर्वात गरीब जिल्ह्यांमध्ये मालदाची नोंद होते. इथली बहुसंख्य ग्रामीण जनता गरीब आणि मजुरीवर अवलंबून असणारी आहे. “या जिल्ह्यातल्या रोजगाराचा मुख्य स्रोत म्हणजे शेती.” मालदाचे वरिष्ठ पत्रकार शुभ्रो मैत्रा सांगतात. “पण शेतीचा आकार पाहिलात तर बहुतेक छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत. यातली बरीचशी शेती वारंवार येणाऱ्या पुराखाली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला आणि शेतमजुराला ती करण्यासारखीच नाही.” या जिल्ह्यात कोणते उद्योग नाहीत त्यामुळे लोक कामाच्या शोधात राज्याच्या बाहेर जातात, ते सांगतात.
२००७ साली पश्चिम बंगाल शासनाने प्रकाशित केलेला जिल्हा मानव विकास अहवालः मालदा कामगारांच्या स्थलांतरामागच्या कारणांवर प्रकाश टाकतो. हा अहवाल सांगतो की पाण्याचं असमान वाटप आणि शेतीसाठी वातावरण साजेसं नसल्यामुळे त्याचा शेतमजुरीवरही विपरित परिणाम होताना दिसतो. शहरीकरणाचा संथ वेग, औद्योगिक उपक्रम नाहीत आणि ग्रामीण भागात हंगामापुरतंच काम मिळत असल्यामुळे मजुरीत घट झाली आहे. त्यामुळे छोट्या कामगारांना कामाच्या शोधात दूरवर जावं लागतं असं हा अहवाल सांगतो.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, देशभर कोविड-१९ ने उसळी घेतलेली असताना, ३७ वर्षीय नीरज मोंडल बरं काम मिळण्याच्या आशेने मालद्याहून दिल्लीला निघाले. पत्नी आणि दोघं किशोरवयीन मुलं माघारी, मालदाच्या माणिकचाक तालुक्यातल्या भुतनी दियारामध्ये (नदीतलं बेट) राहिली. “मास्क घालायचा आणि पुढे निघायचं,” ते म्हणतात. “[२०२० च्या] टाळेबंदीपासून तसं तर फारसं कामच नाहीये. सरकार काय देईल त्यावर आम्ही निभावून नेलं, पण हातात पैसाच नाही. मालदात तसंही फार काम नसतं.”
नीरजला मालदात रोजंदारीवर काम केलं तर २०० रुपये मिळायचे. दिल्लीत त्याच कामासाठी ५००-५५० रुपये. “तुम्ही जास्त पैसे वाचवू शकता आणि माघारी पाठवू शकता,” ते सांगतात. “आता, घरच्यांची कमी भासणारच. दूरदेशी जायची कुणाल हौस आहे?”
बंगालच्या विधान सभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पण आपलं मतदान चुकणार याची नीरज यांना खंत नाही. “खऱ्यात काही बदलत नाही,” ते सांगतात. “मला आठवतंय त्याप्रमाणे आमच्या गावाहून लोक कायमच कामासाठी स्थलांतर करत आलेत. ते थांबवून त्यांच्यासाठी रोजगार तयार व्हावा म्हणून कुणी काय केलंय? मालदात जे काम करतायत ना, त्यांचं कसंबसं भागतंय.”
गुलनुर बीबींना याची पूर्ण कल्पना आहे. निजमिल शेख, वय ३५ इथल्या दुर्मिळ लोकांपैकी एक, जे भगबानपूर (लोकसंख्या १७,४००, जनगणना २०११) गाव सोडून गेलेले नाहीत. या कुटुंबाची गावात पाच एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे. पण निजमिल इथून ३० किलोमीटरवर, मालदा शहरातल्या बांधकामावर काम करतात. “त्यांना दिवसाला २००-२५० रुपये मिळतात,” ३० वर्षीय गुलनुर सांगतात. “पण काम कधीकधीच मिळतं. अनेकदा तर ते हात हलवत घरी परततात.”
इतक्यात गुलनुर यांची एक शस्त्रक्रिया झाली ज्यासाठी रु. ३५,००० इतका खर्च आला. “आम्ही त्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकला,” त्या सांगतात. “अचानक काही उद्भवलं तर त्यासाठी आमच्यापाशी पैसाच नसतो. आमच्य मुलांना आम्ही शिक्षण तरी कसं द्यायचं?” गुलनुर आणि निजमिल यांना ६ ते १६ वयाच्या तीन मुली आणि दोन मुलं आहेत.
अनास बेपत्ता झाले तोपर्यंत रेहना यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा घोर नव्हता. वडील पैसे पाठवत होते त्यावर त्यांची मुलगी नसरीबा, वय १६ आणि नसीब, वय १५ यांचं शिक्षण सुरू होतं. “त्यांच्या स्वतःसाठी ते फार काही ठेवतच नव्हते,” रेहना म्हणतात. “ते आधी रोजंदारीवर काम करत होते. पण इतक्यात त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली होती. आम्हाला त्यांचा इतका अभिमान वाटत होता.”
चमोलीच्या आपत्तीला नुकतेच दोन महिने उलटलेत. पण अनास बेपत्ता झालेत हे अजून पटतच नाहीये, रेहना म्हणतात. भविष्याबद्दल विचार करायला तर या कुटुंबाला वेळच मिळाला नाहीये. रेहना इतके दिवस घर सांभाळत होत्या. आता त्या गावात अंगणवाडी किंवा आरोग्य कर्मचारी म्हणून काम करता ईल का याचा विचार करतायत. त्या जाणून आहेत की त्यांना नोकरी करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण पण घ्यावं लागणार आहे. “मला माझ्या मुलांच्या शिक्षणात खंड पडायला नको आहे,” त्या म्हणतात. “ते सुरू राहण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन.”
अनुवादः मेधा काळे